Engineers Day 2025: हैदराबाद पूरमुक्त करणारे, आधुनिक म्हैसूरचे जनक! किमयागार भारतरत्न 'एम. विश्‍वेश्‍वरय्या'

M Visvesvaraya: विश्‍वेश्‍वरय्या यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत फार मोठे योगदान दिले आहे, त्यामुळे त्यांची जयंती भारतासह श्रीलंका आणि टांझनिया या देशांतही अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते.
Engineers Day 2025 | Visvesvaraya contributions to engineering
Engineers Day 2025 | Visvesvaraya contributions to engineeringDainik Gomantak
Published on
Updated on

उमेश शिरगुप्पे

अभियंता हा केवळ कल्पकच नव्हे तर, नवनिर्मिती करणारा अवलिया असतो. अभिनव कल्पनांना वास्तवात आणून वास्तू घडवणाऱ्या किमयागारांच्या अभियांत्रिकी ज्ञानामुळेच आज आपण प्रगतीची फळे चाखतो आहोत. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत फार मोठे योगदान दिले आहे, त्यामुळे त्यांची जयंती भारतासह श्रीलंका आणि टांझनिया या देशांतही अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंता नव्हते, तर ते थोर देशभक्तही होते. कर्नाटकाच्या कोलार जिल्ह्यातील मदनहळ्ळी गावात संस्कृत पंडिताच्या पोटी १५ सप्टेंबर १८६१ रोजी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती, तरीही संस्कृत पंडित असलेल्या विश्वेश्वरय्या यांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.

परिस्थितीशी दोन हात करत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अव्वल गुणांनी पूर्ण केले. नंतर गावातून ते उच्च शिक्षणासाठी बंगळुरुला आले. तिथेही त्यांनी विशेष गुणवत्ता मिळवून बी.ए. केले. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांना तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण झाली.

पण ते शिक्षण घेण्यासाठीची आर्थिक स्थिती नसल्याने त्यांनी म्हैसूरच्या राजाला मदतीसाठी साकडे घातले. म्हैसूरचे राजा वडेयार यांनी विश्‍वेश्‍वरय्या यांच्यातील बौद्धिक कुवत आणि गुणवत्ता हेरून त्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन पुण्याला पाठवले.

विश्वेश्वरय्या यांनीही त्यांच्यावर राजाने ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत अभियांत्रिकी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम क्रमांक पटकावला. या त्यांच्या यशाची दखल घेऊन १८८४ साली सरकारने त्यांना सहाय्यक अभियंता या पदावर नेमणूक दिली.

तिथेही त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. १९०३ साली त्यांनी पुण्याच्या खडकवासला धरणासाठी एक अभिनव अशा ‘स्वयंचलित गेट’ची निर्मिती केली. अशा गेटची निर्मिती भारतात पहिल्यांदाच झाली होती. या डिझाइनचे नाव पुढे ‘विश्वेश्वरय्या गेट’ असे झाले.

१९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती पत्करली. निवृत्तीनंतर निजाम सरकारने त्यांची विशेष सल्लागारपदी नियुक्ती केली. तिथे त्यांनी हैदराबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधून हैदराबाद शहर पूरमुक्त केलेच शिवाय शहराचा कायापालटही केला.

म्हैसूरच्या राजाने त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर दिली त्यांनी ती स्वीकारली. म्हैसूरचे मुख्य अभियंता असताना त्यांनी तिथे कृष्णराज सागर धरण, वृंदावन गार्डन बांधले तसेच विकासाची अनेक कामे केली.१९१५ मध्ये समाजहितासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ब्रिटीश सरकारने ‘कमांडर आॅफ दी आॅर्डर आॅफ दी इंडियन एम्पायर’ सन्मान बहाल केला.

सर एम. विश्वेश्वरय्या यांना "भारतातील आर्थिक नियोजनाचे जनक" म्हटले जाते, कारण त्यांनी देशात राष्ट्रीय आर्थिक नियोजनासाठी पद्धतशीर दृष्टिकोन प्रस्तावित केला आणि अंमलात आणला. त्यांच्या दृष्टिकोनाने आणि योगदानाने भारतातील भविष्यातील आर्थिक विकास धोरणांचा पाया घातला.

Engineers Day 2025 | Visvesvaraya contributions to engineering
International Literacy Day: 1950मध्ये टुरिंग टेस्ट सुचवली, यंत्राची बुद्धिमत्ता तपासली गेली; AI साक्षर होणं काळाची गरज

१९१७ मध्ये त्यांनी बेंगळुरूत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे या महाविद्यालयाचे विश्‍वेश्‍वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालय,असे नामकरण करण्यात आले. ‘आधुनिक म्हैसूरचे जनक’ या उपाधीनेही त्यांना १९६२ मध्ये सन्मानित करण्यात आले. विश्‍वेश्‍वरय्या यांनी सातत्याने अभियांत्रिकी क्षेत्रातच नव्हे तर समाजहितासाठी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या व्यतिरिक्त त्यांनी उद्योग व शेती सिंचनाची अनेक कामे केली. पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी ‘ब्लॉक सिस्टीम’ ही त्यांचीच देणगी आहे.

Engineers Day 2025 | Visvesvaraya contributions to engineering
Engineer's Day 2024: विश्वेश्वरैय्या यांची दूरदृष्टी! गाेव्‍यात साकारलेला पाणीपुरवठा प्रकल्‍प 67 वर्षांनंतरही अबाधित

म्हैसूरचे दिवाणपद सोडल्यावर त्यांनी अभियांत्रिकीच नव्हे तर उद्योग, शेती, नगर सुधारणा या योजनांत अतिशय मोलाचे कार्य केले. सर विश्वेश्वरय्या हे उच्चविद्याविभूषित असूनही त्यांची राहणी अतिशय साधी होती. म्हैसूरी फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचे व्यक्तिमत्त्वही आकर्षित करणारे होते. ते जितके साधे होते तितकेच ते सडेतोड आणि परखड होते. त्यांनी हयातभर पुरोगामी विचार जपले. ‘बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीला साजेशेच त्यांचे वर्तन होते, कारण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळे काही नसायचे.

वयाच्या ९४ व्या वर्षी म्हणजेच १९५५ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. विश्वेश्वरय्या हे शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव व्हावा, म्हणूनच आजचा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com