Traditional Marriage Values: लग्नाचे विधी हरवले अन् इव्हेंट आणि देखावाच उरला; 'लग्न पाहावे करुन' नाही, आता 'लग्न पाहावे दुरुन' म्हणण्याची वेळ

Modern Wedding Extravaganza : लग्न सोहळ्याच्या नावाखाली रतीब घालण्याचा जो प्रकार सध्या सुरू आहे तो असाच राहिल्यास ’ लग्न पाहावे करून’ असे म्हणण्याऐवजी ’लग्न पाहावे दुरून’ असे म्हणण्याची वेळ येईल.
traditional vs modern marriage rituals
traditional vs modern marriage ritualsDainiak Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत :

लग्न सोहळ्याच्या नावाखाली रतीब घालण्याचा जो प्रकार सध्या सुरू आहे तो असाच राहिल्यास ’ लग्न पाहावे करून’ असे म्हणण्याऐवजी ’लग्न पाहावे दुरून’ असे म्हणण्याची वेळ येईल.सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे लग्नाचा माहोल दिसतो आहे. ‘लग्न पाहावे करून’ असे पूर्वी म्हटले जायचे. म्हणजे लग्नाच्या मंडपाखालून गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ समजत नाही अशी पूर्वी धारणा असायची. त्यावेळी विधींना जास्त महत्त्व दिले जायचे. आजची लग्ने म्हणजे एक इव्हेंट बनायला लागली आहेत.

त्यात विधी कमी आणि आणि शो जास्त असे दिसायला लागले आहे. त्यामुळे लग्नाचा मूळ हेतू किंवा आत्माच हरवल्यासारखा वाटायला लागला आहे. आज कोणत्याही लग्नाला जा त्यात देखावाच अधिक असतो. लग्न म्हणजे ’जनम जनम का बंधन’ असे पूर्वी समजले जायचे. आता हे बंधन कधी तुटेल याची शाश्वती देणेच कठीण झाले आहे. म्हणून तर गोव्या सारख्या छोट्या राज्यात सुद्धा घटस्फोटांचे प्रमाण वाढताना दिसायला लागले आहे. याचे बीज खरे तर आजच्या लग्न सोहळ्यातच असावे, असे म्हटल्यास ते काही वावगे ठरणार नाही.

traditional vs modern marriage rituals
Yuri Alemao: विधवा आईने पार पाडले मुलीच्या लग्नाचे विधी; आलेमाव म्हणाले यामुळे लढ्याला बळ मिळेल

सगळा प्रकारच औपचारिक व्हायला लागला आहे लग्नाचे विधी करतानासुद्धा व्हिडिओ शूटिंग करणे आणि व्हिडिओग्राफर सांगतात तसे हावभाव करणे यामुळे लग्नविधीमधले पावित्र्यच नष्ट होऊ लागले आहे. हल्लीचे लग्न सोहळे म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसारखे वाटतात. चित्रपटाच्या चित्रीकरणात कसे दिग्दर्शक सांगतात तसे नायक नायिका शॉट देतात तसेच आताच्या लग्न सोहळ्यात घडताना दिसत आहे. लग्नाचे विधी का करतात तर वधू-वरांच्या मनावर संस्कार बिंबविण्याकरता. तसे पाहायला गेल्यास कायद्याच्या दृष्टीने या लग्न विधीला विशेष महत्त्व नसते.

सरकारी कचेरीत लग्नाची नोंदणी झाल्यावरच वधूवर कायद्याने पती-पत्नी बनत असतात. पण मंत्राक्षरे पडल्याशिवाय तसेच सप्तपदी झाल्याशिवाय पती-पत्नी झाल्यासारखे वाटत नाही म्हणूनच वधू-वरांचे विधिवत लग्न लावून दिले जाते. आणि ही आपली परंपरा आहे. पण आज या परंपरेलाच नख लावले जात आहे. लग्नाच्या नावाखाली अवाढव्य खर्च करायचा ही आता नवीन परंपरा बनायला लागली आहे. आणि हे करायला सगळ्यांची आर्थिक बाजू भक्कम असते असेही नाही. पण एकटा करतो म्हणून दुसरा करतो असे व्हायला लागले आहे.

traditional vs modern marriage rituals
Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

कर्ज काढूनसुद्धा अशा प्रकारचे भव्यदिव्य लग्नसोहळे साजरे केले जात आहेत. आता हे सोहळे एका दिवसापुरते मर्यादित राहिलेले नसून त्याची व्याप्ती चार-पाच दिवसांपर्यंत पोहोचायला लागली आहे. मागे कोविड काळात लग्न सोहळ्यावर मर्यादा घालण्यात आली होती. निमंत्रित मर्यादित, वेळही मर्यादित अशी अनेक बंधने त्यावेळी लग्न समारंभ व इतर समारंभावर घालण्यात आली होती. आणि त्याचा अनेकांना फायदाही झाला होता. लग्नांना एक प्रकारचे आटोपशीर स्वरूप प्राप्त झाले होते. कोविड काळाची ही सर्वात मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. पण आता परत लग्न सोहळ्यांचा वारू उधळताना दिसायला लागला आहे.

परवा एका लग्न सोहळ्याला जाण्याचा योग आला. स्वागतसमारंभाची वेळ होती एक ते तीन. पण दुपारचे दोन वाजले तरी वधू-वरांचाच पत्ता नव्हता. विचारल्यावर समजले की वधूवर व्हिडिओ शूटिंग मध्ये व्यग्र आहेत. बिचारे निमंत्रित मात्र वधूवर कधी येतील याची रांगेमध्ये उभे राहून वाट बघत होते. आता वधू-वरांना आशीर्वाद देण्याची प्रथाही हळू हळू पडद्यामागे जायला लागली आहे. त्याऐवजी वधू-वरांबरोबर उभे राहून फोटो काढण्याची नवी प्रथा जन्माला यायला लागली आहे. आणि मजेची गोष्ट म्हणजे सगळ्या निमंत्रितांबरोबर फोटो काढले जात असले तरी वधूवर व त्यांचे पालक यांना हवे तेवढे च फोटो अल्बम मध्ये राहतात, बाकीचे ‘डिलीट’ केले जातात

traditional vs modern marriage rituals
Mrunal Thakur Wedding: "योग्य जोडीदाराच्या शोधात", लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, धनुषसोबतच्या अफेअरवरही दिलं उत्तर

. मग एवढे फोटो काढण्याचे व त्यापैकी अनाठायी वेळ खर्च करण्याचे प्रयोजन काय हेच कळत नाही. अशी अनेक ’नाटके’ आताच्या लग्न सोहळ्यात पाहायला मिळतात. हौस म्हणून हे केले जाते असे म्हटले जात असले तरी हौसेलासुद्धा मर्यादा असायला हवी हेही तेवढेच खरे आहे.

शेवटी लग्न सोहळ्यावर जो वारेमाप खर्च केला जातो तो तत्कालीन असतो. एकदा हा सोहळा संपला की तो ’खर्च’ इतिहासजमा होत असतो. अगदी लग्न सोहळ्याचे तसेच वधू-वरांचे चित्रीकरण केलेला व्हिडिओसुद्धा एक किंवा दोन वेळापेक्षा जास्त वेळा बघितला जात नाही.

आणि काही दिवसांनी तर तो ’व्हिडिओ’ कुठे आहे याचा शोध घ्यावा लागतो. त्यापेक्षा लग्नसोहळा लघुतम स्वरूपात साजरा करून उरलेले पैसे वधू-वरांच्या नावाने एखाद्या अनाथाश्रम वा समाजसेवी संस्थेला दिले तर त्याचा खरा उपयोग होऊ शकतो. अर्थात त्याकरता वधू-वर व त्यांच्या पालक मंडळीची मानसिकता बदलायला हवी. मात्र सध्याच्या काळाची ती गरज आहे असे एकंदरीत परिस्थितीचा विचार केल्यास वाटायला लागते. पण लग्नसोहळ्याच्या नावाखाली रतीब घालण्याचा जो प्रकार सध्या सुरू आहे तो असाच राहिल्यास ’लग्न पाहावे करून’ असे म्हणण्याऐवजी ’लग्न पाहावे दुरून’ असे म्हणण्याची वेळ येईल एवढे मात्र निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com