
काहीही झाले की, लगेच भावना दुखावणाऱ्या लोकांची संख्या, अन्य ग्रहावर कुठेही नसेल तेवढी आपल्याकडे आहे. भावना दुखावल्या जाण्यासाठी काही मोठ्ठे व्हावे लागते, असेही नाही. कुणी थट्टा केली, कुणाची जीभ घसरली तरी ‘लागते’ (कुठे ते विचारू नका). केवळ माणसांच्याच नव्हे तर माशांच्याही..
परवा मी मत्स्य महोत्सवातून बाहेर पडता पडता, झालेल्या अतोनात गर्दीसाठी समस्त जलचरांना शाप देतोय हे पाहून एका खेकड्याने माझ्या पायाचा चावा घेतला. मी खाली वाकून त्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘तू माझे जाड कवच दुखावले आहे. मी तुझ्यावर खटला दाखल करेन!’ सांगायचे तात्पर्य काय तर फक्त दुखावले जाणे पुरेसे नसते; फिर्यादही नोंदवावी लागते.
वास्को, झुआरी येथे केलेल्या भलत्याच अद्भुत कार्यासाठी कुणीतरी मॉविन गुदिन्हो यांना संतपद देण्याची केलेली मागणी त्यांनी भलतीच मनावर घेतली. चक्क शर्ट पॅन्ट उतरवली (थांबा हो, वाक्य पूर्ण तरी होऊ द्या. तुमच्या मनातच पाप आहे बुवा!) आणि भगवे सोवळे चढवले.
जानवे घालून गोत्र सांगितले की नाही ते कळाले नाही(बहुधा दत्तात्रेय ठेवावे की अन्य कोणते निवडावे याच संभ्रमात असावेत). पण नागपूर व दिल्लीच्या कानाचे पडदेही फाटतील अशा उच्चरवात गर्जना करते झाले, ‘मी हिंदू आहे...!’ त्याच आवेशात ते मागणी करणाऱ्यांवर खटला भरण्यासाठी कासोटा घट्ट धरून धावले. सूर्य जाळण्याचा (रात्रीच्या वेळी सूर्याच्या उन्हामुळे जळण्याचा) महोत्सव - म्हणजे आपल्या सोप्या मराठीत ‘सनबर्न’ हो! - त्यावर पाणी पडल्याने त्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि तो म्हणे सर्व गर्दुल्ल्यांवर आणि अमलीपदार्थांकडे पाहण्याची ऐपत नसलेल्या लोकांवर खटला दाखल करायला निघाला होता.
तेच कशाला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोहन खंवटे आणि बाबूश मोन्सेरात यांच्या भावना कुणीतरी काड्या करतेय म्हणून दुखावल्या होत्या. त्या बिचाऱ्याची सकारण बदनामी होईल म्हणून खटला गुदरता गुदरता थांबले. माणूस कितीही ताकदवान असला तरी भावना दुबळ्या असतात, त्या अशा! त्यांचे जाऊ द्या, एक सुदिन व सुमुहूर्त पाहून मी पणजीत जाण्यास बाहेर पडलो.
अनेक खड्ड्यांना चकवत दुचाकी घेऊन जाताना एका फसव्या खड्ड्यात पडलो. हात, पाय, अहंकार सगळेच दुखावले. अरेच्चा सांगायचे राहूनच गेले, भावनाही दुखावल्या. रागाने ओरडलो, रस्त्यावरच्या समस्त खड्ड्यांना शिव्या घातल्या. मला वाटले पणजी स्मार्ट झाल्याचे फक्त ‘इमॅजिन’च करणाऱ्यांच्या भावना दुखावतील. पण कसचे काय! अहो कुठूनसे खड्डे (केस नसलेले) एकत्र आले आणि भावना दुखावल्याचे सांगून केस घालण्याची धमकी देऊन गेले.
हे भावनांचे दुखावले जाणे आठवायचे कारण म्हणजे माझे प्रिय मित्र दत्ता नायक. त्यांनी मंदिर, मठ लूट करतात असे म्हटले. विशेषत: पर्तगाळी मठ. त्यांनी अर्थातच ‘लूट’ असे म्हणायला नको होते, असे मागाहून म्हटले आहे.
दत्ता यांच्या या विधानाने नाराज व्हावे का? की हे चहाच्या कपातील वादळ आहे? दत्ता यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे हे उल्लंघन आहे का?
येथे माझे तीन विचार मांडतो...
* तर्कनिष्ठ आणि नास्तिक या नात्याने, अशास्त्रीय आणि जुनाट मानत असला तरीही दत्ता केवळ हिंदू प्रथांनाच लक्ष्य करू शकत नाही. दत्ता आणि त्यांच्यासारखे अनेक विचारवंत इस्लामच्या स्त्रीद्वेष्ट्या, अमानुष, सिद्धांतांविरुद्ध कधीही बोलत नाहीत. हिंदू देवदेवतांना खोटे देव असे म्हणत त्यांचा नाश करू पाहणाऱ्या पाद्री, मिशनरि यांवर कधीच बोलत नाहीत. तर्काशी एकनिष्ठ असलेल्या विचारवंतांनी सगळ्या धर्मांवर टीका करायला हवी.
* जेव्हा हिंदू श्रद्धा पायदळी तुडवल्या जातात तेव्हा राज्य कथित गुन्हेगाराच्या विरोधात कठोरपणे हालचाली करते. अल्पसंख्याकांची वाळवी नष्ट करण्याच्या आवाहन केले जाते तेव्हा पोलिस दल किंवा न्याय व्यवस्था जांभया देत असते.
काही भावना इतरांपेक्षा पवित्र असतात का??
* आणि शेवटी दत्तावर काय खटला चालवला जातोय,
विशेषत: त्याने शब्दांच्या निवडीबद्दल माफी मागितल्यानंतर?
माझ्या मते, दत्ता नायक यांनी असे म्हणणे हा मूर्खपणाची पराकाष्ठा आहे आणि ‘मला सगळ्यातले सगळे कळते’ हा आढ्यतेखोरपणा आहे. असे असले तरीही हा दंडनीय गुन्हा कधीपासून आहे? खुनाचे हत्यार कुठे आहे? मृतदेह कुठे आहे? कुठे लुटला पैसा? औषध कुठे आहे? एफआयआरच्या या विनोदावर हर्युल पॉइरोटही मिशीच्या आत लपून बसेल.
दत्ता क्रूर, धूर्त आणि वार्धक्यामुळे भ्रमिष्ट झाले आहेत. (त्यांनी पर्तगाळी मठाने केलेल्या उत्कृष्ट कार्याचा अभ्यास केला नाही). विज्ञाननिष्ठ व विवेकवादी असण्यासाठी समाजाला दुखावणे गरजेचे नाही.
पण गुन्हा??? तो कुठे केला आहे त्यांनी? या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’चा पाठलाग करण्याव्यतिरिक्त पोलिसांकडे खऱ्या गुन्हेगारांना पकडणे वगैरे असे अन्य चांगले काम शिल्लकच नाही का?? किती लज्जास्पद आहे हे!!
ता. क. : या संपूर्ण वादाचे खरे कारण एक नवीन चिराग (दिवा) मडगावला उजळू पाहतोय हे आहे का? मडगाववर राज्य करणारा देवाला (अर्थातच एक महान दत्तमित्र) कायमचे अंधारात ढकलण्याचा प्रयत्न आहे का?
‘दत्ता’सोबत त्याचेही नाव घेतले जात असले तरी मी अर्थातच या ‘देवा’चे नाव घेणार नाही. एरव्ही तो तसा मस्त माणूस आहे. पण सध्या त्याच्या भावना दुखावल्या जातील एवढ्या नाजूक आहेत की नाही, कुणास ठाऊक??
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.