Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Origin of reading and writing: सुमेरियन लोकांनी मेसोपोटेमियामध्ये, ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली. मातीच्या गोळ्यांमध्ये चिन्हे कोरून व्यवहार, कायदे आणि मिथक ‘रेकॉर्ड’ होत असताना लिखित भाषेचा जन्म झाला.
history of reading
history of readingDainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात मौखिक परंपरांच्या पलीकडे ज्ञान जतन करण्याच्या प्रयत्नांत वाचन कलेचा आरंभ झाला. सुमारे ३५०० ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी मेसोपोटेमियामध्ये, ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली. मातीच्या गोळ्यांमध्ये चिन्हे कोरून व्यवहार, कायदे आणि मिथक ‘रेकॉर्ड’ होत असताना लिखित भाषेचा जन्म झाला.

ईसापूर्व ३२०० वर्षांपूर्वी, इजिप्तमध्ये, चित्रलिपीच्या माध्यमातून धार्मिक ग्रंथ आणि राजेशाही आदेशांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले. हे माध्यम फक्त शास्त्री-पुरोहितांसाठी असले तरीही यामुळे साक्षरतेचा पाया रचला गेला.

जागतिक स्तरावर ईसापूर्व २०००पर्यंत, ग्रीक आणि लॅटिन लिपींवर प्रभाव वाढून लेखन सोपे झाले. मौखिक असलेले भारतीय वैदिक ग्रंथ १५०० ईसापूर्व काळात, ब्राह्मी लिपीद्वारे संस्कृतमध्ये लिहिण्यास प्रारंभ झाल्यामुळे, उपनिषदांमधील तात्त्विक आणि आध्यात्मिक कल्पना वाचता आल्या.

लिखित साहित्य वाचून त्यावरील सांस्कृतिक चर्चा समृद्ध होऊन बौद्धिक देवाणघेवाणीला चालना मिळाली. हस्तलिखिते लिहीत शास्त्रीय ज्ञान जतन केले जाऊ लागले. १४४० सालातील छापखान्याच्या शोधामुळे वाचनाच्या कलेत क्रांती झाली. वाचनामुळे ‘ज्ञानप्राप्ती’ होऊन कल्पना विस्तारास वाव मिळू लागला.

शिक्षणाचा प्रसार वाढत असतानाच एकोणिसाव्या शतकातील औद्योगिकीकरणाने सामान्यजनांना परवडणारा कागद आला. सार्वजनिक ग्रंथालये येऊन, वाचन हा शिक्षणाचा अविभाज्य घटक बनला.

विसाव्या शतकात टाइपरायटर आणि संगणकांनी जग व्यापून टाकले. वाचनाचे डिजिटल स्वरूप झपाट्याने विकसित होऊन ई-पुस्तके, ऑडिओबुक्स आणि किंडलसारख्या अ‍ॅप्सनी वाचनाचे रूपांतर परस्परसंवादीवादी बनविले. आजच्या डिजिटल युगात, वाचनाची क्रिया लिखित शब्दाशी सखोल आणि जाणीवपूर्वक नाते निर्माण करते.

वाचन केवळ लिखित शब्दांतील प्रतीकांचा उलगडा करत नाही, तर गूढ मनातील कथा-कल्पना विस्तारांच्या जगात स्वतःला बुडवून घेऊन, सहानुभूती, टीकात्मक विचार आणि मानवतेशी संबंध विकसित करते.

जगात सामाजिक द्वेष वाढत असताना, भारतासारख्या देशात धार्मिकतेतून समाज विभाजनाचा धोका वाढत असताना, शोधक वाचनाची एक साधी कृती, शक्तिशाली मनोवैज्ञानिक उतारा बनू शकते. वर्तमानकाळात, इंटरनेटच्या जगात मानव एकमेकांशी जोडूनसुद्धा विभाजित अवस्थेत जगत असल्याचे ‘पदोपदी’ जाणवते.

भारतात, हिंदू-इस्लाम-ख्रिश्चन-शीख-बौद्ध धर्मांत देव आणि श्रद्धांमधील फरकांमुळे सांप्रदायिक तणाव उद्भवतात.

विविध धर्म-परंपरांमधील लेखकांची, धर्मापलीकडील सार्वत्रिक आध्यात्मिक तळमळ व्यक्त करणारे, मानवीकरण समजावणारे दु:ख आणि बहुलवादाचा शोध घेणारे लेखन वाचल्यास, समाजातील चुकीची माहिती व द्वेषाला खतपाणी देणाऱ्या कठोर कट्टरतावादाला आळा बसू शकतो. वाचनामुळे अतिरेकीपणा बाजूला होऊन, सामाजिक सुसंवाद घडण्यास मदत होते.

आपल्याला माहीत असलेला इतिहास खरा की खोटा हे ग्रंथ वाचनानेच समजू शकेल. ‘लीळाचरित्र’, ‘संत तुकारामाची गाथा’ इत्यादी ग्रंथांचे वाचन आपल्या ज्ञानात बहुमोल भर टाकते. पूर्वी भारतात हिंदू-मुस्लीम राज्ये असली तरी आज पराकोटीला पोचलेला हिंदू-मुस्लीम वाद नव्हता, हे शिवाजी महाराजांच्या चाकरीत असलेल्या मुसलमानांच्या संख्येतून आणि औरंगजेबाच्या नोकरीत असलेल्या हिंदूंच्या प्रमाणावरून दिसून येते. फिरतीवर असलेल्या आणि जग पाहिलेल्या लोकांच्या ग्रंथनिर्मितीतून आपल्याला जगाचा भूतकाळ समजू शकला.

२३ एप्रिल हा ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ज्ञानप्राप्ती, बौद्धिक-मानसिक विकास, मनोरंजन, इत्यादी गोष्टी साध्य होण्यास वाचनामुळे शक्य होऊन, आपल्या ज्ञानाचा विस्तारामुळे आपण समृद्ध होतो.

आपण भारतीय, युरोपियन देशांच्या मानाने फार कमी वाचतो. प्राचीन भारतात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, ओदन्तपुरी, वल्लभी, कांची, बनारस, पुष्पगिरी, श्रीधन्यकटकसारखी शिक्षणकेंद्रे होती, लेखन-वाचनात विविधता-बहुवचन वादामुळे समृद्धता होती. पंथ जाऊन धर्म आले. शिक्षणाच्या पद्धती बदलल्या. परकीयांनीही आपल्या शिक्षणपद्धती सुरू केल्या.

history of reading
Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

जेव्हा जेव्हा जगात एकाधिकारशाही-हुकूमशाहीने स्वातंत्र्य आणि विचारांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा अनेक विचारवंतांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी विविध ग्रंथ वाचून लोकांमध्ये परिवर्तनाची जाणीव करून दिली.

पुस्तकांमधील लिखाणातील प्रतिकाराच्या धडपडीने, मानवतावादाच्या सिद्धांतांनी जनतेच्या मनात क्रांतिकारी विचार पेरून क्रांतीची ठिणगी शस्त्रांमधून नव्हे तर पुस्तकांच्या पानांमधून पेटते हे दाखवून दिले. विविध ग्रंथांच्या वाचनातून जागृती झाली व उपेक्षितांच्या अधिकाराची आस वाढली. जॉर्ज ऑरवेलचे ‘१९८४’, थॉमस पेनचे ‘कॉमन सेन्स’ आणि सोलझेनित्सिनच्या खुलाशांनी जनतेला जागृत करून, ज्ञान हे अत्याचाराविरुद्धचे अंतिम शस्त्र असल्याचे दाखवून दिले.

history of reading
Opinion: जगण्यात 'आउट ऑफ बॉक्स थिंकींग' का आवश्यक आहे?

‘रीड बिटवीन द लाइन्स’ ह्या इंग्रजी वाक्प्रचाराचा अर्थ मजकुरात किंवा विधानात स्पष्टपणे सुचवलेल्या अर्थाच्या पलीकडील, खोलवर लपलेला अर्थ शोधणे. जसे सद्य:स्थितीत ‘एसआयआर’ (सर) या शब्दाचा अर्थ ‘स्लेव आय रिमेन’ म्हणणे योग्य आहे काय? तसेच, वाचाल तर ‘वाचाल’ असे म्हणत असताना, ‘वाचाल’ तर वाचाल, अशी शक्यता उद्भवण्यापूर्वी वाचाल तर ‘वाचवाल’ असे म्हणावेसे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com