इटलीच्या फरश्या, मकावच्या टेबलखुर्च्यांनी सजलेल्या 'वास्तूने' डॉ. लोहिया - मिनेझिस चर्चेनंतर गोव्याच्या मुक्तिसंग्रामात फुंकला प्राण

Menezes Braganca House: गोवा मुक्तीसाठी झालेल्या क्रांतीची योजना, बैठक ज्या घरात झाली ते असोळण्यातील मिनेझिसांचे घर गोव्यासाठी, क्रांतिकारकांसाठी प्रेरणास्रोत बनले.
Menezes Braganca House
Menezes MansionDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी या दक्षिण गोव्यातल्या तालुक्यातील असोळणा हे कृषिप्रधान गाव साळ नदीकिनारी वसलेले आहे . अरबी सागराशी बेतूल येथे एकात्म होणाऱ्या साळ नदीतले पाणी भरती ओहोटीत असोळण्यात येत असल्यानेे, इथल्या नदीत त्याचप्रमाणे खाडीतल्या पाण्यात चवदार माशांची मुबलक पैदास होत असते. भात, नारळ, भाजीपाला, कडधान्ये यांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असल्याने इथल्या लोकांचे जीवन शेकडो वर्षांपासून सुखी समृद्ध झालेले आहे.

आकाशाला गवसणी घालण्यास सिद्ध असलेल्या माडांच्या सावलीत, आंबा, फणस अशा वृक्षांनी समृद्ध गावात शेकडो वर्षांपासून मानवी समाज हा गाव जलमार्गाद्वारे नदी, सागर यांच्याशी जोडला होता. सातेरी, बेताळ आदी देवदेवतांच्या आशीर्वादात कष्टकरी समाज आनंदात इथे पूर्वापार वास्तव्यास होता.

माडांची सूर, गूळ, फळफळावळ यांमुळे नाना जाती जमातीचे लोक सुखासमाधानाने जगत होते. पोर्तुगीज अमदानीत सोळाव्या शतकात पोर्तुगिजांच्या अन्यायअत्याचाराविरुद्ध बुलंदपणे आवाज उठविणाऱ्या कुंकळळी, वेळ्ळी आणि असोळणा येथील क्षात्रवृत्तीचे आणि स्वाभिमानी बाण्याचे गावकरी अग्रेसर होते.

याच निसर्गरम्य गावात शतकोत्तर परंपरा असलेले मिनेझिस कुटुंबीयांचे नानाविध वृक्षवेलीच्या सान्निध्यात जुने प्रशस्त घर आहे. या घराने गोव्याच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेत खितपत पडलेल्या गोमंतकीय लोकमानसाला वीर अक्षौहिणीचे सामर्थ्य प्रदान केले होते.

७ ऑगस्ट १९०९ रोजी डॉ. ज्युयांव मिनेझिस यांचा जन्म असोळणा येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर मिनेझिस कुटुंबीयांनी एका तपानंतर मनेझिस मेन्शन या सुबक घराची उभारणी केली. डॉ. ज्युलियांव यांचे वडील जेफ्रिनो पियादाद देश विदेशात जाणाऱ्या जहाजावरती नोकरी करत असल्याकारणाने घराचे बांधकाम करताना त्यांनी इटलीतून खास फरश्या आणल्या होत्या.

मकाववरून घरात टेबल, खुर्च्या आणल्या होत्या. ख्रिस्ती धर्मगुरूंनी असोळणा येथील स्थानिकांचे ख्रिस्तीकरण केले, त्यावेळी त्यांनी इथल्या लोकांना भारतीय संस्कृतीपासून तोडण्याचे अटोकाट प्रयत्न केले होते. परंतु धर्म बदलला असला तरी मिनेझिस कुटुंबीयांची नाळ या मातीत रुजली होती.

त्यामुळे डॉ. ज्युलियांव यांच्यावरती असोळणा येथील माती आणि संस्कृतीची संवेदना विकसित झाली आणि त्यामुळे परकीय गुलामगिरीत असणाऱ्या भूमीतून उच्च शिक्षणासाठी जर्मनीत बर्लिन येथे स्थायिक झालेले असताना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र व्हावा, गोव्यात मुक्तीची पहाट यावी ही विचारधारा त्यांच्यात वैद्यकीय शिक्षण घेताना कायम होती.

त्यामुळे त्वचा रोग तज्ज्ञ झाल्यानंतर परदेशात नोकरी करून, सुख चैनीचे जीवन घालवण्याऐवजी त्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिली. जर्मनीत स्वाभिमानी भारतीय विद्यार्थ्यांबरोबर महत्त्वाच्या समकालीन विषयांवर चर्चा करत असताना समाजवादी विचारसरणीच्या डॉ. राम मनोहर लोहिया यांच्याशी त्यांचे स्नेहबंध जुळले .

कालांतराने डॉ. लोहिया भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. डॉ. ज्युलियांव मुंबईत वैद्यकीय सेवा बजावत असताना, डॉ. लोहिया त्यांच्याकडे तपासणीसाठी आले असता, डॉ. ज्युलियांव यांनी त्यांना विश्रांतीची नितांत गरज असल्याचे सांगितले आणि आपल्यासोबत गोव्यात निमंत्रित केले.

१० जून १९४६ रोजी ते दोघे असोळणा येथील त्यांच्या घरी आले. असोळणा येथील निसर्गसंपन्न मनेझिस मॅनशन या घरात डॉ लोहिया यांचे आगमन झाल्याची माहिती गोव्यात पसरली. पावसाचे दिवस असताना पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून गोवा मुक्तीचा ध्यास घेतलेली मंडळी असोळणा येथे डा.ॅ लोहियांशी गोव्यातल्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आली.

गोव्यात त्यावेळी इथल्या स्थानिकांची नागरी स्वातंत्र्याच्या अभावी जी गळचेपी केली जायची त्याची कल्पना त्यांना चर्चेत सहभागी झालेल्या विचारवंतांनी करून दिली. गोव्यात निर्माण झालेल्या कोंडीविरुद्ध आवाज उठवण्याचा संकल्प डॉ. लोहियांनी केला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे गोमंतकीय नेत्यांनी ठरवले.

पोर्तुगिजांनी गोव्यातला सक्तीने ख्रिस्ती धर्माची दीक्षा देऊन, त्यांचे भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन करण्यास चालना दिल्याने आणि वेळोवेळी त्यांच्या सत्तेविरुद्ध झालेल्या उठावांना निर्दयपणे मोडून काढल्याने, आपली सत्ता इथे कायम राहील अशी त्यांची धारणा झाली होती.

त्यामुळे गोव्यात असोळणा येथे झालेले आगमन आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेनं उपस्थितांना प्रचंड ऊर्जा प्रदान केली. मनेझिस मॅनशनच्या त्या वास्तूने आणि डॉ. लोहिया यांच्या राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारप्रणालीने क्रांतीचे स्फुल्लिंग गोव्याच्या कानाकोपऱ्यातून हजर झालेल्या मंडळीत जागृत केले.

पूर्वेला कुंकळळी, पश्चिमेला नदीपल्याड केळशी, दक्षिणेला वेळ्ळी आणि उत्तरेला चिंचिणी अशा गावांच्या मधोमध वसलेला असोळणा गाव, डॉ. लोहिया यांच्या वास्तव्याने इतिहासाला कलाटणी देणारा ठरला.

असोळण्याहून वेळ्ळीला जाताना मुख्य रस्त्यावरती आज डॉ आरमांदो मोंतेरो यांची १७३०सालातली राजप्रासादासारखी वास्तू आहे. त्याच्या उजवीकडून जाणारा छोटासा मार्ग मनेझिस मॅनशनकडे जातो. याच घरात डॉ. लोहिया यांच्याशी झालेल्या चर्चेनं पोर्तुगिजांविरुद्ध लढा देण्याची नवीन चळवळ जन्माला आली.

गोव्यातल्या जनतेला संरजामशाही राजवटीत भाषण, मुद्रण स्वातंत्र्य नव्हते. सभेचे आयोजनही करायला प्रतिबंध होता. याचे ज्ञान डॉ. लोहियांना असोळणा येथील मुक्कामी नेत्यांच्या झालेल्या चर्चेतून आणि येथील अवलोकनातून प्राप्त झाले होते.

या साऱ्या झोटींगशाहीविरुद्ध आणि नागरी स्वातंत्र्याच्या मागणीखातर आपण मंगळवार, १८ जून १९४६ रोजी मडगाव शहरात संध्याकाळी चार वाजता सत्याग्रह करणार असल्याचे ठासून सांगितले . यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी उपस्थित मंडळींसमोर अल्पावधीत सत्याग्रहाचे आयोजन करण्याचे मोठे आव्हान उभे होते. असोळणा येथील बैठकीनंतर सत्याग्रह आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी डॉ. लोहिया मुरगाव आणि मडगावला गेले.

असोळण्याचे रोकेजेन्यू आल्मेदा यांनी मडगावचे वसंत वैकुंठ कारे, पुरुषोत्तम काकोडकर आदी मंडळीची लोहियांशी घडवलेली असोळणा येथील भेट आणि चर्चा फलदायी ठरली. १६ जूनला गोमंतक विद्यार्थी संघाने पणजीत व्यापारी, विचारवंत, वकील, डॉक्टर आदी मंडळीशी लोहियाची बैठक आयोजित केली होती.

पोर्तुगिजांच्या पाशवी कायद्याविरुद्ध त्यांनी केलेल्या निर्धारात गोमंतकीय स्वाभिमानी जनतेने सहभाग घेण्याचे ठरवले. त्यामुळे १८ जून १९४६ रोजी मान्सूनचा पाऊस कोसळत असताना गोव्यातील जनता पहिल्यांदा सनदशीर मार्गाने कायदेभंग करण्यासाठी मडगाव चौकीपासून नगर पालिकेपर्यंत एकत्रित भारावल्यागत आले होते.

Menezes Braganca House
Goa: कॅप्टन मिरांडानी डॉ. लोहियांवर पिस्तूल रोखले, त्यांनी हात बाजूला काढत भाषणाला सुरुवात केली; क्रांतीची ज्योत पेटली..

डॉ. लोहिया, ज्युलियांव मनेझिस, लक्ष्मीदास बोरकर टॅक्सीतून सत्याग्रह स्थळी पोहोचले. ‘भारत माता की जय’, ‘डॉ लोहिया की जय’, अशा घोषणांनी सारा आसमंत निनादून गेला. डॉ. लोहिया उत्स्फूर्तपणे एकत्र आलेल्या लोकांसमोर भाषण करण्यास उभे राहताच कॅप्टन मिरांद याने त्यांच्यावरती बंदूक रोखून धरत, भाषण बंदीचा हुकूम दिला आणि डॉ. लोहिया आणि डॉ. मिनेझिस यांना पकडून आपल्या जीपगाडीत नेले.

डॉ. लोहियांना भाषण करता आले नाही तरी त्याच्या भाषणाची हस्तलिखित प्रत उपलब्ध झाली. त्यात त्यांनी भारतातली ब्रिटिश सत्ता उखडल्यावर गोव्यातली पोर्तुगीज सत्ता जास्त काळ टिकणार नाही. जुलमी राजवटीचे कायदे अस्तित्वात नाही अशा आविर्भावात वावरण्याचे त्यांनी गोमंतकीयांना आवाहन केले होते.

Menezes Braganca House
Goa Revolution Day: लोहिया - मिनेझीस भेटीनंतर 10 दिवसांत गोव्याचा इतिहास बदलून गेला, 18 जून रोजी मडगावात त्याचा स्फोट झाला

डॉ. लोहियांना अटक करून पोर्तुगिजांनी त्यांना गोव्याबाहेर जाण्यास भाग पाडले. तरी दुसऱ्या दिवसांपासून सभा, प्रभात फेरी, सायकल फेरी याद्वारे लोक सहभाग प्रदर्शित झाला. त्यानंतर डॉ. लोहियांनी गोव्यातल्या क्रांतीची जी मशाल पेटवली होती ती सातत्याने केवळ गोव्यातल्याच स्वाभिमानी जनतेला नव्हे तर भारतभरातल्या तरुणाईला गोवा मुक्ती चळवळीत सहभागी करण्यास कारणीभूत ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com