Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

Dainik Gomantak: चौकशी समितीच्या माध्यमातून उघड झालेले गैरव्यवहार प्रशासकीय लाल फितीने झाकले जाऊ नयेत म्हणून दैनिक ‘गोमन्तक’ने घेतलेली भूमिका वर्तमानपत्रांविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांना चोख उत्तर आहे.
Goa Opinion
Journalism Dainik Gomantak
Published on
Updated on

शुभदा दीपक मराठे

पत्रकारिता हा भारतीय लोकशाहीचा अघोषित चौथा स्तंभ आहे. लेखणी सरसावली तर ती जमीन-आसमान एक करू शकते. वाट चुकलेल्याला सरळ मार्गावर आणायचे काम लेखणीइतके कोण दुसरा करू शकतो? या लेखणीने भल्याभल्यांचे पितळ उघडे पाडले आहे.

याचे जिवंत उदाहरण द्यायचे झाले तर आजच्या घडीला गाजत असलेला गोवा युनिव्हर्सिटीचा ज्वलंत प्रश्न. चौकशी समितीच्या माध्यमातून उघड झालेले गैरव्यवहार प्रशासकीय लाल फितीने झाकले जाऊ नयेत म्हणून दैनिक ‘गोमन्तक’ने घेतलेली भूमिका वर्तमानपत्रांविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांना चोख उत्तर आहे. एखाद्या घटनेचा पाठपुरावा करणे, तिच्या मुळाशी जाणे व सत्य उजेडात आणणे एवढे सोपे नसते. घटनेची बातमी होताना, त्यात आपले मत घुसडणे योग्य नसते. त्यामुळे, केवळ बातमी देऊन न थांबता त्या घटनेचे वैचारिक विवेचन लेख लिहून केले.

उद्दाम बलशक्तीवर ‘वेध’ पुरवणीत ‘मर्मवेध’ सदरातील लेखांतून राजू नायक यांनी हाणलेला लेखणीचा प्रहार खरोखरच लक्ष्यभेद करणारा होता. लेखणी नाजूक असली तरी व्यवहारकुशल आणि धारदार असते ती चालवणारी व्यक्ती ही तितकीच खमकी आणि अन्यायाला वाचा फोडणारी असावी लागते. ‘गोमन्तक’ला संपादकाच्या रूपाने ती लाभली आहे हे गोवेकरांचे अहोभाग्य.

विद्यापीठात जिथे नवनवीन शोध, नवनवीन उपक्रम सतत राबवून सुज्ञ आणि सुसंस्कारित पिढी घडवायची असते तिथे कोतेपणा आणि निर्लज्जपणाची हद्द गाठणारे सुविद्य(?) प्राध्यापक आणि त्यांना पाठीशी घालणारे कुलगुरू, सर्व काही माहीत असूनही डोळ्यावर झापडे ओढणारे आपले राज्यकर्ते, माहीत असून काहीच माहिती नसल्यासारखे भासवणारे सहकारी प्राध्यापक किंवा आपली कातडी वाचवणारे लोक यांना काय म्हणावे तेच कळत नाही.

‘काय होते ते होऊ दे. मी कशाला पडू या भानगडीत?’ अशा वृत्तीच्या लोकांचे हितसंबंध कुठे कुठे आणि कसे गुंतलेले असतील हे सांगणे थोडे कठीणच. या सगळ्या मायाजालाची कोणतीही पर्वा न करता सत्याचा शोध लागावा या हेतूने केलेले लेखन नि:संशय अभिमानास्पद आहे.

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ अशा शब्दांत सरकारवर टीका करणारे नि:स्पृह पत्रकार लोकमान्य टिळक पारतंत्र्यातदेखील जुलमी सरकारला तसूभरही न घाबरता सळो की पळो करून सोडीत. स्वतःची मते अशा प्रकारे छातीठोकपणे मांडणारे पत्रकार आजच्या घडीला मिळणे दुरापास्तच.

असे असतानाही या दलदलीतून एखादे सत्याचा ध्यास घेतलेले कमळ उगवतेच. विरोधकांच्या अरेरावीला न जुमानता लेखणीद्वारे सत्य समोर आणते. शिवम दीक्षितसारखे निर्भीड पत्रकारितेचा वारसा जपणारे पत्रकार आजही इथे आहेत म्हणून बजबजपुरीने भरलेल्या जगात एखादा आशेचा किरण दिसतो तो अशा पत्रकारांच्या रूपाने.

सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, योग्य गोष्टींवर अंकुश ठेवणे आणि समाजाभिमुख गोष्टींची माहिती पुरवणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणा वाटल्यास. अत्यंत कठीण आणि विरुद्ध परिस्थितीत याचे पालन केल्यास राजसत्तासुद्धा हादरते. चुकीचे वर्तन करताना दहा वेळा विचार करायला लावते ती पत्रकारिता एखादे लहानसे स्फुल्लिंग का असेना, चेतवत ठेवते.

ही ताकद पत्रकारितेतच आहे हे ‘गोमन्तक’ने दाखवून दिले. आपल्या छोट्याशा राज्यातच अशा कितीतरी अवैध घटना घडताना, मुद्दाम केल्या जाताना पावलोपावली दिसतात. शासन आणि सरकार, दुबळ्या जनतेकडे सराईतपणे डोळेझाक करताना दिसते; अशावेळी या परिस्थितीवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारालाच करावे लागते. समाजाविषयी प्रेम, समाजाचा चौफेर विचार असल्यास, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून पत्रकार अतिशय प्रभावीपणे कार्य करू शकतो. एखाद्या घटनेमागील कारणे पत्रकारच सहजपणे शोधून काढू शकतो.

समाजात खोट्याची साथ धरून स्वतःची तुंबडी भरून घेण्याची सोपी पद्धत फोफावू लागली आहे. सत्य, प्रामाणिकपणा, माणुसकी, परोपकार या गोष्टी कालबाह्य ठरताना उघड्या डोळ्यांनी पाहत बसणे म्हणजे खोट्याची साथ देण्यासारखेच आहे.

सत्य समाजासमोर आणून खऱ्या-खोट्याची शहानिशा करण्याची ताकद पत्रकारात असावी लागते. सामान्य माणसाची सकाळ नेहमी वर्तमानपत्राच्या वाचनाने होत असते. वर्तमानपत्रातील बातम्या खूप काही करू शकतात; चांगली आणि वाईटही. असत्याचा पर्दाफाश करून सत्य जगासमोर आणण्याचे काम वर्तमानपत्रे करू शकतात.

गोव्यातली वर्तमानपत्रे ते काम करतातच. पण, त्याही पुढे जाऊन घटनेमागचा विचार, विकार - जो बातमीत येत नाही - लोकांसमोर आणणेही तितकेच महत्त्वाचे असते. लोकांना ‘हे असे असे घडले’ याची माहिती बातमी देते. ‘ते तसे का घडले व पुन्हा घडू नये म्हणून काय करायचे?’ हा विचार लेखाच्या माध्यमातूनच मांडावा लागतो. हा विचारच वाचकांना पुढील निर्णय घेण्यास, व्यक्त होण्यास प्रवृत्त करतो.

‘गोमन्तक’ हेच कार्य अतिशय प्रभावीपणे करत आहे. गोवा विद्यापीठ असो व पणजी स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवरील खड्डे असो किंवा कला अकादमी असो. जे काही अवैध असेल, खोटे असेल, गोव्याला व गोमंतकीयांना अहितकारक असेल ते ते निर्भीडपणे मांडण्याचे काम अत्यंत चोखपणे सुरू आहे. अशी वर्तमानपत्रे आणि पत्रकार हेच खरे जनतेचे आधार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com