
अॅड. सूरज मळीक
सुजलाम् आणि सुफलामतेचा समृद्ध वारसा लाभलेला पेडण्यातील पालये गाव पश्चिम किनारपट्टी आणि तेरेखोल नदीच्या मुखावरती वसलेला आहे. कधीकाळी तेरेखोल नदी आणि खाडीने मुख्य जलमार्गाशी हा गाव जोडलेला असल्याकारणाने देश विदेशातून येणाऱ्या व्यापारी, यात्रेकरू यांना तो ज्ञात होता.
अरबी सागराच्या दोन किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीने युक्त या गावात कोरगाव आणि हरमल या गावांतून येणारे मुख्य रस्ते आज असले तरी पूर्वी जलमार्ग हा वाहतूक आणि दळणवळणाचे मुख्य माध्यम होते. त्यामुळे शेकडो वर्षांपासून पालयेत लोकसमूह स्थायिक झाले होते.
खाजन आणि वायंगणी भातशेतीबरोबर नवलो पठारावर आणि अन्य जमिनीत कुळीथ, वरी, पाखड, तीळ यांची लागवड करण्याबरोबर भाजीपाला, मिरची, कांदा यांचे उत्पादन केले जात असल्याने इथे सुख समृद्धी नांदत होती. मिरझल, पोवळीसारख्या नैसर्गिक झरी आणि तळी तलाव या सारख्या जलस्रोतांत बारमाही पाणी खेळते ठेवण्यासाठी पारंपरिक बांध घालण्याची प्रथा इथे होती. त्यामुळे जलसिंचन सुविधेमुळे शेती, भाजीपाला कडधान्ये यांचे उत्पन्न केले जायचे.
पालये हे ग्रामनाम लोकवस्तीने युक्त वाड्याशी निगडित आहे. ‘पाल’ म्हणजे गाव असा अर्थ होतो. गोव्यात पेडणे तालुक्यात तुये येथे पालये, बार्देशात उसकई येथे व सांगे तालुक्यात देखील पालये नावाचा गाव आहे.
पेडण्यातील सत्तावीस महसुली गावांपैकी ९९९.६४ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावाला एका बाजूने गोव्याच्या उत्तरेच्या टोकाला महाराष्ट्रापासून भौगोलिकदृष्ट्या वेगळा बनवण्यासाठी राज्य सीमा ठरलेली तेरेखोल नदी, तर दुसऱ्या बाजूने फेसाळणाऱ्या अरबी समुद्राची सीमा आहे. समुद्राचे खारे पाणी तेरेखोल नदीत घुसत असल्याने पालये परिसरात खारफुटीच्या वैविध्यपूर्ण वनस्पती अनुभवाला मिळतात.
त्यामुळे क्षार पाण्यातील परिसंस्थेत नाना तर्हेचे मासे, कोळंबी, खेकडे, खुबे यांची एकेकाळी पैदास व्हायची. शेती, मासेमारी, भाजीमळे ही इथल्या कष्टकरी समाजाला उपजीविकेची साधने परंपरेने प्राप्त झाली होती. आजच्यासारखी वाहतूक आणि दळणवळणाची साधने नव्हती तेव्हा पालये गाव स्वयंपूर्ण होता. इथली शेतजमीन आणि नदीची खाडी जगण्यासाठी आवश्यक बाबी पुरवत होती.
इथल्या मातीतील सुपीक गुणधर्मामुळे धान्याची भरपूर पैदास व्हायची. जमीन सुपीक होती आणि त्यासाठी इथल्या कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली. मृण्मयी वारुळाकडे पाहताना त्या भूमीत पाण्याचे स्रोत असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला.
वाळवीने मातीचे भुसभुशीत कण गोळा करून बनवलेल्या वारुळाच्या रूपात त्यांनी आपल्या कुलदैवत भूमिका देवीला पुजण्यास सुरुवात केली. दर्याच्या सम्राटाला आग्यो आणि गोरखो वेताळाच्या रूपात पुजलेले आहे. या बद्दलच्या कथा आजही ऐकायला मिळतात.
गावची आदिमाया भूमिका देवी एकेकाळी वृक्षवल्लींच्या आश्रयात जंगलसदृश परिसरात होती. दरवर्षी तिचे वारूळ वाढत होते. कृमी-कीटकांना जगवणारे हे वारूळ पालयेचे भूषण होते. आज सिमेंट कॉंक्रीटच्या भिंतीमुळे चारही बाजूने निसर्गाशी असलेला संपर्क तुटल्यामुळे त्याची सतत वाढणारी उंची स्थिरावलेली आहे.
सुरंगी, बकुळी, हसोळी, पायरी आणि महाकाय घोटींग व त्यावर लोंबकळणाऱ्या वेली यांनी संपन्न असलेले जल्मी देवाचे आदिमस्थान पालये गावातल्या देवराईच्या इतिहास आणि संस्कृतीची स्मृती जागृत करत आहे.
राष्ट्रोळीच्या नावाने उभे असलेले विस्तीर्ण वड आणि धालो शिगम्याच्या पारंपरिक मांडावर म्हटली जाणारी गाणी या गावातल्या निसर्ग आणि पर्यावरणीय संस्कृतीचा वारसा सजीव करतात. ठिकठिकाणी असलेल्या भेंडीसोबत उंच डोकावणारे भेरली माड विविध पक्ष्यांना आकर्षित करतात.
सरकारी यंत्रणेच्या नोंदीनुसार पालयेत नैसर्गिक जंगल आच्छादन नसले तरी पूर्वापार इथल्या लोकमानसाने जल्मी देवाची राय, बाराजणाची राय अशा देवरायांद्वारे वृक्षवल्ली आणि पशुपक्ष्यांचे जगणे समृद्ध केले होते. त्यामुळे समुद्री पक्ष्यांबरोबर जंगली पक्ष्यांचे वैभव इथे अनुभवायला मिळते. ‘ब्राऊन बॅलिड ककू’ या पक्ष्याची मान्सूनातील पक्षी म्हणून ओळख आहे.
सकाळ संध्याकाळ या पक्ष्याचा आवाज आपल्या कानावर पडतो. पावश्या पक्ष्यासारखाच तो परत परत एकसारखा आवाज करत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. या पक्ष्यांबरोबर ‘बॅन्डेड गेय ककू’, विविध किंगफिशरच्या आवाजाने संपूर्ण परिसर गजबजून जातो.
या पक्ष्याचा आवाज आजही इथल्या शेतकऱ्यांना खुणावत असतो. पावसाळ्यात गावातील काही मंडळी समूहाने एकत्र येऊन लांबलचक क्षेत्रफळात शेतीची लागवड करताना दिसतात. येथील श्रद्धास्थान, देवळाजवळ असलेल्या विहिरीचे पाणी आजही पेयजलासाठी उपयोगात आणलेले आहे.
पालये ग्रामसंस्थेतील भूमिका, वेताळ, रवळनाथ, भगवती, महादेव, ब्राह्मण आणि वाटेराम पुरुष या लोकदैवतांचे आशीर्वाद येथे राहणाऱ्या लोकमानसाला लाभले. म्हारिंगण, जल्मी, राष्ट्रोळी ही लोकदैवते या गावाची सांस्कृतिक संचिते आहेत. ढोलताशांच्या गजरात दसऱ्याला लोकगीतांच्या पार्श्वभूमीवर होणारा रोमटामेळातील आविष्कार, इथल्या कष्टकरी समाजाची नाळ या मातीत घट्ट पुरलेली आहे याचा साक्षात्कार घडवतो.
पालये गाव हा शूरवीरांचा. निसर्गाच्या प्रसन्नतेने नटलेल्या या भूमीबरोबर समूहजीवन व्यतीत करताना समाजरक्षणासाठी लढणारे वीरपुरुष जन्माला घालणारा गाव आहे. गावाच्या अस्मितेच्या रक्षणार्थ त्यांना आपल्या जीव गमवावा लागला. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेले वीरगळ वाटेराम कुलपुरुषाच्या स्थळी पाहायला मिळतात.
गावातील सतीची पाषाणे गावाच्या क्षात्रतेजाचा इतिहास सांगतात. आज पालयेत बहुसंख्य हिंदूबरोबर ख्रिस्ती समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे. गावात आज एकही मुस्लीम धर्मीय नाही. परंतु बावाखानवाडा हे नाव आणि मधलावाडा येथे असणारे पिराचे थडगे एकेकाळी इथे असलेल्या मुस्लीम वस्तीची आठवण करून देतात.
पालये गावातील लोकांनी निसर्गातील वृक्ष, तळी, दगड यामध्ये देवत्व अनुभवले त्याचप्रमाणे भोम येथील एका महाकाय देहाच्या विस्तीर्ण पसरलेल्या वडाच्या वृक्षांत वाईट शक्तीचा वास असल्याचे जाणवणे. त्यामुळे आज सकाळी संध्याकाळी सहसा कुणी या वृक्षाकडे जात नाही. दोन किलोमीटर चौरस परिसरात पसरलेला हा गोव्यातील भव्य वृक्ष आहे.
‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ अशा अभंगांद्वारे भगवद्भक्तीचा प्रसार करणाऱ्या संत सोहिरोबानाथ आंबिये यांचा जन्म १७१४ साली पालयेत झाला. अभंग, पदे, श्लोक त्याचप्रमाणे सिद्धांत संहिता, अक्षयबोधसारखी ग्रंथनिर्मिती करणाऱ्या या संत पुरुषाच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा गाव आजही तितकाच दिव्यत्वाची प्रचिती देणारा आहे.
पेडण्यातून येताना भालखाजन, मांद्र्यातून येताना हरमलमार्गे तर महाराष्ट्र आरोंदा किरणपाणीतून येताना जलमार्गे पालयेत येणे शक्य होते. मराठी नाट्यपरंपरा, ढोलकी-भजनाचा वारसा मिरवणारा पालये पर्यटकांच्या वर्दळीमुळे आपले गतवैभव हरवत चालला आहे. ४५० हेक्टर जमीन एकेकाळी लागवडीयोग्य होती.
खाजन शेती करण्याची परंपरा आज विस्मृतीत जात आहेत. १९९४मध्ये हरमल-पालयेच्या पठारावरील ३०० हेक्टर जागेत ‘जपानग्राम गोल्फ कोर्स’ विकसित करण्याचे योजिले होते. परंतु ती संकल्पना प्रत्यक्षात आली नाही म्हणून गावातील लोकांनी पूर्वापार जपून ठेवलेला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा काही प्रमाणात तरी आज टिकून आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.