
‘सिंगल विंडो’ किंवा ‘वन विंडो’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली तर ही धावपळ होणार नाही. निर्णय घेण्यास वेळ न लावता कर्जाचा लाभ अनेकांना घेता येईल. मा झ्या मैत्रिणीला स्वत:चा व्यवसाय सुरू कारायचा आहे. पैशांची थोडी तंगी आहे. ‘आर्थिक बळकटी मिळाली तर मी ऑरगॅनायज्ड् दुकान काढेन’, असे ती म्हणते. आर्थिक मदत, कर्ज कुठे मिळेल याविषयी तिला थोडी माहिती हवी होती. मी तयारी दाखवली. चल म्हणून दोघी निघालो. इडीसी पणजीत मध्यवर्ती देवळाजवळ, म्हटलं नारळ फोडून तिथे जाऊ.
‘लोन कुठे मिळते?’ हा प्रश्न सेक्युरिटीला विचारला. जणूकाही भाजी विकत घ्यायला आलोत आणि मंडई कुठे आहे विचारतोय! तो प्रश्न आमचा आम्हांला वेडगळ वाटला तरी तो त्याच्या अंगवळणी पडला असावा. त्याने निराकार मुद्रेने समोर बोट दाखवत, ‘इथेच’, म्हणत समोर बोट दाखवले. दरवाजा उघडून रिसेप्शनवर आम्हांला थोडी माहिती मिळाली. पण ‘अधिक माहिती सर देतील’, असे म्हणत पाठवणी केबिनमध्ये करण्यात आली.
पूर्वकल्पना न देता दोघींचे आत जाणे अंमळ चुकलेच. बिचारा साहेब चणे खात बसला होता. डब्याशी झटापट करत त्याने आमचे स्वागत केले, पण ‘चणे खाणार का?’ हे मात्र विचारले नाही. मन खट्टू झाले. जुजबी प्रश्नोत्तरे झाली आणि आमची रवानगी परत बाहेर बसलेल्या महिलेकडे झाली. तिने माहिती पुरवली. आम्ही मात्र १०० रुपयांचा फॉर्म न घेता बाहेर आलो. कारण, आमची झोळी मोठी होती आणि स्कीमप्रमाणे तळाला पुरेल इतकी पुंजी ते देऊ करत होते.
खादी ग्रामोद्योग आपल्याला जास्त मदत देऊ शकेल या आशेने ‘जुंता हाउस’मध्ये प्रवेश केला. पहिली लिफ्ट चालू होती. पण खादी ग्रामोद्योगचे कार्यालय गाठायला दुसऱ्या लिफ्टचा वापर करावा लागतो म्हणून मग चालत पुढे गेलो. उखडलेले टाइल्स, मुताच्या घाणी घेत पुढे सरकलो. सकाळ असून अंधार. लिफ्टचे बटण दाबले तर ‘जी’ वर जी जी करत शांत होते. मागून कुणी तरी आवाज दिला ‘लिफ्ट चलना!’आम्ही चाचपडत पुढल्या लिफ्टकडे पोचलो.
दुसरा माळा. नेटके, सुसज्ज ऑफिस. सगळा स्टाफ - निदान बाहेर बसलेला तरी - मोबाइलमध्ये गर्क होता. सरकारी नोकर म्हणजे ही ऐष. माझ्या मनात आले, ‘देवा, मला अशी नोकरी व पगार मिळायला हवा होता’. एवढे मोठे खासगी क्षेत्र उघडे पडलेले असताना, प्रत्येक गोमंतकीयाला सरकारी नोकरीच का पाहिजे, याचे उत्तर मिळाले. आत्ता कळले, लोकांचा तो सरकारी नोकरीसाठीचा अट्टहास असतो तो याचसाठी! असो.
तिथे माहिती मिळाली. एका सज्जन व्यक्तीने आणखी सरकार दरबारी कुठल्या स्कीम आणि कुठे माहिती मिळेल हे सांगून पुढे चला म्हणून सहकार्य केले. जास्त पैसे देणारे मुद्रा लोन पाहू म्हणून पुढे सरकलो. ‘हे निश्चित क्लिक होईल’ म्हणत स्टेट बँकेत गेलो. वरच्या मजल्यावर तरुण मॅनेजर भेटला. त्याने फोन नंबर विचारून धडाधड कितीतरीच पाने फोनवरून पाठवली. त्याला आमच्यासारखे पिडणारे लोक त्याला दररोज खूप भेटत असतील.
तेच तेच दररोज बोलण्यापेक्षा हा ‘शॉर्ट कट’ बरा, असे त्याला वाटले असावे. ‘सगळं वाचा नी मग परत सर्व ठरलं, की मग तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता ते पाहून प्रोसेस सुरू करू’, असे त्याने सांगितले. त्यांचा जास्त वेळ न घेता आम्ही पायऱ्या उतरून बाहेर आलो.
आता आमच्याकडे चणे होते ते कधी फुगवायचे की कच्चे खायचे ते वेळेत ठरवावे लागेल. ‘सिंगल विंडो’ किंवा ‘वन विंडो’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली तर ही धावपळ होणार नाही. निर्णय घेण्यास वेळ न लावता कर्जाचा लाभ अनेकांना घेता येईल. कर्जासाठी लागणारे कागदपत्र सगळे तेच काही फरकाने असतील.
नीना नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.