क्षणिक थरार, आयुष्यभराची वेदना! सहलीत दारू, बेफिकिरी आणि सेल्फीचा नाद ठरतोय जीवघेणा

Tourist Safety: आपली उत्साही तरुणाई जेव्हा अशा सफारीवर निघते, तेव्हा बहुतांश ‘मज्जा’ करायची हा एकच हेतू असतो.
Tourist Safety
Tourist SafetyDainik Gomantak
Published on
Updated on

सुलक्षा मनेष गावस

आपली उत्साही तरुणाई जेव्हा अशा सफारीवर निघते, तेव्हा बहुतांश ‘मज्जा’ करायची हा एकच हेतू असतो. यात काहीच गैर नाही. मात्र या आनंदाला गालबोट लागते ते बेफिकीर आणि उन्मत्त वागण्यामुळे. दुर्दैवाने अनेक सहलींचे नियोजनच दारू आणि चिकन या भोवती फिरताना दिसते. दारूच्या नशेत पाण्यात उतरणे म्हणजे स्वतःच्या सुरक्षिततेशी खेळ करण्यासारखे आहे.

आमच्या गावात एक फार्मसी होती. ती एक वृद्ध, औषधांचे उत्तम ज्ञान असलेली व्यक्ती चालवत असे. अर्धांगवायूचा त्रास असूनही ते आपल्या कामात तत्पर होते. त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक खोल वेदना दिसत असे. सणाच्या काळात झालेल्या एका साहसी खेळात त्यांनी आपला तरुण मुलगा गमावला होता. आनंदाने घराबाहेर पडलेला तो मुलगा कॉफीनमध्ये घरी आला. त्याची वेदना सांगणारी रेषा त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर कायम दिसे. आजही सणासुदीच्या काळात बेफिकीरपणे वागणारी तरुण मंडळी दिसली, की त्या वृद्ध व्यक्तीची आणि घटनेची आठवण हमखास होते.

हल्ली ही घटना वारंवार मनात येते. गेल्या काही दिवसांत गोव्यात पाण्यातील साहसी उपक्रमांचा थरार अनुभवण्याच्या प्रयत्नात १३ व्यक्तींनी आपले प्राण गमावले. अशा अकाली मृत्यूची छाया केवळ त्या व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही; ती संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर कायमचा आघात करून जाते. आता पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरू होत आहे.

दैनंदिन धकाधकीतून काही क्षण बाहेर पडणे आणि नव्या अनुभवांचा आनंद घेणे हे निश्चितच चांगले असते. साहसी उपक्रम योग्य पद्धतीने आणि आवश्यक काळजी घेऊन केले, तर ते आपल्या मानसिक मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि जीवनाकडे नव्या उमेदीने पाहण्याची ऊर्जा देतात. निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर आपण अधिक ताजेतवाने होऊन आपल्या कामात आणि कुटुंबात परततो.

परंतु या आनंदासोबत सुरक्षिततेची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. साहसी उपक्रम करताना योग्य काळजी घेणे, त्या ठिकाणाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. परिसराचे स्वरूप, पाण्याचा प्रवाह, खोली आणि संभाव्य धोके यांची जाण असल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. थराराचा आनंद घेताना, सुरक्षिततेचे भानही ठेवणे आवश्यक असते .

आपली उत्साही तरुणाई जेव्हा अशा सफारीवर निघते, तेव्हा बहुतांश ‘मज्जा’ करायची हा एकच हेतू असतो. यात काहीच गैर नाही. मात्र या आनंदाला गालबोट लागते ते बेफिकीर आणि उन्मत्त वागण्यामुळे. दुर्दैवाने अनेक सहलींचे नियोजनच दारू आणि चिकन या भोवती फिरताना दिसते. दारूच्या नशेत पाण्यात उतरणे म्हणजे स्वतःच्या सुरक्षिततेशी खेळ करण्यासारखे आहे.

कारण मेंदू आणि शरीर यांचे ट्युनिंग आधीच दारूने बिघडवलेलं असत. नशेच्या अवस्थेत निर्णयक्षमता, संतुलन आणि परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी पोहणे, स्वतःचा तोल सांभाळणे किंवा संकटसमयी योग्य निर्णय घेऊन स्वतःचा बचाव करणे माणसाला शक्य होत नाही. परिणामी, क्षणिक थरार किंवा बेफिकीरी अनेकदा जीवघेणी ठरू शकते.

या दिवसात निसर्गरम्य स्थळांवर कुटुंबासह, जाणे अनेकांना अस्वस्थ करणारे वाटते. दारू पिऊन धिंगाणा घालणे, भांडणे, शिवीगाळ करणे किंवा अश्लील वर्तन करणे अशा घटना सर्रास दिसून येतात. नशेच्या प्रभावाखाली अनेक युवक आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांचा अंदाज गमावतात. त्यांचे वर्तन इतर पर्यटकांना, कुटुंबांना त्रासदायक ठरत असते, मात्र त्याची जाणीव किंवा पर्वा त्यांना राहात नाही. वैयक्तिक आनंद आणि स्वातंत्र्य यांचा उपभोग घेताना सार्वजनिक शिस्त, सभ्यता याकडे दुर्लक्ष केले जाते.

Tourist Safety
Goa Crime: दारूच्‍या नशेत बेदम मारहाण; एकाचा मृत्‍यू, चिखली-कोलवाळ येथे 'सांजाव'ला गालबोट; चौघे संशयित अटकेत

अशा थरारक अनुभवांच्या मोहात अनेकदा व्यक्ती आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काही करण्याचा प्रयत्न करते. त्या वेळी तिच्या मनात एक फसवा आत्मविश्वास आणि अवास्तव आशावाद निर्माण झालेला असतो. मात्र निसर्गाच्या रौद्र आणि अनिश्चित शक्तीपुढे हा आत्मविश्वास क्षणात कोलमडून पडू शकतो. त्यातच दारूच्या नशेमुळे सारासार विचार करण्याची क्षमता आधीच मंदावलेली असते. परिणामी, आपण पत्करत असलेला धोका किती गंभीर आहे किंवा आपण आत्मघाताच्या दिशेने पाऊल टाकत आहोत याची जाणीव होत नाही. आणि जरी ती जाणीव झाली, तरीही ‘आपल्याला काही होणार नाही’ हा भ्रम आणि थराराची उर्मी, विवेकावर मात करत असते.

त्यात आता भर पडली आहे ती आपल्या साहसी कृत्यांचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीची. अधिकाधिक लाईक्स, व्ह्यूज आणि कौतुक मिळवण्याच्या नादात अनेक जण स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. आपण हे नेमके का करतो आहोत, त्यासाठी किती मोठा धोका पत्करतो आहोत आणि काही अनर्थ घडल्यास आपले तसेच आपल्या कुटुंबाचे काय होईल, याचा विचार अनेकदा केला जात नाही. परिणामी, निसरड्या कड्यांवर चढणे, धबधब्यांच्या अगदी जवळ जाऊन थरार अनुभवणे किंवा धोकादायक ठिकाणी उभे राहून व्हिडिओ आणि सेल्फी काढणे याची एक स्पर्धाच लागलेली दिसते.

थरार अनुभवण्याच्या धुंदीत जोखमीचे सामान्यीकरण होते.‘काय जावंचे ना ,यो तू’ अशा हाकांमधून एकमेकांना धाडस करण्यास प्रवृत्त केले जाते . मित्र आग्रह करतात म्हणून ‘नाही’ म्हणणे अवघड वाटते आणि अनेक जण स्वतःची इच्छा नसतानाही अशा साहसी कृत्यांमध्ये सहभागी होतात. एकाने उडी घेतली म्हणून दुसरा, दुसऱ्याने केली म्हणून तिसरा अशा समूहमानसिकतेत जो तो अडकतो.

Tourist Safety
Goa Monsoon: मान्सूनचा दमदार कमबॅक! पाच दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी, तीन दिवसांत 24 टक्के तुटवडा निघाला भरून

अनेक वेळा स्थानिक गावकरी किंवा अनुभवी लोक स्पष्टपणे इशारा देतात, ‘तिथे जाऊ नका, पाण्याचा अंदाज तुम्हाला येणार नाही’ किंवा ‘या ठिकाणी धोका आहे.’ पण अनुभवातून आलेले हे शब्द दुर्लक्षित केले जातात. प्रत्येकाला स्वतःची धाडसाची कहाणी घडवायची असते, चार जणांच्या ग्रुपमध्ये एक जरी उतावीळ आणि अविचारी व्यक्ती असली, तरी तिच्या कृतींचा फटका संपूर्ण ग्रुपला बसू शकतो. इतकेच नव्हे, तर अशा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी धावणाऱ्या मित्रांचे, स्थानिकांचे किंवा बचावकार्य करणाऱ्यांचेही प्राण अकारण धोक्यात येतात.

साहसी उपक्रम आणि निसर्ग पर्यटन यांचा जरूर आनंद घ्यावा. थकलेल्या मनाला उभारी देण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि मुलांना निसर्गाचे सौंदर्य अनुभवता यावे यासाठी अशा सहली महत्त्वाच्या आहेत. मात्र, हा आनंद घेताना निसर्गाच्या मर्यादा आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे तितकेच आवश्यक आहे.

वाढत्या जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्थानिक प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. पण शेवटी आपल्या सुरक्षिततेची सर्वात मोठी जबाबदारी आपलीच असते. थोडी सतर्कता, शिस्त आणि विवेक बाळगला, तर निसर्गसहल ही आनंददायी आठवण ठरेल; अन्यथा क्षणिक बेफिकिरी आयुष्यभराची वेदना देऊन जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com