
डॉ. ऑस्कर रिबेलो
नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांना पडलेल्या, ‘टू बी ऑर नॉट टू बी? जगावं की मरावं?’ या एकाच सवालाप्रमाणे मलाही असंख्य प्रश्न छळतात. शेक्स्पिअरच्या हॅम्लेटला पडलेला प्रश्न किंवा कुसुमाग्रजांच्या बेलवलकरांना पडलेला प्रश्न, ती द्विधा मन:स्थिती आज प्रत्यक्षात प्रत्येक गोमंतकीयाची आहे.
मला पडलेल्या प्रश्नांचे स्वगत बोलावे, की स्वत:पाशीच ठेवावे, या प्रश्नाने माझे डोके भंडावून सोडले आहे. तसा रंगमंचावर जात, स्पॉटलाइट असल्याची खात्री करून त्याखाली धडाधडा बोललोही असतो. असो. तर मी हे प्रश्न आपल्यासमोर ठेवतो...
लोकशाहीतील ‘रामराज्यात’ मारहाण झालेले रामा काणकोणकर स्वत: व्यक्त होणार नाहीत, तोवर त्यामागील सत्य बाहेर येणार नाही. ते जितका वेळ घेतील तितके त्यांच्यासाठी सरकारविरुद्ध होणारे निषेध आंदोलन मंदावत जाईल. त्यामुळे, रामा काणकोणकर दंडाधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी कधी तंदुरुस्त होतील?
युकेमध्ये जेव्हा सुएला आणि कीथ, व्हॅलेरी आणि अॅडोराबेल्स निवडून येतात तेव्हा आपण त्यांचे कौतुक करणाऱ्यांना गोव्यात जर एखादा लमाणी, यादव किंवा राजपूत सार्वजनिक पदावर निवडून आला तर हृदयविकाराचा झटका आल्यागत का होते? इतकी अॅलर्जी का?
रिअल इस्टेट क्षेत्रात असणारे आमदार, मंत्री, विरोधक रामा काणकोणकर यांची जातीने विचारपूस करतात. हल्ल्याचा धक्का बसलेले डॉक्टर प्रमोद सावंतही मदतीस पुढे सरसावतात. सत्ताधीश व विरोधक ‘रामा’ची विचारपूस करण्याबाबत एकत्र येतात. असे असूनही फक्त एकच प्रमुख रिअल इस्टेट ‘शार्क’ (पोहत पोहत साता समुद्रापार नसलेल्या आठव्या समुद्रात गेला असेल कदाचित. जाऊ बापडा!) या घटनेकडे ढुंकूनही पाहत नाही, का?
जेव्हा भाजपचे मतदार रागाच्या भरात उभे राहतात तेव्हा पक्ष त्यांची दखल घेतो आणि कोडार येथे संभाव्य आयआयटी-प्रकल्प रद्द होतो. मग, गोव्याच्या अन्य मुद्द्यांवर भाजपचे मतदार पेटून उठतील व सरकारला विरोध करतील का?
प्रशासकीय यंत्रणेला, काम करण्याचे व काम न करण्याचे असे दोन प्रकारचे वेतन द्यावे लागते. टेबलावरून दिले जाते, ते काम न करण्यासाठी असते, तर टेबलाखालून दिले जाते ते काम करण्यासाठी असते.
‘निष्काम’ राहण्यासाठी सरकार वरून पगार देते, तर ‘सक्रिय’ होण्यासाठी लोक खालून देतात. वाढवून कमी केलेला जीएसटी व अन्य अनेक कर आपल्या हातांनी भरणाऱ्या लोकांनी टेबलाखालून पगार देण्याचा अतिरिक्त बोजा उचलावा का?
केंद्रात भाजप असल्याने २०२७साली गोव्यातही भाजपचे सरकार असणे क्रमप्राप्त व कर्मप्राप्त आहे. भाजपच्या घोर विरोधात असलेले अनेक अघोरी, देवाच्या कौलाशिवाय किंवा कौलासह भाजपची शाकारणी करायला जातील.
हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि स्पष्ट असतानाही, आम्ही सर्व मतदाता नेहमीप्रमाणे सांप्रदायिक विरुद्ध धर्मनिरपेक्ष या वादात स्वत:चा निद्रानाश व रक्तदाब वाढवत बसावे का?
स्वत:च स्वीकारलेल्या कंटकाकीर्ण मार्गावर चालताना स्वराष्ट्राला परमवैभवापर्यंत नेण्यासाठी संघाचे स्वयंसेवक, भाजपच्या अत्यंत भ्रष्ट आणि अनैतिक मंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतील? की नैतिकतेची ‘बौद्धिके’ निवडून आलेल्यांना लागू होत नाहीत, असे घोषित करून मोकळे होतील?
‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्टा’ या उक्तीवर पराकोटीची प्रामाणिक श्रद्धा असणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, आमदारासाठी व मंत्र्यासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालतात. त्यांच्या किरकोळ दोषांवर मी अनेकदा बोट ठेवले आहे. बहुतांश कार्यकर्त्यांच्या चुका असतात. बहुतेकांच्या भूतकाळात चुका असतात.
पण ते सर्व गोव्याच्या समस्यांसाठी सातत्याने एकाकी लढा देत असतात, यात दुमत नाही. कधी काळी मीही त्यांपैकी एक होतो. भले ते लाख चुका करोत, पण अशा समर्पित कार्यकर्त्यांपेक्षा राज्यकर्ते कधीही चांगले असू शकत नाही, असत नाहीत. हे असे कार्यकर्ते गर्विष्ठ आणि स्वार्थी असतात का?
गोव्याची ओळख, पर्यावरण, भ्रष्टाचार आणि राहणीमानाच्या मुद्द्यांवर बहुतांशी एकमत असते. त्यामुळे, सांप्रदायिकता, सर्वधर्मसमभाव यावर शक्ती खर्च न करता; गोव्याची जमीन लुटणाऱ्या प्रमुख गुन्हेगारांना ओळखून, २०२७मध्ये ते कोणत्याही पक्षाचे लेबल लावून आले तरी त्यांना हरवण्यासाठी आपण एकत्र येऊ शकतो का?
गुंड सोकावत आहेत. त्यांच्यात होणारी अशांतता निवारण करण्याची खुमखुमी सध्या तरी गोव्यात कुणाचकडे नाही. त्यासाठी आंग्लदेशी धाव घ्यावी लागेल.
एक नाव माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेले ते म्हणजे जगभर काडेपेट्यांचे वाटप करून आग विझवण्याबद्दलचा नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यास अतिआतुर असलेले डोनाल्ड ट्रम्प! आपण समस्त गोमंतकीयांच्या वतीने, सर्व गुंडांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी यत्र तत्र सर्वत्र नाक खुपसणाऱ्या, टॅरिफलादे अमेरिक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अधिकृतपणे आमंत्रित करूया का?
हेच ते सर्व प्रश्न जे मी स्वगतात विचारणार होतो. पण, लेखात विचारून टाकले. तसे पाहू जाता हॅम्लेट व बेलवलकरांची व्यथा, अगतिकता एकच आहे, जी माझी आहे; फक्त कालखंड आणि संदर्भ वेगळे आहेत.
शेवटी, जे हॅम्लेट म्हणतो :
‘...म्हणूनच दु:खाने भरलेलं आयुष्य इतकं लांबतं. ते जगू देत नाही, पण जिवंत ठेवतं. पण, म्हणून सहन करायचा काळाचा चाबूक? हेटाळणी? सत्ताधाऱ्यांचा अन्याय? मानभावी माणसाची उपेक्षा? नाकारलेल्या प्रेमाची वेदना? न्यायव्यवस्थेचा विलंब? सत्ताधाऱ्यांचा गर्विष्ठपणा? आणि लायकी नसलेल्यांकडून होणारी गुणी लोकांची उपेक्षा?’
जे वृद्ध अप्पासाहेब बेलवलकर म्हणतात :
‘नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार. अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना. आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो, खालच्या मानेनं, आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी....
विधात्या.. तू इतका कठोर का रे झालास?’
आणि तेच स्वगत आता मी स्वत: डॉ. ऑस्कर रिबेलोही म्हणतोय.
भले मला त्यासाठी ऑस्कर मिळो न मिळो...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.