Tigers In Goa: खाणींची अराजकता सुरू होण्यापूर्वी 'वाघ' देवराईत बसायचा, रक्षणकर्ता मानला जायचा; पाषाणी मूर्तीतला वाघ्रोदेव

Tiger worship traditions Goa: सह्याद्री आणि सागर यांचे अस्तित्व जसे एकमेकांसाठी पूरक आहे तसेच येथील सजीवसृष्टीचे जीवन सुंदर आणि समृद्ध करण्यात सह्याद्री आणि सागर महत्त्वाची भूमिका बजावत आलेला आहे.
Tiger worship traditions in Goa
Tiger worship traditions in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याच्या भूमीला अज्ञात काळापासून येथील जीवसृष्टी जगवण्यासाठी सह्याद्री आणि सागर महत्त्वाचे योगदान करत आहे. सह्याद्री आणि सागर यांचे अस्तित्व जसे एकमेकांसाठी पूरक आहे तसेच येथील सजीवसृष्टीचे जीवन सुंदर आणि समृद्ध करण्यात सह्याद्री आणि सागर महत्त्वाची भूमिका बजावत आलेला आहे.

मान्सूनची पर्जन्यवृष्टी सह्याद्रीतल्या पशुपक्षी, वनस्पती यांच्यासाठी जीवनाधार ठरलेली आहे. तेथे कोसळणाऱ्या पावसामुळे नदीनाले मोठ्या प्रमाणात गोडे पाणी डोंगरांतून सखल प्रदेशात आणून सागराची क्षारता नियंत्रित करत असतात.

त्यामुळे गोवा - कोकणातल्या मानवी समाजाचे जगणे येथील दमट हवामानात सुसह्य होते. गोवा कोकणातल्या सह्याद्रीच्या जंगलात जी प्राणिसंपदा पूर्वापार आढळते त्यात पट्टेरी वाघ हा सर्वोच्च शिखरस्थानी असल्याची जाणीव इथल्या निसर्ग आणि पर्यावरणस्नेही लोकमानसाला शेकडो वर्षांपूर्वी झाली.

त्यामुळे गावातल्या दैवत पंचायतनात पट्टेरी वाघालाही महत्त्वाचे स्थान दिले होते. केवळ आदिवासीबहुल प्रदेशातच नव्हे तर जंगलनिवासी लोक समूहांत पट्टेरी वाघ हा ‘वाघ्रो देव’ म्हणून पुजला जात आहे.

सांग्यातल्या रिवणसारख्या जंगलसमृद्ध गावात पौष महिन्यातल्या अमावास्येला तेथील पट्टेरी वाघांनी आपल्या गुराढोरांना इजा पोहोचवू नये, त्यांच्यावर हल्ले करू नये आणि त्यांचे रक्षण करावे या भाबड्या आशेने लोक ‘वागऱ्या अमास’ साजरी करायचे.

पौषातल्या अमावास्येला पारंपरिक विधींचे पालन करून लोकमानस इथल्या जंगलात शिखरस्थानी असणाऱ्या पट्टेरी वाघाविषयीची कृतज्ञता व्यक्त करायचे. वाघ हा त्यांच्यासाठी केवळ जंगलातला प्राणी नव्हे तर तो त्यांच्या धर्मश्रद्धेचे संचित ठरला होता.

त्याच्या नैसर्गिक अधिवासाला म्हणूनच सुरक्षित ठेवले जात होते. सांगे तालुक्यातील धारबांदोडा तालुक्याशी सीमा भिडणाऱ्या काले गावात ‘वागऱ्या गाळ’ म्हणून देवराईचे अस्तित्व होते. आज तेथील देवराईतली जंगलसंपदा शेती, बागायती पिकांच्या अतिक्रमणामुळे संकटग्रस्त झालेली आहे. परंतु असे असले तरी ‘वागऱ्या गाळ’ या जागेत जी वाघ्रो देवाची पाषाणी मूर्ती पुजली जाते ती संपूर्ण गोव्यात वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे.

या मूर्तीत पट्टेरी वाघ प्रमुख असून त्याच्या पायाशेजारी सिंह आणि रान डुक्कर यांच्या छोट्या प्रतिमा आहेत.

केप्यातल्या आंबावली या गावात पट्टेरी वाघांचे वास्तव्य पूर्वापार होते आणि त्यामुळे येथील आदिवासी वर्षपद्धतीने वाघाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघ्रोदेवासमोर सामूहिक पद्धतीने गावजेवणाचा विधी ‘म्हातण’ साजरा केला जायचा.

गुजरातेतल्या गीरच्या प्रदेशात आशियाई सिंहाचे वास्तव्य असून तेथील जंगलांचा तो अनभिषिक्त सम्राट आहे. तरी सह्याद्रीच्या पट्टेरी वाघालाच इथल्या कष्टकरी आणि आदिवासी समूहाने जंगलांचा राजा मानलेला आहे.

दुर्गा देवीचे वाहन म्हणून बऱ्याच पाषाणी मूर्ती शिल्पात सिंह जरी प्रकर्षाने दाखवलेला असला तरी गोवा कोकणातल्या तिच्या मूर्तीत वाघ वाहन म्हणून दाखवलेला आहे. भगवान शिव नंदीबैलावरती आरूढ होत असला तरी तो व्याघ्रांबर धारण करणारा देव मानलेला आहे.

सत्तरीतील पिसुर्ले या खाणग्रस्त ग्रामपंचायत कक्षेत वाघुरे गाव येत असून, येथील शिव व्याघ्रेश्वर म्हणून पुजला जातो. वाघुरेत पूर्वापार वाघांची शिकार आणि हत्या निषिद्ध मानलेली आहे. चुकूनसुद्धा कोणी वाघाला इजा पोहोचवण्याचे धाडस केलेले नाही.

वाघाला ठार केले तर निर्वंश होण्याचा शाप बाधेल आणि त्या प्रकोपात आपल्या वर्तमान आणि भविष्याला काळिमा फासला जाईल म्हणून वाघूरेत वाघाला देवाचे स्थान दिलेले आहे. पूर्वी जी घनदाट देवराई होती तेथे वाघाचे अस्तित्व होते आणि लोह खनिज खाणींच्या उत्खननाची अराजकता इथे सुरू होण्यापूर्वी वाघ देवराईत बसायचा आणि तेथील ग्रामस्थांचा आणि पाळीव प्राण्यांचा रक्षणकर्ता मानला जात होता.

पट्टेरी वाघाने माणसावर हल्ला केल्याची घटना इथे आजतागायत उद्भवलेली नाही. जवळच खोड्ये गावात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने देवचाराच्या लग्नाचा विधी उरकला नाही तर तेथील पट्टेरी वाघ त्यांच्या गुराढोरांवर हल्ले करायचा. माणूस आणि वाघ यांच्यात जे अनुबंध पूर्वापार प्रचलित होते त्याची वीण आज मानवी समाजात अर्थकारणापायी क्षीण होऊ लागली आहे.

फोंडा तालुक्यातल्या मांडवी किनाऱ्यावरचा खांडोळा गावाची ग्रामदेवी सांतेर ही मृण्मय वारुळाच्या रूपात जेव्हा पुजली जात होती तेव्हा तिचे स्थान महाकाय वृक्षवेलींनी समृद्ध होते.

झरे, तळी आणि देवराई यांच्या सांनिध्यात देवी सांतेर राहत होती. या देवराईत पट्टेरी वाघ वास्तव्य करत असल्याची जाणीव लोकमानसाला असल्याकारणाने त्यांनी देवराईचे अस्तित्व सुरक्षित ठेवले होते.

परंतु कालांतराने निसर्ग आणि पर्यावरणकेंद्रित लोकधर्माचा पगडा जेव्हा दुर्बल होत गेला आणि लोकवस्तीचा विस्तार देवराईत करण्याची मानसिकता विकसित होत गेली, तेव्हा पट्टेरी वाघाचे अस्तित्व आणि तेथील त्याचा नैसर्गिक अधिवास ठरलेली देवराई इतिहासजमा होत गेली. आज वाघ्रो देव पाषाणी मूर्तीद्वारे आपल्या घुमटीत बंदिस्त झाला.

Tiger worship traditions in Goa
Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

वाघ्रो देव म्हणजे पट्टेरी वाघ आणि त्याचे मंदिर म्हणजे देवराई ही भावना लोकमानसातून लोप पावली. त्यामुळे त्याला पाषाणी मूर्तीतच पुजणारे भाविक खांडोळ्यात प्रबळ होत गेले.

काणकोण तालुक्यातल्या खोतीगाव आणि सांगे तालुक्यातल्या नेत्रावळी अभयारण्याच्या परिसरात जो वाघडोंगर आहे तो पट्टेरी वाघांमुळेच नावारूपाला आला होता. आज व्याघ्र राखीव क्षेत्रातल्या पट्टेरी वाघांच्या भ्रमण मार्गात येणारा हा डोंगर, ‘वाघांचा नैसर्गिक अधिवास’ हा आपला पूर्वाश्रमीचा लौकिक हरवत चालला आहे.

Tiger worship traditions in Goa
Mhadei Tiger Reserve: म्हादईत व्याघ्र प्रकल्प होणार का? CEC येणार गोव्यात; गोवा फाउंडेशन-वन अधिकाऱ्यांत खडाजंगी

पेडणे तालुक्यातला पालये हा गाव जंगलांच्या वैभवाने नटला होता आणि त्यामुळे इथल्या जंगलांत बिनदिक्कतपणे वाघ संचार करायचा. आज बेशिस्त पर्यटनाची शिकार ठरलेला स्वीट लेक ही जागा ‘वाघ कोळंब’ म्हणून ओळखली जात होती आणि या तळ्यातले चवदार पाणी पिण्यासाठी वाघ यायचा, याचे विस्मरण स्थानिक समाजाला झालेले आहे आणि त्यामुळे येथील सुंदर जंगल आणि ‘वाघ कोळंब’ यांचे अस्तित्व दिवसेंदिवस दुर्बल होऊ लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com