
अॅड. सूरज मळीक
गोवा हा प्रदेश हिमालयापेक्षाही जुना असलेल्या पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला असल्यामुळे येथे नाना तर्हेच्या दुर्मीळ व प्रदेशनिष्ठ जीवनसृष्टीचे अप्रूप दर्शन घडत असते. गोव्याचा नकाशा न्याहाळताना एका बाजूने सरळ रेषेत भरपूर किलोमीटर अंतरात व्यापलेल्या याच हिरवळीचे विहंगम दृश्य नजरेस पडते.
या पर्वतरांगांत अनेक ठिकाणी विस्तीर्ण पसरलेले कातळ दगडाने युक्त पठार पर्यावरणीय परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. पठारावर मातीचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या किंवा नैसर्गिकरीत्या जमिनीवर पडलेल्या बिया क्वचितच रुजून येतात. त्यामुळे विशेषत: उष्णता सहिष्णू वृक्ष येथे दृष्टीस पडतात.
जे उन्हाचा मारा सहन करत, कमी पाण्याचा उपयोग करून तग धरून उभे राहतात. मुळे येथे सावर, पंगारा, उक्शी यांसारखी भरपूर फुलांनी बहरणारी झाडे, चविष्ट रानमेवा उपलब्ध करून देणारी करवंद, चुन्ना, चारा, भेडसा, त्याच बरोबर गेळा, कुंभा यांसारखी झाडे विशेषत: पठारावरती आढळतात. मातीमध्ये नायट्रोजन कमी प्रमाणात असल्यामुळे येथे आढळणाऱ्या तृण वनस्पतीसुद्धा कीटकभक्षी असतात.
पठारावरील पुष्प बहार अनुभवण्यासाठी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू महत्त्वाचे असतात. उन्हाळ्यात लाल फुलांनी बहरणारी जमिनीवर ‘पसरणारी कोच’ किंवा ‘शंखपुष्पी’ नामक फुले उन्हात प्रसन्नतेने कशी काय बहरतात हे एक कोडेच बनलेले असते. काही मोजकीच फुले सोडली तर उन्हाळ्यातील पठाराचे दृश्य बहुतेक ठिकाणी पूर्णपणे कोरडे असते.
वर्षा ऋतूत प्रवेश करताना मात्र निरुपयोगी वाटणारे हे पठार पाण्याच्या आधारे वैविध्यपूर्ण फुलांच्या घमघमाटाने नाना विविध प्रजातींच्या फुलपाखरांबरोबर पक्षी, पतंग, कृमी कीटक व पठारावर वास्तव्य करणाऱ्या लहानमोठ्या प्राण्यांना जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळे मान्सूनच्या पावसानंतर कातळ सडे पक्ष्यांच्या किलबिलाटात, मधमाश्यांच्या गुंजनात गजबजलेले असतात.
बार्देश तालुक्यातील सुकूर ग्राम पंचायत क्षेत्रात येणारा सुकर पठार पश्चिम घाटापासून कित्येक किलोमीटर दूर असून अरबी समुद्रापासून काहीच किमी अंतरावर असला तरी येथे गोव्यातील पानगळतीच्या घनदाट जंगलात आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ घटकांचे दर्शन घडते.
पठाराच्या सीमा उसकई, पालिये, पोंबुर्पा, साल्वादोर दि मुंद आणि आराडी या गावांशी भिडलेल्या आहेत. अभ्यासकांच्या दृष्टीने ‘ब्लू ओक लिफ’ हे फुलपाखरू प्रदेशनिष्ठ असून ते पश्चिम घाटातील घनदाट जंगलात आढळून येते.
जंगलात भ्रमंती करत असताना पाणथळ जागेत विशेषत: त्याचे दर्शन होते. परंतु मान्सूननंतरच्या कालखंडात सुकूर पठाराच्या बाजूने असलेल्या जंगलातसुद्धा या फुलपाखराचे दर्शन कसे काय होते ही आश्चर्यजनक बाब आहे. इथे आलेल्या निसर्गप्रेमींना सुकलेल्या पानासारखा आकार आणि रंग असलेल्या या फुलपाखराचे दर्शन होताच आपण घनदाट जंगलात आल्यासारखा भास होतो.
हे फुलपाखरू येथील पर्यावरणीय परिसंस्थेच्या चांगल्या आरोग्याचे द्योतक आहे. आराडी सुकूरहून काहीच अंतरावर मोठ्या संख्येने भेरली माडाबरोबर जंगलात आढळणाऱ्या लाएनासारख्या वेली काही झाडांवर चढलेल्या एक देवराईत पाहायला मिळतात. ‘मंकी पझल’, ‘कॉमन ग्रास येलो’, ‘कॉमन ब्ल्यू बॉटल’ यांसारखी फुलपाखरे तर हमखास नजरेस येतात.
सकाळ ते संध्याकाळ आकाशात गोलाकार फिरत ‘टीट टीट टिटिव’ करणारी टिटवी हमखास नजरेस पडते. काही वेळा त्यांची लहान पिल्ले पाठीमागे चालत जाताना दिसतात. संख्याकाळ होताच बेडकांच्या आवाजाबरोबर रातवा नामक पक्ष्याचा आवाज कानावर पडतो. आपले तोंड उघडे ठेवून उडत असताना कीटकांची शिकार करताना तो दृष्टीस पडतो.
पठार हा सच्छिद्र असलेल्या कातळ दगडांनी युक्त असल्यामुळे मान्सूनमध्ये पडलेला मुसळधार पाऊस आपल्या गर्भात शोषून घेण्याची ताकद या पठारामध्ये असते. त्यामुळे पावसाचे पाणी काही प्रमाणात दगडामध्ये मुरते आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढते.
यामुळेच या दगडाला मुरुड दगड असेही म्हटलेले असून कातळ सड्यांना नैसर्गिक पर्जन्य जलसंचय करण्याचे साधन असेही म्हटलेले आहे. पावसाळ्यात ठीकठिकाणी पाणी साचून डबकी तयार होतात त्यामुळे बेडकांच्या वैविध्यपूर्ण प्रजाती येथे आढळतात. पठाराच्या कडेने वृक्षाच्या छायेत कातने नामक भाजी आढळते तर पठारावर या दिवसात फुलांनी बहरणारी कुर्डुची भाजीही उगवलेली दिसते.
पठारावरील डबक्याजवळ उगवलेले लाल रंगाचे तेरडे, पिवळ्या रंगाची सोनकी, जांभळ्या रंगाची सीतेची आसवे व धनगरी फेटा या सारख्या पुष्प वनस्पतींचे रूप जेव्हा पाण्यात प्रतिबिंबित होते तेव्हा फुलांच्या घमघमाटा बरोबर हे दृश्य मन लुभावणारे असते.
श्रावणात सुरू झालेला तृण वनस्पतींचा बहर भाद्रपद, आश्विन महिन्यात शिगेला पोहोचतो. सातारा येथील कास पठारावरील पुष्पोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भारताबरोबर इतर प्रांतातील अभ्यासकांची रेलचेल तेथे सुरू असते. या पठाराची विशेषत: म्हणजे मान्सूनच्या आगमनापासून पुढे सरकणाऱ्या प्रत्येक महिन्यात तो वेगवेगळे रंग धारण करतो.
कारण तिथे ठरावीक वेळेत संपूर्ण पठारावर एकसारखीच फुले वर्चस्व मिरवत असतात. सुकूर पठारावरती फक्त काहीच ठिकाणी एक एक प्रजाती भरभरून वाढलेल्या दिसतात. त्यामुळे संपूर्ण पठार रंगीबेरंगी दिसतो. जांभळ्या रंगाची मुरडानिया सेमीटरेस, पिवळ्या रंगाची स्मितिया सेन्सिटिवा, धनगरी फेटा या पठारावर वर्चस्व गाठतात.
काही विशिष्ट ठिकाणी दरवर्षी सीतेची आसवे समूहामध्ये बहरतात, कुठे प्रदेशनिष्ठ असलेली ड्रॉसेरा इंडिका लाल फुलांनी बहरून आपल्या चिकट अंगातून भक्षकांना चिटकवून ठेवतात, तर कुठे भरपूर प्रमाणात बहरलेली सुगंधित हबेनरिया डायफायला त्या भागाला पांढऱ्या रंगाचा साज चढवतात. सेरोपेजिय अट्टेनुयेटा, इफिजेनिया मॅगनिफिका या भरपूर कमी प्रमाणात आढळणाऱ्या प्रजातींचे दर्शनही येथे घडते.
सुकूर पठाराला ज्याप्रमाणे नैसर्गिक वैभव लाभलेले आहे त्याचप्रमाणे एका ठिकाणी गवत विरहित कातळ पृष्ठभागावर कोरलेली चित्रे त्याला पुरातत्त्वीय महत्त्व प्रदान करतात. यामध्ये दोन ठिकाणी दोन सरळ रेषेत कप मार्क दर्शविलेले आहेत. त्याच्या शेजारी अनियमित पद्धतीने उभी आणि आडवी रेषा मारून ’अधिक’ चिन्ह दर्शविलेली आहेत.
त्याचबरोबर येथे जो मोठ्या आकाराचा वळणदार मासा दर्शविलेला आहे तो आपल्याला विचार करायला लावण्यासारखा आहे. आजूबाजूला गवत वाढलेले आहे. इतरत्र परिसर विविध फुलांनी सजलेला आहे तरी चित्र काढलेल्या ठिकाणी कधीही गवत उगवून येत नाही.
इतक्या उंच भागात मासा काढण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? इथे जवळ नदी होती का? काय हा आदिमानवाने रचलेला खेळ आहे? काय ही कलाकृती कुठल्या दैवी शक्तीला प्रेरित करण्यासाठी बनवलेली आहेत? हे सांगणे कठीणच.
परंतु या कोरलेल्या चित्राबद्दल गावातील लोकांकडून जी कथा ऐकायला मिळते त्यामध्ये हा कोणताही मासा नसून ते एक शस्त्र असल्याचे सांगितले जाते. त्याला कोयता असे म्हणतात. तर त्याच्या जवळच कातळ दगडातच कोरून बनवलेला जणू मोठ्या आकाराचा खड्डा आहे. कोयता घेऊन कुणाचा तरी वध केला आणि रक्त त्या खड्ड्यात साठवले होते अशी कथा सांगितली जाते. गावातील जाणकार, वयस्क माणसांशी विचारपूस करून यासारख्या ठिकाणांचा शोध घेऊन त्यांना संरक्षण दिले तर त्यामागचा इतिहास जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.