Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

Mike Mehta Tiatr : तियात्र रंगभूमीवरील एक ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, ‘प्लेराईट’, गोव्यातील सुरुवातीचे अग्रणी चित्रपट निर्माते आणि एक प्रसिद्ध ‘क्रिमिनल लॉयर’ असलेल्या माइक मेहता नुकतेच ख्रिस्तवासी झाले.
Mike Mehta Tiatी
Mike Mehta TiatrDainik Gomantak
Published on
Updated on

कोकणी तियात्रकार, चित्रपट आणि कायदेतज्ज्ञ असलेले, एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले, माइक मेहता यांचे १ नोव्हेंबर रोजी वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. माझी आणि त्यांची ओळख १९७९सालची.

जुन्या कला अकादमीच्या नाट्यगृहात (आताचे इडीसी हाउस) जॉन क्लारो आणि ते ‘पोर्तुगीज कोलवोंत’ तियात्रासाठी थिएटर आरक्षित करण्यासाठी आलेले असताना, मी स्पर्धेच्या नाटकासाठी तयार केलेला ‘सायक्लोरामा’ पाहताच, मी नाट्यशास्त्र शिकल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्याच क्षणी त्यांनी मला तियात्रासाठी प्रकाशयोजना करण्यासाठी आमंत्रित केले. माइक मेहता हे तेव्हा गोव्याच्या तियात्र आणि कोकणी क्षेत्रात नाट्यशास्त्र शिकलेले एकमेव व्यक्तिमत्त्व. त्यांच्या सर्वच तियात्रांच्या निर्मितीत आणि सगळ्याच तियात्रांना, त्या काळी तियात्र क्षेत्रात कोणालाच माहीत नसलेल्या, प्रकाशयोजनेचे निरनिराळे आधुनिक प्रयोग मला करता आले.

त्यांनी गोव्याच्या तियात्र संस्कृतीला आकार देणारा आणि गोवा आणि मुंबईतील तियात्रिस्त पिढ्यांना प्रेरणा देणारा वारसा मागे सोडला. तियात्र रंगभूमीवरील एक ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, ‘प्लेराईट’, गोव्यातील सुरुवातीचे अग्रणी चित्रपट निर्माते आणि एक प्रसिद्ध ‘क्रिमिनल लॉयर’ म्हणून आदरणीय असलेले मेहता, यांचे योगदान तीन दशकांहून अधिक काळ टिकले.

त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळाले. काही लोकांना माहीत नसेल की ते एक चांगले खवय्ये व ‘कुक’ पण होते. त्यांनी रेस्टोरंट पण चालवली. त्यांच्या जीवनाचा प्रवास अथक सर्जनशीलता, वकिली आणि गोव्याच्या ओळखीला जतन करण्यासाठी समर्पित आहे.

गोव्यातील फोंडा तालुक्यातील बोरी येथे जन्मलेल्या माइक मेहतांचे मूळ नाव मिगुएल ट्रान्सफिगुरासाओ डी क्रिस्टो माइकल रॉड्रिग्ज असे आहे. मुंबईत माहीम परिसरात शिक्षण घेत असतानाच ते इंग्रजी रंगभूमीच्या जगात आकर्षित झाले.

इथेच ते एका शिक्षिकेने चुकून माइक मेहता म्हटल्यावर कलाक्षेत्रात कायमचे ‘माइक मेहता’ बनले. आश्चर्याची बाब म्हणजे कधी-कधी कोर्टांच्या फलकांवर पण हेच नाव कित्येक वेळा मी पाहिलेले आहे.

गोव्याची चैतन्यशील, राजकीय, व्यावसायिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यग्र नाट्यपरंपरा लाभलेल्या तियात्र रंगमंचाला त्यांनी सखोल-चिंतनशील अनुभव दिला. प्रमुख फौजदारी वकील म्हणून प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवली.

समाजसेवा आणि क्षमा करणे त्यांच्या स्वभावात भिनलेले होते. मला आठवतेय, त्याकाळी गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण गोव्यातील एका गँगने, एका तियात्राच्या प्रयोगादरम्यान त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. रक्तबंबाळ स्थितीत मी त्यांना मडगाव-हॉस्पिसियोत दाखल केले. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला. खटला बराच काळ चालला, पण गँगमधील एकाचा मृत्यू झाल्यावर त्यांनी सर्वांनाच माफ करून खटला मागे घेतला. पुढे प्रसिद्ध मंत्र्यांचे विश्वासू सल्लागार बनलेल्या माइक मेहतांचे सामाजिक आणि राजकीय स्थान आणखी मजबूत झाले.

तियात्र लीजेंड माइक मेहतांची तियात्र मंचावरील कारकीर्द नावीन्यपूर्णता, धैर्य आणि ‘नीज-गोंयकार’पणाची भावना उंचावण्याच्या दृष्टिकोनाने परिभाषित केली जाते. ३५ वर्षांहून अधिक गौरवशाली काळात, मेहतांनी हजारो कार्यक्रमांमध्ये काम केल्याचे स्मरते.

एकापेक्षा एक सरस असलेल्या, अकरा मूळ तियात्र संहितांचे लेखन करून त्या दिग्दर्शित करून, त्यांची स्वतः निर्मिती केली. प्रत्येक संहितेची रचना गोव्यातील प्रेक्षकांशी खोलवर संवाद साधून सर्जनशील मर्यादा ओलांडण्यासाठी केली गेली.

‘बिटविन द लाइन्स’ अर्थ असणाऱ्या संहिता लिहिणारे ते एकमेव लेखक होत. त्यांच्या प्रसिद्ध निर्मितींमध्ये ‘ग्रँट रोड’, ‘गोंयकारांचे रोगोत’, ‘गोयें विकलें घांटार’, ‘पुलीतिक’, ‘ऊ पापागाय कांता इबेरा’, ‘पावल मुजें चुकलें’, सुनिता अशा तियात्रांचा सामावेश आहे.

प्रत्येक तियात्र महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित होते. ‘गोंयकारांचे रोगोत’ हे भारतीय संविधानात कोकणीच्या मान्यतेवर लक्ष केंद्रित करत होते. कोकणी-मराठीच्या चळवळीच्या वेळी आम्ही प्रयोगासाठी जात असताना आमच्या मिनिबस वर रॉकेल टाकून आम्हांला जाळण्याचा प्रयत्न, माइक मेहता यांनी आपली वकिली युक्ती वापरून हाणून पाडला होता, हे इथे नमूद करावेसे वाटते.

‘गोयें विकलें घांटार’ हे माइक मेहताने खटला चालवून परप्रांतीयापासून वाचवलेल्या, अजूनही न्यायालयात तीस वर्षे खटला चालत असलेल्या, तुये-पेडणे येथील जमीन प्रकरणावर आधारित व पुढे येणाऱ्या परकीय जमीन माफियावर आधारित तियात्र होते, ज्याचा अनुभव आज गोव्यात सत्यात येताना दिसतो.

‘पूलीतिक’ हे भारतातील आणीबाणीचे निर्भय टीकास्त्र होते. तियात्र रंगभूमीला प्रथमच ख्रिस पेरी यांचे संगीत असलेले १९८२चे ‘ग्रँट रोड’ हे तियात्र सादर करतानाच्या गोव्या-मुंबईतील दिवसांच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

या तियात्रातील कामाठीपुरातील देहविक्रय करणाऱ्या मुलीची भूमिका करणारी बेटी फर्नांडिस व ‘भडव्याची’(पिंप) भूमिका साकारणाऱ्या अनिलकुमार यांच्या भूमिकेला तोड नाही. तियात्र रंगभूमीवरचा तो अजूनही एक मैलाचा दगड म्हणून कौतुकास्पद आहे. मेहता यांनी सामाजिक भाष्य करण्यासाठी तियात्र रंगमंचाचा वापर करण्यास मागेपुढे पाहिले नाही.

त्यांचे दिग्दर्शन आणि लेखन वारंवार धाडसी कथात्मक रचनांसह प्रयोग करत असे. ‘इडीपस रेक्स’ विषय हाताळणारे ते एकमेव तियात्र कलाकार होत. अनेकदा राजकीय कारस्थान, सामाजिक ओळख आणि नैतिक दुविधांवर प्रकाश टाकण्यासाठी विनोद, व्यंग्य आणि नाटक यांचे मिश्रण ते करत असत. स्टॅनिस्लावस्कीच्या नाट्यतंत्राकडे त्यांचा विशेष लगाव होता.

स्टॅनिस्लावस्कीच्या नावावरूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘स्टेनली’ ठेवले. प्रत्येक भूमिकेत अभ्यासपूर्ण वास्तववाद स्वीकारताना, बौद्धिक आणि सामाजिक दूरदर्शी माइक मेहतांचा प्रभाव थिएटरच्या पलीकडे पसरला होता.

गोंयकारांच्या समस्यांसाठी एक अभ्यासू समर्थक, कला आणि सामाजिक कार्यात ‘नीज गोंयकार’पण राखणारे ते सुरुवातीच्या काळातील समर्थकांपैकी एक होते. भाषा, राजकीय प्रतिनिधित्व आणि सांस्कृतिक संवर्धनाशी संबंधित कारणांचे समर्थन करणाऱ्या माइक मेहताना सहकारी आणि समकालीन लोक एक निर्भय विचारवंत म्हणून संबोधत होते, जे सतत प्रश्न विचारण्यासाठी, आव्हान देण्यासाठी आणि समाजाला त्याच्या सखोल सत्यांकडे जागृत करण्यासाठी तियात्रचा वापर करत असत.

Mike Mehta Tiatी
Tiatr Artist: गोव्याची 'परंपरा' राखायची असेल तर समर्पित नाट्यगृहे गरजेची, 'तियात्र' कलाकारांची जागेअभावी परवड

स्वतःच्या तियात्रांबरोबरच त्यांनी जॉन क्लारो, एम. बोयर, प्रेमानंद सांगोडकर, इत्यादींच्या तियात्रांत भूमिका केल्या. त्यांच्या सर्जनशील कलात्मक प्रवासाबरोबरच ते एक प्रतिष्ठित कायदेतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. मेहता यांना गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला देण्यात मनापासून आदर होता. हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनवरील प्रभाव, मेहतांचे सर्जनशील प्रयत्न केवळ तियात्र रंगमंचापुरते मर्यादित नसल्याचे दर्शविते.

गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीला आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असूनही, मेहता त्यांच्या हयातीत सरकारी सन्मानांना आश्चर्यकारकपणे अपरिचित राहिले.

Mike Mehta Tiatी
Tiatr Season: गोव्यात ईस्टरपासून सुरू होतोय 'तियात्रांचा' दुसरा हंगाम, तालमींना जोरात सुरुवात

पहिली ‘गोंयच्या तियात्रिस्तांची संस्था’ मडगावी स्थापन करणाऱ्या संस्थापकांपैकी एक असलेल्या, या महान तियात्र कलाकाराची नोंद हल्लीच, तियात्र अकादमीने अस्मादिकांच्या सांगण्यावरून घेऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला.

माइक मेहता यांच्या निधनाने गोवा आणि मुंबईतील तियात्र कलावंत, चित्रपट आणि कायदेविषयक समुदायांसाठी आणि त्यांच्या पत्नी, मुलगा, सून , नातवंडे, नातेवाईक आणि मित्रमंडळीसाठी एका युगाचा अंत झाला. त्यांची कलात्मक प्रतिभा, कायदेशीर ज्ञान आणि गोव्याच्या ओळखीसाठी अढळ वकिली यांनी त्यांना मातीचा खरा सुपुत्र आणि भविष्यासाठी एक दिवा म्हणून स्थापित केले. श्रद्धांजली वाहताना, कला, समाज आणि न्यायासाठी त्यांनी केलेल्या सेवेची सार्वत्रिक मान्यता, यामुळे गोव्याच्या सांस्कृतिक दिग्गज व्यक्तींसोबत त्यांचे नाव अमर झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com