
गणेशचतुर्थी काही दिवसांवर येऊन पोहोचताच साफसफाईची कामे आटोपल्यावर खेडेगावातील माणसांची नजर माटोळीसाठी लागणाऱ्या वनस्पतींच्या शोधात असते. पेडणे ते काणकोणपर्यंत या उत्सवात मृण्मय मूर्तीच्या रूपात पुजलेल्या गणपतीच्या माथ्यावर अ सणाऱ्या माटोळीचे सुबक दृश्य अनुभवताना त्या परिसरातील नैसर्गिक वैभवाचे दर्शन घडते.
गजमुखी गणपतीची पूजा ही निसर्गाची पूजा असते. हत्ती हा प्रचंड बुद्धिमत्ता आणि महाकाय शरीराचा प्राणी वृक्ष वनस्पतीने समृद्ध असलेल्या घनदाट जंगलात वास्तव्य करतो. आपल्या घरी आणलेल्या गणपतीलासुद्धा आपण निसर्गाच्या थंडगार सावलीत वसल्याचा भास व्हावा आणि प्रसन्नतेने आपल्याला त्याचा आशीर्वाद लाभावा म्हणून जणू काही त्याच्या माथ्यावर रंगीबेरंगी पाने, फळे, फुले यांनी सजलेली माटोळी बांधली जाते.
गोमंतकातील ठिकठिकाणी असलेल्या माटोळीकडे बघितले तर आपल्याला त्यात उंच उंच वाढणाऱ्या वृक्षांचे वृक्षांच्या घटकांचे दर्शन होते. त्यात माट्टी, आंबा, करमळ, फणस, यांसारख्या झाडांच्या पानाफुलांचा विशेष समावेश दिसून येतो.
त्याचबरोबर गोव्यातील पानगळतीच्या जंगलात सहज आणि भरपूर प्रमाणात आढळणाऱ्या झुडूप आणि वेलवर्गीय वनस्पतींचा समावेशदेखील होतो. ही सगळी वनस्पती भरपूर उंच वाढतात आणि त्यामुळेच माटोळी ही गणपतीच्या माथ्यावरती बांधली जात असावी.
त्याचप्रमाणे या गोवा, कोकणातल्या आयतार पूजनात विशेषत भरपूर प्रमाणात तृणवर्गीय वनस्पतींचा समावेश असल्याकारणाने त्यांना जमिनीवर स्थान दिले असावे. विशेष म्हणजे गणेशचतुर्थीला दूर्वासुद्धा भरपूर प्रमाणात वापरल्या जातात.
पण ते गवत असल्याकारणाने गणपतीच्या चरणी अर्पण केले जाते. त्यामुळे माटोळीच्या हिरवाईकडे बघताना गणपतीच्या सभोवताली जणू नैसर्गिक रचनेत वृक्ष आच्छादन बनवून गणपतीला व दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना प्रसन्न करत असते. माटोळी हा गणेश चतुर्थीचा अविभाज्य घटक असतो.
खरे तर गणेशचतुर्थीच्या उत्सवाचे नाते पर्यावरणीय संस्कृतीशी निगडित आहे. आज आपण विविध कृत्यांद्वारे प्रदूषणाला आमंत्रण देऊन आपले जगणे संकटग्रस्त करत आहोत. श्रावणामध्ये बरसून गेलेल्या पावसाच्या रेशमी धारा आणि मध्येच पिवळे धमक ऊन पडत असल्याने संपूर्ण सृष्टी रंगीबेरंगी पुष्पांनी सजलेली आहे.
हिरव्या वैभव आणि नटलेल्या श्रावण या ऋतुराजाच्या महिन्याच्या समाप्तीनंतर भाद्रपदातल्या चतुर्थीला गणेशचतुर्थी या उत्सवाला प्रारंभ होतो. यावेळी पठारे, माळराने पिवळ्या गुलाबी फुलांनी सजलेले असतात. त्यावेळी गोवा- कोकणातला निसर्ग विलक्षण प्रसन्न असतो.
आज पठारावरती पिवळ्या धमक रंगाचे सोनकी त्याचबरोबर छोटे व मोठे तेरडे गुलाबी रंगाचा साज चढवत आहेत. कोवळे ऊन पडल्यावर त्यांचे लावण्य शब्दापलीकडचे असते. या सर्व फुलांचा समावेश माटोळीला सजविण्यासाठी केला जातो. गोव्यामध्ये श्रावणातदेखील असा क्षण येतो जेव्हा मुसळधार पावसात कुळागरातील सुपारी बरोबर इतर वृक्षांची फळे भरपूर प्रमाणात गळून पडतात. त्यामुळे त्या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘कुसडो पाऊस’ असे म्हटले जाते.
श्रावणात भाजीच्या मळ्यात लावलेल्या पिकांना चांगले उत्पन्न लाभल्याने येथील लोकमानसाचा हर्ष द्विगुणित होतो. काकडी, भेंडी, चिबूड यासारख्या फळांना मुद्दाम माटोळीमध्ये बांधण्यासाठी राखून ठेवले जाते. त्यामुळे गणपतीला जे काही धनधान्य अर्पण करायचे असेल तर त्यांना माटोळीला बांधले जाते.
ही फळेफुले व पानांचा गुच्छ बांधण्यासाठी वापरला जाणारा दोरसुद्धा झाडापासून मिळवलेला असतो. केवण किंवा मुरुड शेंग म्हणून ओळखली जाणारी एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. त्याचे वैज्ञानिक नाव हेलिक्टरेस आईसोरा असे आहे. गोव्यामध्ये विशेषतः माटोळीला बांधण्यासाठी याच झाडापासून मिळवलेल्या दोरांचा वापर केला जातो.
एरवी वर्षभर कुंभा नामक वृक्षाच्या सालीपासून बनवलेल्या दोरांचा वापर केला जातो परंतु गणेश चतुर्थीला या झाडाला वर्ज्य मानले जाते. त्यामुळे कुठेही कुंभाचा दोर वापरला जात नाही. मुरुड शेंग या वनस्पतीला उन्हाळ्यात गडद लाल फुले येत असल्याने ते झाड हमखास नजरेत येते. परंतु पावसाळ्यात बहर संपून जातो त्यामुळे आयत्यावेळी दोर काढण्यासाठी या झाडाला त्याच्या पानावरून ओळखावे लागते.
झाडे ओळखण्याचे आणि त्याचे दोर कसे काढायचे याचे पारंपरिक ज्ञान माटोळीमुळे पुढच्या पिढीकडे पोहोचत आहे. माटोळीमध्ये बांधल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये कांगला, कवनाळा, नागल कुडा, घागऱ्या, माट्टुला, शेरवाडा, आंब्याची पाने या घटकांचा आज जरी दैनंदिन जीवनात काहीच संबंध नसला तरी कधीकाळी या वनस्पतींशी असलेले ऋणानुबंध आणि पारंपरिक ज्ञानाचा वारसा उमजतो.
पर्जन्यवृष्टीमुळे आपण जे काही धरित्रीच्या कुशीत पेरलेले असतात त्याला बहर येतो. फळेफुले यांचे उत्पन्न लाभते. काकडी, दोडगी, भोपळे, भेंडी अशी भाजी असो अथवा प्राजक्त, केवडा, जास्वंद, चाफा, यांसारखी फुले असोत किंवा सुरण, काटे कणगी, झाड कणगी, करांदे असो यांच्या मौसमाचे वैभव दृष्टीस पडते.
आपण जे पेरलेले आहेत ते या मृण्मय धरित्रीच्या कुशीतून उगवले, फळले आणि फुलले. या अन्नाची पैदास करणाऱ्या धरित्रीविषयीची कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करण्यासाठी इथल्या लोकमानसाने गणेश चतुर्थीत माटोळीचे नियोजन केले आणि त्यात मौसमी फळाफुलांना स्थान दिले.
धारबांदोडा आणि काणकोण या तालुक्यांना एका बाजूने जंगलांची श्रीमंती लाभल्याने तेथील माटोळीत वनौषधी आणि मानवी जीवनात उपयुक्त ठरलेल्या वृक्ष वनस्पतीचे दर्शन आजही होते. शिगाव येथील माटोजे गावात माटोळीवर करमळाची पाने ठेवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी करंज्या (नेवऱ्या) बांधल्या जातात.
गोव्यात ठिकठिकाणी ज्या प्रमाणे घरातील चौकात बांबूपासून बनवलेली माटोळी बांधली जाते त्याचप्रमाणे तुळशीसमोरही दोन काठ्या उभ्या जमिनीत रोवून त्याच्यावरून एक आडवी काठी घालून त्याला विविध फळे, पाने, फुले बांधून माटोळीचे स्वरूप दिले जाते.
कृषीची परंपरा आता झपाट्याने मागे पडत आहे. गोमंतकातील कष्टकरी जनतेने पूर्वापार लागवडीत आणलेल्या खोचरी, दामगो, बेळो, कोरगुट, शिट्टोसारख्या या मातीतल्या भाताच्या प्रजाती विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. पूर्वी शेतातील कणसांनी परिपक्व असलेल्या भाताचे झेले बनवून माटोळीला झुंबरासारखे बांधले जायचे. नवे धान्य आपल्या जेवणात वापरण्याऐवजी गणपतीला अर्पण करण्यात कष्टकरी धन्यता मानत असत.
आज चवदार आणि आरोग्यदायी असलेल्या मोजक्याच वनस्पतीचा वापर आम्ही दैनंदिन जीवनात करत आहेत. आपल्या सभोवताली औषधी गुणधर्माने युक्त असलेल्या असंख्य वनस्पती आहेत. या वनस्पतींकडे दुर्लक्ष होऊ नये आणि या पारंपरिक ज्ञानाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचावा म्हणून माटोळीच्या परंपरेतून लोकशिक्षण प्रत्यक्षात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.