Goa Opinion: 13-14 पिढ्या गोव्यात घालविलेले ‘गोंयकार’ आपल्या जमिनींच्या हक्कासाठी कित्येक दशके कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत..

Cultural exploitation in goa: ’गोंयकारपण’ जपण्यासाठी, गोवा ‘विनाशकारी’ राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करण्यासाठी जनतेने पुढे येणे अत्यावश्यक आहे.
Cultural exploitation in goa
Dainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

धर्मनिरपेक्ष देश असूनही भारतात धर्म आणि राजकारण यांचा जवळचा संबंध असणे हे धर्माचे तसेच राजकारणाचे विडंबन आहे. अनेक राजकीय पक्ष आणि नेते धर्माचा उपयोग मतदारांना प्रभावित करण्यासाठी करतात.

हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन-बौद्ध-शीख समुदायांमधील तणावांचा उपयोग राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी केल्यामुळे, सामाजिक फूट पडून सामान्य माणसाचे गरिबी, शिक्षण आरोग्य, रोजगार, यासारखे प्रश्न दुर्लक्षित राहतात. हल्लीच्या काळात राजकारण्यांनी, ‘अति-श्रीमंतांना’ लाभ देणाऱ्या धोरणांना प्राधान्य दिल्यामुळे सामाजिक असमानता कमालीची वाढली आहे. राजकीय नेत्यांचा धर्माचा गैरवापर आणि त्यामुळे होणारी सामाजिक हानी यावर प्रकाश टाकताना आर. के. लक्ष्मण यांनी ‘कॉमनमॅन’ द्वारे केलेले विडंबन विशेष प्रबोधन करून गेले.

फुगडी हे स्त्रियांचे पारंपरिक लोकनृत्य स्त्रियांना दैनंदिन कामातून विश्रांती देण्यासाठी आणि सामुदायिक बंध मजबूत करण्यासाठी जन्मले. शिमगा, फुगडी-धालो, जागर, घोडेमोडणी यांसारखी नृत्ये-मिरवणुका, हिंदू-ख्रिश्चन समुदायांमध्ये गायली जाणारी भजने-भक्तिगीते-मांडो या कला गोव्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेचे प्रतीक आहेत.

गोव्यात काही नेत्यांनी या धार्मिक उत्सव आणि परंपरांचा उपयोग राजकीय प्रचारासाठी करणे यासारखे विडंबन नाही. राजकारणी या कलांचा उपयोग स्थानिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली मतदारांना आकर्षित करण्यासाठी करतात. राजकारण्यांच्या अल्प बुद्धीला वाटेल त्याप्रमाणे राज्याचे अधिकृत उत्सव घोषित करतात.

अशा उत्सवांत-मिरवणुकांत हल्ली देवापेक्षा मोठे दिसणारे राजकारण्यांचे फोटो, राजकीय पक्षांचे झेंडे आणि घोषणा दिसतात. ‘धार्मिक कार्ये’ राजकारण्याद्वारेच प्रदर्शनीयरीत्या आयोजित केली जाणे, यासारखे विडंबन नाही.

ढोल आणि तबल्यातील फरक माहीत नसलेले राजकारणी अति-उत्साहाने धार्मिक मिरवणुकांत नाचताना ‘बीच’वरील नशा-धुंद पर्यटकासारखे दिसतात, भजनांना ‘गोंगाट’ म्हणणारेच आता राजकीयदृष्ट्या प्रेरित सभेत भजने गाऊन स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व पाहून आपला हा अनमोल सांस्कृतिक वारसा मूळ स्वरूपात जपण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणाऱ्या ‘अस्सल गोंयकारांच्या’ मनात प्रश्न निर्माण होतो की या कला खरोखर आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात की राजकारण्यांच्या हातातील बाहुले बनून संस्कृतीचे ‘विडंबन’ करतात?

पूर्वायुष्यात ‘सूर आळवीत’ आयुष्याच्या उत्तरार्धात ‘भजन-प्रवचन-अध्यात्मात’ ‘रमबाण’ झालेले कित्येक लोक अस्मादिकाने पाहिले आहेत. आपल्या पाल्यांना अध्यात्माकडे ‘सरकविण्यास’ अशा लोकांना धन्यता वाटते.

हल्ली बाल-कलाकारांच्या भजनी स्पर्धा भरविल्या जात आहेत. बालपण हे मुलांचे हसत-खेळत विश्वाकडे उत्सुकतेने बघत, धमाल करत, स्वप्नांच्या दुनियेत बागडण्याचे वय आहे. मुलांनी भजन-चित्र-नृत्य-गायन-नाट्य-वक्तृत्व या कलांत, त्यांच्या आवडीप्रमाणे व्यक्त व्हावे. तरीपण कल्पना करा एक ‘अजाण बालक’ विजयाची स्वप्ने पाहत, राग आणि तालाच्या ‘कचाट्यात’ सापडून भजन गात आहे. पालकांना वाटते की आपले मूल आध्यात्मिक उंची गाठत आहे, तर शिक्षकांना वाटते की ते ‘संस्कारी’ बनत आहे.

पण हे विडंबनात्मक दृश्य आहे. ‘गंभीर सत्य’ असे आहे की आपण मुलांचे बालपण आणि स्वातंत्र्य हिसकावून, त्यांना पुढील आयुष्यात अत्यंत आवश्यक असलेला ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ न देता आध्यात्मिकतेच्या बंधनात अडकवत आहोत.

गोव्यातील नोकरीचे वचन आणि भ्रष्टाचार हे एक विडंबन आहे. राजकारणी स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात त्या विकतात. ‘कॅश-फॉर-जॉब्स’ घोटाळ्याने या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. सद्य:स्थितीत कुठलाही सभ्य व्यवसाय करणेही कठीणच असल्यामुळे स्थानिक गोवा सोडून जात असल्याचे भयावह चित्र आहे.

Cultural exploitation in goa
Goa Opinion: 'गोवा विद्यापीठाचा' घसरलेला कारभार रुळावर यावा, ही राज्यपालांकडून कुलपती नात्याने अपेक्षा

१९६१मध्ये पोर्तुगीज राजवट जाऊन गोवा मुक्त झाला. गोवा सोडून जाताना त्यांनी गोव्यातील जमिनी सरकारच्या नसून स्थानिकांच्या असल्याचे कायदेशीरपणे दाखवल्याने ‘गोंयकारांना’ आपल्या जमिनी आणि संस्कृती जपण्याची संधी मिळाल्याचे दिसले.

परंतु हळूहळू खाणकाम, रेती-उत्खनन आणि एमपीटी, एमआरएफसारख्या मोठ्या आस्थापनांमधील कामांमुळे गोव्यात बाहेरील लोकांचा प्रवेश वाढला. या लोकांनी गोव्यात आर्थिक संधींचा फायदा घेतला आणि हळूहळू बेकायदेशीरपणे, ‘एक-चौदा फॉर्म’सारख्या, बनावट कागदपत्रांद्वारे अनेक जमिनी खरेदी केल्या.

Cultural exploitation in goa
Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

याच लोकांनी पर्यटन आणि रिअल इस्टेट उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून जमिनींच्या किमती गगनाला भिडवत गोव्याची दुर्दशा घडवली. गोव्यात खाणींवर घमेली उचलण्यासाठी, रेती काढण्यासाठी किंवा मुरगांव पोर्ट ट्रस्ट, शिपयार्डसारख्या मोठ्या संस्थांमध्ये काम करण्यासाठी आलेले बाहेरील लोक आता जमिनींचे मालक बनले आहेत, तर १३-१४ पिढ्या गोव्यात घालविलेले ‘मूळ गोंयकार’ आपल्या जमिनींच्या हक्कासाठी कित्येक दशके कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत, असे विडंबनात्मक चित्र दिसून येते.

गोव्यात सरकारी कर्मचाऱ्याला कार्यालयात घुसून दिल्लीकरांकडून मारहाणीच्या बातमीने विडंबनाचा कळस गाठला. राजकारण्यांच्या ढोंगीपणा आणि कृतींमुळे होणारी हानी उघड करण्यासाठी, ‘गोंयकारपण’ जपण्यासाठी, गोवा ‘विनाशकारी’ राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करण्यासाठी जनतेने पुढे येणे अत्यावश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com