

संदीप हेबळे
आधुनिक भारताने संस्कृतीच्या प्रतीकांना केवळ एक दिखाऊ, भव्य, उंच आणि उच्च रवाचे का बनवले आहे? आध्यात्मिक खोली कधीच उंची किंवा आवाजावर अवलंबून नव्हती, हीच गोष्ट आपण विसरलो आहोत. आणि हेही विसरलो की भारत ही सदैव आपल्या प्रचंड विविधतेने जगाला थक्क करणारी संस्कृती आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतभ्रमण करताना मार्क ट्वेन यांनी भारताला ‘शंभर राष्ट्रे, शंभर भाषा, हजार धर्म आणि दोन दशलक्ष देवांची भूमी, मानवी वंशाची पाळण, मानवभाषेची जन्मभूमी, इतिहासाची जननी, पुराणकथेची आजी, परंपरेची पणजी’ असे संबोधले होते.
ही विशालता, ही आत्मसात करण्याची, नव्याने घडविण्याची, पुन्हा अर्थ द्यायची आणि सहअस्तित्वाची क्षमता यामुळेच भारत संस्कृतीने समृद्ध होता. हाच विचार शशी थरूर यांनी ‘सॉफ्ट पॉवर’ची संकल्पना मांडताना सांगितला होता.
आपण संस्कृतीच्या या महान वारशाला उंची आणि आवाजाच्या स्पर्धेत ढकलले आहे. पुतळा किती उंच आहे किंवा घोषणांचा आवाज किती मोठा आहे, यावर श्रद्धेची ताकद किती आहे, हे ठरवू लागलो आहोत.
कोणत्याही धार्मिक/ऐतिहासिक व्यक्तींचे भव्य पुतळे उभारण्याच्या सध्याच्या वेडातून आपण सावरले पाहिजे. आर्किमिडीजची गोष्ट आठवते - त्याच्या मांजरीने सहा पिल्ले दिल्यावर त्याने त्यांच्यासाठी येण्याजाण्यासाठी सहा छिद्रे तयार केली.
पण सर्व पिल्ले आईच्या मागे त्याच एका छिद्रातून येत जात होती. त्याचा हा छिद्रान्वेषी प्रयत्न निष्फळ ठरला. आपली मोठ्यातले मोठे पुतळे उभारण्याची स्पर्धा त्याच प्रकारे निरुपयोगी आहे. उपयुक्तता नाही, विचार नाही, उद्देश नाही, दीर्घकालीन सांस्कृतिक लाभ नाही. एक पुतळा दुसऱ्यासारखाच; त्यातले नावीन्य संपते; संदेश हवेत विरतो.
हिंदू संस्कृतीला उंचीत व उच्चरवात मोजणे चुकीचे आहे. ती एकसुरी नाही; कट्टर मतप्रणाली नाही. धर्म म्हणजे एक ग्रंथ, एक पैगंबर, एक मार्ग अशी कल्पना हिंदू संस्कृतीत नाही; तसे असेल तर त्याला पंथ, संप्रदाय, मत असे म्हटले जाते, धर्म म्हटले जात नाही.
एकेश्वरवादी पंथ आपल्याकडेही हजारो वर्षांपासून आहेत, पण अन्य पंथांविषयी नकारात्मकता, हीनभाव व संपवण्याच्या गोष्टी नाहीत. उलट, एक विशेष सांस्कृतिक लवचिकता असलेली परंपरा आहे. सावरकरांनी ‘हिंदू’ची व्याख्या केली ती भौगोलिक, तात्त्विक आणि वैविध्य जोडून ठेवणारी आहे. ती हिंदू धर्माला संकुचित करत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही एल. के. अडवाणी प्रकरणातील निर्णयात हिंदू धर्माला एक जीवनपद्धती एक मानसिक अवस्था कल्पनांचे समन्वयन असे म्हटले होते.
याच लवचिकतेमुळे व सहअस्तित्वाच्या क्षमतेमुळे असंख्य आक्रमणे, स्थलांतरे आणि बदल झाले तरी हिंदू धर्म व संस्कृती टिकून राहिली. पण आपण तिला कुठे आणून ठेवले आहे?
‘जय श्रीराम’ला राजकीय घोषणा केले आहे आणि कोणाचा पुतळा किती उंच याची स्पर्धा सुरू केली आहे. हिंदू धर्म कधीच एकेश्वरवादी कट्टरतेसारखा नव्हता. मोठे म्हणजे चांगले, हा धार्मिक नव्हे तर राजकीय असुरक्षिततेचा विचार आहे. असे वागणे हे आर्किमिडीजच्या सहा छिद्रांसारखे दिशाहीन, निरर्थक आणि छिद्रान्वेषी आहे.
ग्रामीण भारताच्या अप्रतिम सर्जनशीलतेत हिंदू धर्म व संस्कृती अद्याप शाश्वत आहे. या भागांतील लोकांनीच हिंदू धर्माची परंपरा टिकवून ठेवली. पण आजचे राजकीय/धार्मिक नेतृत्वच यालाही कळत-नकळत दूषित करत आहे.
उदाहरणार्थ, गोमंतकातील शिगमो: गावातील कलाकार पौराणिक कथा, ग्रामजीवन, लोककथा, ऋतूंपरंपरा यांचे अप्रतिम चित्ररथ बनवतात. त्यांच्या उत्कृष्टतेची गणना उंचीवर नव्हे तर सौंदर्य, व्यक्त होण्याची पद्धत आणि कल्पनेवर केली जाऊ शकते. जर हे सर्व चित्ररथ उंचीच्या स्पर्धेत उतरले तर? आत्मा नसलेली, कथानक नसलेली, मोडकळीची उंच वस्तू बनून राहतील. शिगम्याचा आत्माच हरवेल.
तसेच माशेल, केपे, कुंभारजुवे व अनेक ठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपती पाहिले तर ते नारळ, गवत, सुपारी, फळे, भाज्या, शंख, पुनर्वापरातील वस्तू यातून तयार केलेले पाहावयास मिळतात. कलाकार असलेले माझे मित्र नागेश सरदेसाई त्यांचे परीक्षण करतात. त्या कल्पनाशक्तीचे दर्शन घ्यायला मीही दरवर्षी जातो. प्रत्येक कलाकृतीत दिसणारी कल्पकता वाखाणण्यासारखी असते. हे भक्ती, परंपरा आणि कल्पनाशक्तीचे रूप आहे. इथे उंचीची निर्जीव स्पर्धा नाही.
संस्कृती म्हणजे पांथिक कट्टरता, अंधश्रद्धा किंवा मूल्यांचा अभाव नव्हे. खरी संस्कृती कथांत, उत्सवांत, परंपरांत, कलेत, नृत्यात, खानपानात, प्रादेशिक तत्त्वज्ञानात आहे. खरे तर भारत ही विविध राजवटींनी घडवलेली परंपरा आहे.
पण प्रत्यक्षात सरकारांनी - आधी कॉंग्रेस, आज भाजप - सांस्कृतिक परिसंस्था निर्माण करण्याऐवजी भव्य पुतळ्यांची उथळ धोरणे राबवली. कल्पना करा, भारताने फ्रान्सप्रमाणे संग्रहालयांमध्ये गुंतवणूक केली असती, जपानसारखी आधुनिकता आणि संस्कृती जोपासली असती, इजिप्तसारखी पुरातत्त्वीय संपत्ती विकसित केली असती तर?
पॅरिस एकटाच भारतापेक्षा जवळजवळ दहापट पर्यटक खेचतो. थायलंडसारखा छोटा देशही भारतापेक्षा चारपट पर्यटक आणतो. भारताकडे तर जगातील सर्वोत्तम सांस्कृतिक वारसा आहे - रामायण-महाभारत, चोल-पल्लव वास्तुकला, अजिंठा-एलोरा, ओडिशाचे मंदिरपरंपरा, बौद्ध वारसा, मध्ययुगीन दख्खन, विजयनगर, आणि हो, राजकीय नाराजी असली तरी मुघलकाल हा इतिहासाचा अविभाज्य उज्ज्वल अध्यायच आहे!
पण आपण या महान इतिहासाची गळचेपी राजकीय प्रतीकवादाच्या आवाजात करत चाललो आहोत. धार्मिक विभागणींमध्ये इतके अडकून पडलो की आपण आपला वारसा जतन करण्यात, त्याचा प्रचार करण्यात किंवा त्याला नव्याने जगासमोर आणण्यात अपयशी ठरलो आहोत.
मोठे पुतळे जगाला खेचत नाहीत. त्यांचा उद्देश नक्की काय? भारतात पुराणकथांवरील थीम पार्क, लोककला संग्रहालये, कथाकेंद्रे यांसारख्या सांस्कृतिक परिसंस्था मोठ्या प्रमाणावर का उभ्या राहत नाहीत? आपणाकडे कथासंपत्ती आहे, सांगण्याची दृष्टी नाही.
गोव्यातसुद्धा, संघाने कधीकाळी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनाची परंपरा रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या वारशाचा जागतिक प्रभाव ओळखून स्वीकारण्याशिवाय अन्य पर्याय उरला नाही. इतिहास बदलता येत नाही; त्याच्याकडून शिकता येते, समजून घेता येते, बुद्धिमत्तेने उपयोग करता येतो.
उंच पुतळ्यांऐवजी भारताला एक जिवंत सांस्कृतिक स्थान बनवायला हवे. हिंदूंनी आपली ऊर्जा आधुनिक, कालातीत वास्तुकलेत घालवावी - जशी की लोटस टेम्पलची शांत सौंदर्यपूर्ण आधुनिकता, अक्षरधाम, कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारकात तत्त्वज्ञान-वास्तूशास्त्र यांची घातली गेलेली सांगड. जगाला उंची नव्हे, सौंदर्य, खोली आणि अर्थ आकर्षित करतात.
भारताला उंच पुतळ्यांत नव्हे, तर त्या संस्कृतीत, कथांमध्ये आणि एकेकाळी जगाला आपल्याकडे आदराने व कुतूहलाने पाहायला लावणाऱ्या गूढतेत शोधणे आवश्यक आहे. गोव्यालाही फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे. पण, आपण जगासमोर त्याला योग्य पद्धतीने मांडत नाही.
गोव्याची प्रतिमा कशा पद्धतीने जगात मांडली जाते, हे इथे येणाऱ्या पर्यटकांवरून ओळखता येते. संस्कृतीची जाण आणि जाणीव असलेले दर्जेदार पर्यटक येथे यावेत असे आपल्याला वाटतच नाही. त्यामुळे मदिरा, मदिराक्षी आणि जुगार यांची आवड असलेले पर्यटकच गोव्याला झेपणार नाही इतक्या प्रमाणात इथे भेट देतात. त्यांचा ताण केवळ इथल्या साधनसुविधांवरच होतो, असे नव्हे तर इथल्या संस्कृतीवरही होतो!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.