
Climate Change Crisis
राजस्थान येथील ‘अनिल अग्रवाल डायलॉग’ या पर्यावरणविषयक परिषदेमध्ये बोलायला केंद्रीय पर्यावरण आणि विज्ञान केंद्राच्या (सीएसई) सरसंचालिका सुनीता नारायण उभ्या राहिल्या तेव्हा त्या अक्षरशः थरथरत होत्या.
त्या म्हणाल्या, २०२४ हे जगाला उष्णतेच्या संदर्भात कलाटणी देणारे वर्ष ठरले आहे. हे वर्ष इतक्या लवकर आमच्या पुढे उभे ठाकेल, असे आम्हांला यत्किंचितही वाटले नव्हते. काही वर्षांपूर्वी आम्ही वातावरण बदल, तापमान वाढ, उष्णता या संदर्भात बोलत असू, तेव्हा लवकरच २०२४ हे साल आमच्यापुढे महाकाय राक्षसासारखे उभे ठाकेल, असे आम्हांला स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु तो दिवस आला आणि जग भीतीदायक अशा अतितीव्र वातावरण बदलाच्या घटना एकामागोमाग अनुभवत अक्षरशः थरथरू लागले आहे.
एकाच वेळेला उष्णतेच्या तर शीतलाटा दुसऱ्या बाजूला, असे हे वातावरण बदलाचे भीषण चित्र आहे आणि त्यामध्ये संपूर्ण जग होरपळून जातेय की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो आहे. एका बाजूला तो लढत असताना दुसरीकडे अतितीव्र घटना एकामागोमाग आपल्या भयानक अस्तित्वाची प्रचिती देत उभ्या ठाकल्या आहेत. हे मानवी इतिहासातील अस्तित्वाच्या लढाईचे एक भयंकर पर्व आहे.
वैज्ञानिक या घटनेला मानवी संकट आणि संपूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणीय अस्तित्वाचा लढा मानतात. मानवी अस्तित्वासाठी माणसाने जे-जे केले- स्वतःचे कल्याण-इथपासून संपत्ती निर्माण - त्याला तडे जाऊ लागले आहेत...
उष्णतेच्या लाटा २१व्या शतकाचे एक मोठे आव्हान बनले आहे. ही अतितीव्र आणि अधिक काळ अस्तित्वात राहणारी अतिउष्णता, त्यात वातावरण बदलाची भर शिवाय जंगलतोड, मोठ्या प्रमाणावर लाकडाचे जाळणे व उष्णतेला फैलावणाऱ्या इतर घटना यामुळेही वातावरणाची तीव्रता वाढू लागली आहे.
जागतिक तापमान आता एक अंशाच्या वर गेले आहे आणि हे शतक संपेल त्यावेळी ते दोन अंश एवढे वाढलेले असेल, यामध्ये आता शास्त्रज्ञांमध्ये एकमत झालेले आहे. उष्णतेच्या लाटांचा परिणाम भारतातील महत्त्वाच्या शहरांवर यापूर्वीच झालेला आहे.
बहुतेक प्रमुख शहरांमध्ये तापमान ४० ते ५० अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा व पर्यावरणीय व्यवस्था यावर तीव्र परिणाम झाला. आपल्या लोकसंख्येला - त्यामध्ये बालके आली शिवाय वृद्धांचाही समावेश होतो - त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. बहुतेक भारतीय शहरांमध्ये दाटीवाटीने इमारती उभ्या केलेल्या असतात. तिथे हवा खेळू शकत नाही.
चिंचोळे रस्ते व रस्त्याच्या कडेला दाटीवाटीने उभ्या केलेल्या इमारती. या इमारती केवळ काँक्रीटच्या बनलेल्या आहेत. त्यामध्ये अन्य कोणतेही सामान वापरलेले नसते. त्यावर आरसे - ज्यामुळे उष्णतावाढीस मदत होते. केवळ अनेक शहरांमध्ये कोणतेही हरितपट्टे किंवा झाडेच अस्तित्वात राहिली नाहीत. मानवाने आपल्या विविध कामांच्या स्वरूपांमुळेही तापमान वाढविले. पर्यावरणास धोका निर्माण केला.
उष्ण तापमानामुळे आपण पर्यावरणीय व्यवस्था व सार्वजनिक आरोग्य यावर गंभीर परिणाम केला आहे. २०१८मध्ये ‘द लँसेट’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालात मोठ्या प्रमाणावर वृद्ध नागरिकांना विविध विकार जडले आहेत, असा निष्कर्ष काढला. हृदयविकार, फुफ्फुसे, मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रकार वाढले.
त्यामुळे इस्पितळामध्ये दाखल होणाऱ्या वृद्धांची संख्या वारेमाप वाढली. २०२३मध्ये तर तापमानामध्ये नवीन विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. शिवाय नागरी आरोग्य सुविधांवरचा ताण वाढला. भारतामध्ये विविध पर्यावरणीय व्यवस्था कोसळल्यामुळे सामाजिक, आर्थिक आव्हानांमध्ये वाढ झाली. या संस्थेच्या २०२३च्या अहवालामध्ये म्हटले आहे, हे शतक संपेपर्यंत भारताचे तापमान ५ अंशाने वाढलेले असेल व त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर तीव्रतेने होणार आहे.
जगामध्ये ज्या देशांवर मोठ्या प्रमाणात तापमानवृद्धीचा परिणाम होईल, त्यात भारत सातव्या क्रमांकावर आहे. भारताला या अतितीव्र वातावरणाचा गेल्या अनेक वर्षांपासून अनुभव येतो आहेच. गेल्या वर्षी भारतात उष्माघातामुळे २,२६९ मृत्यू घडले. एकूणच वातावरण बदलातून घडलेल्या मृत्यूंची संख्या ३,७०० आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत सकल उत्पादनावर झाला. भूपृष्ठावरची बांधकामे व बांधकाम क्षेत्राचा दबाव यावरील परिणामातून तापमान वाढीस आणखी हातभार लागला. विशेषतः उष्णतेच्या लाटेची मालिका अनेक शहरांमध्ये निर्माण झाली.
देशातील वाढते तापमान आणि मानवावर होणारा परिणाम याबाबत ‘सीएसई‘ने देशातील पाच महानगरे- दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू व चेन्नई तसेच चार छोटी शहरे चंदीगढ, जयपूर, लखनऊ आणि पुणे यांचा अभ्यास हाती घेतला होता. त्यांनी अभ्यासासाठी २००१ ते २०२३ ही वर्षे गृहीत धरून भूपृष्ठ तापमान विशेषतः आर्द्रता यादृष्टीने बारकाईने अभ्यास केला. आर्द्रतेचा उष्ण तापमानावर होणारा परिणाम हा त्यातल्या त्यात महत्त्वाचा दृष्टिकोन होता.
भारतामध्ये उन्हाळा आता तीव्र उष्णता निर्माण करू लागला आहे. त्याचे एक कारण अत्यंत वेगाने होत असलेले शहरीकरण हेच आहे. शहरे दाटीवाटीने उभी आहेत, नियोजनाचे कोणतेही निकष पाळलेले नाहीत. शहरांमध्ये काँक्रीट जंगलाचे निर्माण झाले. शिवाय बांधकामांमध्ये उष्णता शोषून घेणारे व त्याचेच उत्सर्जन करणारे सामान वापरले गेले. इमारतींमधील सामान आणि त्यांचे स्वरूप याबद्दलही कोणतेच नियम नाहीत.
शिवाय हरितपट्टे आणि झाडांच्या कत्तली यामुळे उष्णतेत भर पडली. जलाशयेही नेस्तनाबूद करण्यात आली. बहुतेक शहरांमध्ये आज ३८ ते ४० अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढलेले आहे. त्यात आर्द्रतेची भर पडल्याने मुंबई, कोलकाता व गोव्यासह इतर किनारी राज्यांमध्ये उष्मा अधिक त्रासदायक बनला. आर्द्रतेच्या प्रमाणातही वाढ झाल्याने मानवी जीवन मेटाकुटीला आले आहे.
आता बहुतेक शहरांमध्ये उष्णतेत आर्द्रता ही कमालीची भर टाकते. विशेषतः दिल्ली व हैदराबाद येथील कमाल तापमानात वाढ झालेली आहे. परंतु तेथील हवेतील उष्णता काही प्रमाणात कमी झाली तरी वाढलेल्या आर्द्रतेमुळे उष्णतेतील घट जाणवत नाही. दिल्लीतील आर्द्रता गेल्या दोन दशकांमध्ये ८ टक्क्यांनी वाढली. तर हैदराबादमध्ये हीच आर्द्रता १० टक्क्यांनी वाढली आहे. मुंबई व कोलकाता या शहरांसह पणजी राजधानीतील आर्द्रतेचे प्रमाण सहनशीलतेच्या वर पोहोचले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात वृद्ध नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. तसा इशारा हवामान खात्याने यापूर्वीच जारी केला आहे.
पावसाळा अनेक बाबतीत तीव्र तापमानाचे प्रमाण कमी करून गारवा आणण्यासाठी साह्यभूत ठरत होता. परंतु आता तो फारसा परिणामकारक ठरत नाही. विशेषतः दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई येथे पावसाळ्यामध्येही उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. म्हणजेच पावसाळापूर्व काळातही तेथे आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. आर्द्रतेमुळे पावसाळ्यातही लोकांना फार काळ गारवा जाणवत नाही.
वेगाने झालेले शहरीकरण त्यात अनियोजन राजकारण्यांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी शहरावर मारलेला डंख, यामुळे तापमानवृद्धी आटोक्यात येत नाही. चेन्नईमध्ये २००३मध्ये भूपृष्ठावरील बांधकामाचे परिणाम ५० टक्के होते, ते २०२३मध्ये ७०.३ एवढे वाढले. तेथील हरितपट्टाही १४ टक्क्यांनी कमी झाला.
जयपूरमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये बांधकामाचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून ८५.७ टक्के एवढे वाढलेले आहे. इतर लहान शहरांमध्येही बांधकाम क्षेत्र अप्रमाणित वाढले. चंदीगढमध्ये २००३मध्ये ते ३२ टक्के होते, ते २०२३मध्ये ५४.८ टक्के बनले. दिल्लीमध्ये त्या तुलनेत झाडांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तेथे तापमानवृद्धीत काहीशी घट होत असली तरी- रात्री दिल्लीचे तापमान ३.८ टक्क्यांनी घटते, तरीही अनेक कारणांमुळे रात्रीही तेथे उष्णता जाणवते.
रात्रीचे तापमान वाढू लागल्याचे एक नवे संकट निर्माण झालेले आहे. भूपृष्ठ तापण्याचे प्रमाण दिल्लीमध्ये अधिक जाणवते. दुसऱ्या बाजूला चंदीगढमध्ये अनेक जलाशये आहेत, शिवाय हरितपट्टेही आहेत. त्यामुळे तेथे तापमान कमी असायला हवे, परंतु मोठ्या प्रमाणावर बांधकामे वाढली असल्याने तापमान घटत नाही. रात्रीच्यावेळी तापमान कमी न होण्याचा प्रकार बंगळुरू, मुंबई, पुणे व पणजीसह इतर छोट्या शहरांनाही जाणवतो. तेथे पूर्वीसारखा रात्रीचा आता गारवा जाणवत नाही.
देशातील शहरांनी गेल्या एका दशकात हवामानात अनेक विकृत बदल अनुभवले. त्यात तीव्र तापमानवृद्धी पाहिलीच शिवाय शहरांना पुरांनीही तडाखा दिला. वातावरण बदल हे त्याचे एक कारण आहेच, शिवाय वातावरणाशी सुसंगत अशा शहरी नियोजनाचा अभाव, हेही महत्त्वाचे कारण आहे. हरितपट्टे जाऊन त्यांची जागा उष्णता पसरवणाऱ्या बांधकामांनी घेतल्याने ही शहरे आता भयंकर उष्ण बेटे बनली आहेत. अनियोजित बांधकामांमुळे पाण्याचा निचरा होण्याची शहरांची शक्तीही लोप पावली.
भारतीय वेधशाळेने विकसित केलेल्या ‘भारतातील वातावरणीय दुष्परिणाम व धोके’, या विषयावरील नकाशानुसार देशातील ३० टक्के जिल्हे व ४१ टक्के लोकसंख्या आता पुराच्या रेषेखाली आली आहे. १३ टक्के जिल्हे व १५ टक्के लोकसंख्येला उष्ण तापमानाचा सामना करावा लागतो. भारतातील शहरी लोकसंख्या २०३०मध्ये ५९० दशलक्ष बनणार आहे. जी अमेरिकेपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे शहराच्या अस्तित्वावर अस्तित्वाचे संकट कोसळणार आहे.
हल्लीच्या वर्षांत देशातील शहरांनी विलक्षण तापमानवृद्धी अनुभवली व २०२४मध्ये ती ५० अंशांवर पोहोचली. मे २०२४मध्ये तर ३१ पैकी २६ दिवस अतिउष्ण होते व हे तापमान पहाडी व किनारपट्टी भागात सारख्याच तीव्रतेचे होते. मे व जून या काळात दिल्लीत तापमान ४० अंशाहून अधिक झाले व लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशात या काळात उष्माघाताचे ३७४ बळी पडले. १७ राज्यांमध्ये ३७ शहरी भागात मार्च ते जुलै या काळात हृदयविकाराच्या ६७ हजार घटना घडल्या. यावरून गेल्या वर्षीच्या तीव्र उष्णतेच्या झळांनी कशी परिस्थिती निर्माण केली असेल, याचा अंदाज यावा. एका स्वतंत्र संस्थेने काढलेल्या निष्कर्षात उष्णतेच्या लाटेचे एकूण बळी ७३३ होते.
दिल्लीच्या सीएसईच्या सर्वेक्षणानुसार दिल्ली, जयपूर, नागपूर-पुणे येथे अतितीव्र झळांनी नागरिकांचा जीव कासावीस झाला व ५० दशलक्ष लोकसंख्या विकारग्रस्त बनली. उष्णतेच्या ऐन काळात संपूर्ण शहरे तीव्र तापमानाने ग्रासली होती व या उष्णतेने लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न निर्माण केले. या सर्वेक्षणानुसार उष्णतेच्या जोडीला आर्द्रता यामुळे चेन्नईला १५३ दिवस अडचणीचे गेले, नागपूरला १४३, तर पुण्याला ८४ दिवस त्रासाचे होते. २०२४ हे गोव्यासाठी सर्वांत उष्ण ठरले.
हवामान खात्याच्या निष्कर्षानुसार राजधानी पणजीचे तापमान डिसेंबर २०२४मध्ये ३३ अंशांवर गेले होते. आता तर गोव्यात फेब्रुवारीपासून तापमान वाढीला सुरुवात होते. मार्चच्या पहिल्या दोन दिवसांतच तापमान वाढीचा ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यावरून मेपर्यंत आपले काय हाल होणार आहेत, याचा अंदाज करता येतो. २०२४ या वर्षी गोव्याला अतितीव्र वातावरणाने सतत तडाखे दिले.
एका बाजूला हे वर्ष अतिउष्ण होते, तर पावसाळाही अतितीव्र होता. जून २०२४मध्ये ९६७.२ एमएम पाऊस पडला, जो ७ टक्के जादा होता. जुलै २०२४मध्ये एकाच दिवशी २३५ एमएम पावसाची नोंद झाली जी विक्रमी होती. पावसाळ्यात एकूण ४४००.७ एमएम पावसाची नोंद झाली जो पाऊस ४७ टक्के अधिक होता. ऑगस्ट २५ ते सप्टेंबर २ या काळात अस्ता चक्रीवादळानेही गोव्यात भीती निर्माण केली, शिवाय २०२४मध्ये १.३ अंशापेक्षाही अधिक होते.
तापमानवृद्धी आणि त्यातून उष्णतेची लाट, उद्भवणारे पूर व इतर अतितीव्र घटना यामुळे विशेष राष्ट्रीय धोरण आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बांधकामांवर निर्बंध, जमीन वापर, सांडपाणी आणि गटार व्यवस्था, पूर रोखण्यासाठी यंत्रणा आदी उपाय तातडीने तयार करावे लागतील.
गोव्यात चढ-उतार, डोंगर यांचे मजबुतीकरण, तेथे बांधकामांना मनाई, जंगलतोडीस बंदी व जमीन रूपांतरे व बांधकामांचे क्षेत्र, हरितपट्टे-शेतीचे संरक्षण यावर ठोस उपाययोजना हवी आहे. गोव्यात जंगलांचे संपूर्ण संवर्धन हाती घेतले जावे, शहरी नियोजनाचे इतरही काटेकोर उपाय तातडीने अमलात आणले तरच माणूस वाचू शकेल, परंतु त्याबाबत कोणालाच चिंता आहे, असे वाटत नाही!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.