Marathi Gaurav Din: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त्य ‘रिटर्न गिफ्ट’! पहिल्या गोमंतकीय मराठी संशोधनपत्रिकेचा संकल्प

Marathi Language Pride Day: परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गोमंकीय मराठी अभ्यासकांना ‘पीयर रिव्हू जर्नल’ उपलब्ध करून देण्याच्या सुवर्ण संकल्पाची पेरणीही याच शुभमुहूर्तावर आम्ही करू.
Marathi Language Pride Day
Marathi literatureDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. मधू घोडकिरेकर

येत्या गुरुवारी म्हणजे २७ रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी केली जाणार आहे. कुसुमाग्रजांनी मराठीला ‘ज्ञान भाषे’चे स्वरूप यावे यासाठी आजन्म अथक प्रयत्न केले.

येथे गोव्यात तर मराठी गोमंतकीयांची ज्ञान भाषा अगदी निर्विवाद आहे. मागील काही वर्षांपासून, गोवा विद्यापीठातील मराठी विभागाचे ‘शारदा विद्यार्थी मंडळ’ या दिवसाचे औचित्य साधून तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करत आहे. परिषद असो वा अकादमी, अशा संस्था मराठी येथे टिकावी, तिचा मन सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न करू शकतात.

पण, भाषा विकसित करण्याचे काम फक्त हेच विद्यार्थी व शिक्षक मंडळी करू शकतात. या वर्षी, ‘शारदा विद्यार्थी मंडळा’सोबत या कार्यक्रमासाठी परिषदेने सहयजमान व्हावे, अशी विनंती प्रकल्प संचालक डॉ. विनय बापट यांनी आम्हांला केली. अर्थात, स्तुत्य उपक्रम असल्याने आम्ही त्यांची विनंती मान्य केली आहे. आता, औचित्याला शोभेल असे कोणते ‘रिटर्न गिफ्ट’ त्यांना आम्ही देऊ यावर विचार सुरू आहे.

तर्कवितर्क नको म्हणून, ही विनंती परिषदेस का करण्यात आली, हे सांगणे गरजेचे आहे. परिषदेचे दोन वार्षिक कार्यक्रम नियमित होतात. कै. अ. का. प्रियोळकरांची जयंती अन् शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील ‘बाळकृष्ण सावर्डेकर वक्तृत्व स्पर्धा’.

यातील कै. अ. का. प्रियोळकर यांची जयंती गो. रा. ढवळीकरसरांची मराठी राजभाषा समिती व आम्ही संयुक्तपणे करतो. ‘बाळकृष्ण सावर्डेकर वक्तृत्व स्पर्धा’ मात्र आम्ही स्वतंत्रपणे आयोजित करतो. माझ्याकडे परिषदेची जबाबदारी आली तेव्हा कोविड काल होता, त्यामुळे स्पर्धा झाली नाही. आधी द. वा. तळवणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली उमेश रेडकर, के. डी. मनवाडकर, विश्वास कुंडईकर, सुहास रिवणकर, तुकाराम रेडेकर, प्रेमानंद नाईकसर वगैरे स्पर्धेसाठी धावपळ करायचे.

मी उपाध्यक्ष असलो, तरी माझी जबाबदारी संस्थेच्या सरकार दरबारी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी पाहण्याची होती. आता, द. वा. तळवणेकर सरांच्या अनुपस्थितीत, त्यांच्याकडे असलेली सेनापतीची भूमिका माझ्याकडे आली. एक गोष्ट लक्षात आली की स्पर्धा जवळ जवळ पंचवीस वर्षे सुरू असल्याने, केंद्रवार प्रमुख व्यवस्थित आयोजन करतात.

आम्ही व्यवस्था करावी लागते ती परीक्षकांची. आता परीक्षक म्हणजे भाव खाणारे तज्ज्ञ अशी माझी भावना आहे. त्यातल्या त्यात, दर महिना दीड लाख पगार घेणारे अध्यापक प्राध्यापक मंडळीसुद्धा अडीचशे-पाचशे रुपयाचे पाकीट घेऊन घरी जातात, हे मी आधीच्या तपशिलावरून पाहिले आहे.

मी ठरविले असे एक नवीन परीक्षक मंडळ तयार करायचे, ज्यांनी स्पर्धा आधी जिंकली असेल. शौनक बेहरे आमच्या परिषदेचे सहसचिव आहेत आणि त्यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावरच्या दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या.

त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली. परिणाम चांगला झाला. आज परिषदेकडे सर्व तालुक्यातील मिळून पन्नासहून जास्त युवा परीक्षक तयार झाले आहेत. कधी कधी मीही त्यांच्यासोबत परीक्षणाला बसतो व मार्गदर्शन करतो. मी त्या सर्वांना एकच सांगतो की तुम्ही जेव्हा स्पर्धक म्हणून माइकसमोर उभे राहायचा, तेव्हा तुमची काय अवस्था व्हायची ते आठवा.

मुलांच्या चुकांची यादी तयार करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींची यादी तयार करा. स्पर्धक स्पर्धकामधील तुलना चुकांवरून, नव्हे तर चांगल्या गोष्टीवरून करा. असेही नाही की आम्ही त्यांच्या चुका वाऱ्यावर सोडतो. आमचे प्रेमानंद नाईकसर या वयातही, निकाल तयार होईपर्यंत जो मोकळा वेळ असतो, त्यात मुलांना व्याकरण व स्पष्ट उच्चार याचे मार्गदर्शन करतात.

परिषदेने तयार केलेल्या परीक्षक मंडळातील काही मुले येथील मराठी विभागाचे पदव्युत्तर विद्यार्थी आहेत. त्यांनी परिषदेचे नाव आपल्या शारदा मंडळाला सुचविले व पुढची प्रक्रिया झाली. आता परिषदेने त्यांना यथाशक्ती ‘रिटर्न गिफ्ट’ द्यायचे, हे ठरवायचे आहे. त्यासाठी परिषदेची शक्ती काय हे पडताळून पाहावे लागेल.

आपल्याला आठवत असेल की, मी मागच्या लेखात ‘परिषदेचे मुखपत्र व इतर मराठी नियतकालिके चालविणे’ परिषदेचा संस्था, या उद्देशाअंतर्गत ‘गोमंकाची अस्मिता’ (या पुढे ‘अस्मिता’ म्हणूया) या त्रैमासिक मुखपत्राचे प्रकाशन सुरू झाले, असे सांगितले होते.

परिषदेच्या घटनेतील मुख्य उद्देश ’गोमंतकाची भाषा मराठी आणि कोकणी ही तिची बोली’ या मूलभूत सिद्धांतावर गोमंतकात मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धन करणे, मराठीला एकमेव राजभाषेचा दर्जा मिळवून देणे, मराठी साहित्य निर्मितीला उत्तेजन देणे आणि मराठीच्या शिक्षणात सुसूत्रता आणणे असा आहे.

हे साध्य करण्यासाठी वरील उल्लेख केलेल्या साधनांसोबत, ‘सभा- परिषदा- संमेलने- मेळावे भरविणे, व्याख्याने आयोजित करणे, चर्चासत्रे घडवणे इ., सरकार दरबारी, आकाशवाणीवर किंवा इतरत्र होणाऱ्या अन्यायास प्रखर विरोध करणे आणि मराठीला आपल्या हक्काचे स्थान मिळवून देण्याकरता योग्य ती कारवाई करणे,

गोमंतकीय मराठी लेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी आर्थिक मदत देणे, ती जरूर तर संस्थेमार्फत प्रकाशित करणे किंवा त्यांच्या छापील प्रती विकत घेणे, मराठी भाषा व साहित्य या क्षेत्रांत मौलिक कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव करणे, मराठी भाषा व तिच्या गोमंतकीय बोली यांच्या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथालय निर्माण करणे व ते चालवणे आणि या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकास आर्थिक मदत देणे.’ याही साधनाचा उल्लेख आहे.

मुखपत्राचे एक साधन सोडून उर्वरित सगळ्या साधनांचा मराठीच्या बिगर सरकारी व सरकारी मराठी अकादमी वापर करीत आहे. इतर संस्थेच्या तुलनेत ‘गोमंतकाची अस्मिता’ ही परिषदेची आजच्या घडीची शक्ती आहे. कशी ती पाहूया.

हल्ली खंडित असलेल्या ‘गोमंतकाची अस्मिता’ला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. नजीकच्या काळात अस्मिताचे दिवाळी अंक लोकांना परिचित आहेत, त्यामुळे दिवाळी अंकातील अळंब्यातील एक अळंबी असावे, असा माझा समज होता. जेव्हा अध्यक्ष या नात्याने जुने दस्तऐवज माझ्या नजरेस आले, तेव्हा कळले की ही रद्दी नाही तर गोमंतकीय मराठी चळवळीची बीबीसीने तयार केलेली डॉक्युमेंटरी आहे.

या त्रैमासिकाला केंद्र सरकार दरबारी नियतकालिक क्रं. २७२००/७५ असा नोंदणी क्रमांक आहे. गोव्यातील पहिल्या पाच नोंदणीकृत मराठी प्रकाशनात ते गणले जाते. पहिल्या दोन वर्षाच्या अंकाचे मुद्रण दैनिक ‘गोमन्तका’च्या छापखान्यात झाले होते. पुढे मुद्रक बदलला तरी मुद्रणासाठी लागणारे ब्लॉक येथूनच घेतले गेले. ‘गोमन्तक’चे पहिले संपादक कै. बा. द. सातोस्कर यांनी पहिल्या अंकापासून लेखन केले. परिषदेचे पहिले सचिव कै. मनोहर हिरबा सरदेसाई यांनी पुढील काळात गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक सचिव म्हणून काम पाहिले. त्यामुळे, पुस्तक प्रकाशनासाठी निधीची कमतरता असण्यासारखे प्रश्न सुटले व ती कार्ये मार्गी लागली.

अर्थात हा निधी आता गोवा मराठी अकादमीकडे आहे. येथून प्रकाशित झालेली प्रकाशने आज नवीन शिक्षण धोरणाखाली तयार झालेल्या मराठीच्या पदवी अभ्यासक्रमाची संदर्भ पुस्तके झाली आहेत. पण या दोन्ही संस्थांनी संशोधनास आवश्यक एकही नियतकालिक किंवा जर्नल प्रकाशन सुरू केलेले नाही, जे कोकणी अकादमीने केले आहे. आजच्या घडीला, स्थानिक साहित्य व संस्कृती अभ्यासक्रमात आल्यावर त्यांच्या संदर्भ पुस्तकांसोबत अद्ययावत असलेले शैक्षणिक जर्नल येथील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी गरजेचे आहे. असे जर्नल प्रकाशित करण्यास एकमात्र गोमंतकीय मराठी संस्था पात्र आहे, ती म्हणजे आमची गोमंतक मराठी भाषा परिषद.

पात्रता असून चालत नाही, पण जर्नल प्रकाशित करण्यासाठी साधने, निधी व मनुष्यबळ यांची गरज लागते. जर्नलसाठी लागणारा निधी हा सहकारी तत्त्वावर उभा राहतो. इच्छा असलेले पदवी शिक्षक व पदव्युत्तर शिक्षक-विद्यार्थी मंडळी एकत्र आली की मनुष्यबळ तयार होते. पन्नास वर्षांपूर्वी संशोधनास पात्र साधने कशी शोधली गेली हे कुणास जाणून घ्यायचे असेल तर परिषदेचे जुने दस्तऐवज चाळून पाहावे.

आज ज्या ज्या लेखकांची पुस्तके संदर्भ पुस्तके झाली आहेत, त्या सर्वांनी सुरुवातीचे लेखन ‘अस्मिते’मध्ये प्रसिद्ध केले होती. पुढील काळासाठी संदर्भ ग्रंथ तयार व्हायचे असतील तर त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागेल.

Marathi Language Pride Day
Romi Konkani: रोमीला राजभाषा कायद्यातून वगळणे हा ख्रिस्‍ती समाजावर अन्‍याय, माजी सभापती कार्दोझ यांचे प्रतिपादन

आधी उल्लेख केलेला मराठी विषयाचा पदवी अभ्यासक्रम गोवा विद्यापीठाने जारी केला आहे, त्यात प्रथम वर्षाच्या प्रथमसत्रात ‘गोमंतकातील लोकसंस्कृती व लोकपरंपरा’ हा विषय आहे. त्यासाठी संदर्भपुस्तक सूचीत सर्वांत जास्त पुस्तके माननीय विनायक खेडेकर यांची तेथे दिली आहेत.

त्यांचा ‘गोमंतकाची लोककला’ या मथळ्याने अगदी प्राथमिक स्वरूपाचा लेख ‘अस्मिते’च्या १९७९च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. पुढच्या काळातील संदर्भ ग्रंथ संशोधन प्रक्रियेतून तयार झालेले असावे लागतील.

Marathi Language Pride Day
Goa Opinion: भरती प्रक्रियेतील कोकणी-मराठी वाद! प्रायश्चित्त म्हणून सर्वांनी सामूहिक राजीनामा द्यावा

म्हणून, परिषदेने ‘अस्मिते’चे यापुढील अंक शोधपत्रिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा विचार सुरू केला आहे. या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात अस्मितेचे नूतन स्वरूप मुखपृष्ठाचे अनावरण करून, त्यांना आमच्या परीने ‘रिटर्न गिफ्ट’ आम्ही देण्याचा प्रयत्न करू.

परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गोमंकीय मराठी अभ्यासकांना ‘पीयर रिव्हू जर्नल’ उपलब्ध करून देण्याच्या सुवर्ण संकल्पाची पेरणी या शुभमुहूर्तावर आम्ही करू. कसा असेल ‘पीयर रिव्हू जर्नल’ याविषयी पुढच्या आठवड्यात...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com