Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

Kushavati River: नदी आपल्या काठावरती लोकसंस्कृतीला आकार देत असते. जगभरातल्या संस्कृतींचे नदी हे अज्ञात काळापासून पाळणाघर ठरलेले आहे.
Kushavati River
Kushavati RiverDainik Gomantak
Published on
Updated on

नदी आपल्या काठावरती लोकसंस्कृतीला आकार देत असते. जगभरातल्या संस्कृतींचे नदी हे अज्ञात काळापासून पाळणाघर ठरलेले आहे. गोव्याची भूमी जरी भौगोलिक आकाराने अगदी छोटी असली तरी म्हादई आणि कुशावती या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यात अश्मयुगीन काळापासून आजतागायत मानवी संस्कृती समृद्ध आणि संपन्न झालेली आहे. तिच्या वैविध्यपूर्ण अशा पुरातत्त्वीय वारशाची संचिते गावोगावी अनुभवायला मिळतात.

रामायण महाकाव्यात कोशल राज्यात कुशावती नगराचा उल्लेख आढळतो. प्रभू रामचंद्राचे लव आणि कुश असे दोन सुपुत्र होते. त्यामुळे कुशावती या नावाला भारतीय लोकमानसाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात तेजोवलय लाभलेले आहे.

दक्षिण गोव्यात साळ नदीच्या मुखाजवळ रामाचे भूशिर असून, नेत्रावळी अभयारण्याच्या कक्षेत राम डोंगर वसलेला आहे. वेर्ले आणि लोटली येथे शिवाची उपासना रामनाथ रूपात केली जाते. त्यामुळे श्रीरामाशी निगडीत कुशावती या नावाला तेजोवलय लाभलेले आहे .

भारतीय बौद्ध परंपरेत गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणाशी निगडीत कुशीनगर कुशावती नावाने प्रसिद्ध पावले होते. गोव्यात कुशावती नावाने जुवारीची एक महत्त्वपूर्ण उपनदी असून, हा स्रोत पश्चिम घाटातल्या सांगे तालुक्यातल्या नेत्रावळी अभयारण्यात येणाऱ्या नुंदे गावातल्या नासा डोंगरातून उगम पावतो.

याच डोंगरातून प्रवाहित होणारी दुसरी उपनदी इरावती म्हणून ओळखली जायची. हा स्रोत पुढे तळपण नदीशी एकरूप होतो आणि याच नदीच्या काठावरती पर्वत कानन हे तीर्थक्षेत्र पाच शतकांपूर्वी मध्व संप्रदायातल्या अनुयायांना गोकर्ण पर्तगाळी संस्थानाची स्थापना करण्यास कारणीभूत ठरले.

आणि त्यांनीच या पवित्र तळपण नदीचा उल्लेख ‘कुशावती’ म्हणून केलेला आहे. त्यामुळे कुशावती या नावाचे प्रादेशिक अनुबंध सांगे आणि केपे तालुक्यांशी असून धारबांदोडा आणि काणकोण तालुक्यांशी त्याचे धार्मिक आणि भावनिक अनुबंध निर्माण झालेले आहेत.

गोव्यात अश्मयुगातल्या आदिमानवांच्या असंख्य पाऊलखुणा हजारो वर्षांपूर्वी जशा म्हादईच्या दुधसागर खोऱ्यात आढळल्या तशाच त्या कुशावतीच्या खोऱ्यातही आढळलेल्या आहेत. कुशावती नदी किनारी केपे तालुक्यातल्या काजुर आणि पिर्ला त्याचप्रमाणे सांगे तालुक्यातल्या रिवण ग्रामपंचायत क्षेत्रातल्या पणसायमळ येथे शेकडो वर्षांच्या इतिहासाचा वारसा सांगणारी प्रस्तर चित्रे आढळलेली आहेत.

तिन्ही ठिकाणची प्रस्तर चित्रे तीन विभिन्न कालखंडांशी संबंधित आहेत. या प्रस्तर चित्रांशी निगडीत आदिम लोकसमूहांचे वास्तव्य कुशावतीच्या खोऱ्यात होते आणि ही चित्रे त्यांच्या पुरातत्वीय, सांस्कृतिक, धार्मिक त्याचप्रमाणे यातुविद्येशी संबंधित असली पाहिजेत.

कुशावती नदीच्या डाव्या किनाऱ्यावर केपे तालुक्यातील जे काजूर गाव वसलेले आहे तेथे पर्यावरणीय धर्म संस्कृतीवर पूर्वापार विश्वास असणाऱ्या जंगल निवासी वेळीप गावकर जमातीचे वास्तव्य आहे. तेथे पट्टेरी वाघाला देवत्व प्रदान केलेले असून वाघाच्या नैसर्गिक गुंफेलाही इथल्या लोकधर्मात आदर आणि भक्तीचे स्थान लाभलेले आहे.

गावातल्या पाईक देवाच्या शेजारी जी शेतजमिनीच्यामध्ये ‘दुधाफातर’ म्हणून जागा आहे, तेथील ग्रॅनाईट दगडावरती मृगकुळातील जंगली तृणहारी प्राण्यांची प्रामुख्याने चित्रे असून, मातृदेवतेचे प्रतीकात्मक चित्र आहे.

इथल्या पारंपरिक लोकधर्मात या स्थळाला महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. पुरातत्त्व संशोधकांनी ही प्रस्तर चित्रे इथल्या दऱ्याखोऱ्यात वास करणाऱ्या आदिम जमातीची असल्याचे मत मांडलेले आहे. तेथून जवळ असणाऱ्या कावरे पिर्ला या गावात कुशावतीच्या डाव्या किनारी जी ‘बावल्याचे टेंब’ नावाची जागा आहे तेथील जांभ्या कातळावरती मनुष्य आणि पाळीव प्राण्यांच्या कोरलेल्या प्रतिमा आहेत. स्थानिकांच्या मते ही प्रस्तर चित्रे शेतकरी पती, पत्नी आणि त्याच्या पुत्राची तसेच पाळीव बैलजोडीची आहेत. तेथील कपसदृश्य खुणा यातुविद्येशी संबंधित आहेत.

कुशावती नदीच्या उजव्या तीरावर वसलेल्या रिवण धांदोळे येथील फणसायमळची प्रस्तर चित्रे हत्तीचा पूर्वज मँमोथ, गवे, काळवीट, हरणे, ससे, मातृदेवता, मोर आदींची आहेत. पुरातत्त्व संशोधकांनी ही प्रस्तर चित्रे मध्याश्म युगातली असल्याचे मत मांडलेले आहे.

या चित्रांतून यातुविद्या, जंगली श्वापदांची शस्त्रांच्या आधारे शिकार करण्याची पद्धत, त्याचप्रमाणे सामाजिक - धार्मिक जीवनाचे पैलू प्रतिबिंबित होत असल्याचे सांगितलेले आहे. नदीचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी वापरण्यासाठी तेथे दगडातले कालवे अस्तित्वात आहेत ते हब्बूंनी कोरलेले असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

Kushavati River
Kushavati District Goa: 'कामे झाली तरच उपयोग'! नव्या ‘कुशावती’ जिल्ह्याकडून लोकांच्या अपेक्षा; काय आहेत प्रतिक्रिया, वाचा..

कोळंबची ग्रामदेवी शांतादुर्गा, रिवणचा विमलेश्वर यांच्या सांनिध्यात ही नदी लाखो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या चंद्रनाथ पर्वताच्या सावलीतून भोज - कदंब राज घराण्यांनी राजधानी म्हणून प्रस्थापित केलेल्या चंद्रपूर नगरीत प्रवेश करते.

गोवा कदंब राजवटीत बांधकामासाठी भाजलेल्या विटांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करण्यात आल्याने, चंद्रनाथ पर्वतावरचा गाळ पावसाच्या पाण्याबरोबर वाहत येऊन एकेकाळी व्यापार उद्योगाला चालना देणाऱ्या कुशावती नदीतल्या जलमार्गाला विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरला.

Kushavati River
'काणकोणची जनता तिसऱ्या जिल्ह्यात सहभागी होणार नाही'! गोवा फॉरवर्डच्या नाईकांचा दावा; भाजप रवी नाईक यांचा वारसा संपवत असल्याचा आरोप

तेथील गोव्यातला महाकाय भग्न नंदी आणि शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाशी संबंधित कोट, लोकपरंपरेतील कोटाचा हबशी, कार्निव्हालला संपन्न होणारे कवडी आणि चांदोर इथले मुसळ नृत्य चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक त्याचप्रमाणे ऐतिहासिक गतवैभवाची प्रचिती देत आहेत.

त्यामुळे चंद्रपूरच्या शेकडो वर्षाच्या इतिहासाला कवेत घेऊन वाहणारी कुशावती कालांतराने जुवारीच्या मुख्य प्रवाहाशी एकरूप होत असली , तरी दक्षिण मध्य गोव्याच्या वैविध्य पूर्ण संस्कृतीला या नदीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ही नदी केवळ पाण्याचा स्रोत नसून जीवन आणि संस्कृतीला संजीवनी देणारा चिरंतन प्रवाह आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com