

डॉ. ब्रह्मानंद कुंकळियेंकर
ज्येष्ठांचं लक्षपूर्वक सहनशीलतेने ऐकणं फार गरजेचं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, त्यांच्या डोळ्यांतील समाधान हेच खरे समाजाचे आरसे आहेत. म्हणूनच, ज्येष्ठ नागरिक दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून, तो आपल्या जीवनशैलीत बदल घडवणारा प्रेरणादायी क्षण आहे.
भारतात दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. हा दिवस समाजातील वयोवृद्ध व्यक्तींप्रती आदर, कृतज्ञता आणि जबाबदारी व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आजचा हा दिन ज्येष्ठ नागरिक हे केवळ कुटुंबाचेच नव्हे तर समाजाचेही मार्गदर्शक आहेत याची जाणीव व स्मरण करून देतो. अशा वयस्क नागरिकांकडे अनुभवाची शिदोरी असते. या त्यांच्या जीवनाच्या अनुभवातून समाज मार्गदर्शन घेऊ शकतो. मोठ्या आदराने त्यांना विचारून शिकू शकतो. त्यांच्याकडे कल्पना असतात, कुठल्याही कार्यक्रमासाठी आपण त्या अंमलात आणून कार्यक्रमाला उंची देऊ शकू.
ज्येष्ठ नागरिक म्हणजे जीवनाच्या विविध प्रांतांतील अनुभवाचा खजिना. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून समाजाला, कुटुंबाला आणि राष्ट्राला योगदान दिलेले असते. त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि साधना यामुळेच आजची पिढी सुखसोयींमध्ये जगते. त्यामुळे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
भारतीय संस्कृतीत ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ असे सांगितले गेले आहे. वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे ही परंपरा आहे. परंतु आधुनिक जीवनशैलीत, वेगवान शहरीकरणात आणि तंत्रज्ञानाच्या युगात कधी कधी ज्येष्ठ नागरिक उपेक्षित होतात. ज्येष्ठ नागरिक दिन आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की त्यांचा सन्मान करणे हे केवळ औपचारिक कर्तव्य नसून जीवनमूल्य आहे. उत्तरदायित्व आहे.
वयोमानानुसार आरोग्याच्या समस्या वाढतात. हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी, स्मृतीभ्रंश अशा अनेक आजारांशी ज्येष्ठ नागरिक झुंज देतात. त्यामुळे त्यांना योग्य आरोग्यसेवा, विमा सुविधा आणि सुरक्षित वातावरण देणे आवश्यक आहे. शासनाने विविध योजना जसे की ज्येष्ठ नागरिक बचत योजना, आरोग्य विमा योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु त्यांचा लाभ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचवणे ही समाजाची जबाबदारी आहे. अनेक ज्येष्ठांना मोबाईलवरून फोन करून त्यांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन ठकवणारे सायबर गुन्हेगार ही डोकेदुखी ठरली आहे. त्याविषयी त्यांना सजग करणं आमचंच कर्तव्य.
ज्येष्ठ नागरिक हे घरातील संस्कारांचे मूळ आहेत. आजी-आजोबा मुलांना गोष्टी सांगतात. त्यांच्या अनुभवातून तरुण पिढीला मार्गदर्शन मिळते. परंतु अनेकदा वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढताना दिसते. हे समाज स्वास्थ्यासाठी चिंताजनक आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना वेळ द्यावा, त्यांचे मत ऐकावे.
मी दर बुधवारी स्नेहमंदिरात जातो. तिथल्या वृध्दांची तपासणी करतो. त्यांच्या भावना, संवेदना प्रेमासाठी भुकेलेल्या आहेत हे दिसतं. शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक संस्था यांनी ज्येष्ठ नागरिकांना व्याख्यानासाठी, संवादासाठी आमंत्रित करावे. त्यामुळे पिढ्यांतील संवाद वाढत जाईल.
समाजातील प्रत्येक व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकांना भार नव्हे तर मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे. मी माझ्या व्याख्यानात याच मुद्द्यांवर भर देतो. मोबाईलचा वापर किती करावा, कसा करावा, काय करावे, काय करू नये याविषयी आवश्य सांगतो. त्यांच्यात आत्मविश्वास बळावेल असे प्रेरणादायी शब्द पेरतो. ज्येष्ठांकडील हा संवाद त्यांच्यासाठी शक्तीवर्धक आहे. ज्येष्ठांचं लक्षपूर्वक सहनशीलतेने ऐकणं फार गरजेचं.
ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचे हास्य, त्यांच्या डोळ्यांतील समाधान हेच खरे समाजाचे आरसे आहेत. म्हणूनच, ज्येष्ठ नागरिक दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून, तो आपल्या जीवनशैलीत बदल घडवणारा प्रेरणादायी क्षण आहे. ज्येष्ठ नागरिक घरात असणं म्हणजे तेवत असलेला एक सात्विक दीप असतो. तो पेटत असतो. प्रकाश देण्यासाठी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.