

विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना ‘नरकासुर वधाचा’ मुहूर्त लाभला याला निश्चित संदर्भ आहे. दिल्लीत रामलीला मैदानावर असा राजकीय पुकारा होत आला आहे. त्यातून मनोरंजनही होते आणि राजकीय संदेशही दिला जातो.
नरकासुर किंवा रावणाचे प्रतीक उन्मत्त सत्ताधीश आणि या दुर्जनांचा नाश करण्यासाठी राम-कृष्णाचा अवतार पुढे येतो. याला आपल्या पुराणातही महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर राक्षस प्रवृत्ती माजल्या व हाहाःकार निर्माण झाला तेव्हा तेव्हा देवांनी अवतार घेतला, अशा कथा आपल्या पुराणात अनेक आहेत.
या पार्श्वभूमीवर सत्तेवरच्या प्रवृत्तीला दुष्ट शक्ती मानायची आणि दुर्जनांचा नाश करण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी विरोधी नेत्यांच्या रूपाने तारणहार प्रवृत्ती निर्माण झाली आहे, असे मानायचे काय? हे पचवायलाही लोकांना कठीण जाईल.
कारण सत्ताधीश-विरोधकांमधली सीमारेषा पुसट झाली आहे. आज तरी अर्धाअधिक काँग्रेस पक्ष भाजपात आहे. किंबहुना मूळ भाजपापेक्षा बाहेरून आलेल्यांचाच अधिक भरणा असलेले सरकार आपण पाहातो आहोत. विरोधकांमध्येही अनेकजण सरकारात पाहुणचार घेऊन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.
त्यामुळे सरकारे हटविण्याचे कार्य जर पवित्र असेल - कारण त्या घटनेला दिवाळीचा मुहूर्त - काळोखावर प्रकाशाचे जैत - दिलेला आहे - तर विरोधकांनाही लोकांच्या विश्वासास पात्र व्हावे लागेल. कारण लोकांमधली नाराजी, अस्वस्थता, अशांतता यातूनच विरोधकांना शक्ती प्राप्त होत असते.
या अशांततेला आकार देऊन जनक्षोभात तिचे रूपांतर करण्याची शक्ती निर्माण करायची असते. ही शक्ती कोणाला प्राप्त होते, जे जनतेच्या विश्वासाला पात्र होतात, जे लोकांच्या दुःखावर फुंकर घालतात. कायापालट करण्याची ग्वाही देतात.
गोव्यातील लोकांनाही परिवर्तन हवे आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. किंबहुना भाजपा सरकार सध्या १२ वर्षे सत्तेत आहे. मोदींचा करिष्मा कायम आहे. तरीही इतकी वर्षे सत्तेत राहिल्यामुळे प्रस्थापित विरोधी वातावरण आहे.त्यात अनेक प्रश्नांबाबत सरकारात अनास्था, हलगर्जी आणि उदासिनता आहे.
कायदा व सुव्यवस्था हा एक गंभीर प्रश्न. दोन प्रश्नांमुळे या प्रश्नाची तीव्रता लोकांना भासली. एक रामा काणकोणकर प्रकरण व दुसरे म्हापसा दरोडा! रामा काणकोणकर हा एसटी समाजातील सामाजिक कार्यकर्ता. गेली अनेक वर्षे तो सातत्याने रस्त्यावर आहे.
आवाज उठवतो आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. तसा तो रामा काणकोणकरांबद्दलही आहे. समाजमाध्यमांमुळे राज्यात अनेक सामाजिक नेते निर्माण झाले, परंतु त्यांच्या आचरणाबद्दल लोक प्रश्न उपस्थित करीत असूनही त्यांनी काही सनसनाटी निर्माण केली.
जमीन रूपांतरे, जमीन बळकाव, बिल्डरांचा धाकदपटशा आदी प्रश्नांवर विरोधी नेत्यांनी दाखवले नाही एवढे धैर्य दाखवले, परंतु त्यांना ज्याप्रकारे मारहाण करण्यात आली त्यामुळे समाजमन प्रक्षुब्ध बनले. अजूनही रामा काणकोणकर प्रकरणात पोलिसांना सत्य खणून काढता आलेले नाही. आता तर रामावर ‘राजकारण’ करीत असल्याचा आरोप होऊन हे प्रकरण गाडून टाकण्याच्या दृष्टीने तपासाची वाटचाल सुरू आहे.
म्हापसा दरोड्यात बांगलादेशी गुंतले आहेत. धेंपो यांच्या बंगल्यावर दरोडा पडल्याच्या तीन महिन्यांत हा दुसरा दरोडा पडतो व ते राज्य व देशाची सरहद्द ओलांडून सहज पळून जातात. या दोन्ही घटनांमुळे पोलिसांच्या राजकीयीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. समाजमनावर कायमचा ओरखडा उमटला!
त्यामुळे ‘देव’ अवतरणार नाही, परंतु विरोधकांनी आपल्या प्रश्नावर आवाज उठवावा, एक ठोस राजकीय कृती कार्यक्रम तयार करावा अशा जनतेच्या भावना आहेत. दिवाळीच्या निमित्ताने विरोधी नेते एकत्र येऊन एक आश्वासक वातावरण तयार करतात ही महत्त्वाची बातमी निश्चित आहे.
सत्ताधाऱ्यांना निश्चितच धडकी भरली व लोक उत्सुकतेने या घटनेकडे पाहू लागले आहेत यातही तथ्य आहे. आता प्रश्न आहे, त्यांच्यातील ऐक्य टिकू शकेल? पुढच्या दोन वर्षांत आपापसातील मतभेद विसरून ठोस कार्यक्रम तयार करून ते भाजपाला पर्याय निर्माण करण्यास यशस्वी ठरतील काय?
या आघाडीतील गोवा फॉरवर्ड व मनोज परबांची रेव्होल्युशनरी गोवन्स या दोन्ही संघटना एकत्र आल्या, आपापसात चर्चा करू शकल्या व त्या दोघांनी एक जबरदस्त राजकीय आघाडी निवडणुकीपुरती तरी तयार केली तरी ती एक मोठी आश्वासक बातमी ठरेल. कारण मनोज परब यांच्यामागे तरुण आहेत,
उत्तर गोव्यातही त्यांची शक्ती आहे व गोवा फॉरवर्डबरोबरची युती-गेल्या निवडणुकीत त्यांनी निर्माण केलेला भावबंध आणखी मजबूत बनवून गोव्याच्या राजकारणात दीर्घकाळ अस्तित्व तयार करण्यास त्यांना मदतरूपच ठरणार आहे.
रेव्होल्युशनरी गोवन्सचे अस्तित्व २०२७च्या निवडणुकीत निश्चित होणार आहे. गेल्या निवडणुकीत ‘आम आदमी पक्षाने’ त्यांच्याबरोबर युती करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला, परंतु ‘एकला चलो’ची भूमिका मनोज परब यांनी कोणत्या निकषावर घेतली होती, हे कळण्यास मार्ग नाही.
त्यामुळे ते स्वतःही हरले. पुढच्या निवडणुकीत पुन्हा ‘एकला चलो’ भूमिका स्वीकारली तर सांत आंद्रेत वीरेश बोरकर यांचीही शाश्वती नसेल. याचे कारण ख्रिस्ती मतदार आता एकूणच प्रादेशिक पक्षांबद्दल साशंक बनले आहेत.
गेल्या निवडणुकीत ख्रिस्ती मतदार रेव्होल्युशनरीचे पाठीराखे बनले याचे कारण विदेशस्थ गोंयकारांच्या भावनांना हात घालणे आरजीला शक्य झाले. त्यांच्या ‘पोगो’ विधेयकाने ख्रिस्ती मतदारच-नव्हे तर हिंदू तरुणांनाही या पक्षाचे आकर्षण वाटले, परंतु विधानसभेत हे विधेयक उभे राहू शकले नाही तेव्हा त्यातील त्रुटी लोकांच्या लक्षात आल्या. केवळ या विधेयकावरून राजकीय वातावरण तापविणे शक्य नाही.
दुसरी बाब ठळकपणे सामोरे आली ती मतविभाजनाची. आरजीमुळे काँग्रेस पक्षाची मोठी पडझड झाली. शिरोडा, फोंड्यासह अनेक मतदारसंघांत दोन-तीन हजार मते आरजीने खेचली. थिवी मरदारसंघात आरजीला चार हजार मते प्राप्त झाली. नावेली, कुडचडे, ताळगाव, बाणावली, वेळ्ळी येथे काँग्रेसचे उमेदवार ३००-४०० मतांनी हरले. साखळी, फोंडा, शिरोडा, वास्को येथेही खूप कमी मतांनी हार मानावी लागली. आरजीने ९४ हजार मते प्राप्त केली.
केवळ सांत आंद्रे मतदारसंघात भाजपाच्या फ्रांसिस्क सिल्वेरा यांना धक्का बसला. शिवोली मतदारसंघातही भाजपाच्या दयानंद मांद्रेकरांना स्वीकारावा लागलेला पराभव हा काही प्रमाणात आरजीमुळे होता. आरजीने या निवडणुकीत १० टक्के मते प्राप्त केली, त्यानंतर तृणमूल काँग्रेसने ८ टक्के, आपने ६ टक्के मते!
परिणामी काँग्रेसला हातातोंडाशी आलेल्या विजयापासून मुकावे लागले. हा संदेश समुद्रापार गेला आहे. आरजीमुळे भाजपाला पुन्हा विजय मिळाला व काँग्रेसला सत्तेपासून रोखण्याचे काम आरजी करते आहे.
दुसरा मुद्दा जो सर्वदूर गेला आहे तो म्हणजे, आरजी व भाजपाचे नातेसंबंध! आरजीला निधी देण्याचे काम परदेशस्थ गोवेकर करतातच, परंतु गेल्या निवडणुकीत मतविभाजनासाठी भाजपाने आरजीला मोठा निधी दिल्याचा आरोप झाला. त्यामुळे आरजी निवडणुकीच्या राजकारणात विघातक प्रवृत्ती असल्याचा समज ख्रिस्ती मतदारांनी करून घेतला आहे. आरजीच्या अस्तित्वालाच त्यामुळे धक्का बसला.
भाजपाही येत्या निवडणुकीत आरजीपासून अंतर राखणार आहे. कारण आता आरजी हिंदू मतदारसंघामध्येही फूट घालत असल्याचे दिसू लागले आहे. थिवीत त्याचा प्रत्यय आलाच, शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपाला हार मानावी लागली - याची जी काही कारणे आहेत, त्यात आरजीने केलेले मतविभाजन महत्त्वाचे ठरले. आरजीचा उमेदवार एसटी होता व ती मते आरजीच्या पारड्यात पडली.
ख्रिस्ती मतदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम व भाजपाने राखलेले अंतर या पवित्र्यामुळे आरजीला स्वतःचे अस्तित्व सांभाळायचे तर विरोधी युतीत सहभागी व्हावे लागेल व काँग्रेस पक्षापेक्षा गोवा फॉरवर्डबरोबरची युती त्यांच्यासाठी अधिक सोयीची व अधिक सोपी आहे.
पक्षश्रेष्ठी काहीही भूमिका घेवोत, ‘आप’च्या नेत्यांना जिंकून येण्यासाठी या नवीन आघाडीत सामील व्हावेच लागेल. अमित पाटकर यांचे विजय सरदेसाईंशी असलेले निकटचे संबंध त्याचीच ग्वाही देतात. एक गोष्ट खरी आहे, काँग्रेसचे आमदार जरी दिवाळीत एकत्र दिसले तरी या घटनेकडे राज्यातील त्या संघटनेतील नेते व पक्षश्रेष्ठी फारशा उत्सुकतेने पाहात आहेत, अशातला भाग नाही.
कारण या सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसलाच कुरतडले आहे. विशेषतः ‘आप’ने जिंकलेले दोन जागे खात्रीपूर्वक काँग्रेसचे आहेत. ते का म्हणून विरोधी ऐक्यासाठी उदारहस्ते त्यांनी देऊन टाकावेत? म्हणून कदाचित या कार्यक्रमाचे आमंत्रण ‘आप’ला दिले नव्हते!
विजय सरदेसाई तरी या घटनेकडे कितीशा औत्सुक्याने पाहात आहेत? गेल्या तीन वर्षांत सरदेसाईंनी स्वतःविषयी आश्वासक वातावरण तयार केले आहे, यात तथ्य आहे. त्यांची विधानसभेतील कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांचा मतदारांशी असलेला सुसंवाद त्यांनी वाढवत नेला. त्यामुळे त्यांची प्रतिमा बदलली.
एक अभ्यासू व आक्रमक नेता म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. काहीजण त्यांच्याकडे प्रति पर्रीकर म्हणूनही पाहातात, परंतु सरदेसाईंना अनेक मर्यादा आहेत. पर्रीकरांसारखे जीव तोडून राजकारण त्यांना करता आलेले नाही.
पायाला भिंगरी बांधून किमान १०-१५ मतदारसंघांतसुद्धा या पक्षाला स्वतःचा दबदबा निर्माण करता आलेला नाही. फातोर्डा मतदारसंघावर त्यांची जबरदस्त पकड आहे. त्यामुळे येती निवडणूक मी लढवणार की नाही, याबाबत एवढ्यात मी पत्ते खोलणार नाही, या भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या वक्तव्यात फारसा दम नाही.
विजय सरदेसाई तीनवेळा सातत्याने जिंकून आले व तितक्या वेळा दामूंचा पराभव झाला. आता दिगंबर कामत यांच्या पाठिंब्याने तेथे कमळ फुलेल अशी आशा बाळगायला काहींनी सुरवात केली असली तरी दिगंबर व विजय या दोघांनाही जिंकायला एकमेकांची आवश्यकता भासू शकते. कामतांच्या मतदारसंघातही चुरस वाढली आहे, हे स्वतः कामत मान्य करतील.
राज्यातील सहा कुटुंबे राजकारणावर अधिपत्य गाजवतात व निवडणूक जाहीर होताच खेळात ते नवे पत्ते पुढे करणार आहेत. त्यांच्यापासून सरदेसाई व काँग्रेसला अंतर राखता येईल काय, राजकारणाला नवी दिशा देणारी आखणी करण्याची हिकमत हे नेतृत्व दाखवू शकेल काय, हा प्रश्न आहे.
विजय सरदेसाई स्वतः मेहनत घेऊन ही आघाडी बनवेल व आघाडीतील घटक पक्षांना जिंकून आणण्यासाठी कंबर कसेल, हे स्वीकारणे भाबडेपणाचे ठरेल. कारण ज्याप्रकारे आरजीचे नेते व मनोज परब आघाडीतील नेत्यांकडे संशयाने पाहातात, तसेच सरदेसाईही पाहातात.
आरजी व गोवा फॉरवर्ड हे एक जबरदस्त कॉकटेल आहे व ते भाजपाच्या नेत्यांच्या मनात जरूर धडकी भरू शकतात, तसेच काँग्रेसचाही त्यांच्यापासून धोका आहे, परंतु या आघाडीत शाश्वत मूल्ये असू शकणार नाहीत.
कारण एकमेकांच्या गैरविश्वासावर ही आघाडी उभी राहील. त्यामुळे जिंकले तरी निवडणुकीनंतर कोण कोठे जाईल, सांगता यायचे नाही. त्यामुळे सरदेसाईंचा शाश्वत आधार हा काँग्रेस पक्षच राहणार आहे.
सत्तेवर येण्यासाठी अशा आघाड्यांना मूल्याधिष्ठित किमान राबवण्यायुक्त कार्यक्रमही बनवावा लागणार आहे किंवा भविष्याचा विचार करून काँग्रेस पक्षात सामील होण्याचाही मार्ग त्यांच्यासाठी खुला राहातो, परंतु तसे करायला जाण्यासाठी त्यांना काँग्रेसमधील वेगवेगळ्या गटांशी जुळवून घ्यावे लागेल. विजय येऊन नेतृत्व बळकावेल, ही भीती सध्या युरी आलेमाव गटाला आहेच!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.