Gujarat Lion: ‘तुम्ही गोव्याहून गुजरातमध्ये सिंहांचा अभ्यास करण्यासाठी, इतक्या दूर का आलात?' सौराष्ट्रातील विस्थापित सिंह

Gujarat Lion Conservation: २०१२सालची गोष्ट आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने वन्यजीवांशी संबंधित काही तातडीच्या विषयांवर सल्लामसलत करण्यासाठी नवी दिल्लीला बोलावले होते.
Lion behavior
Gujarat lion reserveDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. मनोज सुमती बोरकर

२०१२सालची गोष्ट आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने वन्यजीवांशी संबंधित काही तातडीच्या विषयांवर सल्लामसलत करण्यासाठी नवी दिल्लीला बोलावले होते. कॉलेजच्या दिवसांपासूनच मला वन्यजीवांच्या अभ्यासात विशेष रुची आहे. यात वन्यजीवशास्त्र शिकवणारे प्राध्यापक प्रकाश देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे. निरीक्षणासाठी तीक्ष्ण नजर, पराकोटीचा संयम आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन हे त्यांनी सांगितलेले तीन गुण मी भारतीय जंगलात काम करताना जाणीवपूर्वक आत्मसात केले आहेत.

दिल्लीत काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत आणि एका कॉर्पोरेट संस्थेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. सुमारे दोन तासांच्या सखोल विचारविनिमयानंतर, मला एक काम देण्यात आले ज्यामुळे आनंदलो आणि चिंताग्रस्तही झालो.

गीरमधील अभयारण्यापासून दूर असलेल्या शहरी आणि निमशहरी भागांत राहणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पशुधनावर होणारे सिंहांचे आक्रमण आणि त्यामुळे मानव विरुद्ध सिंह असा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मी आव्हान स्वीकारले. माझी स्वत:ची टीम निवडण्याचे स्वातंत्र्य व दोन वर्षांचा कालावधी मागून घेतला आणि कामास लागलो.

वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्यांव्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रांमधील तज्ज्ञांची आवश्यकता लागेल हे जाणून मी माझी टीम तयार केली. यात आर्किटेक्ट पद्मा कामत यांचा समावेश होता ज्यांचा मास्टर्सचा प्रबंध माझ्या मार्गदर्शनाखाली झाला होता.

गोव्यातील तत्कालीन सेवारत रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश सालेलकर व गोव्यातील कृषी आणि जल क्षेत्र तज्ज्ञ डॉ. सचिन तेंडुलकर यांनाही माझ्या टीममध्ये घेतले. राजस्थानमधील दोन तरुण संशोधकांना फील्ड असिस्टंट म्हणून माझ्यासोबत घेतले. पहिल्याच ट्रिपमध्ये मी प्रसिद्ध वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. ए. जे. टी. जॉनसिंग यांना आमच्यासोबत येण्याची विनंती केली. तथापि, त्यांच्या पूर्वनियोजित कामांमुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत.

परंतु त्याऐवजी त्यांनी त्यांच्या सर्वोत्तम विद्यार्थ्यांपैकी एक डॉ. मीना वेंकटरमन यांना पाठवले. डॉ. मीना यांनी गीरमध्ये सिंहांच्या पुनरुत्पादक वर्तनाचा अनेक वर्षे अभ्यास केला होता. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलने त्यांच्या कामावर एक माहितीपट देखील तयार केला आहे! काही प्रसंगी डॉ. उत्कर्षा चव्हाणदेखील आमच्यासोबत सहायक तज्ञ म्हणून होत्या.

सिंहाच्या हालचालींचा एक महत्त्वाचा अप्रत्यक्ष पुरावा असलेल्या ‘लायन पग मार्स’वर डेटा गोळा करण्यास त्यांनी मला मदत केली. सुरुवातीला आमच्या हेतूविषयी तिथल्या लोकांना, अधिकाऱ्यांना खूप शंका होत्या. वन विभागाकडून परवानगी मिळवणे कठीण होते. तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकार सिंहांबद्दल खूप पझेसिव्ह होते आणि काही सिंहांना कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यास तयार नव्हते.

सरकारने आग्रह धरला की सिंह हा ‘गुजरातचा अभिमान’ आहे आणि त्यांचा अधिवास राज्यातच पाहिजे. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तींपासून किंवा सिंहांचा संपूर्ण नाश करू शकणाऱ्या आजारांपासून सिंहांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना राज्याबाहेर नेण्याचा आग्रह डॉ. यादवेंद्र देव झाला आणि डॉ. रवी चेल्लम यांसारखे शास्त्रज्ञ धरत होते. ‘तुम्ही गोव्याहून गुजरातमध्ये सिंहांचा अभ्यास करण्यासाठी इतक्या दूर का आलात?’, असा प्रश्न तत्कालीन वनसंरक्षक मीणा यांनी मला विचारला.

आम्ही त्या भागातील काही औद्योगिक गटाच्या कामकाजाला चालना देण्यासाठी सिंहांना तेथून दूर नेण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी शंका त्यांना होती. ‘तुम्ही याच कामासाठी आला आहात, हे ज्या दिवशी मला कळेल, त्याच वेळी मी तुम्हाला येथे जिवंत गाडून टाकेन!’, अशी धमकीच त्यांनी परवानगी देतेवेळी दिली. ‘एक जीवशास्त्रज्ञ म्हणून मी भारतभर कुठेही संशोधन करू शकतो’, असे त्यांना नम्रपणे सांगितले.

त्या दोन वर्षांच्या कालावधीत सिंह कुटुंबीयांच्या दिनचर्येचे, वर्तनाचे, सवयींचे निरीक्षण करता आले. मी आणि माझ्या टीमने नियमितपणे तीन सिंहिणी आणि त्यांच्या पिल्लांच्या वर्तनाचे, परस्पर संबंधांचे प्रत्येक पैलू समजून घेतले. सिंह कोणत्या प्रकारची शिकार करणे पसंत करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे उर्वरित अन्न, तपासणीसाठी त्यांची विष्ठा गोळा करून अनेक महिने त्याचा अभ्यास केला.

जेव्हा ते पिल्लांना शिकार करायला शिकवत व शिकार केलेल्या प्राण्याला खात असत तेव्हा आम्ही निरीक्षणे नोंदवायचो. गुरांसाठी बांधलेल्या पाण्याच्या हौदातून सिंह कसे पाणी पितात हे आम्ही पाहिले तेव्हा विश्वास बसेना. रात्रीच्या वेळी रस्ते आणि महामार्गांवर हे सिंह कसे भटकतात आणि वाहतूक ठप्प होते हे पाहून आश्चर्य वाटले. एका काटेरी झुडुपाखाली विश्रांती घेत असलेल्या आठ सिंहांना कॅमेऱ्यात टिपणे हा माझ्यासाठी त्या दोन वर्षांतला सर्वांत अविस्मरणीय क्षण होता. राजुलाच्या अहिर (जे स्वतःला भगवान कृष्णाचे वंशज मानतात) लोकांशी संवाद साधताना किंवा ज्यांचे पशुधन सिंहांनी फस्त केले, अशा लोकांशी संवाद साधताना, मला मानव आणि वन्य प्राण्यांमधील सहअस्तित्वाचा आधार कळला!

ते त्यांच्या कुत्र्याच्या गळ्यात अणकुचीदार खिळे लावलेले पट्टे घालत. संघर्ष टाळण्यासाठी वापरात असलेल्या पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व मला कळले. सिंहांची कुटुंबपद्धती मातृसत्ताक आहे. आशियाई सिंहांच्या गोटात सहसा फक्त सिंहिणीच असतात आणि सिंहांना फक्त प्रजननाच्या हंगामापुरतेच त्या गोटात सामील होण्याची परवानगी असते.

२०१४मध्ये कुठेतरी एके दिवशी, आम्हाला एका स्थानिकाकडून फोन आला की, आमच्या हॉटेलपासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या खाणकामाच्या ठिकाणी सिंह आणि सिंहिणीची जोडी समागम करत आहेत. काही मिनिटांतच आमची टीम तिथे पोहोचली आणि संपूर्ण दिवस त्या जोडीचे निरीक्षण करण्यात घालवला. हे खरोखर खूप अघटित होते कारण सिंह सहसा उघड्यावर प्रणयाराधन करत नाहीत. शहरी वातावरणाशी जुळवून घेणे सिंहांना जमू लागल्याचे ते लक्षण होते.

Lion behavior
Ponda: रात्री रस्त्यांवर गवे, बिबट्याचा मुक्तसंचार; फोंडा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत

वाहतूक, खाणींचे स्फोट, लोक यामुळे त्यांना भीती वाटली नाही. इतकेच नव्हे तर लोकांचा वावरही त्यांना खटकेनासा झालाय. आम्ही येथील अनेक उद्योगांच्या कर्मचाऱ्यांना सिंहांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण दिले, जेणेकरून ते प्राण्यांना इजा न पोहोचवताही सुरक्षित राहू शकतील. आम्ही वन्यजीवांच्या महत्त्वाबद्दल मुलांशी आणि महिलांशी बोललो आणि येथे येणाऱ्या अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे दस्तऐवजीकरण केले.

त्या दोन वर्षांत, आम्हाला कळले की सिंहांनी शिकार केलेल्या प्राण्यांच्या अवशेषांमुळे गिधाडांची संख्या पुन्हा वाढली. घराच्या आवारात स्वच्छतागृह असण्यासारख्या सोप्या उपायामुळे माणसांवर सिंहांच्या हल्ल्यांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, हे लक्षांत आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक थरावर स्थानिक वनस्पतींचा वापर करून उंच उभारलेले मातीचे कडे. हे कडे मांसाहारी व तृणाहारी वन्यजीवांसाठीचे नैसर्गिक अडथळे सिंहासाठी घातक नव्हते.

Lion behavior
Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

सिंहांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्याइतपत, संघर्ष टाळण्याइतपत सक्षम होते. मानव-वन्यजीव संघर्ष हा अनेकदा मानवांसाठी हानिकारक आहे, असा चुकीचा अर्थ लावला जातो. पण, तो प्राण्यांसाठीही तितकाच घातक सिद्ध होतो. गोव्यातही वाघांना विष घालून मारण्याचे प्रकार घडले होते. केवळ विषप्रयोगच नव्हे, तर अनेकदा पाठलाग करून त्यांचा जीव घेतला जातो. रेल्वेचे रूळदेखील मृत्यूचे सापळे आहेत, जिथे अनेक वन्य प्राणी रेल्वेला धडकतात, मरतात किंवा पळून जातात. ग्रामीण भागातील उघड्या विहिरी रात्रीच्या अंधारात प्राण्यांसाठी धोकादायक ठरतात. बिबट्या आणि सिंह अनेकदा उंचावरून पाण्यात पडतात. ठोस उपाय केले तर काही प्रमाणात मानवी वस्ती व वन्यप्राण्यांचा अधिवास यांचे सहअस्तित्व शक्य आहे, हेच सौराष्ट्रातील सिंह-मानव संबंधांचे, सहअस्तित्वाचे मी केलेले ‘सिंहावलोकन’ अधोरेखित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com