Rama Kankonkar: प्रश्न ‘रामा’चा नाही, ‘रामराज्या’तील अराजकतेचा! गोव्यातील शांततेला लागलेला सुरुंग..

Rama Kankonkar Attack: बेकारी आणि दारिद्र्य, सामाजिक विषमता, शहरीकरण, स्‍थलांतर, अमली पदार्थाचा वाढता कैफ, कायदा व सुव्‍यवस्‍थेची शिथिलता शिगेला पोहोचल्‍यावर गुन्‍हेगारी फोफावणारच.
social Activist Rama Kankonkar assualt
Rama KankonkarDainik Gomantak
Published on
Updated on

बेकारी आणि दारिद्र्य, सामाजिक विषमता, शहरीकरण, स्‍थलांतर, अमली पदार्थाचा वाढता कैफ, कायदा व सुव्‍यवस्‍थेची शिथिलता शिगेला पोहोचल्‍यावर गुन्‍हेगारी फोफावणारच. रामा काणकोणकर यांच्‍यावर प्राणघातक हल्‍ला झाल्‍यानंतर उमटलेल्‍या संतप्‍त प्रतिक्रिया व राजधानी पणजीत मोर्चाद्वारे झालेला निषेध अराजकतेविरोधातील ‘आवाज’ आहे.

काणकोणकर हे निमित्त ठरले. पण, कायदा सुव्यवस्थेसह सरकारी कारभाराविरोधात व्यक्त झालेला तो असंतोष आहे. अनुसूचित जमातीवर अन्याय होत असल्याच्या तीव्र भावनेचा तो आक्रोश आहे.

सरकारविरोधी विविध घटक एकत्र आले. राजकीय लाभ मिळवण्‍याची त्‍यात सुप्‍त इच्‍छाही होतीच. वाळलेल्‍या पाचोळ्यावर ठिणगीची शक्‍यता मुख्‍यमंत्र्यांनी ओळखली. राजकीय चातुर्य दाखवून आंदोलकांच्‍या शिष्‍टमंडळाला संवादाची त्‍यांनी संधी दिली.

गोमेकॉत जाऊन काणकोणकरांची जातीने चौकशी केली. तेव्‍हा कुठे परिस्‍थिती नियंत्रणात आली. हे खरे असले तरी डबघाईला पोहोचलेल्‍या कायदा सुव्‍यवस्‍थेसंदर्भात आंदोलकांनी सरकारला दाखवलेला आरसा समाजस्‍वास्‍थ्‍यासाठी महत्त्वाचा आहे, ज्‍याची दखल घेण्‍यावाचून गत्‍यंतर नाही.

सरकारी धोरणे असोत, प्रादेशिक आराखडा असो वा खाण आंदोलन. विरोधी भूमिका घेतली म्‍हणून अपवाद वगळता गोव्‍यात कधी कुणी पराकोटीचा हिंसात्‍मक मार्ग अवलंबलेला नाही. गोव्‍यातील या सुसंस्‍कृतपणाला अलीकडच्या काळात सुरुंग लागला.

सुपारी देऊन ‘काटा’ काढण्‍याची संस्‍कृती हातपाय पसरत असल्‍याची भीती पणजीतील आंदोलनातून उद्धृत झाली. काणकोणकरांवर आलेली वेळ आपल्‍यावरही येऊ शकते, या धारणेतून निषेधासाठी पुढे आलेले कमी नव्‍हते.

मागील वर्षी मांद्रेत माजी सरपंच तथा विद्यमान पंच कोनाडकर यांच्‍यावर सुपारी देऊनच हल्‍ला घडवून आणला होता. रिवण येथे अमित नाईक यांनाही झालेली जबरी मारहाण ह्याच पद्धतीची होती.

दक्षिण गोव्‍यातील मुंगूल हल्‍ल्‍यात आतापर्यंत २५ जणांना अटक झाली, तो वाद पूर्ववैमनस्‍यातून झाल्‍याचे पोलिस भासवतात; परंतु वर्चस्‍ववादातून राजस्‍थानातून शूटर मागवल्‍याचे उघड झाले आहेच. असे सुपारीबहाद्दर चिंतेचे कारण आहे. हे न थांबल्‍यास उद्या कुणीही कुणाला मारण्‍याचे धाडस करेल.

पाच दिवसांपूर्वीच पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी राज्‍यात संघटित गुन्‍हेगारी नसल्‍याचा दावा केला होता. काणकोणकर यांच्‍या हल्‍लेखोरांनी आलोक कुमार यांना खोटे ठरवले आहे.

पोलिसांचा धाक लयास गेला आहे. मागील तीन महिन्‍यांतील घटना त्‍याची साक्ष देतात. पोलिस मार खाऊ लागलेत. पोलिसांना संरक्षणाची गरज भासण्‍याजोगी परिस्‍थिती का यावी? उत्तर व दक्षिण गोव्‍यातील ‘हिस्‍ट्रीशिटर’ पोलिसांना ठाऊक आहेत.

ते गुन्‍हे करतात, त्‍यांना जामीन मिळतो, मग पुन्‍हा नवे गुन्‍हे त्‍यांच्‍या हातून घडतात. त्‍यांना जोवर वेसण घातली जात नाही, तोवर हिंसक घटना थांबणार नाहीत. धाकाशिवाय गुन्‍हेगारी वृत्ती आटोक्‍यात येत नाही.

पोलिसांचा धाक नसल्‍यानेच ‘हिस्‍ट्रीशिटर’ दरवर्षी वाढत आहेत. पोलिस नोंदीनुसार राज्‍यात आजघडीला २२७ नामचीन गुंड आहेत. ज्‍यातील अनेकांना राजकीय संरक्षण लाभते, हे सर्वश्रुत आहे. अशांना कायद्याच्‍या कक्षेत रोखण्‍याची, हद्दपार करण्‍याची पोलिस छाती दाखवत नाहीत तोपर्यंत गुन्‍हेगारीवर नियंत्रण येणार नाही.

सऱ्हाईत गुन्‍हेगारांना पोलिस जेव्‍हा तुरुंगात सडवतील, तेव्‍हाच महासंचालकांनी उजळ माथ्‍याने माध्‍यमांना मुलाखती द्याव्‍यात. अॅप काढण्‍याच्‍या पोकळ घोषणांनी परिस्‍थिती सुधारणा नाही. काणकोणकर यांच्‍यावर हल्‍ला का झाला, याचे वास्‍तव समोर यायलाच हवे.

social Activist Rama Kankonkar assualt
Rama Kankonkar: रामा काणकोणकर हल्ला! पोलिसांची मोठी कामगिरी; अल्पावधीत 7 संशयित अटक; Watch Video

दुसरी बाजूही समजणे तितकेच गरजेचे आहे. प्रकरणातील ‘मास्‍टरमाईंड’चे नाव जाहीर होणार की कुणाला तरी बळीचा बकरा करणार? हे पाहावे लागेल. शांतताप्रिय, बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक, धर्मनिरपेक्ष गोव्‍याची ओळख पुसण्‍यास राजकीय नेत्‍यांच्‍या दबावाखालील पोलिसांची क्रियाशून्‍यता जबाबदार आहे.

यातूनच बाउन्सर, घातक शस्त्रे बाळगणाऱ्या भाडोत्री टोळ्या, घृणास्पद हिंसाचाराचा उदय झाला. पोलिस दलाचे राजकारणीकरण, राजकारणी-पोलिस-गुंड यांच्‍या संगनमतातून सध्‍याचे भयावह चित्र उभे राहिले आहे.

social Activist Rama Kankonkar assualt
Rama Kankonkar: ..जागे व्हा गोवेकरांनो! एका हाकेवरून नेते, समाजकार्यकर्ते आझाद मैदानात एकवटले; हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?

यात सामान्य, तळागाळातला माणूस, कार्यकर्ते यांचा आवाज बंद केला जातो. कारणे काहीही असली तरी मार्ग चुकतोय. त्याचे कारण पुन्हा तेच आहे की, पोलिसांचा वचक उरलेला नाही. प्रश्न रामाचा नाही, ‘रामराज्या’च्या नावाखाली सुरू असलेल्या अराजकतेचा आहे. शासन, प्रशासन असूनही नसलेल्या स्थितीत असण्याचा.

लोकांचा उद्रेक आज शांत झाला किंवा करण्यात यश मिळाले, म्हणजे समस्या सुटली असे समजणे भ्रामक ठरेल. मूळ समस्येकडे जोवर गांभीर्याने पाहिले जात नाही, तोवर लोकांचा हा उद्रेक पानांचे मथळे बनून चार दिवस तळपत राहील. त्यानंतर लोक विसरतात, याची सवय सरकारला झाली आहे. ती मोडायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com