

जुन्नर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला शिवनेरी किल्ला हा मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. तिन्ही बाजूंनी ताशीव कातळकड्यांनी अभेद्य असणारा हा किल्ला दुर्गस्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झाला, त्यामुळे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
शिवनेरीच्या दगडी चिलखती तटबंदी, सात दरवाजांची मालिका आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू आजही किल्ल्यावर ताठ मानेने उभ्या आहेत. शिवनेरी किल्ल्याचा नुकताच ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ला केवळ एक पर्यटनस्थळ नाही, ते एक प्रेरणास्थान आहे. इतिहास आणि निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी हा किल्ला नक्कीच भेट देण्यासारखा आहे.
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेला शिवनेरी किल्ला हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नसून, शिवप्रेमींसाठी ही जागा म्हणजे एक तीर्थक्षेत्र आहे. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला.
सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला सुरुवातीला एक महत्त्वाचे लष्करी ठाणे म्हणून उभारण्यात आला होता. जुन्नरच्या ऐतिहासिक भागात असलेला नाणेघाट, शिवनेरीच्या भवताली असणारे हडसर, चावंड, जीवधन यांसारखे किल्ले यामुळे मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे अध्याय या परिसरात लिहिले गेले.
याच शिवनेरीच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण घडले. शिवनेरीचा निसर्गसंपन्न परिसर, मजबूत तटबंदी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केलेली रचना पाहिल्यास शहाजीराजांनी हा किल्ला का निवडला, याचे महत्त्व लक्षात येते.
शिवनेरी किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा झाल्यास इ. स. सनाच्या सातव्या शतकापर्यंत मागे जावे लागते. सातवाहन राजवटीच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली. हा किल्ला देश ते कल्याण बंदर शहराकडे जाणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गाचे म्हणजेच नाणेघाटाचे रक्षण करण्यासाठी वापरला जात असे.
तेराव्या शतकात दिल्ली सल्तनत कमकुवत झाल्यानंतर हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला आणि नंतर सोळाव्या शतकात हा किल्ला काही काळ निजामशाहीत होता. शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीचा शिवनेरी हा महत्त्वाचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी किल्ल्यावर झाला आणि त्यांनी त्यांचे बालपण तेथेच घालविले.
शिवनेरी किल्ला हा लष्करी स्थापत्यकलेचा एक आदर्श नमुना आहे. या किल्ल्याला असणारे सात दरवाजे हे लष्करी संरक्षणशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. किल्ल्यावर बारा महिने असणाऱ्या पाणीसाठ्यांमुळे पूर्वीच्या काळी किल्ल्यांना शत्रूचा वेढा पडला, तरी अनेक महिने किल्ला लढविण्याची ताकद किल्लेदाराला मिळत असे.
किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या मंदिरामुळे या किल्ल्याला ‘शिवनेरी’ नाव मिळाले. सात दरवाजांच्या वाटेने गडावर जाताना पाचवा शिपाई दरवाजा ओलांडून मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळल्यानंतर आपण शिवाई देवीच्या मंदिरात पोहोचतो.
शिवाई देवीच्या मंदिरात शिवाईची मूर्ती असून, मंदिरामागील खडकात सहा-सात गुहा आहेत. या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नामकरण करण्यात आले, असे सांगितले जाते.
शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. शिवकुंजची पायाभरणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली होती. बालपणातील शिवाजी महाराज आपली छोटी तलवार फिरवीत आपल्या आई जिजामाता यांना आपल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नांचे वर्णन करीत आहेत, असा या स्मारकाचा विषय आहे.
शेवटचा दरवाजा म्हणजेच कुबालकर दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना दिसतो. पूर्वी याच अंबरखान्यात संपूर्ण अन्नधान्य साठविले जात असे. शिवनेरी किल्ल्याची वाट चढत जाताना वाटेत अनेक पाण्याच्या टाक्या लागतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी, १९ फेब्रुवारीला, किल्ल्यावर मोठा उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक संगीत, ऐतिहासिक देखावे आणि नाट्यप्रयोग यांमुळे हा दिवस अविस्मरणीय ठरतो. जुन्नर गावातून शिवनेरी गडावर पोहोचण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत.
पहिली वाट आहे ती साखळीची वाट. जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ चार रस्ते एकत्र असलेले दिसतात. या चौकातून डाव्या रस्त्याने सुमारे एक किलोमीटर अंतरावर उजव्या हाताला एक पायवाट जाते. या पायवाटेने गेल्यास आपण थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीजवळ पोहोचतो.
ही वाट काहीशी कठीण असून, गडावर पोहोचण्यास सुमारे ५० मिनिटे लागतात. जुन्नरमधून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यास डांबरी रोड आपल्याला शिवनेरी किल्याच्या पायऱ्यांजवळ घेऊन जातो. याच पायऱ्यांनी गडावर जाताना महादरवाजा, हत्ती दरवाजा, परवानगीचा दरवाजा, शिपाई दरवाजा, पीर दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलाबकर दरवाजा असे सात दरवाजे आहेत.
या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यासाठी जवळपास दीड तास वेळ लागतो. शिवनेरी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून, महाराष्ट्राचा अभिमान, शौर्य आणि परंपरेचे प्रतीक आहे. इतिहासप्रेमी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यास करणारा कोणताही पर्यटक येथे एक आगळावेगळा अनुभव घेऊ शकतो. शिवनेरीचा प्रत्येक दगड, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक वाट इतिहासाचे सोनेरी पान उलगडते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.