Opinion: जगण्यात 'आउट ऑफ बॉक्स थिंकींग' का आवश्यक आहे?

life purpose happiness: जगात सगळ्याच गोष्टी तर्कशुद्ध होत नसतात, अतार्किक ‘वाईल्ड थिंकींग’ करून आपण स्वप्नवत दृष्टी निर्माण केली तर मेंदूमध्ये सकारात्मक जीवरसायनांचे पेव फुटेल.
life purpose happiness
life purpose happinessDainik Gomantak
Published on
Updated on

या जगात सगळ्याच गोष्टी तर्कशुद्ध होत नसतात, अतार्किक ‘वाईल्ड थिंकींग’ करून आपण स्वप्नवत दृष्टी निर्माण केली तर मेंदूमध्ये सकारात्मक जीवरसायनांचे पेव फुटेल. आपण आनंदी राहणे, ज्ञानी होणे हेच या जीवनाचे शेवटी उद्दिष्ट असते.

मानवी मेंदूच्या कार्यास ‘मन’ अशी संज्ञा आहे. मानवी बुद्धी हे याचेच प्रगत स्वरूप. मानवी जीवनाचा उद्देश काय हा प्रश्न सर्वसामान्य माणसालाही पडलेला असतो. आधी शालेय शिक्षण, नंतर महाविद्यालयीन शिक्षण, नंतर पदवी, नंतर नोकरी, विवाह, कुटुंब, सार्वजनिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा, संपत्ती अशी चाकोरीबद्ध जीवनपद्धती सर्वसामान्य माणूस जगत असतो. आपल्या जीवनाची आखणी भौतिक सुखांच्या आधारावर करणे हेच त्याचे उद्दिष्ट असते.

सच्चिदानंद स्वरूप म्हणजे ज्ञान, चैतन्य आणि प्रेम यांचे हे अतूट नाते. पण आज संपूर्ण विश्वात, या भौतिक जगात परिस्थिती अगदी उलट आहे. शालेय शिक्षणात आम्हांला शिकवले जात होते की आपली पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. पण चाळीस वर्षांपूर्वी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी माझा व्यापार सुरू केला तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ही पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून, ही पृथ्वी आणि संपूर्ण मानवी समाज हा एका रुपयाच्या नाण्याभोवती फिरतो.

आणि हे कटू सत्य मला स्वीकारणे भाग पडले. म्हणूनच चाळीस वर्षे अथक व्यापार करून मी माझी आर्थिक स्थिती मजबूत केली. कारण या भौतिक जगात ‘अर्था’शिवाय माणसाची स्थिती ‘अर्थशून्य’ होते हे व्यावहारिक सत्य आपल्याला स्वीकारावेच लागेल. अत्यंत गरिबीत किंवा अत्यंत श्रीमंतीत माणूस ज्ञानमय होऊ शकत नाही. आजपर्यंत जे जे महात्मे, संत, धर्मप्रवर्तक, समाजसुधारक झाले ते सर्व मध्यम वर्गात जन्माला आले होते.

life purpose happiness
Goa News: बांदोडा येथील बूथ क्रमांक २३ मधील सर्व ११९ मतदार हे सनातन आश्रमचे साधक, वाचा दिवसभरातील घडामोडी

मी जेव्हा माझ्या बेडरूम (ही बेडरूम आधी माझे आजोबा प्रसिद्ध समाज सुधारक काशिनाथ दामोदर नायक यांची होती.)मध्ये स्थिरावतो, तेव्हा मी कम्फर्ट झोनमध्ये असतो. दोन टीव्ही, दोन लँडलाइन, दोन भ्रमणध्वनी, चीनमधून आयात केलेली महागडी क्रोकरी, संग्रह केलेली चांदीची (पोर्तुगीज इंडिया) नाणी, अनेक ग्रंथ, पुस्तके अशी अत्यंत सुखमय स्थिती. माझ्या अत्यंत जवळच्या नातेवाइकाने मला एकदा विचारले की, विमानात फिरण्याची, मुंबईत असताना मर्सडिस बेंझ हायर करण्याची ऐपत असताना तुम्ही त्या महाराष्ट्राच्या एस.टी. (लालपरी म्हणजे अमेरिकेचा पॅटन रणगाडा) मधून का फिरता?’ मी त्याला दिलेले उत्तर. ‘मी आता पुस्तके वाचण्याचे बंद केले आहे.

आता मी माणसे वाचतो. त्यांच्याशी संवाद साधतो. लालपरीमध्ये शेतकरी भेटतात, गरीब माणसं भेटतात. आपलं भारतीय जीवन केवढे कष्टमय आहे याचा अनुभव येतो. त्यांच्या सुखदु:खात मी सहभागी होतो.’ उदाहरणार्थ. मी वर्धा ते यवतमाळ प्रवास करत होतो. मी माझ्या सीटवर बसलो होतो. दहा किलोचे बॅकबॅग व पुढे छोटी बॅग अशा दोन बॅगाही ठेवण्यास जागा नव्हती. मधल्या स्टॉपवर एक वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढली. हातात काठी.

त्यांची नात त्यांच्याबरोबर होती. त्या वृद्ध व्यक्तीच्या गळ्यावर आताच कुठेतरी मलमपट्टी केली होती. त्यांच्या नातीने अनेक जणांना त्यांना थोडीतरी जागा द्या म्हणून विनवले. ‘कुणी जागा देता का ही जागा?’ (नटसम्राट). विशेष म्हणजे दहा बारा वर्षांची मुलंही उठली नाहीत. वृद्धाला कोणीही जागा देत नाही हे पाहिल्यावर मी पटकन उठलो व त्या वृद्धाला जागा दिली. आपलं सुख दुसऱ्यांना देऊन त्यांचे दुःख आपल्या उराशी बाळगण्यात जो त्याग करावा लागतो तेच खरे सुख असते.

त्यांच्या नातीने मला म्हटले, ‘तुम्हाला यवतमाळपर्यंत उभं राहावे लागेल.’ मी तिला म्हटले की, ती चिंता तू करू नकोस. चोवीस तास उपाशी राहून, पंधरा किलोचे बॅकबॅग पाठीवर घेऊन दहा किलोमीटर चालण्याची माझी क्षमता आहे. ‘हे कसं शक्य आहे?’ माझ्या त्या नातेवाइकाचा प्रतिप्रश्न. या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. प्रवासात असताना अत्यंत अनुकूल परिस्थितीत मी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतो.

चोवीस तास उपाशी राहून पंधरा किलोचे बॅकबॅग पाठीवर घेऊन दहा किलोमीटरचे अंतर चालायचे असा टास्क. म्हणजे मी शरीराला आणि मनाला खंबीर करण्याचे ट्रेनिंग देत असतो. म्हणजे स्वतःहूनच स्वतःला ‘कमांडो’ ट्रेनिंग द्यायचे.

मी चेन्नई स्टेशनवर बसलो होतो. तेव्हा एक उंच आकर्षक व्यक्ती माझ्याजवळ आली. ते खूप अस्वस्थ होते. हे पारशी समाजातील आहेत हे मी प्रथमदर्शनी ओळखले. त्यांची वाढत जाणारी अस्वस्थता बघून त्यांना विचारले, ‘एनिथिंग राँग सर? कॅन आय हेल्प यू इज एनी वेज?’ ते म्हणाले, ‘मी, ट्रेनच्या प्रथम वर्गात होतो. माझे बॅग, पैसे, डेबिट कार्ड, औषधे सर्व काही चोरीला गेले. माझ्याकडे फक्त मोबाइल आहे. माझा रक्तदाब वाढत आहे.’ मी त्यांची पल्स रेट बघितली. मिनिटाला १६० ठोके. मी त्यांना म्हटले, ‘तुम्ही काळजी करू नका.’ मी त्यांना रेस्टॉरंटमध्ये नेऊन कॉफी दिली. औषधे घेतली.

life purpose happiness
Goa healthcare policy: महागडे उपचार आता सर्वांसाठी परवडणार; दुर्मिळ आजारांवरील औषधांसाठी राज्यात 'अभिनव किंमत' धोरण राबवण्याची सरकारची घोषणा

आणि ते नको नको म्हणताना त्यांच्या खिशात दोन हजार रुपये कोंबले. मी त्यांना पुन्हा विचारले, ‘तुम्हांला हॉस्पिटलमध्ये एडमीट करु का?’ कारण गेलेला जीव परत येत नाही. आता औषधे घेऊन त्यांना स्वस्थ वाटत होते. ते म्हणाले, ‘मी माझ्या भावाला फोन केला आहे ते विमान घेऊन येत आहेत.’ आता त्यांना मी कोण ही उत्सुकता लागली होती. मी म्हटले, ‘मी नायक गोव्याचा.’ त्यांनी आपले नाव सांगितले. (नाव उघड करू शक्त नाही) ते पुढे म्हणाले, ‘१९६०च्या दशकात माझे वडील व्यापारानिमित्त गोव्याला जायचे. तेथील प्रसिद्ध व्यापारी काशिनाथ दामोदर नायक त्यांचे खास मित्र. तुम्ही त्यांना ओळखता का?’ मला हसू आवरेना.

मी त्यांना सांगितले, ‘मी त्यांचाच नातू आहे.’ असे असतात ऋणानुबंध. पुढे एका वर्षानंतर मुंबईच्या वर्तमानपत्रात एक बातमी झळकली. त्यांच्या नावावरून मला कळते की हे मुंबईतल्या, दोन लाख कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या धनाढ्य पारशी कुटुंबातील सदस्य आहेत. असे जीवन असते. म्हणूनच मी अत्यंत अनुकूल परिस्थितीत प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतो. सदैव दक्ष स्थितीत राहतो. ‘आउट ऑफ बॉक्स थिंकींग’ करून आपल्या जीवनाची आखणी करणे जरुरी आहे. गरुड पक्षी जसा आकाशात स्वैर फिरतो, तसे स्वैर जगावे. आपल्या इच्छेने जगावे. स्वैर जगणे याचा अर्थ स्वैराचार करणे नव्हे.

भारतीय तत्त्वज्ञानात व्यष्टी, समष्टी, व्याप्ती यांची प्रगल्भ व्याख्या केली आहे. आपली व्याप्ती खूप मोठी आहे. अनंत आहे. ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही, त्यांचाही आदर करा. अज्ञेयवाद हाही भारतीय तत्त्वज्ञानाचाच भाग आहे. भारतीय तत्त्वज्ञान व प्रगत मानसशास्त्र यांचा योग्य संयोग केला तर आपण आनंदी ज्ञानमय स्थिती प्राप्त करू शकतो. या जगात सगळ्याच गोष्टी तर्कशुद्ध होत नसतात, अतार्किक ‘वाईल्ड थिंकींग’ करून आपण स्वप्नवत दृष्टी निर्माण केली तर मेंदूमध्ये सकारात्मक जीवरसायनांचे पेव फुटेल. आपण आनंदी राहणे, ज्ञानी होणे हेच या जीवनाचे शेवटी उद्दिष्ट असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com