
पणजी: ‘तुझे माझे जुळेना, तुझ्याविना करमेना!’ मगोप आणि भाजपची याहून निराळी स्थिती नाही. युती करायची, मांडीला मांडी लावून बसायचे आणि टीकेचे वाग्बाण सोडायचे. सातत्याने असेच घडत आले आहे. मुख्यमंत्र्यांनी मगोपला दिलेला अपमानास्पद इशारा आणि ढवळीकर बंधूंची दिल्लीवारी सत्तानाट्याचा नवा अंक आहे.
असे वाद अधूनमधून उद्भवत आले आहेत. दोघांनाही नेमके काय हवे ते अद्याप उमगलेले नाही. कोण आहे मगोप? दोन ते तीन आमदार गाठीशी बांधून पुढे जाणारा पक्ष. निवडणूक निकट आल्यावर सामाजिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एक-दोघा धनाढ्य, बलाढ्य व्यक्तिमत्त्वांना पक्षाची उमेदवारी द्यायची व तोंडी लावण्यापुरते संख्याबळ वाढवण्याचा शिरस्ता. याच मर्यादा ठाऊक असल्याने मगोपला बोचकारण्याचे धाडस भाजपला होते.
यावर उपाय - मगोपला भाजपसोबत अपेक्षित वाटाघाटींसाठी, स्वाभिमान जपण्यासाठी रचनात्मक बांधणी करावी लागेल; परंतु तशी इच्छाशक्ती हवी. सहा ते सात मतदारसंघांमध्ये मगोपचे प्राबल्य आहे, तेथे भाऊसाहेबांवर प्रेम करणारे लोक मगोपला साथ देतात; परंतु पक्षाकडून अपेक्षित कामे होताना दिसत नाहीत. फोंडा, मडकई आणि जीत आरोलकर यांच्यामुळे मांद्रे वगळता इतरत्र फारसे लक्ष दिसत नाही.
परिणामी मगोपकडे संघटनात्मक बळ नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा भाजपने मगोपला जवळ केले आहे. पण, हेच ढवळीकर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस वा इतर पक्षांसोबत गेले तर भाजपसाठी अडचणीचे ठरू शकतात. २०१७च्या निवडणुकीत फारकतीचा परिणाम भाजपने अनुभवला आहे. भाजपचे संख्याबळ २१ वरून १३वर घसरण्यामागे ते मोठे कारण होते. २०२२मध्ये ढवळीकरांनी तृणमूलसोबत घरोबा केल्याने हिंदूबहुल मतदारांना ते रुचले नाही; शिवाय ‘आरजी’चे अस्तित्व भाजपच्या पथ्यावर पडले. आज भाजप राज्यात ‘बाहुबली’ असला तरी लागलेला निकाल भाजप नेत्यांना अनपेक्षित होता.
मगोप व भाजपमध्ये लोकांना नैसर्गिक मैत्र दिसते. म्हणूनच दोघांनी मिळून काम करावे, अशी जनभावना आहे. भाजपने नेहमीच छोट्या पक्षांना संपण्याचा प्रयत्न केला आहे. मगोपलाही त्याची धग बसलेली आहे. (त्यासाठीच पक्षाच्या चाव्या ढवळीकरांनी आपल्या हाती ठेवल्या, जे योग्य की अयोग्य यावर मतमतांतरे जरूर आहेत.) महाराष्ट्रात शिवसेना हे त्याचे ताजे उदाहरण; परंतु गोव्यात प्रादेशिक पक्षांना निश्चित अशी भूमिका आहे. ते जिवंत राहणे राज्याच्या हिताचे आहे. त्यासाठी सत्तेतील मगोपला स्वतंत्र अस्तित्व दाखवावे लागेल. भाऊसाहेबांच्या कार्यकाळातदेखील मगोप हा त्यांच्या करिश्म्यावर ‘एककल्ली’ चालत असे. ढवळीकरही तीच ‘री’ ओढत आहेत. हा पक्ष सक्षम बनायला हवा. तरुणांच्या भावभावना त्यातून प्रतिबिंबित व्हायला हव्यात.
दुसरीकडे ‘शिस्त पाळणे’ हा भाजपचा लौकिक आयारामांनी पुरता लयाला मिळवला आहे. युती तोडण्यासंदर्भात वक्तव्य करून मंत्री गोविंद गावडे यांनी औचित्यभंग केला आहे. ढवळीकर सध्या युतीत आहेत, तरीही त्यांच्यावर घेतलेले तोंडसुख मान्य केले जात असेल, तर भाजपने शिस्त बासनात गुंडाळली, असे म्हणावे लागेल. गावडे यांना तो अधिकार दिला कुणी? तानावडे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा कुणी अशी आगळीक केल्यास किमान समज देण्याचे दायित्व ते पार पाडत. गावडे यांच्यासंदर्भात दामू नाईक यांना तेही वाटलेले नाही. हेच गावडे म्हणत, ‘भाजपच्या तिकिटावर लढलो नसतो तर अधिक मते मिळाली असती’. मुळात भाजप-मगोप वाद गावडे यांच्यामुळेच उपस्थित झाला.
भाजपचे धुरीण नेहमीच म्हणतात, ‘आम्ही शिस्त पाळतो.’ मग गावडे यांना अभय कसे? त्यांच्याच मतदारसंघात सभापती रमेश तवडकर हे सभा घेतात, ज्यात गावडे नसतात. एक खरे, पर्रीकरांच्या पश्चात भाजपमध्ये शिस्तीचा क्षय झाला. वास्तविक, हे सरकार आयात आमदार, अपक्ष आणि मगोपच्या टेकूमुळे भक्कम बनले आहे. ढवळीकरांना हुसकावून ते मंत्रिपद सोडतील; त्यांचा स्वाभिमान जागा होईल ही अपेक्षा, भाजपला अपशब्दांची लाखोली वाहूनही ढवळीकर जेव्हा सत्तेत दाखल झाले आणि त्यांना भाजपने घेतले, तेव्हाच निकालात निघाली.
राजकारणात ‘ज्याच्या हाती सत्ता, तोच पारधी’ हे जितके खरे, तितकेच ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’ हे सार्वकालीन सत्य आहे. ‘बैल, म्हैस, हत्ती आदी उपमांचे ‘किव्याण’ लोकांना नकोय. सगळ्यांना माहिती आहे, ‘म्हैस गाभण राहते ती मालकाच्या फायद्यासाठी नव्हे.’ पुढील विधानसभेसाठी जसजसा कालावधी कमी होत जाईल, तशा राजकीय ढुश्या वाढत जातील. एकमेकांशी न पटणाऱ्या पती-पत्नीला एकत्र ठेवण्यात अपत्य दुवा ठरते. आज भांडणारे पक्ष सत्तेसाठीच एकत्र राहतील, उद्या पुन्हा शय्यासोबत करतील. सध्या जे चालले आहे ते निव्वळ लोकानुरंजन. लोकांना आपली कामे झालेली हवी आहेत. जमिनीचे प्रश्न सोडवा. लोकांना मुबलक पाणी पुरवा. ढेपाळलेले प्रशासन जाग्यावर घाला. तिथे ताकद खर्च करा, लोक दुवा देतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.