Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Renuka Yellamma transformation: जसे आपण गेल्या भागात, यल्लम्मा पंथ, जोगते, जोगतिणी यांच्याबद्दल जाणून घेतले, तसेच रेणुका आणि तिचे यल्लम्मामध्ये रूपांतरही समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Renuka Devi History
Renuka Devi HistoryDainik Gomantak
Published on
Updated on

तेनसिंग रोद्गीगिश

जसे आपण गेल्या भागात, यल्लम्मा पंथ, जोगते, जोगतिणी यांच्याबद्दल जाणून घेतले, तसेच रेणुका आणि तिचे यल्लम्मामध्ये रूपांतरही समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कदाचित रेणुका ही एखादी ठरावीक ऐतिहासिक व्यक्ती नसावी, जशी तिला आज आपण पाहतो. आज आपण जी रेणुका पाहतो, ती बहुधा पारशुरामाच्या दख्खनी आक्रमणात आपल्या पतीचा बळी गेल्यानंतरही आपल्या जनतेचा सन्मान व अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लढणाऱ्या शूर स्त्री-सरदार राण्यांचे प्रतीकात्मक रूप आहे.

यल्लम्मा या नावाची एक व्युत्पत्ती यल्ला + अम्मा = सर्व + आई, म्हणजे सर्वांची आई, अशी सांगितली जाते. यल्लम्मा पूजेचा उगम रेणुकेच्या घटनेपूर्वीच - म्हणजे ब्राह्मण दख्खनमध्ये पोहोचण्यापूर्वीच - झालेला दिसतो.

जगन्नाथन यांच्या मते, सावदत्ती (सौंदत्ती) परिसरात, जेव्हा सत्ता स्थानिक सरदारांकडे होती, तेव्हा यल्लम्माची पूजा माता-देवता म्हणून केली जात होती.

(संदर्भ : जगन्नाथन, २०१३ : यल्लम्मा कल्ट अँड डिव्हाईन प्रोस्टिट्युशन : इट्स हिस्टॉरिकल अँड कल्चरल बॅकग्राऊंड, इन इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अँड रिसर्च पब्लिकेशन्स, खंड ३, क्र. ४, ३). म्हणूनच त्या लोकांनी आपल्या एकमेव तारक व शक्ती-प्रतीक असलेल्या रेणुकेतही हाच गुणविशेष पाहिला असावा व हे स्वाभाविक आहे.

सावदत्तीच्या इतिहासात आणि तिच्या मंदिरात आपल्याला नंतर या मंदिराभोवती विकसित झालेल्या धार्मिक लैंगिकतेची अर्थव्यवस्था पाहायला मिळते. स्थानिक सरदारांच्या राज्यकाळात कुमारिका स्त्रियांना पुजारी म्हणून नेमले जात होते. आठव्या शतकात जेव्हा जैन राजे सत्तेत आले, तेव्हा या मंदिरातील विधी जैन साध्वींनी करायला सुरुवात केली.

परंतु नवव्या शतकात जैन राजांची सत्ता गेल्यावर शाक्तपंथीयांनी पुन्हा यल्लम्मा मंदिराचा ताबा घेतला.

दहाव्या व अकराव्या शतकात कपालिक संप्रदायातील शैव राजांनी नियंत्रण घेतले; स्त्री-पुजाऱ्यांच्या जागी त्याच संप्रदायातील पुरुष पुजारी नेमले गेले आणि या पुरुष पुजाऱ्यांनी पूर्वीच्या स्त्री-पुजाऱ्यांचा वापर वैयक्तिक सुखासाठी करायला सुरुवात केली.

बाराव्या शतकात जेव्हा वीरशैव संप्रदाय प्रभावी झाला, तेव्हा या पुजाऱ्यांच्या जागी जंगम पुजारी नेमले गेले. (संदर्भ : जगन्नाथन, २०१३ : यल्लम्मा कल्ट अँड डिव्हाईन प्रोस्टिट्युशन : इट्स हिस्टॉरिकल अँड कल्चरल बॅकग्राऊंड, इन इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अँड रिसर्च पब्लिकेशन्स, खंड ३, क्र. ४, ३).

बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाल्याने त्याची अधोगती झाली. राजकीयदृष्ट्याही सावदत्ती विजयनगरच्या वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली आणि त्यांनी ब्राह्मण पुजारी नेमले.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी हे मंदिर पुन्हा स्थानिक राजांच्या ताब्यात आले आणि त्यांनी हळूहळू खालच्या जातींच्या लोकांना पुजारी म्हणून नेमायला सुरुवात केली. या काळातच यल्लम्मा हे नाव बदलून रेणुका असे झाले. (संदर्भ : जगन्नाथन, २०१३ : यल्लम्मा कल्ट अँड डिव्हाईन प्रोस्टिट्युशन : इट्स हिस्टॉरिकल अँड कल्चरल बॅकग्राऊंड, इन इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अँड रिसर्च पब्लिकेशन्स, खंड ३).

किंवा उलट - रेणुकेला यल्लम्माच्या, म्हणजे सर्वोच्च पूज्य आणि लोकांची अंतिम तारक या स्थानावर प्रतिष्ठित करण्यात आले.

हे परिवर्तन ‘स्थानिक राजांच्या’ कारकीर्दीतच घडले हे लक्षात घेण्यासारखे आहे. मंदिरात खालच्या जातींच्या लोकांची पुजारी म्हणून नेमणूक हा तपशीलही लक्षणीय आहे;

पण या संदर्भात ‘खालच्या जाती’ म्हणजे शूद्र किंवा कुणबी नव्हे, तर केवळ ‘ब्राह्मणेतर’ असा अर्थ असावा. कदाचित आपल्याला जगनाथन यांच्या दिलेल्या कालानुक्रमिक अनुक्रमापेक्षा मागे जाऊन सावदत्ती आणि तिच्या मंदिराचा इतिहास उलगडावा लागेल. ते ‘स्थानिक सरदार / शासक’ आणि ‘जैन राजे’ असा उल्लेख करतात; हे कोण होते?

सावदत्ती ही सुमारे इ.स. ८७५ ते १२३० या काळात रट्ट वंशाची राजधानी होती. (संदर्भ : रियु, १९३३ : हिस्टरी ऑफ द राष्टकूटाज, १००). हे दोन्ही उल्लेख रट्ट वंशासंबंधी असू शकतात का?

‘स्थानिक सरदार’ हा उल्लेख त्यांच्या प्रारंभिक कारकीर्दीसाठी आणि ‘जैन राजे व स्थानिक शासक’ हा उल्लेख त्यांच्या नंतरच्या कारकीर्दीसाठी असू शकतो का? रट्ट राजे हे सावदत्ती परिसरातील डेक्कन क्षत्रिय सरदारांमधून उदयास आले होते; म्हणूनच त्यांना ‘स्थानिक सरदार / शासक’ म्हटले गेले हे स्वाभाविक आहे. आणि रट्ट हे जैन धर्माचे अनुयायी होते. (संदर्भ : रियु, १९३३ : हिस्टरी ऑफ द राष्टकूटाज, १०१).

रेणुकेच्या कथेशी रट्ट वंशाचा संबंध जोडणारा एक ठोस पुरावा उपलब्ध आहे. रट्ट वंशातील नन्ना शाखेतील चौदा राजांपैकी चार राजांची नावे कार्तवीर्य होती.

(संदर्भ : रियु, १९३३ : हिस्टरी ऑफ द राष्टकूटाज, १००). जमदग्नीवर हल्ला करून त्याची कामधेनू हिसकावण्याचा प्रयत्न करणारा कार्तवीर्य हा रट्ट वंशातील एखादा पूर्वकालीन राजा असावा; कारण अनेक राजघराण्यांमध्ये नावांची पुनरावृत्ती ही सामान्य बाब आहे.

यल्लम्मा / रेणुका संप्रदायाशी जोडलेली एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘बंधनमुक्त स्त्री’ - म्हणजे विवाहाच्या चौकटीत न अडकलेली स्त्री. यल्लम्माचे वैधव्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या जोगतिणीचा माघी (रांडाव) पौर्णिमेचा चुडा फोडतात आणि सौभाग्य सूचित करण्यासाठी ज्येष्ठी (अहेव) पौर्णिमेला पुन्हा चुडा भरतात.

‘रांडे हूनिमे’च्या रात्री यल्लम्माच्या हिरवा चुडा फोडला जातो, शुभ्र वस्त्र नेसवले जाते, कपाळावरचे कुंकू पुसले जाते आणि सोन्याचे दागिने काढून ठेवले जातात. हा विधी आजही सुरू आहे; मुख्य मंदिरात तो पुजारी करतात, तर गावोगावी जोगम्मा किंवा जोगती (कधीकधी देवदासी) करतात.

(संदर्भ : रॅमबर्ग, २०११ : व्हेन द देवी इज युवर हजबंड : सेक्रेड मॅरेज अँड सेक्शुअल इकॉनॉमी इन साऊथ इंडिया, इन फेमिनिस्ट स्टडीज, खंड ३७, क्र. १, ३५). जोगतिणी दरवर्षी सावदत्ती जवळील यल्लम्मा गुढीत आणि गावातील यल्लम्मा मंदिरांत एकत्र जमतात.

Renuka Devi History
Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

या वेळी त्या स्वतःच्या हिरवे चुडे फोडतात, कपाळावरचे कुंकू पुसतात आणि मंगळसूत्र काढून टाकतात. (संदर्भ : रॅमबर्ग, २०११ : व्हेन द देवी इज युवर हजबंड : सेक्रेड मॅरेज अँड सेक्शुअल इकॉनॉमी इन साऊथ इंडिया, इन फेमिनिस्ट स्टडीज, खंड ३७, क्र. १, ३८).

त्यांच्या स्त्रीत्वाचे हे प्रतीकात्मक बंधनमुक्तीकरण म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी या दख्खन समाजावर जे ओढवले होते त्याचे स्मरण आहे आणि त्यातून उद्भवलेल्या धार्मिक लैंगिकतेच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. तीन महिन्यांनी, वसंत ऋतूच्या प्रारंभी, ‘मुटाईदे हूनिमे’ या उत्सवाने यल्लम्माचे मंगल वैवाहिक स्थान पुन्हा प्रस्थापित केले जाते.

Renuka Devi History
Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

या प्रसंगी जोगतिणीदेखील आपले मुटाईदे (सौभाग्यवती स्त्रीत्व) पुनर्स्थापित करतात. (संदर्भ : रॅमबर्ग, २०११ : व्हेन द देवी इज युवर हजबंड : सेक्रेड मॅरेज अँड सेक्शुअल इकॉनॉमी इन साऊथ इंडिया, इन फेमिनिस्ट स्टडीज, खंड ३७, क्र. १, ४२). या प्रकारे, दरवर्षीच्या बंधनमुक्ती आणि बंधनस्थापन या विधींमधून त्या स्वतःला नित्यसुमंगली - म्हणजे सर्वकाळ सौभाग्यवती - म्हणून टिकवतात.

(संदर्भ : कर्सनबूम, १९५३ : नित्यसुमंगली : टुवर्ड्स द सेमिओसिस ऑफ द देवदासी ट्रेडिशन ऑफ साऊथ इंडिया).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com