SME Management Strategies: लघु-मध्यम उद्योगांसाठी 'सहासूत्री'; व्यवसाय टिकवायचा असेल तर ‘या’ 6 गोष्टी लक्षात ठेवा

Six M Management Principles: लघु व मध्यम उद्योगांचे महत्त्व देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अनन्यसाधारण आणि मोठे आहे.
Six M Management Principles
SME Management StrategiesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वाय. एच. घारपुरे

लघु व मध्यम उद्योगांचे महत्त्व देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अनन्यसाधारण आणि मोठे आहे. व्यवस्थापनशास्त्रातील काही मार्गदर्शक तत्त्वे नीट लक्षात घेतली तर त्यांना तग धरून राहणे शक्य होईल. त्या तत्त्वांची माहिती.

अनेक लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील चांगली कल्पना, भांडवल किंवा तांत्रिक कौशल्य असूनही अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. त्यामागे अनेकदा व्यवस्थापनातील मूलभूत त्रुटी असतात. प्रत्येक उद्योजकाला व्यवस्थापनशास्त्राचे सखोल शिक्षण मिळालेले असेलच असे नाही. त्यामुळे व्यवसायातील महत्त्वाच्या घटकांकडे साध्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने पाहणे गरजेचे आहे. यासाठी ‘६-एम’ व्यवस्थापन सूत्र उपयुक्त ठरते. त्यातील सहा ‘एम’ म्हणजे पैसा, मनुष्यबळ, साहित्य, विपणन, उत्पादन आणि कार्यपद्धती.

Six M Management Principles
Goa Politics: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पुन्हा जवळ येणार? सरदेसाईंच्या नव्या पवित्र्याने दक्षिण गोव्याचे राजकीय गणित बदलले

१. पैसा : लघु व मध्यम उद्योगांसाठी पैसा म्हणजे केवळ भांडवल नव्हे, तर त्याचा योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी वापर. उद्योगाची ‘ब्रेक-इव्हन’ क्षमता समजून घेणे अत्यावश्यक आहे. स्थिर खर्च आणि परिवर्तनीय खर्च मिळून जेवढा खर्च होतो, तेवढे उत्पन्न मिळण्याची पातळी म्हणजे ‘ब्रेक-इव्हन’. उद्योगाने या पातळीपेक्षा अधिक क्षमतेने काम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रोकड कुठे अडकली आहे, यावरही लक्ष हवे. ग्राहकांकडील येणी, कच्चा माल, प्रक्रियेतील माल आणि तयार मालाचा साठा यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा अडकू शकतो. त्यामुळे रोकड प्रवाहाचे नियमित नियोजन आवश्यक आहे.

२. माणसे : योग्य मनुष्यबळ व त्यांना योग्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. यंत्रे आणि भांडवलापेक्षा माणसे उद्योगाच्या यशात अधिक निर्णायक ठरतात. कर्मचारी वेळेवर कामावर येणे, कामात सातत्य ठेवणे आणि जबाबदारीने काम करणे यासाठी विश्वासाचे वातावरण आवश्यक आहे. यासाठी नैसर्गिक न्यायाची तीन तत्त्वे महत्त्वाची आहेत. कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडण्याची संधी, निर्णयात पूर्वग्रहाचा अभाव आणि निष्पक्ष वागणूक. त्याचबरोबर शिक्षण आणि प्रशिक्षण यातील फरक समजणे आवश्यक आहे. शिक्षण क्षमता निर्माण करते; प्रशिक्षण त्या क्षमतेचे कार्यक्षमतेत रूपांतर करते.

३. साहित्य : कच्चा माल, प्रक्रियेतील माल आणि तयार मालाचा अनावश्यक साठा म्हणजे अडकलेली रोकड. त्यामुळे साहित्य व्यवस्थापनाचा थेट संबंध रोकड प्रवाहाशी आहे. ज्या वस्तूंमध्ये सर्वाधिक पैसा अडकला आहे, त्यांच्यावर विशेष नियंत्रण ठेवता येते. मोठ्या प्रमाणावर कमी किमतीचा साठा आणि कमी प्रमाणात महाग साठा यातील फरकही समजून घ्यावा लागतो. उद्दिष्ट एकच, गरजेपुरता साठा आणि कमीत कमी अडकलेली रोकड.

४. विपणन : विपणनाचा विचार उत्पादन सुरू झाल्यानंतर नव्हे, तर प्रकल्पाच्या संकल्पनेपासूनच झाला पाहिजे. उत्पादन किती विकले जाईल, कोण खरेदी करेल, कोणत्या किमतीला खरेदी करेल आणि बाजारपेठ किती स्थिर आहे, याचा आधीच विचार आवश्यक आहे. ब्रेक-इव्हन क्षमतेइतकी बाजारपेठ आधी निश्चित झाली तर उद्योगाचा धोका कमी होतो. विपणन म्हणजे केवळ तयार माल विकणे नव्हे; ग्राहकाच्या मनात उत्पादनाची गरज निर्माण करणे आणि त्याला उत्पादन सहज उपलब्ध करून देणे होय.

Six M Management Principles
BJP Goa: 'सेवा ज्योती'ने दाखवली भाजपची ताकद; CM सावंत-नाईकांसह मंत्री, आमदार रस्त्यावर, 4 महिन्यांवरच्या निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन

५. उत्पादन : उत्पादनातील यंत्रसामग्री शक्य तितक्या कार्यक्षमतेने चालणे, अनावश्यक बंद राहण्याचे प्रमाण कमी असणे आणि सातत्यपूर्ण कामगिरी मिळणे आवश्यक आहे. यंत्रसामग्रीची निवड करताना केवळ सुरुवातीची किंमत पाहणे पुरेसे नाही. सिद्ध झालेले तंत्रज्ञान, विश्वासार्ह यंत्रणा आणि दीर्घकालीन देखभाल यांचाही विचार करावा. उत्पादनाच्या शेवटी केवळ माल तयार झाला की काम संपत नाही. गुणवत्ता, उत्पादनाचे प्रमाण आणि अपेक्षित क्षमता सिद्ध होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

६. पद्धत : चांगली माणसे, पैसा आणि यंत्रसामग्री असूनही योग्य कार्यपद्धती नसेल तर उद्योगाची कार्यक्षमता कमी होते. म्हणून प्रत्येक प्रक्रियेकडे सहा प्रश्नांनी पाहणे उपयुक्त ठरते—काय, का, कधी, कसे, कुठे आणि कोण? कामाची जबाबदारी कोणाची? ती पद्धत का वापरायची? काम कधी आणि कसे करायचे? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे असतील तर गोंधळ, विलंब आणि अनावश्यक खर्च कमी होतो. कार्यपद्धतीत सातत्य आणि शिस्त निर्माण होते.

Six M Management Principles
Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

या सहा घटकांकडे स्वतंत्रपणे पाहणे ही मोठी चूक ठरू शकते. पैसा अडकला तर साहित्य व्यवस्थापनावर परिणाम होतो. साहित्याचा प्रश्न निर्माण झाला तर उत्पादन थांबते. उत्पादन थांबले तर विपणन आणि रोकड प्रवाह बिघडतो. कुशल मनुष्यबळ नसेल तर उत्तम यंत्रसामग्रीही अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही. म्हणून लघु व मध्यम उद्योगांसाठी ‘६-एम’ ही केवळ व्यवस्थापनाची यादी नाही; ती उद्योगाच्या आरोग्याची तपासणी करणारी चौकट आहे. पैसा, माणसे, साहित्य, विपणन, उत्पादन आणि पद्धत, सहाही आघाड्यांवर शिस्त असेल तरच उद्योग टिकतो, वाढतो आणि स्पर्धात्मक बनतो.

(लेखक रासायनिक आणि औषधनिर्माण उद्योगातील सल्लागार आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com