

संगीता नाईक
१९४८ मध्ये, म्हणजे जवळपास आठ दशकांपूर्वी, जेव्हा माहिती तंत्रज्ञान अगदी बाळबोध स्वरूपात होते, त्यावेळी ‘१९८४’ ही कादंबरी लिहिली गेली. आणि तरीही कादंबरीतील काल्पनिक राज्यव्यवस्थेचे आजच्या घडीच्या जगभरातील अनेक एआय-पॉवर्ड राज्यव्यवस्थांशी असलेले साधर्म्य खरोखरच अचंबित करणारे आहे.
ऑर्वेलियन लोकशाही’ या संकल्पनेशी माझी ओळख डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण (डीपीडीपी) या कायद्याविषयी माहिती करून घेताना झाली. देशभर फिरून, नागरिकांकडून अभिप्राय घेऊन या कायद्याचा सर्वात पहिला मसुदा तयार करणारे न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णा हे या कायद्याचे एक प्रमुख शिल्पकार. डीपीडीपी कायद्याअंतर्गत, माहिती(डेटा)संरक्षणाच्या नावाखाली सरकारला जबाबदेहीमुक्त अमर्याद अधिकार दिले गेले, तर देशाची ‘ऑर्वेलियन स्टेट’ सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, असा उल्लेख त्यांनी या कायद्या विषयी बोलताना केला.
न्यायमूर्तींच्या या विधानाने कुतूहल चाळवल्याने मी या संकल्पनेचा मागोवा घेत निघाले, तेव्हा उलगडा झाला की, याचा संदर्भ जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘१९८४’ या जगप्रसिद्ध कादंबरीशी आहे. १९४८ मध्ये, म्हणजे जवळपास आठ दशकांपूर्वी, जेव्हा माहिती तंत्रज्ञान अगदी बाळबोध स्वरूपात होते, त्यावेळी ‘१९८४’ ही कादंबरी लिहिली गेली. आणि तरीही कादंबरीतील काल्पनिक राज्यव्यवस्थेचे आजच्या घडीच्या जगभरातील अनेक एआय-पॉवर्ड राज्यव्यवस्थांशी असलेले साधर्म्य खरोखरच अचंबित करणारे आहे. म्हणूनच या कादंबरीला तंत्रज्ञानाने नियंत्रित केलेल्या राज्यव्यवस्थांच्या भीषण परिणामांवर भाष्य करणारा एक राजकीय दस्तऐवज मानले जाते.
जॉर्जऑर्वेल यांनी या कादंबरीत वरवर लोकशाहीसारख्या दिसणाऱ्या एका राज्यव्यवस्थेचेडिजिटल तंत्रज्ञान वापरून केलेले हुकूमशाही राजवटीतील रूपांतर चित्रित केले आहे. कादंबरीची कथा ‘ओशियानिया’ नावाच्या एका काल्पनिक देशात घडते, जिथे ‘इं गसॉक’ (इंग्लिश सोशलिझम) नावाच्या पक्षाची हुकू मशाही असते. या व्यवस्थेचा सर्वोच्च नेता ‘बिग ब्रदर’ असतो, जो कधीही प्रत्यक्ष कोणाला दिसत नाही, पण त्याचेभव्य पोस्टर्स आणि ‘बिग ब्रदर तुम्हाला बघतोय’ हे ब्रीदवाक्य संपूर्ण देशभर जागोजागी दिसते.
इथं लोकांच्या घराघरांत, सार्वजनिक ठिकाणी, अगदी सगळीकडेच सीसीटीव्ही आणि ‘टेलिस्क्रीन’ बसवलेले असतात. याद्वारे सत्ताधारी वर्ग नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर, आवाजावर आणि अगदी चेहऱ्यावरील हावभावांवरही २४ तास नजर ठेवत असतो. इथेएक ‘सत्य मंत्रालय’ आहे, जिथे ऐतिहासिक नोंदी, वर्तमानपत्रे, सरकारी आकडे, पुस्तके इत्यादींमध्ये पक्षाच्या सोयीनुसार बदल करून इतिहास नव्यानेलिहिण्याचे ‘असत्य’ काम के लेजाते. चुकीचेठरलेलेअंदाज, अपयशी धोरणे किंवा अप्रिय व्यक्ती इतिहासातूनच गायब केल्या जातात, जेणेकरून सत्ताधारी पक्ष कधीही चुकीचा ठरू नये.
हे करण्यामागचा सत्तेचा हेतूस्पष्ट करताना ऑर्वेल लिहितात, ‘Who controls the past controls the future; who controls the present controls the past.’ स्वतंत्रपणे विचार करणे, सरकारविरुद्ध कृती सोडाच, नुसता विचारही करणे हा ‘थॉट क्राइम’ इथे जन्मठेपेच्या शिक्षेची सोय असलेला घोर अपराध मानला जातो. नागरिकांनी असेअपराध करू नयेत म्हणून त्यांच्या विचारांवर सतत नियंत्रण ठेवण्यासाठी देशभर ‘थॉट पोलिस’ तैनात केलेले असतात.
भाषा जितकी संकुचित केली जाईल, तितके मानवी विचारविश्वही संकुचित होईल हा विचार केंद्रस्थानी ठेवून अतिशय कमी शब्दभांडार असलेली ‘न्यूस्पीक’ नावाची नवीन भाषा येथील नागरिकांसाठी तयार केली आहे. स्वातंत्र्य, बंड, प्रतिकार, अन्याय यांसारख्या संकल्पना व्यक्त करणारे शब्दच या भाषेत नाहीत. व्यक्त करण्याची सोय नसल्यामुळे असे विचार जन्मच घेणार नाहीत, याची खात्री राज्यसत्तेला करून घ्यायची असते.
इथली आणखी एक संकल्पना म्हणजे ‘डबलथिंक’ (दुहेरी विचार) म्हणजे दोन परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी सत्य म्हणून लादण्याची प्रक्रिया. पक्ष तीन प्रमुख ब्रीदवाक्ये मांडतो: ‘युद्ध हीच शांती आहे, स्वातंत्र्य हीच गुलामगिरी आहे, आणि अज्ञान हेच सामर्थ्य आहे.’ या विरोधाभासी घोषणांचा उद्देश नागरिकांची चिकित्सक विचार करण्याची क्षमता कमकुवत करणे आणि सत्ताधाऱ्यांनी सांगितलेलेच अंतिम सत्य म्हणून स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करणे हा असतो.
आणि इथली सर्वात भयानक संकल्पना म्हणजे ‘टू मिनिट्स हेट’ (दोन मिनिटांचा द्वेष!). दररोज नागरिकांना एका ठरावीक शत्रूविषयी सामूहिक द्वेष व्यक्त करण्यास भाग पाडले जाते. या प्रक्रियेद्वारे भीती, संताप आणि उग्र राष्ट्रवादाचा डोस देऊन नागरिकांचेलक्ष त्यांच्या मूळ समस्या, महागाई आणि सरकारचेअपयश यांवरून दुसरीकडे वळवले जाते. इतकेच नाही, तर राज्यात सतत युद्ध सुरू असल्याचे आभासी चित्र निर्माण केले जाते. शत्रू बदलतो, पण युद्ध कधीच संपत नाही! या ‘कायमस्वरूपी धोक्याच्या’ वातावरणात नागरिक सुरक्षा आणि राष्ट्रहिताच्या नावाखाली स्वतःचे स्वातंत्र्य गमावायला सहज तयार होतात.
‘१९८४’ ही कथा आहे याच भयानक व्यवस्थेला वैतागलेल्या, ‘सत्य मंत्रालयात’ कनिष्ठ अधिकारी म्हणून काम करणाऱ्या विन्स्टन स्मिथची. स्वतःचे विचार मांडणारी डायरी लिहिण्या सारख्या बंडापासून सुरू होणारी ही कथा, पुढे ‘बिग ब्रदर’मय होत प्रस्थापित व्यवस्थ्ये समोर घेतलेल्या शरणागतीने संपते!
लोकशाही म्हणजे के वळ निवडणुका नव्हे; मुक्त अभिव्यक्ती, चिकित्सक विचार, स्वतंत्र प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्थेची स्वायत्तता, गोपनीयतेचा अधिकार आणि वस्तुनिष्ठ सत्य यांचेसंरक्षणही तेव्हढेच महत्वाचेआहे. या मूल्यांना धोका निर्माण होऊ लागला, तर लोकशाहीचेबाह्य स्वरूप कायम राहील पण तिचा आत्मा हरवेल, हेही कादंबरी निक्षून सांगतेआणि म्हणूनच ती आज कधी नव्हे एवढी समर्पक वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.