

असं होऊ शकतं का की यल्लम्मा पंथ आणि लिंगायत पंथ हे दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न समूहांकडून केलेले प्रयत्न होते - जणू एखाद्या आघातमय भूतकाळाची भरपाई करण्याचे आणि वर्तमान व भविष्य त्यापासून वेगळं करण्याचे दोन मार्ग! त्यांचा इतिहास व भूगोलही एकच होता का?
ते एकमेकांशी निगडीत होते की नाही, याचा ठाम पुरावा आपल्याकडे नाही. लिंगायतांना नेहमीच ‘वरच्या जाती’त समजलं गेलं, तर यल्लम्माच्या जोगम्मा आणि जोगप्पा यांना ‘खालच्या जाती’त. एका अर्थी हे दोघेही जणू एका नवीन सामाजिक करारात ब्राह्मण आणि शूद्र यांच्या जागी स्थापन झाले होते - ब्राह्मण सत्तेला विरोध म्हणून.
हे सगळे जाणण्यासाठी लिंगायत पंथाची उत्पत्ती शोधणं उपयोगी ठरेल. हा पंथ कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील कल्याण येथे इ.स. ११६२ च्या सुमारास विज्जळ नावाच्या कलचुरी राजाचा मुख्य मंत्री असलेल्या बसव यांनी हा पंथ स्थापन केला असे मानले जाते.
(संदर्भ : सर्गंट, १९६३ : द लिंगायट्स, १). पण या बाबतीत मतभिन्नता आहे. अनेक इतिहासकार लिंगायत पंथाच्या स्थापनेचं श्रेय आळबूरच्या एकांतदा रामय्या यांना देतात. (संदर्भ : नंजुंडय्या आणि अय्यर, १९३५ : द मैसूर ट्राइब्स अँड कास्ट्स, खंड ४, ८१; फार्क्वहार, १९२० : ॲन आऊटलाईन ऑफ द रिलीजियस लिटरेचर ऑफ इंडिया, २६०).
बहुधा बसव किंवा रामय्या यांनी फक्त आधीपासून अस्तित्वात असलेल्या एका समाजाला स्वतंत्र पांथिक ओळख दिली असावी. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा, नैतिक अधिष्ठान देण्याचा, त्यांच्या वेदनांना वाट मोकळी करून देण्याचा तो एक प्रयत्न असावा.
उच्च असला व तळागाळातला असला तरी दोन्ही समाजाची दु:खे सारखीच होती. डावलले जाणे एकच होते. इतिहासात त्यांची झालेली वंचना, बाहेर फेकले जाणे, झालेला अन्याय सारखाच व एकाच ब्राह्मण समाजाने केलेला असू शकतो.
वेगवेगळ्या परिस्थितीतला अन्याय वेगवेगळे परिणाम दर्शवतो. त्याशिवाय, समाजाची असलेली प्रतिष्ठा, मोठेपण हेही आड येते. त्यामुळे, हे दोन्ही समाज पूर्णपणे भिन्न प्रकृतीचे असले तरी अन्याय एकच असण्याची शक्यता आहे.
कदाचित एकसंध एकाच समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय झाल्यामुळे त्याची प्रतिक्रियाही वेगळ्या प्रकारे आली व ते दोघेही वेगळे झाले असे घडले असण्याचीही शक्यता आहे. एकसंध असलेला समाज एकाच प्रकारच्या अन्यायाने भिन्न झाला किंवा दोन वेगळ्या समाजावर अन्याय झाला असण्याचीही शक्यता आहे. ते समाज कोणते असू शकतात? याचं निश्चित उत्तर देणं जवळजवळ अशक्य आहे; आपण फक्त तर्क लावू शकतो.
कदाचित त्यासाठी एखादी परिस्थिती कारणीभूत झाली असावी. हे लक्षात ठेवावं की हा फक्त एक संभाव्य तर्क आहे - ज्याला इतिहासातील पुराव्यांची गरज आहे; त्याचा उद्देश फक्त त्या पुराव्यांचा शोध घेण्यासाठी एक चौकट तयार करणं हा आहे.
‘कुर’ (ज्यात कुणबी आणि तत्सम काही समाज येतात) आणि दख्खनचे क्षत्रिय (आज ज्यांना मराठा किंवा ओक्कलिगा / गौडा म्हणतात) हे दोघेही परशुरामाच्या संहाराचे बळी ठरले असावेत. या दोघांपैकी प्रत्येकाने आपापल्या आघातमय भूतकाळाची भरपाई करण्यासाठी आणि वर्तमान व भविष्य त्यापासून वेगळं करण्यासाठी भिन्न संरक्षणात्मक उपाय अवलंबले असावेत.
आमचा तर्क असा आहे की कुर समूहाने, आपल्या सामाजिक असुरक्षिततेमुळे, यल्लम्मा पंथाचा मार्ग स्वीकारला; तर दख्खन क्षत्रिय समूहाने स्वतःच्या ओळखी आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी अधिक सक्रिय धोरण राबवलं - आणि त्या धार्मिक कवचाचं रूप पुढे ‘लिंगायत पंथ’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
या प्रक्रियेत त्यांनी स्वतःला ब्राह्मणांच्या विरोधात उभं केलं आणि सामाजिकदृष्ट्या यल्लम्मा पंथीयांपेक्षा वरच्या स्तरावर ठेवलं. त्यामुळे यल्लम्मा पंथ आणि लिंगायत यांच्यातील संबंध हे परस्पर सौहार्दाचे नसून शोषणात्मक स्वरूपाचे असावेत.
जातीय भेदाचा हा सूक्ष्म धागा तिसऱ्या बचावात्मक प्रयत्नात अधिक स्पष्ट दिसतो - ज्या लोकसंख्येने आपल्या भूतकाळातील जखमांची भरपाई करण्यासाठी आणि वर्तमान व भविष्य त्यापासून वेगळं करण्यासाठी वेगळी नीती स्वीकारली; ती म्हणजे गोमंतक मराठा समाजाची नीती.
हा समाज अशा लोकांचा संघ आहे, जे ऐतिहासिकदृष्ट्या शोषित आणि तुच्छ लेखले गेले. हा समाज गोव्याच्या देवदासींपासून उद्भवलेल्या विविध गटांमधून तयार होतो आणि त्याची मुळं अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जातात. समुदाय म्हणून त्यांची औपचारिक ओळख प्रथम १९२७मध्ये झाली. (संदर्भ : अंजली आरोंदेकर, २०१५ : इन द ॲब्सेन्स ऑफ रिलायबल घोस्ट्स : सेक्सुॲलिटी, हिस्टोरिओग्राफी, साऊथ एशिया, जर्नल ऑफ फेमिनिस्ट कल्चरल स्टडीज, २५.३)
या समाजाने स्वीकारलेली नीती अशी आहे, की त्यांनी आपल्या भूतकाळाला अपराधभावाशिवाय स्वीकारलं आणि ‘मराठा’ या नावावरचा आपला दावा निर्भीडपणे, ठामपणे मांडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.