Siddheshwar Temple Bori: सह्याद्री खंडातही उल्लेख! बोरीच्या सिद्धनाथ पर्वतावर आजही पाहायला मिळतो प्राचीन वारसा

Goa Siddheshwar Temple Bori: गोव्याच्या फोंडा तालुक्यातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाने समृद्ध असा निसर्गसंपन्न सुंदर गाव म्हणजे बोरी, ज्याचे पूर्वीचे प्राचीन नाव बद्रीवन.
Goa Siddheshwar Temple Bori
Siddheshwar Temple BoriDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

व्याच्या फोंडा तालुक्यातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाने समृद्ध असा निसर्गसंपन्न सुंदर गाव म्हणजे बोरी ज्याचे पूर्वीचे प्राचीन नाव बद्रीवन. या बोरी गावात सिद्धनाथ पर्वत हे नैसर्गिक वारसा लाभलेले ऐक रमणीय पर्यटनस्थळ व बोरीच्या प्राचीनतेची साक्ष देणारे या पर्वताच्या शिखरावर असलेले एक प्राचीन श्री सिद्धेश्वराचे छोटेसे असे मंदिर. बोरी गावात नारळाच्या आणि पोफळीच्या सुंदर अशा बागायतीत व दाट झाडांच्या मधोमध एक नैसर्गिक पाण्याची टाकीदेखील आहे. या टाकीच्या जवळच प्राचीन असे श्री नवदुर्गा देवीचे मंदिर.

दरवर्षी या पाण्याच्या टाकीत पारंपरिक श्री नवदुर्गा देवीचा ‘सांगोड’ साजरा केला जातो. इतिहासकार व्ही.टी. गुणे यांच्या मतानुसार असे मानले जाते, की देवी नवदुर्गा देवीची मूर्ती कदंब राणी कमलादेवी यांनी देवतेला समर्पित मंदिरात ई. स ११५० मध्ये स्थापित केली होती. स्थापत्य आणि परंपरेनुसार,बेळगाव जिल्ह्यातील कमल नारायण मंदिर देखील राणी कमलादेवीच्या कदंब काळातील असावे. याला पुष्टी देणारे पुरावे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवगामवे गावातील कमल नारायण मंदिरातून मिळतात. देवगामवेच्या या कमल नारायण मंदिराच्या भिंतीवर राणी कमलादेवी आणि त्यांचे पती राजा शिवचित परमादिदेव कदंब यांचे नाव कोरलेले पाहायला मिळते.

Goa Siddheshwar Temple Bori
Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

श्री नवदुर्गा मंदिरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध सिद्धनाथ पर्वत आहे.या टेकडीवरून बोरी गाव आणि त्याच्या शेजारच्या बेतोडा, ढवळी आणि शिरोडा या गावांचे विहंगम दृश्य दिसते. पर्वताच्या शिखरापर्यंत एक अरुंद रस्ता वळणे घेत तासाभराच्या खडतर प्रवासानंतर टेकडीच्या शिखरावर पोहोचवतो.या पर्वताशी अनेक दंतकथा आणि लोककथा निगडीत आहेत. सिद्धनाथ पर्वताचा संदर्भ गोव्यातील सर्वात प्राचीन दस्तऐवजांपैकी एक अशा सह्याद्री खंडात सापडतो. सह्याद्री खंड हा स्कंद पुराणाचा एक भाग आणि तो गोव्यात अस्तित्वात असलेल्या विविध देव-देवतांशी संबंधित आहे.

सह्याद्री खंडाच्या ९व्या अध्यायात ‘शंकावली नगरीचे महात्म्य’ यात सिद्धनाथ पर्वताचा उल्लेख आहे. ज्यांत बोरी गावाचा उल्लेख ‘बद्रीवन’ म्हणून केला जातो, ज्याचा संस्कृत अर्थ ‘बोर’ या वृक्षांचे जंगल असे आहे. एकेकाळी ही झाडे प्रचंड प्रमाणात असल्याने गावाला हे नाव पडले असावे. या सह्याद्री खंडाच्या ९व्या अध्यायाच्या शेवटी असा उल्लेख आहे की दैत्यांचा वध करणारा, देव महादेव त्याची पत्नी देवी पार्वती सहित या भूमीत येऊन राहिला होता. भगवान महादेव यांना भवानी शंकर अशी पण उपाधी देण्यात आली आहेत.

या भूमीत बद्रीनावाच्या ऋषींचे आश्रम अस्तित्वात होते. त्यात पुढे असा उल्लेख आहे की एका सिद्धपुरुषाने बोरीच्या झाडाखाली तपश्चर्या केली. ध्यानस्थ असताना अचानक एक राक्षस त्याच्यासमोर आला. आवाजाने ऋषींच्या तपश्चर्येला व्यत्यय आला. त्यांनी देव शंकरांना बोरी गावाला राक्षसांपासून वाचवण्याची विनंती केली. आपल्या भक्ताची विनंती ऐकून भगवान शंकर ऋषीसमोर प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसांचा नाश केला. सिद्धपुरुषांच्या तपश्चर्येमुळे भगवान शंकर पृथ्वीवर अवतरले असल्याने ते जगाला सिद्धेश्वर म्हणून ओळखले गेले. त्या दिवसापासून ते बद्रीवन येथे वास्तव्यास होते व बोरी येथील सिद्धनाथ पर्वताच्या टेकडीवरील श्री सिद्धेश्वराचे मंदिर या कथेची साक्ष आहे असे मानले जाते.या सिद्धपुरुषांचा नाथ म्हणजे भगवान शंकर यावरून पुढे सिद्धनाथ देव हे नाव प्रचलित झाले असावे.

Goa Siddheshwar Temple Bori
Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

श्री सिद्धनाथ मंदिराची आज अतिशय साधी वास्तू आहे. परंतु मंदिराच्या सभोवतालच्या अवशेषांवरून असे दिसून येते की प्राचीन काळी मंदिराच्या संरचनेत बहुधा काळ्या दगडांचे भव्य मंदिर असावे. पण यातील फारच थोडे अवशेष आज टिकून आहेत.श्री सिद्धनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला दोन सुरेख कोरीव केलेल्या कालभैरव देवाची व चामुंडा देवीची पाषाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. इतिहासकार डॉ. रोहित फळगावकर यांच्या मते या मूर्ती फार प्राचीन व दुर्मिळ आहेत.माता चामुंडा देवीला सांस्कृतिक महत्त्व आहे, आई चामुंडाचे वर्णन अनेकदा उग्र असे केले जाते.

तरी देवीचे आध्यात्मिक प्रतीक निर्भयता आहे, शतकानुशतके शाक्त परंपरांमध्ये उग्र देवी उपासना हा एक मुख्य भाग राहिला आहे. शाक्त परंपरेनुसार चामुंडा देवी उपासना ही कल्पना प्रतिबिंबित करते की, दैवी स्त्रीशक्ती केवळ पालनपोषण करणारीच नाही, तर जेव्हा धर्माला धोका निर्माण होतो, तेव्हा ती संरक्षक आणि योद्ध्यासारखीही असते,तिची शक्ती हिंसा निर्माण करण्यासाठी नाही, तर आंतरिक धैर्य निर्माण करण्यासाठी आहे. जेव्हा जीवन कठीण होते, तेव्हा खंबीरपणे उभे राहण्याची भक्ताची क्षमता जागृत करणे हा तिचा उद्देश .

अनेक शक्तीपीठांच्या परंपरांमध्ये, भैरवाची देवीसोबत संरक्षक शक्ती म्हणून पूजा केली जाते. भैरव शिस्त, आध्यात्मिक मर्यादा आणि संरक्षणात्मक गांभीर्याचे प्रतीक, तर देवी शक्ती, सामर्थ्य आणि परिवर्तन यांचे प्रतीक आहे.चामुंडा पूजेच्या संदर्भात, भैरवाचे प्रतीक अधिकच अर्थपूर्ण ठरते. शाक्त परंपरेनुसार उग्र शक्तीचा आदरानेच स्वीकार केला पाहिजे. भक्ती प्रामाणिक असली पाहिजे, अहंकाराने प्रेरित नसावी. भैरव त्याच शिस्तीचे प्रतीक आहे.

Goa Siddheshwar Temple Bori
Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

सिद्धनाथ मंदिराच्या थोड्याच खालच्या बाजूला पाण्याचा एक झरा असलेली तळी आहे, बारमाही वाहाणाऱ्या झऱ्यामुळे तळीत नेहमी पाणी असते. गोकुळाष्टमीच्या दिवशी भाविक या तळीत स्नान करण्यात आनंद मानतात. मंदिराच्या गर्भगृहात श्री सिद्धनाथाची पूजा एका लहानशा स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात केली जाते. त्याच्या उजव्या हाताला श्री गणपतीची छोटीशी प्रतीमा दिसते आणि डाव्या हाताला श्रीनवदुर्गेची तितकीच छोटी प्रतिमा आहे. श्री सिद्धनाथ देवाचा जत्रोत्सव पौष मासाच्या पौर्णिमेपूर्वी किंवा नंतरचा जो शनिवार येतो, त्या दिवशी साजरा केला जातो. खाली बोरी गावात देऊळवाडा येथे असलेली कुलदेवता (कुटुंब देवता )श्री नवदुर्गा देवीची जत्रा ही कार्तिक पौर्णिमा आणि राम नवमी (मार्च आणि एप्रिल दरम्यान भगवान रामाचा जन्मदिवस) या प्रत्येकी चार दिवसांच्या दोन जत्रा साजऱ्या केल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Saptakoteshwar Temple Divar History
Chandreshwar Bhootnath Temple Case
Kewda Leaf Fossil Study
Hill flowers
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com