

नीमा आमोणकर
खुर्ची आणि आपलं जीवन ह्यात खूप साम्य आढळून येते. चार पायांच्या खुर्चीचा एक पाय जरी कमकुवत, निकामी झाला, तर ती निरूपयोगी ठरते. त्याचं आकर्षण घटतं. त्याचप्रमाणे कुटुंबातील एक घटक सुद्धा कुटुंबाचा डोलारा नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे वाळवी लागल्यावर खुर्चीला कोणताही ‘फेव्हीकॉल’ का जोड वाचवू शकत नाही. म्हणूनच तर वेळोवेळी त्याची डागडुजी, काळजी घेणे आवश्यक असते.
आजकाल वाढदिवस मग तो छोट्यांचा असो अथवा ज्येष्ठांचा तसेच ‘गेट टू गेदर’ सारख्या अनेक सोहळ्यांत निरनिराळ्या गेम्सचे (खेळांचे) आयोजन हे असतेच. गाठी-भेटी, शुभेच्छांची देवाण-घेवाण सारखे, सोपस्कार पार पडताच ‘महाप्रसादाचा’ लाभ होईपर्यंत ह्या खेळांमुळे उपस्थितांचे मनोरंजन आणि मस्त टाइमपास होत असतो. नवनवीन खेळांच्या भाऊगर्दीत आज ही आपलं अस्तित्व जपत आलेला खेळ म्हणजे संगीत खुर्ची. ना डोक्याला त्रास ना कौशल्य सिद्ध करण्याचा आटापीटा. संगीताच्या तालावर फिरण्याचा अन् संगीत बंद होताच खुर्ची पटकावण्याचा साधा - सुधा नियम असलेला असा हा लोकप्रिय पारंपरिक खेळ प्रकार मला तर भारी आवडतो.
दोन खेळाडू आणि एक खुर्ची शिल्लक उरेपर्यंत हा खेळ चालू राहात असतो. शेवटी जो व्यक्ती खुर्चीचा ताबा मिळवते, ती विजेती ठरत असते. थकल्या-भागल्या जीवाला आराम देणारी खुर्ची ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक. दैनंदिन जीवनात खुर्चीचा उपयोग हा अनिवार्य आहे. घर, हॉटेल, ऑफीस, थिएटर, कार्यालय, समारंभात खुर्ची ही आलीच. प्रत्येक घरात तिची जागा ही ठरलेली असते. किचनमध्ये डायनिंगची, हॉलमध्ये बैठकीची अभ्यासाची, कम्प्युटरची, दारातल्या शिपायाची, सुरक्षा कामगाराची वगैरे वगैरे, गरिब ते श्रीमंत सर्वांच्या घरी नांदणाऱ्या खुर्चीचा वापर काही शतकांपूर्वी प्रतिष्ठीत, सन्माननीय व्यक्तींपुरताच मर्यादित होता.
खुर्ची म्हटली की डोळ्यांपुढे उभी ठाकत असते ती लाकडी खुर्ची पण आजकाल बांबू, प्लास्टीक, विविध धातूंनी खुर्चीला आकर्षक करण्याचा चंगच बांधलाय. चार पायांच्या, लाकडी खुर्चीच्या आकार - प्रकार, रूप, सौंदर्यात भर पडू लागलीय. तिची पाठ, बैठक आकर्षक गाद्यांनी सजू लागलीय. खुर्चीचं अद्ययावत स्वरूप म्हणजे सोफा. आजकाल तीन पायांच्या आकर्षक खुर्ची लक्ष वेधून घेत असल्या, तरी हात असलेल्या चार पायांच्या खुर्चीचा भारदस्तपणा हा वेगळाच. प्राचीन कालातील राजा-महाराजांचे सिंहासन असो अथवा आजच्या युगातील आकर्षक देखणी आरामखुर्ची असो तिच्यावर विसावणाऱ्यांना आराम पुरवणे हेच आपलं कर्तव्य मानणारी अशी ही खुर्ची!
मानवी जीवनात खुर्ची हा शब्द सत्ता, अधिकार, पदाचा संकेत असतो. प्रत्येक खुर्चीचं सुद्धा एक वलय असतं. ती मिळवण्यासाठी उच्च शिक्षण, कठोर परिश्रम ह्याला पर्याय नसतो. कित्येक गोष्टींचा त्याग, समर्पण ह्या गोष्टी अनिवार्य असतात. प्रत्येक खुर्चीचं वैशिष्ट्य असतं. डॉक्टरच्या खुर्चीवर पेशंट बसू शकत नाही, शिक्षकाच्या खुर्चीत विद्यार्थ्याला मनाई असते. न्यायाधीश, पोलिस अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा मान हा वेगळाच. काही ठिकाणी एखाद्या खुर्चीवर बसण्यासाठी परवानगी अनिवार्य असते. ‘जब तक बैठने को कहा नहीं जाता, तब तक खडे रहो...’ सारख्या आदेशाचं पालन करावंच लागतं.
खुर्ची पटकावण्याची क्रिया ही बालपणापासून सुरू होत असते. शाळेत पहिल्या रांगेतील, छोट्या-मोठ्या प्रवासात खिडकी शेजारील, नोकरीच्या कार्यकाळात बढतीची प्रगतीची खुर्ची, सभा-समारंभात मानाची खुर्ची मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो. मनुष्य खुर्चीसाठी, पदासाठी धडपडत असतो. नशिबाने प्राप्त झालेल्या खुर्चीची किंमत वाढवणे किंवा घटणे हे मनुष्याच्या कर्मांवर, कर्तव्यावर अवलंबून असते. इंग्रजीतील चेअरमेन चेअरपर्सन हे शब्द खुर्चीवरूनच जन्मास आलेले. ‘रिटायरमेंटच्या घडीला इतकी वर्षे इमान इतबारे साथ निभावणाऱ्या खुर्चीला अलविदा करणं सोपं नसतं. एखादं पद गेलं, की खुर्ची आपल्यासाठी परकी होते तरी रिकामी उरत नसते. तिच्यावर नंतर विराजमान होणाऱ्या व्यक्तीची वर्णी लागत असते. आपलं जीवन हे सुद्धा संगीत खुर्चीचा खेळ. खुर्चीची किंमत, लालसा माणसाला अस्वस्थ करत असते. कुणाचे पाय ओढून, कुणाला खाली ढकलून खुर्ची पटकावण्यासाठी खटपटी चालूच असतात.
महाभारत, रामायण वा इतिहासातील अनेक युद्धांमागील मुख्य कारण म्हजे खुर्ची. राजकारण आणि सत्तेची खुर्ची हे एक मार्मिक सत्य आहे. राजकारणात खुर्ची हे बसण्यासाठीचे आसन नसून सत्ता, अधिकाराचे प्रतिक असते, मग ते प्राप्त करण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा प्रयोग ही काही आश्चर्यजनक गोष्ट राहिलेली नाहीये. एकदा का ह्या खुर्चीची चटक लागली की तिचा त्याग करणे सोपे नसते. पूर्वी राजकारणासाठी खुर्ची असायची पण आजकाल खुर्चीसाठी राजकारण घडणं नवल राहिलेलं नाहीये. खुर्ची मुकी असली तरी कित्येकांचे अर्थात आपल्यावर विसावणाऱ्या अनेकांचे राज, कट कारस्थाने तसंच सत्कर्मांचे किस्से तिने अंतर्मनात साठवलेले असतात. चांगल्या वाईट कृत्यांची ती असते साक्षीदार.
खुर्ची आणि आपलं जीवन ह्यात खूप साम्य आढळून येते. चार पायांच्या खुर्चीचा एक पाय जरी कमकुवत, निकामी झाला, तर ती निरूपयोगी ठरते. त्याचं आकर्षण घटतं. त्याचप्रमाणे कुटुंबातील एक घटक सुद्धा कुटुंबाचा डोलारा नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे वाळवी लागल्यावर खुर्चीला कोणताही ‘फेव्हीकॉल’ का जोड वाचवू शकत नाही. म्हणूनच तर वेळोवेळी त्याची डागडुजी, काळजी घेणे आवश्यक असते. हेच तत्व जीवनातही लागू पडत असतं. वेळोवेळी नात्यांतील, मैत्रीतील गैरसमजुतींची डागडुजी केली तर ती जास्त टिकत असते. ज्या पदासाठी खुर्चीसाठी मनुष्य आयुष्यभर धडपडत असतो, ते पद कायम रहात नसतं. जसा मिळालेल्या पदाचा (खुर्चीचा) ठराविक काळानंतर त्याग हा करावाच लागतो त्याचप्रमाणे वेळ आली, की जीवनाची एक्झीट घेणं अटळ असतं आणि ह्या अंतिम प्रवासात चार पायांची खुर्ची नव्हे, तर चार खांद्याच्या अर्थीवरच विसावावं लागतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.