Shigmotsav: वोयल्या वोयल्या डोंगरी वाघच्यो गोठणी! लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा वटवृक्ष 'शिगमोत्सव'

Shigmo festival Goa: गोमंतक हा प्रदेश अथांग अरबी सागराच्या कुशीत वसलेला असून असंख्य गोड आणि खाऱ्या नद्यांनी समृद्ध आहे.
 Shigmo festival and Goan folk music tradition
Shigmo festival GoaDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

शिमगो हा गोमंतकातील लोकसंगीताचे मनोज्ञ दर्शन घडवणारा सण आहे. ‘गीतं, वाद्यं तथा नृत्यं त्रयं संगीतमुच्यते’ म्हणजेच गळ्यामधून आलेले सुमधुर शब्द आणि सूर, त्याला लाभलेली वादनाची साथ आणि या गाण्यातील काव्यानुसार शारीरिक मुद्रा करून दर्शविले जाणारे नृत्य.

जेव्हा या तिन्ही क्रिया एकमेकांशी संवाद साधत पार पाडल्या जातात तेव्हा त्याला संगीत असे म्हणतात. कलागुणांनी समृद्ध असलेल्या लोकसंगीताचा हा आविष्कार गोमंतकातील लोक मांडावर अनुभवायला मिळतो.

माणसाच्या अंतःकरणात प्रेम, शोक, करुणा या भावना स्वाभाविकच असतात. शिमगोत्सवातील पवित्र मांड हा गोव्यातील कष्टकरी समाजाच्या आंतरिक भावनांना व्यक्त करण्यासाठी प्रेरणास्थान असतो.

जती, सकराती यांसारख्या गीतांतून त्या भावना प्रकट होतात. लोकगीतांमध्ये शब्दांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे त्यांच्या चाली साध्यासरळ असून त्यात खूप कमी स्वर असतात. कष्टाची कामे करत असताना आपल्या मनात येणाऱ्या विचारांना गुणगुणत एखादी धून तयार झाली आणि त्यामुळेच संपूर्ण गीताला एकसारखी सरळ सोपी चाल मिळाली असावी. शास्त्रीय संगीतात स्वरांमधून रस उत्पन्न होतो तर लोकगीतांत शब्दांतून रस उत्पन्न होतो.

ताल्ली होकाल बांगडो नवरो, शेवटो जालो धेडो रे,

उडोन शेवटो दिवटी धरी, कुल्ली वाजाप करी रे.

गोमंतक हा प्रदेश अथांग अरबी सागराच्या कुशीत वसलेला असून असंख्य गोड आणि खाऱ्या नद्यांनी समृद्ध आहे. त्यामुळे इथल्या लोकांचे जीवन शेती बागायतींसोबत नदी, खाडी व समुद्रातून उपलब्ध होणाऱ्या मासळीवर अवलंबून असायचे. मासे, खेकडे, खूबे, कालवां या सारख्या घटकांचा गोव्याच्या अन्नसंस्कृतीत समावेश झाला.

शिमगोत्सवातील या जती गीतामध्ये आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या सृष्टीतील सजीवांना नवरा, बायको, धेडा, भटजी व वादकवर्ग बनवून हुबेहूब लग्न सोहळ्याचे दृश्य दर्शविलेले आहे. तारली आणि बांगड्याचे लगीन लावताना तारलीला बायको व बांगडा या माशाला नवरा असे संबोधले आहे. लग्नासाठी गोव्याचा राज्य-मासा म्हणून नाव मिळालेला शेवटा धेडा बनून तो हातात दिवा घेऊन उभा आहे. वादक म्हणून खेकडा हजर आहे तर सशाने भटजीची भूमिका घेतलेली आहे. पुढे या गीतात पिटकोळीण (शिपाई बुलबूल) या पक्ष्याचे वर्णन आढळते. हा गाव आणि शहरांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक पक्षी आहे.

लोकगीते ही समूहमनातून जन्माला आलेली असतात. निसर्गाची लय व तालबद्धता यांच्याशी संवाद साधीत जीवन व्यतीत करत असताना लोकगीते निर्माण होतात. निसर्गाचा सहवास, निसर्गाचे अनुकरण व निसर्गाची जगण्यासाठीची मदत घेतल्याशिवाय माणसाचे जगणे शक्य नसते. निसर्ग हा लोकमानसाचा रक्षक, शिक्षक, मार्गदर्शक असतो. शिमगोत्सव हा सण म्हणजे लोकसंस्कृतीचा आणि लोकसाहित्याचा वटवृक्ष आहे. शिमगो मांडावरील खेळ, नृत्य, गायन, वादनाबरोबर सादर केल्या जाणाऱ्या लोकगीतातून समाजजीवनाच्या सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडते.

जंगलाच्या शिखर स्थानी असलेला वाघ असो किंवा कष्टकऱ्यांच्या शेती बागायतीसाठी उपद्रवी ठरलेला उंदीर असो, गोमंतभूमीत त्यांना आदराचे स्थान लाभले आहे.रानावनात फिरत असताना त्यांना वाटेत आढळणारे प्राणी, पक्षी व जंगलाचे सौंदर्य त्यांनी टिपले. कधी,

वोयल्या वोयल्या डोंगरी वाघच्यो गोठणी

वोयल्या वोयल्या डोंगरी सोर्पाच्यो रोयणी

तर कधी

वोयल्या वोयल्या डोंगरी सोसो कराड काडी

मुंगास येटीयो वोळी, हुनीर बाबडो बिळात वोडी

अशी गाणी म्हणत खेळ रंगात येतो. माणसांना निसर्गाविषयी किती विलक्षण ओढ! ही हास्यमधुर गाणी ऐकत असताना आपल्याला मानवाच्या मनातील प्रेमळ भावनेची आणि कुतूहलाची जाणीव होते.

पूर्वी उन्हाळ्यामध्ये जंगलात व माळरानावर सहज उपलब्ध होणारा रानमेवा खाऊन माणूस तृप्त व्हायचा. डोंगर उतारावर पायवाटेने फिरत असताना येथील लोकमानसाला फुले, फळे, वृक्ष वेली यांच्यातील औषधी गुणांची ओळख झाली. त्यांना जंगलाचे ज्ञान प्राप्त झाले. ग्रीष्म ऋतूच्या सुरुवातीला कणेर, आसाळे यांचा आस्वाद घ्यायला मिळतो. त्यानंतर घोटींग वृक्षाला लागलेली फळे पिकून खाली पडायला लागली की ती लहान फळे दगडाने फोडून त्यातील गर काढून खाता येतो. जास्त खाल्ल्याने चक्कर येते. त्याच कालखंडात बिपट या झाडाला लहान काजूसारखे बिबे लागतात. पूर्वी या बिब्याची बी बाजूला करून फक्त त्याचा बोंडू इंगळ्यावर भाजून खाल्ला जायचा. त्यानंतर ग्रीष्माच्या मध्यंतरी काटेरी झुडपामध्ये चून्ना, बोरे या सारखा चविष्ट रानमेवा उपलब्ध होतो.

रामा तुझे बळी रे, उपी वानार

जांभळा साणुन भेसा खाता गोड साकार

ग्रीष्मातून वर्षा ऋतूत प्रवेश करताना जांभूळ व भेडसांचा भरपूर आस्वाद घ्यायला मिळतो. या गीतात रामाचा प्रिय आणि त्याचा निस्सीम भक्त वानर जांभूळ न खाता भेडसां खात असल्याचे सांगितले आहे. नैसर्गिकरीत्या वाढणारी ही फळे आरोग्यवर्धक असतात.

वानर हा एक अत्यंत बुद्धिमान आणि चपळ प्राणी असून आजच्या बदलत्या काळात त्याचे जगणे असहाय्य झालेले आहे. ठिकठिकाणी जंगलतोड झाल्याने त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झालेला आहे. एका जतींमध्ये खाकेला झोळी लावून एक साधू जेव्हा सीतेच्या घरी भिक्षा मागायला येतो तेव्हा ती म्हणते, ‘आमी खातो कानामुळा तुम्हा काय वाढू?’ येथे कानामुळा म्हणजे कंदमुळे. गोव्यात सेंद्रिय खत वापरून पौष्टिक गुणांनी युक्त काटे कणगी, चीना, चिरके, माडी यांच्या विविध प्रकारांची लागवड होते.

 Shigmo festival and Goan folk music tradition
Shigmotsav In Dicholi: रंग, मुखवटे आणि पिचकाऱ्या! शिमग्याच्या साहित्याने फुलला बाजार

सांग्यातील सावर्डे व डिचोलीतील सर्वण या गावांत मयूर नृत्याचे दर्शन घडवणारे ‘मोरूलो’ हे नृत्य सादर केले जाते. या नृत्याची उत्पत्ती मोराच्या वैविध्यपूर्ण हावभावांची नक्कल करून झालेली आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी पावसाळ्यात जेव्हा मनसोक्त नाचू लागतो तेव्हा ते दृश्य मनाला मोहिनी घालणारे असते.

मोराचे नृत्य माणसाला खुणावत आलेले आहे. शास्त्रीय संगीतामध्ये ‘केहरवा’ या तालाची तुलना मयूराशी केलेली आढळते. मयूर जेव्हा नाच करतो तेव्हा तो उजव्या बाजूने चार पावले चालून पुन्हा आपल्या जागेवर येतो. तसेच पुन्हा तो डाव्या बाजूने चार पावले चालून तसाच आपल्या जागेवर येतो. शिमगोत्सवातील मोरूलो सादर करणारे कलाकार धोतर परिधान करून, डोक्याला मोर पिसांचा फडका, पायात घुंगरू, गळ्यात फुलांच्या माळा घालून घुमट आणि झांज वादनाच्या साथीने हे नृत्य सादर करतात.

 Shigmo festival and Goan folk music tradition
Shigmotsav in Goa: शनिवारपासून गोव्यात घुमणार 'घुमचे कटर घूम', वाचा संपूर्ण वेळापत्रक

शिमगोत्सवातील शब्द, माधुर्य, गेयता आणि तालबद्धता यांनी युक्त असलेल्या खेळातील नृत्य ही एक दृश्यकला आहे जी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून आत्मसात केली जाते तर वादन आणि गायन ही श्राव्यकला आहे जी ऐकून आत्मसात केली जाते. नृत्यातील हावभाव सर्वसामान्य माणसाच्या लक्षात राहतात. लोकसंगीत हे अलिखित असून ते मौखिक आहे. लोकगीतांमध्ये आपल्या इतिहासातील घटना, लोककथा यांचा समावेश असून त्याची रचना सोप्या भाषेत केलेली असल्यामुळे, लक्षपूर्वक ऐकल्याने ती लक्षात राहतात.

आज प्रत्येकाने आपापल्या गावातील शिमगो मांडावरील लोकगीतांचा आढावा घेत ती आत्मसात करावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com