Shri Lairai Devi: ..आणि ऐरावतावर बसून 'लईराई देवी' डिचोलीतल्या श्री शांतादुर्गाकडे आली, सात भगिनींची दैवत परंपरा

Shri Lairai Devi Temple: लईराई ही देवता गोवा कोकणातील आदिवासी, कष्टकरी जातीजमातीत लोकमान्य आहे. तिच्या उत्पत्ती संदर्भात अभ्यास करण्याची नितांत गरज आहे.
lairai devi Jatrotsav
lairai devi templeDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक जीवनात लोकदैवतांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांच्या उत्सवात सहभागी होऊन लोक आपल्या जगण्यातील ताणतणावांना सामोरे जाण्याचे प्रयत्न करत असतात. गोवा आणि कोकणातल्या बऱ्याच गावांत लइराईच्या जत्रेत सहभागी होण्यासाठी किमान पाच दिवस तरी लोक व्रतस्थ राहतात.

जत्रेपूर्वी पाच दिवस नदीकिनारी, झऱ्याकाठी असलेले तळ धोंडांनी गजबजून उठतात. शिरगावची ग्रामदेवी मृण्मय, वारूळ रूपातली सातेरी असली तरी गोव्यातील गावोगावी लईराई मातेचे भाविक मोठ्या संख्येने आहेत. भारतीय संस्कृती कोशात लईराई देवीसंदर्भात माहिती आहे.

गोमंतकातील एक शक्तिदेवता. हिचे ठाणे शिरगावला आहे. या देवीची मूळ मूर्ती तांदळास्वरूपाची असून, तिची उत्सवमूर्ती चतुर्भुज आहे. हिला वैष्णवी मायेचा अवतार समजतात. हिच्यासंबंधी रचलेल्या पदांवरून असे वाटते, की हिचे मूळ स्थान डोंगरावर असावे आणि नंतर कोण्या भक्ताने तिची पायथ्याला स्थापना केली असावी.

सप्त मातृकांत वैष्णवी नावाची एक मातृका आहे, तीच ही असावी. वैशाख शुद्ध पंचमीला इथे मोठी यात्रा भरते. या यात्रेचा विशेष म्हणजे या मंदिराच्या परिसरातील एका वडाच्या झाडाखाली मोठे होमकुंड पेटवतात आणि देवीचे भक्त त्यावरून चालत जातात. तसे करताना त्यांना काहीही इजा होत नाही, असे सांगतात. हे एक जागृत देवस्थान आहे, अशी लोकांची भावना आहे. असे देवीकोश खंड द्वितीयचा संदर्भ देऊन म्हटलेले आहे.

खरे तर लईराई ही एक प्रारंभी मनुष्यरूपातली सात भगिनी आणि त्यांच्या एकुलत्या एक भाऊ असणाऱ्या परिवारातील देवता होती. ती ऐरावतावर बसून जेव्हा डिचोलीतल्या शांतादुर्गेकडे आली तेव्हा देवीने त्यांना मये येथील वंडयार पाठवले. केळबाई मुळगाव येथे, तर लईराई शिरगाव अशा रीतीने सात भगिनी प्रतिष्ठापित झाल्याचे मानले जाते.

भारतभर सात भगिनींची दैवत परंपरा आहे. गोव्यातील लोकधर्मात त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. पारंपरिक पद्धतीने लोकगीत गायले जाते, त्यातून सात भगिनी आणि एक भाऊ वायंगिणीचा खेतोबा यांच्याविषयी माहिती मिळते. आज गोव्यातल्या लोकमानसात या लोकदेवतांना अनन्यसाधारण स्थान आहे.

त्यांच्या भक्तांना शक्तीरूपिणीचे दर्शन त्यांच्यात झालेले आहे. तसे पाहायला गेल्यास या देवता मार्गक्रमण करता करता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरच्या चोर्ला गावात आल्या होत्या आणि तेथून त्या मोर्ले येथे जाऊन, गिरोडेतून मावळींगे, लाटमबार्श्याहून डिचोलीत आल्या असे सांगितले जाते. शिरगावात लईराईचे आगमन पोर्तुगीज येण्यापूर्वी झाले असावे आणि कालांतराने त्यांची उपासना बहुजन समाजात रूढ झाली असावी.

गोव्यातल्या लोकदैवतांच्या उत्पत्तीचा अभ्यास करताना त्यांच्याशी निगडीत ज्या असंख्य लोक परंपरा, लोककथा, लोकगीते, श्रद्धा, अंधश्रद्धा अभिजन आणि लोक यांच्यात प्रचलित आहेत, त्या महत्त्वपूर्ण ठरतात. या दैवतांची उन्नयन प्रक्रिया इथल्या समृद्ध लोक संस्कृतीचे दर्शन घडवते. लईराई ही देवता गोवा कोकणातील आदिवासी, कष्टकरी जातीजमातीत लोकमान्य आहे. तिच्या उत्पत्ती संदर्भात अभ्यास करण्याची नितांत गरज आहे.

कारण त्यातून इथल्या कृषी, बागायती आणि अन्य पारंपरिक उद्योग, व्यवसायाशी निगडीत समाजाच्या ज्या श्रद्धा, परंपरा विकसित झाल्या त्याची पार्श्वभूमी कशी आणि काय होती, याची प्रचिती येते त्यावेळी निसर्ग, पर्यावरणाची स्थिती कळते. मानवी जीवनात लोकधर्म आणि समाजजीवन यांचे महत्त्व उमजते.

Shree Lairai Devi Temple
Shree Lairai Devi TempleX

लईराई देवीचे जे शिरगावातील मुड्डेर येथे स्थान होते, तेथे तिची मृण्मय वारूळ रूपातले पूजन रूढ होते. आज गावातल्या मुख्य स्थळी गर्भगृहात तिची प्रतिष्ठापना कळस रूपात केलेली आहे. वैशाख शुद्ध पंचमीला हा कळस माथी घेऊन भारावलेला मोड धगधगत्या निखाऱ्यावरून चालून गेल्यानंतर हाती बेतकाठी धारण करून धोंड अनवाणी पायी चालत जातात ते गळ्यात मोगऱ्याच्या कळ्याची माळ घालून.

शिरगाव येथील जत्रेप्रमाणे धगधगत्या होमखंडातून व्रतस्थ भाविक चालत बऱ्याच जत्रांत सहभागी होतात, परंतु ही जत्रा भाविकांसाठी आकर्षणबिंदू ठरली आहे, त्याला शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा, श्रद्धा, संकेत कारणीभूत ठरलेले आहेत.

lairai devi Jatrotsav
Lairai Jatrotsav: भक्तांच्या हाकेला धावणारी आई, श्री देवी लईराई! शिरगावात भक्तगणांचा महापूर

गावात एकेकाळी गुड्डू रवळू नावाचा जो धनिक होता, त्याच्या कुटुंबाने घरच्या मोलकरणीच्या हातून देवीची पूजा करून, अपमान केल्याने देवीने दिलेल्या शापातून त्यांची धुळधाण झाली हे सांगताना गावकरी एका जीर्ण अवशेषांकडे बोट दाखवतात. या लोककथेच्या मुळात अन्याय, अत्याचार करणाऱ्या जमीनदारविषयीचा रोष, आपल्या परंपरा, रूढी यांची थट्टा करणाऱ्याविषयीची चीड त्यातून प्रकट झालेली दिसून येते.

घाटावरून आलेली देवी लईराई डिचोलीतील शिरगाव येथे आली आणि केवळ इथल्याच नव्हे तर गोवा कोकणातील कष्टकरी समाजाचे प्रेरणास्थान झाली. त्याला या गावाला लाभलेला सुजलाम सुफलामतेचा वारसा कारणीभूत ठरला होता.

lairai devi Jatrotsav
Shri Lairai Temple: श्री लईराई देवीचा 'राज्योत्सव' म्हणजे शासन नेमके काय करणार? सरकारीकरणाच्या शंकेतून होणारा विरोध

पावसाळ्यात खारभूमी आणि हिवाळ्यात वायंगणी मुबलक धान्याची पैदास करण्याबरोबर नारळ, पालेभाज्या आणि कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जायचे. त्यामुळे शिरगाव हा नावाप्रमाणे लक्ष्मीचा गाव म्हणून ओळखला जात असे. सातेरीच्या कृपासावलीत असणाऱ्या शिरगावात लईराई देवीचे आगमन झाल्यावर त्याच्या लौकिकात आणखीन भर पडत गेली. अस्नोडा नदीकिनाऱ्यावरचा हा गाव इथे लोह खनिज उत्खनन सुरू होण्यापूर्वी नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध होता.

जंगलाने नटलेल्या या गावाची खाणी सुरू झाल्यानंतर धुळधाण सुरू झाली. वड, पिंपळ, औदुंबर, आंबा, फणस, माड, सुपारी अशा वृक्षवल्लींनी युक्त शिरगावात जंगली वैभव दृष्टीस पडायचे. त्यासाठी घाटावरच्या या देवीला भरती ओहोटी असणाऱ्या शिरगावची भूमी खूपच आवडली. वैशाखातल्या रणरणत्या उन्हाचा तडाखा सोसत असतानादेखील भाविक लईराईच्या जत्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात, त्याला या देवीचे लोकप्रिय स्वरूप कारण ठरलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com