
रामा काणकोणकर याच्याविरोधातील प्राणघातक हल्ल्याची धग अजूनही कायम आहे. गेले अकरा दिवस गोवा पेटलेला आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. व्यवस्थेविरुद्धचा हा राग असंतोषात रूपांतरित होऊ शकतो.
सुनियोजित गुंडगिरी जी काहीशी माफियांच्या पातळीवर जाऊ लागली आहे आणि तिने पोसलेला धाकदपटशा - यांच्याविरोधात सरकार काय भूमिका घेते, पोलिस आपल्या खाक्या वर्दीला जागतात काय?
शिवाय विरोधक, राज्यातील पत्रकार व प्रसारमाध्यमे विकली गेलीत काय? याकडे लोकांचे बारीक लक्ष आहे. एका खाणचालकाच्या प्रसारमाध्यमाने रामा काणकोणकरवरील हल्ला वैयक्तिक कारणामुळे झाल्याची भूमिका घेतली; तेव्हा तिचे वार्ताहर व संपादक टीकेचे धनी झाले.
रामा काणकोणकर हा समाजकार्यकर्ता म्हणून कसा होता आणि त्याचे वैयक्तिक चारित्र्य हा आता मुद्दाच राहिलेला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कोणाचीही यापुढे धडगत नसेल. कारण भ्रष्ट आणि जुलमी व्यावसायिकांनी पोसलेले गुंड त्यांचा कधीही खात्मा करू शकतात, हे चित्र रामा काणकोणकर प्रकरणात सामोरे आले.
यापूर्वी पर्वरी परिसरात येथे विनोद मेथर या समाजकार्यकर्त्याला जाळून मारण्यात आले होते, त्यावेळी कोणी ते धसास लावण्यास पुढे आले नाही. पुढे प्रकरण राजकीय आशीर्वादाने दाबून ठेवण्यात आले. आज समाजकार्यकर्ते ते उकरून काढताहेत.
२००८ मध्ये आयरीश रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांच्यावर भर दुपारी हॉटेलमध्ये हल्ला झाला होता. त्या प्रकरणात हाती काही लागले नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रवास व कायदा सुव्यवस्थेतील राजकीय हात उंचावत गेला. समाजकंटकांना गुंडांचा धाक नाही!
गुंड आता राजकीय आशीर्वादाने प्राणघातक हल्ला करण्यास आणखी धजावले आहेत. ही कोंडी कशी फोडणार? पोलिस आणि राज्य सरकारची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. भाजप पक्षश्रेष्ठी या घटनेकडे गांभीर्याने पाहत असणार.
रामा काणकोणकर घटनेमुळे राज्यातील गुन्हेगारीचा विकृत भीषण चेहरा सामोरे आला व समाजमन कधी नव्हे ते प्रक्षुब्ध झालेले आपण पाहत आहोत. लोक ऐक्य दाखवतात व केवळ भीती व्यक्त करून थांबलेले नाहीत.
निषेध आणि असंतोष व्यक्त करण्यास धजावले आहेत. लोक घराबाहेर पडून उद्या गोवा बंद करू लागले तरी आश्चर्य वाटायला नको. कारण या हल्ल्याने रागाची तिडीक संपूर्ण गोवाभर गेली. ज्यांनी-ज्यांनी या हल्ल्याची व्हिडिओक्लीप पाहिली, ते एक-दुसऱ्याकडे त्यासंदर्भात प्रखर शब्दांत मते व्यक्त करू लागले.
यासंदर्भात तयार केलेल्या व्हिडिओंना लाखो लोकांनी शेअर केलेले आहे. समाजमन जागृत झाले आहे. जरी ही विवेकबुद्धी व राग आणखी किती काळ शाबूत राहील, हा प्रश्न असला तरी लोक वेळ येते तेव्हा रागाने उठू शकतात आणि आपली सद्सद्विवेकबुद्धी कोणाकडे गहाण ठेवलेली नाही, हे दाखवून देतात.
एकतर सध्याच्या राजवटीपुढे लोक बोलायचे टाळतात किंवा आपला मध्यमवर्ग सुखासीन बनलाय, सुस्तावला आहे. समाजाप्रती कोडगा बनला आहे, अशी मते व्यक्त केली जातात.
परंतु रामा काणकोणकरसारखी घटना पुढे येते, तेव्हा त्यातील काहीजण जरूर समाजसेवकांच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त करीत असतील, परंतु अशा हल्ल्याची निंदा करताना थकत नाहीत, यातही तथ्य आहे. अलीकडे जगभर घडलेल्या घटनांचीही पार्श्वभूमी विचारात घ्यायला हवी.
नेपाळमध्ये कोवळ्या तरुणांनी राजसत्ता उलथवून टाकली. हा लेख लिहिला जात असताना लडाखमध्ये लोक सरकारी इमारती पेटवून देत होते. अन्याय दिसतो किंवा धाकदपटशाही वाढते, मुस्कटदाबी वाढते, लोकशाहीचे आकुंचन केले जाते तेव्हा असा राग उफाळून येताना आपण पाहतो.
लोकांमध्ये जरूर अशी भावनिक तडफ असते. ते एकटे असतात तेव्हा जरूर त्यांच्या मनात भीती, असाहाय्यता असते. परंतु लोक उत्स्फूर्तपणे एकत्र येऊ शकतात व समूहाने तेव्हा जे तिटकारा किंवा राग व्यक्त करतात, त्यावेळी निषेधाची एक मोठी शक्ती आकार घेत असते.
या पार्श्वभूमीवर काणकोणकरविरुद्ध झालेला हल्ला अचानक आणि उत्स्फूर्त अशा निषेधाचे कारण ठरला व गुंडगिरी, मुस्कटदाबी तसेच संघटित हिंसाचाराविरुद्ध पुकारा करणे समाजहित आहे आणि आपला तो अधिकार आहे, असे लोकांना वाटले.
गेल्या आठवड्यात डॉ. मधु घोडकिरेकर यांनी गोव्यातील वाढत्या कंत्राटी मारेकऱ्यांवर गोमन्तकमध्ये प्रक्षोभक उजेड टाकला आहे. गोव्यात सध्या व्यावसायिक मारेकऱ्यांनी आपले जाळे प्रस्थापित केले आहे. एवढेच नव्हे तर येथे सुपारी, खंडणी सुरू झाल्या आहेत.
आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जातात. हा प्रकार सर्रास चालू असल्याचे घोडकिरेकर यांनी म्हटले आहे. गोव्यात संघटित गुन्हेगारी आजची नाही, ती गेली २५ वर्षे कार्यरत आहे, हे खरे आहे.
रवी नाईक मुख्यमंत्री असताना सांताक्रूझमध्ये विद्यमान आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी गोवा प्रोटेक्टर्स स्थापन करून जबरदस्त दहशत निर्माण केली होती. त्यांना प्रोटेक्शन मनी द्यावा लागे. सांताक्रूझ आणि आसपासच्या भागात बिल्डर्सना याचा चाप लागला होता.
त्यानंतर व्हिक्टोरिया फर्नांडिस आमदार झाल्या, त्यामागेही रुडॉल्फ यांचे योगदान असल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. परंतु रुडॉल्फ यांच्या दहशतीमुळे मामी जिंकून येऊ शकतात, हेही आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. कारण व्हिक्टोरिया मामी यांनी ज्या तडफेने समाजकार्य, राजकीय आंदोलने व जनमत कौलात सहभाग घेतला, त्या सहज जिंकून येणे भाग होते.
मामींच्या मागे सांताक्रूझमधील महिलांचीही ताकद होती. पणजीमध्ये गोवा मुक्तीच्या काही वर्षांत जी आंदोलने झाली तिही मामींच्या नेतृत्वाखालील महिला ताकदीमुळे यशस्वी झाली, हे नोंदविले गेले आहे. सुरुवातीच्या राजवटीविरुद्ध आंदोलने करीत हसतहसत तुरुंगातही जाण्यास त्यांनी कमी केले नाही.
दुर्दैवाने त्या काळातील मगोप व युगोपच्या एककल्ली राजकारणात मामींचे राजकारण टीकाव धरू शकले नाही. त्यानंतर मात्र रुडॉल्फची ताकद व चिंबलमधील झोपडपट्टी मामींच्या राजकीय कारकिर्दीला वरदान ठरली.
परंतु याच रुडॉल्फना रवी नाईक यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत शह बसला. रवी नाईक यांनी पोलिसांना मुक्तद्वार दिले होते. त्यामुळे डोके वर काढू पाहणारी संघटित गुन्हेगारी वेळीच ठेचली गेली, पोलिसांच्या कर्तृत्वाचाही येथे उल्लेख करणे भाग आहे.
त्यावेळी पोलिस कशाची, दबावाची तमा न बाळगता कारवाई करीत. मोजक्या संख्येने येणारे आयपीएस अधिकारी आपल्या प्रतिमेला जपत. गोव्यात येताच ते स्थानिक गुंड-पुंडांचा तपशील मिळवत. आजच्यासारखे पोलिस दलाचे संपूर्णतः राजकीयीकरण त्यावेळी झाले नव्हते.
माझ्या टीव्ही कार्यक्रमात बोलताना निवृत्त आयपीएस बॉस्को जॉर्ज यांनी प्रतापसिंग राणे व विल्फ्रेड डिसोझा यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी पोलिस दलात आमदार-मंत्र्यांनाही हस्तक्षेप करू दिला नाही.
दुर्दैवाने आज सिंघम म्हणून ओळखले जाणारे काही अधिकारी लिलाव पद्धतीने स्वतःची वर्णी ड्रग्सचा सुळसुळाट असलेल्या पर्यटन केंद्रामध्ये करून घेतात. गेल्या २५ वर्षांत गुंड आणि म्होरके म्हणवणारेच अनेकजण विधानसभेत पोहोचले. मारेकरी किंवा त्यांचे हस्तक यांचा पाठिंबा असल्याशिवाय सरपंच बनता येत नाही.
रामा काणकोणकर प्रकरणात माझ्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या वक्त्याचा पूर्वेतिहास तुम्हाला माहीत आहे काय? असे विचारणा करणारे फोन मला आले. यापूर्वी त्यांनी गुंडगिरीत भाग घेतला आहे, ब्लॅकमेलिंगचा तो भाग होता, त्याचा बंगला जाऊन पहा, असे सुनावणारा एक प्रामाणिक धर्मगुरूही त्यात होता. मी वर सांगितल्याप्रमाणे गेल्या काही वर्षांत हेच लोक पंचायतींमध्ये पोसले आहेत व आमदार बनण्याची स्वप्ने पाहतात.
गोव्याचा विकास व राज्यात येणारा प्रचंड पैसाही संघटित गुंडगिरीला आश्रय देण्यास कारण ठरला. अनेक अभ्यासकांनी त्यावर पोटतिडकीने लिहिले आहे.
गेल्या २५ वर्षांत गोव्यात काही ठरावीक कुटुंबीयांनी राजकारणावर पकड ठेवली व शेजारील मतदारसंघांवर अधिपत्य निर्माण करण्यासाठी पैशांचा प्रचंड वापर केला. त्यासाठी जमिनी रूपांतरित केल्या जात आहेत व हा पैसा आपल्या हस्तकांना जिंकून आणण्यासाठी किंवा आमदार-सरपंचांना विकत घेण्यासाठी केला जाऊ लागला आहे.
गोवा मुक्तीच्या काळात राजकारण एक ध्यास होता. हा ध्यास गोव्याचे रक्षण व संवर्धन व्हावे यासाठीच होता. परंतु त्यानंतर मात्र भ्रष्टाचार व जमीन व्यवहार हीच राजकारणाची शिदोरी बनली आहे. एकेकाळी भ्रष्ट खाणचालकांच्या ओंजळीतून राजकीय पक्षांंना रसद मिळे.
आज जमिनींच्या व्यवहारातून प्रचंड पैसा येतो व राज्यातील ९० टक्के नेते राजकीय दलाल बनले आहेत. बहुतांश नेते जमीन विकसक किंवा बांधकाम व्यवसायात आहेत.
इतरांची हॉटेले आहेत आणि त्यातील अनेकांची नावे जमीन बळकाव, जमीन मालकांचा छळ, बळजबरी किंवा अपहरणे यात सर्रास घेतली जातात. एकेकाळी सोवळे मानणाऱ्या भाजपालाही आता जमिनीचे राजकारण वर्ज्य नाही. गोव्यात सध्या राजकीयदृष्ट्या बलवान मानले जाणारे बहुतांश नेते, कोणत्या ना कोणत्या जमीन व्यवहारात गुंतलेले आहेत आणि ते भाजपाच्या आश्रयाला आले आहेत.
एकेकाळी भाजपने २०११ च्या वादग्रस्त जमीन आराखडा आंदोलनात भाग घेतला होता. परंतु मोठा गहजब होऊनही प्रादेशिक विकास आराखड्याची नवीन आवृत्ती आणण्यात सरकारला रस नाही. हे सर्व बेकायदेशीर जमीन व्यवहार धाकदपटशा, राजकीय कारस्थाने, संघटित गुन्हेगारींच्या आश्रयाखाली चालले आहेत.
कोणाला त्याची शरम नाही की लज्जा. आंदोलकांना जाहीररित्या धमक्या दिल्या जातात. जादा सदस्य संख्या ही राजकीय पक्षांची सध्या ताकद केवळ मतदारांना आकृष्ट करण्यासाठीच नाही तर ती बेदरकारी किंवा घाकदपटशा दाखविण्यासाठीच असावी, याचाही प्रत्यय गेल्या आठवड्यात आला.
अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय यामुळे बदनाम झालेले असताना संघटित गुन्हेगारी आणि समाजकार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले अशा घटनांमुळे राष्ट्रीय पातळीवर गोव्याचे नाव गाजू लागले आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळते तेव्हा सरकारचीच बदनामी होत नाही, तर लोकांच्या मनातील सार्वजनिक विश्वासही कोलमडत असतो.
आपला देश व सार्वजनिक संस्था यांच्याबद्दलची विश्वासार्हता कमी होते. यापूर्वी संंस्था ढासळल्यामुळे राष्ट्रांचाही ऱ्हास झालेला आहे. सरकारने रामा काणकोणकर प्रकरणात तातडीने कारवाई केली, अनेक गुंड-पुंडांना अटक केली यात तथ्य आहे.
जेनिटो कार्दोझ याला प्रमुख संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर आले व राजकीय पक्षांनी निषेधाची तलवार उपसली. त्यामुळे सरकारवर दबाव आला आहे. परंतु अजूनही या गुंडांचा राजकीय म्होरक्या किंवा प्रमुख सूत्रधार कोण, याची चर्चा थांबलेली नाही.
अनेक व्हिडिओ व छायाचित्रे फिरू लागलीत. अनेक नेत्यांच्या निवडणुकीत हे गुंड दिसतात. काहींनी मंत्र्यांचे मदतनीस म्हणूनही काम केलेय... त्यामुळे संशयाची पाल चुकचुकते.
जेनिटोला पत्रकारांसमोर आणताना आम्ही हल्ल्यामागील मास्टरमाईंड पकडला आहे, असा दावा पोलिसांनी केला असला तरी पत्रकारांनी त्यांना थांबवून अजूनही राजकीय सूत्रधार मोकाट आहे काय? असा प्रश्न केला, तेव्हा उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांची बोलती बंद झाली. या प्रकरणात कदाचित राजकीय नेते थेटपणे गुंतले नसतीलही.
हल्ल्यामागे अनेक थिएरी मांडल्या जात आहेत. एका मोटार अपघातामुळे रामा काणकोणकर याची काही गुंडांकडे दुश्मनी निर्माण झाली होती. त्याशिवाय चिंबल येथे येऊ घातलेल्या एका मोठ्या प्रकल्पाला तो विरोध करीत होता.
त्यामुळे दिल्लीस्थित विकासकांचा त्याने रोष ओढवून घेतला होता. परंतु जमीन व्यवहार हे या सर्व मामल्यातील प्रमुख सूत्र असावे असा संशय जाणकार व्यक्त करतात. संघटित गुंड पैशांचा मोठा व्यवहार असल्याशिवाय असा सुनियोजित हल्ला करीत नसतात.
कोणीतरी त्यांच्या मागे आहे, या हल्ल्याचा कट एका मोठ्या असामीच्या उपस्थितीत ठरला असावा. गुन्हेगारांना मोबदलाही मिळणार होता. तरीही पोलिस पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगून त्याची तीव्रता कमी करण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत.
गुंडांच्या टोळ्या परस्पर वैमनस्यातून एकमेकांचा सूड घेत असतात. जमीन व्यवहारात तर विरोधी टोळ्यांना संपवण्याचे काम सर्रास चालते. गोव्यात कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगातही मोबाईल, अमलीपदार्थ व इतर बंदी असलेल्या गोष्टी सहज पोचतात.
तेथूनही सूत्रे हलविली जातात. जमीन व्यवहार प्रकरणात तर राजकारणी, पोलिस अधिकारी, सरकारी कार्यालये व गुंड यांची साखळीच तयार झाली असून, पैशांचा हा मामला भयानक पातळीवर गेला आहे, त्यामुळे एकूणच राजकीय हस्तक्षेप, पोलिसांची विश्वासार्हता, पोलिस दलातील नियुक्त्या, यावर लोक बोलू लागलेत व हिंसाचाराचा त्या वृत्तीशी संबंध जोडू लागले, हे स्वाभाविक आहे.
पोलिस यंत्रणेने नीचांक गाठला आहे व ते आपल्या ‘बॉस’साठी काहीही करतील अशीच समाजाची एकूण मानसिकता बनलीय. सत्ताधारी आमदार आपल्या सोयीच्या ठिकाणी ठरावीक पोलिस व अधिकारी आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
त्यामुळे असे हल्ले व एकूण व्यवहार यांची चौकशी योग्य निष्कर्षाप्रत पोहोचेल काय, यासंदर्भात लोक चिंता व्यक्त करीत आहेत. निवृत्त पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे राजकारण्यांनी हस्तक्षेप केला, कितीही राजकीय दबाव आला तरी या प्राणघातक हल्ल्याच्या मुळापर्यंत पोहोचून भक्कम पुरावे गोळा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे व खाकी वर्दीची प्रतिष्ठा त्यांना जपावी लागणार आहे.
रामा काणकोणकर यालाही सत्य कथनाचे धाडस दाखवावे लागेल. जेनिटो कार्दोझ हे नाव गेली अनेक वर्षे खून, खंडणी, गोळीबार आणि तडीपार आदेश अशी गुन्हेगारी वाटचाल करीत आले व तरीही तो कायद्यातील पळवाटा शोधून बाहेर येतो. त्याचेही राजकीय लागेबांधे आहेत, त्यामुळे गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचीही कसोटी लागली आहे.
पोलिस प्रमुखांना तर लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी शर्थ करावी लागेल. हे लोकशाही जनतेचे राज्य आहे, असा विश्वास समाजात निर्माण करण्याची व स्वतःचीही प्रतिमा सुधारण्याची त्यांना हीच नामी संधी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय प्रवृत्ती व शांतताप्रिय जनता यांच्यातील सामना असेच स्वरूप या लढ्याला लाभले. जनता न्यायासाठी उभी राहिली तरच या लढ्यातून काही उपजू शकेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.