Raigad Fort: मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी; 'किल्ले रायगड'

Raigad Fort History: रायगड किल्ला स्वराज्याचे, आत्मगौरवाचे आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होता.
Raigad Fort History
Raigad Fort HistoryDainik Gomantak
Published on
Updated on

रायगड किल्ला स्वराज्याचे, आत्मगौरवाचे आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होता. येथून सह्याद्रीच्या अनेक घाटवाटा आणि परिसरावर बारकाईने लक्ष ठेवता येते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याचे दुर्गम भौगोलिक स्थान ही या किल्ल्याची प्रमुख सामरिक ताकद होती.

सन १६७४ मध्ये याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर राजदरबार, बाजारपेठ, होळीसाठी जागा, मेघडंबरीसारखी उंच वास्तू आणि हिरकणी बुरूज ही स्थापत्यवैशिष्ट्ये आजही पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळही याच किल्ल्यावर आहे. या किल्ल्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्यामुळे मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचणार आहे.

महाराष्ट्राच्या पराक्रमाचे प्रतीक आणि मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार म्हणजे किल्ले रायगड. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड, महाडच्या उत्तरेस २५ किमीवर आणि जंजिऱ्याच्या पूर्वेस ६५ किमीवर वसलेला आहे.

रायगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ८४६ मीटर असून, या किल्ल्याभोवती सांदोशी, छत्री निजामपूर, वाघेरी, वाडी, पाचाड, कोंझर अशी गावे वसलेली आहेत. रायरी हे या डोंगराचे जुने नाव. रायगडाच्या ईशान्येला लिंगाणा, पूर्वेकडे तोरणा, दक्षिणेकडे कांगोरी-चांभारगड-सोनगड, वायव्येकडे तळेगड आणि उत्तरेकडे घोसाळगड अशा किल्ल्यांची संरक्षक फळी आहे.

या जागेचे भौगोलिक महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘रायगड’ येथे राजधानी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत रायगड किल्ल्यावर इंग्रज, डच, पोर्तुगीज या वकिलांनी भेट देऊन या किल्ल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे.

त्यात फ्रायर, हेन्री ऑक्सिंडेन, गोन्कालो मर्तिन्स, टॉमस निकल्स या युरोपियन वकिलांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६५६ च्या सुमारास चंद्रराव मोरे या आदिलशाह सरकाराकडून जावळी प्रांत आणि या प्रांतातील सर्व किल्ले जिंकून घेतले.

या मोहिमेदरम्यान महाराजांनी रायरीचे ‘रायगड’ असे नाव ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६२ मध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केली. सन १६७४ मध्ये रायगडावर मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला.

त्यांच्या मृत्यूनंतर सन १६८९ पर्यंत रायगड किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. सन १६८९ मध्ये हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला. १७३५ मध्ये मराठ्यांनी किल्ला पुन्हा मुघलांकडून जिंकून घेतला. नाना फडणवीस यांनी सन १७९६ मध्ये काही इमारतींची डागडुजी केली होती. १० मे १८१८ रोजी ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने तोफांचा मारा करून रायगड जिंकून घेतला.

रायगड किल्ल्याचे रचनात्मकदृष्ट्या श्रीगोंदे टोक, टकमक टोक, हिरकणी टोक, भवानी टोक असे चार भाग आहेत. भवानी टोक या भागात वाड्यांचे अवशेष आणि तलाव असून, टकमक टोक ही कडेलोट करण्याची जागा मानली जाते.

रायगड किल्ल्यावर दोन शिलालेख असून, ते दोन्ही जगदीश्वर मंदिराच्या नगारखान्यावर आहेत. एका शिलालेखात महाराजांनी गडावर कोणकोणत्या वास्तू बांधल्या याविषयी माहिती असून, दुसऱ्या लेखात गडावर बांधकामे करणाऱ्या अधिकाऱ्याचे म्हणजे हिरोजी इंदुलकर यांचे नाव आहे.

रायगडावर पाचाडकडून वाडीमार्गे जाणारा रस्ता सर्वांसाठी सोपा आहे. दक्षिणेकडील वाघ दरवाजाशिवाय किल्ल्याला महत्त्वाचे असे पश्चिमेला महाद्वार आहे. इतर सर्व बाजूंनी कातळ आणि काही ठिकाणी तटबंदी आहे. महादरवाजाच्या अलीकडे २२ मीटर उंचीचे दोन बुरूज आहेत आणि पुढे भव्य महादरवाजा आहे.

रायगडावर हत्ती तलाव नावाचा पाण्याचा मोठा तलाव असून, या तलावाच्या वरच्या बाजूस दोन मनोरे आहे. या मनोऱ्यांच्या मागील बाजूस राण्यांचे सहा महाल आहेत. राण्यांच्या महालाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा आहे, ज्याचा उल्लेख रायगडावरील शिलालेखात आलेला आहे.

Raigad Fort History
Pratapgad Fort : 1656 मध्ये जावळी जिंकले, शिवरायांनी किल्ला बांधण्याची आज्ञा दिली; पराक्रमाची गाथा सांगणारा 'प्रतापगड'

वाड्याच्या दक्षिणेला कचेऱ्या असून, पूर्वेला दिवाण-इ-खास आहे. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी सिंहासनाचा सुस्थितीत असलेला चौथरा आहे. सिंहासनासमोर कारंजे असून, त्यापुढे पूर्वेला १६ मीटर उंचीचा भव्य नगारखाना आणि बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरत असे.

नगारखान्याच्या पूर्वेस कुशावर्त नावाचा तलाव आहे व जवळच श्रीगोंदे टोक आहे. याच्या दरम्यानच्या जागेत छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांचे वाडे होते. नगारखान्याच्या उत्तरेला होळीचा माळ आहे.

Raigad Fort History
UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

ईशान्येस तटबंदीयुक्त पद्धतीने बांधलेले जगदीश्वराचे मंदिर असून, त्याच्या मंडपात मारुतीची सुबक पाषाणमूर्ती आहे. मंदिरात एका शिलालेखावर राज्याभिषेकाची तिथी व शक यांचा उल्लेख आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या पुढे शिवछत्रपतींची समाधी आणि त्यावरील मेघडंबरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com