'रंगे हात', अस्तित्ववादाची विविध प्रमेये स्पष्ट करणारी नाट्यकृती; नाट्यसमीक्षा

Range Haath Play Review: होडररच्या मतांमुळे पक्षाला धोका संभवत असल्यामुळे लुईस त्याचा खून करण्याचा कट रचतो.
'रंगे हात', अस्तित्ववादाची विविध प्रमेये स्पष्ट करणारी नाट्यकृती; नाट्यसमीक्षा
Range Haath Play ReviewDainik Gomantak
Published on
Updated on

द फ्लाईस (लेस मॉचिस), द एक्सिट (हूस क्लॉस), द रिस्पेक्टफूल प्रॉस्टीट्यूट (ला फ्यूशन रिस्पेक्टट्यूज), दर्टी हँड्‌स (लेस मेन्स सेल्स), कोन (कोन), द व्हिक्टर्स (मॉरटर्स सेन्स सेप्लयुचर), लुसिफर अँड द लॉर्ड (लेडिएबल एट ले बॅन डीव) या त्यांच्या सर्व गाजलेल्या नाटकांत अस्तित्ववादी सिद्धांतांचे विचार आढळतात.

‘दर्टी हँड्‌स’ नाटकाच्या ‘रंगे हात’ या नावाने दिलीप जगताप यांनी केलेल्या रूपांतराचा प्रयोग इंद्रेश्वर यूथ क्लब, गावडोंगरी-काणकोण या संस्थेने सादर करून यंदाच्या कला अकादमी अ गट नाट्यस्पर्धेची सुरवात केली.

नाटकाचे कथानक थोडक्यात असे की कमुनिस्ट पक्षाचे प्रमुख लुईस आणि त्याचा एक विचारवंत कार्यकर्ता होडरर यांच्यात मतभेद होतात. पक्षातील वरिष्ठ त्याच्या बाजूने झुकल्याचे दिसतात. होडररच्या मतांमुळे पक्षाला धोका संभवत असल्यामुळे लुईस त्याचा खून करण्याचा कट रचतो. ही जबाबदारी तो पक्षासाठी काही सनसनाटी काम करू इच्छिणाऱ्या ह्युगो या कार्यकर्त्यावर सोपवतो. होडररला साहाय्यकाची गरज असते.

'रंगे हात', अस्तित्ववादाची विविध प्रमेये स्पष्ट करणारी नाट्यकृती; नाट्यसमीक्षा
Pilgaon Sarpanch: खाण वाहतूक विरोध भोवला? पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी यांची उचलबांगडी

अटींनुसार ह्युगो विवाहित असल्यामुळे साहाय्यक बनून होडररकडे त्याचा खून करण्याच्या हेतूने जातो; पण होडररच्या व्यक्तिमत्त्वाने तो भारावून गेल्यामुळे त्याचा खून तो करू शकत नाही. एका क्षणी आपल्या पत्नीला होडररच्या बाहुपाशात पाहताच त्याच्यावर गोळ्या झाडून तो त्याचा खून करतो.

या कृत्याबद्दल त्याला तुरुंगवास होतो. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्याला बदललेल्या परिस्थितीची जाणीव होते. पक्षाविरुद्ध धोरण राबवणारा समजून ज्या होडररचा त्याने खून केला त्याच्याच मतप्रणालींचा पक्षाने आता स्वीकार केला आहे.

आपण केलेल्या खून वैयक्तिक कारणांसाठी केला असे म्हटल्यास त्याला परत पक्षात घेतले जाईल, असे सांगितले जाते; पण आपण हेतुपूर्वक खून केला असे सांगून तो मृत्यूस सामोरे जातो.

नाटकातील प्रत्येक पात्र स्वतंत्र विचारांचे आहे. पण स्वातंत्र्यासह येणाऱ्या गोष्टी लक्षात घेता स्वातंत्र्य ही त्यांना शिक्षाच वाटू लागते. तरीही व्यक्तिस्वातंत्र्यातून आपण निवडलेल्या जीवनातील गोष्टी, निर्णय व कृती यांच्या भल्याबुऱ्या परिणामांची जबाबदारी स्वतःवरच असते.

आयुष्यातील प्रत्येक क्षण सावधपणे व्यतीत केला पाहिजे, आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ आपले परिपूर्ण अस्तित्व आणि त्याचबरोबर येणारी जबाबदारी पेलली पाहिजे. त्यानेच आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो. जोपर्यंत असा अर्थ आपण आपल्या अस्तित्वाला देऊ शकत नाही, तोपर्यंत आपले जगणे निरर्थक असते. असा अस्तित्ववादाचा सिद्धांत या नाटकात मांडला आहे.

नाटकात ‘भस्मासुर’ हा शब्द आल्याने दिग्दर्शक महादेव सावंत यांनी नाटकाचा गर्भित अर्थ शोधताना भारतातील राजकारणाचा अचूक वेध घेतल्याचे जाणवले. राजकारणात ज्या प्रतिमा सामान्यजनांपासून लपविल्या जातात त्यांचे प्रतिबिंब नाटकात दिसून येते. नाटकातील सर्वच पात्रांमध्ये विविध भारतीय आणि परदेशी व्यक्तिरेखा जाणवू लागल्या.

'रंगे हात', अस्तित्ववादाची विविध प्रमेये स्पष्ट करणारी नाट्यकृती; नाट्यसमीक्षा
Panchayat Goa: कधी देणार आमचे मानधन? पाच महिन्यांपासून गोव्यातील पंचायत सदस्य प्रतीक्षेत, खर्च भागवणे झाले मुश्किल

व्यक्तिकेंद्रीत अशा स्वातंत्र्यवादी विचारधारेपासून दूर होऊन वर्चस्वविरहित समाज निर्माण करण्यासाठी माणसाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सत्ता, नेतृत्व, श्रेष्ठी, संघटना, वर्चस्व यापेक्षा परस्पर सौहार्द, समन्वय व स्वातंत्र्य महत्त्वाचे असा अर्थ देण्यास नाटक यशस्वी ठरले. त्यांची दृश्य रचना चांगली होती. नाटकाच्या अतिगंभीर, राजकीय आणि अस्तित्ववादी तत्त्वज्ञानविषयक क्लिष्टतेमुळे गतीवर थोडा फार परिणाम झाल्याचे वाटले.

काहीवेळा संवाद बोलताना पात्रे गडबडल्याचे दिसून आले. नाटक असंगतिसूचक असले तरी दिग्दर्शन सुसंगत वाटले. प्रकाश योजना वैभव कवळेकर यांची होती. ‘टंगस्टन’ दिव्यांच्या तीव्रतेचा कमी-जास्त उपयोग करून त्यांनी परिणाम साधण्याचा प्रयत्न केला. काही ‘इफेक्ट’ सिनेमॅटिक वाटले.

गडद निळ्या पार्श्वभूमीवर साकारलेले संजय गावकर यांचे अतिसामान्य नेपथ्य सूचक होते. सचिन चौगुले यांनी पार्श्वसंगीताची बाजू नीटपणे हाताळली. दीपलक्ष्मी मोघे यांची वेशभूषा आणि प्रेमानंद पोळे यांची रंगभूषा प्रयोगाला साजेशी होती.

‘ह्युगो’च्या भूमिकेला मयूर मयेकर यांनी योग्य न्याय दिल्याचे दिसले. कम्युनिस्ट विचारांचा, अभिमानी असणारा, अस्तित्ववाद आपल्या वागण्याबोलण्यातून दाखवून आपले कर्तृत्व सफल झाल्याचे वाटणारे ह्युगोचे व्यक्तिमत्त्व त्याने नीट साकारले. होडररला आपण आपल्या विचारांसाठी मारला, ही ओळख ह्युगो जगाला दाखवू पाहातो तेव्हा ते त्याला शक्य होत नाही; कारण त्याचा पूर्ण उपयोग सरकारने करून घेतलेला असतो.

या फसवणुकीचा स्वीकार करणे किंवा संबंधितांचा रोष ओढवून एकटेपणाचा स्वीकार करणे एवढेच त्याच्या हाती उरते. भूमिकेतील ही घालमेल तसेच ह्युगोच्या व्यक्तिरेखेला अपेक्षित चांगले-वाईट, सद्‌वर्तन-गैरवर्तन, प्रेम-तिरस्कार यांच्यामधील निरर्थकता मयूर यांच्या अभिनयातून दिसली. भाषेवर आणि उच्चारांवर थोडे लक्ष दिले असते तर भूमिकेने एक वेगळीच उंची गाठली असती.

'रंगे हात', अस्तित्ववादाची विविध प्रमेये स्पष्ट करणारी नाट्यकृती; नाट्यसमीक्षा
Mopa Airport: गोव्याचा सन्मान! ‘मोपा’ उत्कृष्ट देशी विमानतळ, ट्रॅव्हल लेजर इंडियाचा पुरस्कार प्रदान

‘जेसिका’ची भूमिका माधुरी शेटकर यांनी छानपणे करताना सुरवातीची अल्लड आणि नंतरची जबाबदारी पेलणारी तरुण स्त्री, प्रेम आणि वासना या द्वंद्वात असलेली स्त्री, कळत-नकळत ह्युगोच्या कटात सामील होणारी तरुणी, प्रभावीपणे उभी केली.

तरीही खेळ-अल्लडपणा आणि प्रत्यक्ष जीवन यातील सीमारेषा न कळलेल्या एका गृहिणीची भूमिका साकारताना कल्पित आणि वास्तव यांची तिच्या वागण्यात होणारी गल्लत यांचा उपयोग नाटकात अस्तित्ववादी सिध्दांतांच्या स्पष्टीकरणांसाठी केला आहे, याचा अधिक खोलपणे विचार व्हायला पाहिजे होता असे दिसले. जसे जेसिकाच्या कल्पनेतील मायावी गोष्टीचा गवगवा वाढत गेल्याने तिला सत्यही फसवे वाटू लागते.

कमुनिस्ट गटातील ‘ओल्गा’ ही भूमिका दीपलक्ष्मी मोघे यांनी समजून उमजून केल्याचे दिसले. त्यांच्या कृती-उक्ती, शब्दफेक, मुद्राभिनय छान वाटला. सुरवातीचा कमुनिस्ट माहोल उभा करण्यास त्या यशस्वी झाल्या तसेच त्यांचे फ्लॅशबॅक सीन आकर्षक झाले.

‘होडरर’ ही व्यक्तिरेखा अंकुश पेडणेकर यांनी साकार केली. साहाय्यक ह्युगो याला लुईसने आपली हत्या करण्यासाठी नेमला आहे, हे कळल्यानंतर पक्षात वेगळी तत्त्वप्रणाली स्थापण्यास विरक्त झालेला होडरर ह्युगोच्या विवेकबुद्धीला जागे करून मरण पत्करतो. पेडणेकर यांचे ‘जवळ, पाठव, राजकीय’सारखे शब्द अडखळत होते तसेच भूमिकेत चूक न होण्याची खबरदारी घेत राहिल्यामुळे ‘बिटविन द लाइन्स’ अभिनयाला बाधा येत होती. ‘विशेष’ अर्थ असलेल्या जेसिकाबरोबरचे प्रणय दृश्य अचूक वाटले.

‘प्रिन्स’ या भूमिकेतील छटा सलील नाईक यांनी बारकाईने सादर केल्याचे जाणवले. ‘लुईस’ची व्यक्तिरेखा त्यातील ‘कमुनिस्ट’ राकटपणासहित सिद्धेश झाट्ये यांनी व्यवस्थितपणे सांभाळली. ‘कारस्की’चा आक्रस्ताळेपणा स्वप्नील पांगम या कलाकाराकडून व्यवस्थित व्यतीत झाला. स्लीक, जॉर्ज आणि ईव्हान ही पात्रे अनुक्रमे महादेव सावंत, संजय सावंत आणि विशाल जुवेकर यांनी डोळसपणे उभी केली.

- विकास कांदोळकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com