Engineer's Day 2024: विश्वेश्वरैय्या यांची दूरदृष्टी! गाेव्‍यात साकारलेला पाणीपुरवठा प्रकल्‍प 67 वर्षांनंतरही अबाधित

M Visvesvaraya: गोव्‍यातील पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा सर एम. विश्‍‍वेश्‍‍वरैया यांनी सुरू केला होता हे अजूनही कोणी विसरले नाही आहे
M Visvesvaraya: गोव्‍यातील पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा सर एम. विश्‍‍वेश्‍‍वरैया यांनी सुरू केला होता हे अजूनही कोणी विसरले नाही आहे
Opa Khandepar Project|M VisvesvarayaDainik Gomantak
Published on
Updated on

Engineer's Day |M Visvesvaraya

मडगाव: भारताच्‍या आधुनिक स्थापत्य अभियांत्रिकीचे जनक म्हणून ओळखले जाणारे एम. विश्वेश्वरय्या यांची १५ सप्‍टेंबर रोजी जयंती असून संपूर्ण देशात हा दिवस ‘अभियंता दिन’ म्‍हणून साजरा केला जातो. या महान अभियंत्‍याने गोव्‍यासाठीही काम केले हाेते. गोव्‍यात ओपा-फोंडा येथे जो जलशुद्धीकरण प्रकल्‍प (Opa Water Works) सुरू करण्‍यात आला, त्याचे डिझाईन स्‍वत: सर विश्वेश्वरय्या यांनी तयार केले होते.

हा प्रकल्‍प सुरू करताना अगदी बारीक-सारीक तपशील लक्षात घेऊन या प्रक़ल्‍पाची जागा ठरविली होती. या गोष्‍टीला आता ६७ वर्षे उलटली. मात्र, हा प्रकल्‍प अजूनही सुस्‍थितीत असून या प्रकल्‍पातून फोंडा आणि शिराेडा या दोन गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. याचे श्रेय विश्वेश्वरय्या यांनाच जाते, असे मत सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे पाणीपुरवठा विभागाचे निवृत्त मुख्‍य अभियंते श्रीकांत धोंड यांनी व्‍यक्‍त केले.

मडगाव, वास्‍को (Vasco) आणि पणजी या गोव्‍यातील तीन मुख्‍य शहरांना पाणीपुरवठा करण्‍यासाठी कुठली उंचवट्याची जागा योग्‍य ठरेल, हे स्‍वत: विश्वेश्वरय्या यांनी अभ्‍यासाअंती ठरविले. त्‍यासाठी ओपाची जागा निश्‍चित करण्‍यात आली. त्‍यावेळी आजच्‍यासारखी भूसर्वेक्षण करण्‍याची सर्व्हेलन्‍स प्रणाली उपलब्‍ध नव्‍हती. तरीही त्‍यांनी संपूर्ण गोव्‍याच्‍या भूपृष्‍ठाचा अभ्‍यास करीत ओपाची जागा निश्‍चित केली. या जलशुद्धीकरण प्रकल्‍पाची खासियत म्‍हणजे, खांडेपार नदीतून फारसा त्रास न घेता पाणी खेचले जाऊ शकते. तसेच सुरळीतपणे त्‍याचा तिन्‍ही शहरांत पाणीपुरवठा करणे शक्‍य झाले, असे धोंड यांनी सांगितले.

विश्‍‍वेश्‍‍वरैया हे फक्‍त कागदावर आराखडा काढून प्रकल्‍प राबविणारे अभियंते नव्‍हते, तर राज्‍याचे भूपृष्‍ठ, हवामान आणि इतर बाबीं लक्षात घेऊन त्‍या राज्‍याच्‍या वातावरणात चांगला प्रकल्‍प कसा उभारता येईल याकडे लक्ष देत होते. भविष्‍याचा विचार करून प्रकल्‍प डिझाईन करणारे होते. त्‍यामुळे हैदराबाद येथे त्‍यांनी तयार केलेली पूरप्रतिबंधक गटार व्‍यवस्‍था (Hyderabad Flood Control Sewerage System) आणि विशाखापट्टणम बंदरावरील क्षरणविरोधी (Anti-Erosion Mechanism, Visakhapatnam) यंत्रणा, या दोन्‍ही गोष्‍टींना जगमान्‍यता प्राप्‍त झाली. भारत सरकारने त्‍यांना ‘भारतरत्न' हा सर्वोच्‍च पुरस्‍कार देऊन गौरविले, असे खोलकर म्‍हणाले.

सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या पाणीपुरवठा विभागाचे अन्‍य एक निवृत्त मुख्‍य अभियंते उल्‍हास गायतोंडे यांनीही असेच मत व्‍यक्‍त करताना, पूर्ण अभ्‍यासाअंती गोव्‍यातील ओपा येथील हा पहिला जलशुद्धीकरण प्रकल्‍प उभारल्‍यामुळेच तो आजही कार्यक्षमपणे सुरू आहे आणि याचे सर्व श्रेय एम. विश्‍‍वेश्‍‍वरैया यांनाच जाते असे सांगितले.

सुमारे ८० हजार लोकांना पाणीपुरवठा करण्‍याची क्षमता या गोव्‍यातील पहिल्‍यावहिल्‍या जलशुद्धीकरण प्रकल्‍पाची आहे. त्‍यानंतर गोव्‍यात औद्योगिक आस्‍थापने वाढल्‍याने दहा वर्षांच्‍या कालावधीनंतर ओपा येथे आणखी एक नवा जलशुद्धीकरण प्रकल्‍प सुरू करण्‍यात आला. २८ सप्‍टेंबर १९६७ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या दुसऱ्या प्रकल्‍पाचे लोकार्पण केले होते.

हे पाणी नंतर कुर्टी-फोंडा येथील एका भूमिगत टाकीत सोडले जायचे आणि त्‍यातून प्रत्‍येकी दोन हजार घनमीटर क्षमतेच्‍या चार ओव्‍हरहेड टाक्‍यांतून ते पणजी, मडगाव आणि वास्को या शहरांना पुरविले जायचे. ‘आम्‍ही लहान असताना याच प्रकल्‍पातील पाण्‍याचा उपयोग करायचो आणि हे पाणी कुठलीही वेगळी प्रक्रिया न करता पिण्‍यासाठी योग्‍य होते, अशी प्रतिक्रिया निवृत्त मुख्‍य अभियंते धोंड यांनी व्‍यक्‍त केली.

सध्‍या ओपा जलशुद्धीकरण प्रकल्‍पात (Opa Water Purification Project) एकूण पाच वेगवेगळे प्रकल्‍प आहेत. त्‍यातील पहिला ८ एमएलडी क्षमतेचा सर एम. विश्‍‍वेश्‍‍वरैया यांनी डिझाईन केलेला प्रकल्‍प १९५७ साली कार्यान्‍वित करण्‍यात आला. दुसरा ५२ एमएलडी क्षमतेचा प्रकल्‍प १९६७ साली, तिसरा ५५ एमएलडी क्षमतेचा प्रकल्‍प १९७२ साली तर चौथा ४० एमएलडी क्षमतेचा प्रकल्‍प २००४ मध्‍ये सुरू करण्‍यात आला. फक्‍त पणजी शहराला पाणीपुरवठा करण्‍यासाठी २०२० मध्‍ये २७ एमएलडी क्षमतेचा पाचवा प्रकल्‍प कार्यान्‍वितकरण्‍यात आला. असे असले तरी गोव्‍यातील पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा सर एम. विश्‍‍वेश्‍‍वरैया यांनी सुरू केला होता, हे अजूनही कोणी विसरले नाही.

जर्मनीहून मागविली यंत्रसामग्री

या प्रकल्‍पासाठी १९५७ साली जर्मनीतून यंत्रसामग्री आयात केली होती. या प्रकल्‍पाच्या डिझाईनमध्ये मदत करण्यासाठी विश्वेश्वरय्या बंगळुरूहून गोव्‍यात आले. अजूनही हा प्रकल्‍प पूर्वीसारखाच कार्यक्षमपणे सुरू असून कार्बन ब्रशेस बदलण्यासारखी किरकोळ देखभालीची कामे सोडल्‍यास इतर फारशी देखभाल करावी लागत नाही, अशी माहिती ओपा जलशुद्धीकरण प्रकल्‍पाचे साहाय्यक अभियंता जयवंत प्रभू म्हणाले.

M Visvesvaraya: गोव्‍यातील पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा सर एम. विश्‍‍वेश्‍‍वरैया यांनी सुरू केला होता हे अजूनही कोणी विसरले नाही आहे
Engineer's Day: चांद्रयानासाठीची उपकरणे गोव्यातून पाठवली गेली याचाच अर्थ 'गोमंतकीय अभियांत्रिकी क्षेत्रात सक्षम'

विश्वेश्वरैय्या यांनी साकारले डिझाईन

गोवा मुक्‍त होण्‍याच्‍या चार वर्षे आधी म्‍हणजे १९५७ साली या प्रकल्‍पाचे उद्‍घाटन करण्‍यात आले. वास्‍को, मडगाव आणि पणजी या तीन शहरांना पाणीपुरवठा करणे शक्‍य व्‍हावे, यासाठी हा प्रकल्‍प सुरू केला होता. त्‍यावेळी या प्रकल्‍पाचे डिझाईन सर विश्वेश्वरय्या यांनी तयार केले हाेते. यासाठी ते स्‍वत: बंगळुरूहून गोव्‍यात आले हाेते. त्‍यांच्‍याच देखरेखीखाली हा प्रकल्‍प उभारला. या प्रकल्‍पामुळे गाेव्‍याचे विश्वेश्वरय्या यांच्‍याशी नाते जोडले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com