
तेनसिंग रोद्गीगिश
कऱ्हाडे ब्राह्मण हे खरोखरच एक कोडे आहे. बृहत्कोकणमधील ब्राह्मणांच्या विभागणीत या गटाचा इतिहास शोधणे महत्त्वपूर्ण आहे. सह्याद्रिखंडाचे कारष्टर हे करहाटक या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाभोवतीच्या प्रदेशाचे जुने नाव होते, यावरून ‘कऱ्हाडे’ हे नाव पडले असावे.
या प्रदेशात आताच्या कोल्हापूर, कऱ्हाड आणि मिरज यांचा समावेश होता व या प्रदेशाची राजधानी कऱ्हाड होती. (संदर्भ : आठल्ये, १९५९: कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास, ३) ११व्या शतकाच्या उत्तरार्धात कोल्हापूर शिलाहार यांच्या अधिपत्यामुळे हा प्रदेश मर्यादित झाला असावा.
कऱ्हाडे ब्राह्मणांबद्दलच्या बहुतेक संदर्भांमध्ये शिलाहार संबंधाचा उल्लेख आहे; त्यांचा असा दावा आहे की कोल्हापूर शिलाहारची पहिली राजधानी कऱ्हाड येथे होती आणि नंतर ती कोल्हापूरला हलवण्यात आली. बिल्हानच्या विक्रमांकदेवचरित्राच्या आधारे फ्लीटने प्रथम मांडलेली ही शक्यता मिराशी स्वीकारतात.
परंतु शिलाहारांपूर्वीही कऱ्हाड ही या प्रदेशाची राजधानी असल्याचे दिसून येते; राष्ट्रकूटांचे सामंत असलेले काही नंतरचे सिंध राजे स्वतःचा उल्लेख करहाटचे अधिपती म्हणून करतात. (संदर्भ : मिराशी, १९७७: कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इंडिकेरम, खंड सहा, इन्स्क्रिप्शन्स ऑफ शिलाहार, २६). कोल्हापूर शिलाहार आणि कऱ्हाडे ब्राह्मण यांच्यात कऱ्हाड हे स्थान हा योगायोग की, अन्य काही अर्थपूर्ण संबंध असू शकेल का?
आम्हाला माहीत नाही. परंतु दोघांचे कोणतेही वांशिक संबंध नाही हे आम्ही ठामपणे म्हणू शकतो. उत्तर आणि दक्षिण कोकणमध्ये राज्य करणाऱ्या दोन्ही शिलाहार घराणी क्षत्रिय होती. आम्ही त्यांना काठियावाडी चाड्डी म्हटले आहे. एक शक्यता अशी आहे की, कऱ्हाडे ब्राह्मण हे कोल्हापूर शिलाहारांचे पुजारी असावेत.
त्यांच्या ओळखीशी संबंधित असलेला मुख्य प्रश्न म्हणजे ते मूळचे किनारी कोकणातील आहेत की ‘देश’ म्हणजेच दख्खनमधील आहेत; अनेक ग्रंथ त्यांना ‘महाराष्ट्रीय ब्राह्मण’ म्हणतात आणि सारस्वत-कऱ्हाडे संघर्षाला गोव्यातील ब्राह्मण व महाराष्ट्रीय ब्राह्मण संघर्ष म्हणून रंगवतात.
सातोस्करांचे असे मत आहे की कऱ्हाडे ब्राह्मण हे मूळचे गोव्यातील आहेत, ‘त्यांची मुळे सारस्वतांच्या मुळांइतकीच गोव्यातील मातीत खोल रुजलेली आहेत.’ (संदर्भ : सातोस्कर, १९७८: आर द कऱ्हाडे ब्राह्मण ओरिजिनली फ्रॉम गोवा?, केसरी, २४ डिसेंबर १९७८) सातोस्कर यांनी त्यांच्या ‘प्रकृति आणि संस्कृती’(१९७९) या पुस्तकातही हे मत व्यक्त केले आहे.
अर्थात हे त्यांचे राजकीय मत असू शकते. शिवाय, ते अप्रत्यक्ष अनुमान वगळता त्या मताच्या पुष्ट्यर्थ कोणताही ठोस युक्तिवाद किंवा ऐतिहासिक पुरावा देत नाहीत; त्यांच्या मते कऱ्हाडे ब्राह्मणांना कऱ्हाडविषयी तितकेसे प्रेम नाही जितके सारस्वतांना गोव्याशी किंवा चित्पावनांना चिपळूणशी आहे. परंतु हा युक्तिवाद तितकासा पटत नाही, कारण त्यांचे गोव्यावरही विशेष प्रेम नाही.पण सातोस्कर हे एकमेव लेखक नाहीत ज्यांचे हे मत आहे. ‘शतप्रश्नकल्पलतिका’त म्हटल्याप्रमाणे परशुरामाने कऱ्हाडे ब्राह्मणांना परशुरामक्षेत्रातील नंदीपूर नावाच्या ठिकाणी वसवले; हा ते किनारी भागात राहत असल्याचा स्पष्ट संकेत आहे.
धुमे यांचे कऱ्हाडे ब्राह्मणांबद्दलचे गृहीतक, ‘कऱ्हाडे ब्राह्मण हे मूळचे गोव्याचे आहेत’ या दाव्याला बळकटी देऊ शकते. त्यांच्या मते, पद्ये हे सुमेरियन पुरोहितांचे वंशज आहेत जे सुमारे २००० ईसापूर्व गोव्यात आले होते; त्यांचे मत आहे की पद्ये हे नाव सुमेरियन पुरोहित-राजा पातेसी यांच्यावरून आले आहे.
सावईवेरे आणि पद्ये ज्या ठिकाणी राहतात त्या इतर ठिकाणी सुमेरियन उपासनेचे अवशेष सापडले आहेत. पद्यांच्या अनेक देवता सुमेरियन वंशाच्या असल्याचे दिसून येते. सावईवेऱ्याचा अनंत या देवाचे सुमेरियन लोकांच्या अनुशी बरेचसे साधर्म्य आहे. (संदर्भ : धुमे, १९८६: द कल्चरल हिस्ट्री ऑफ गोवा, १४०).
आठल्ये यांनी मावळंगकर सरदेसाई घराण्याच्या इतिहासाबद्दल लिहिले आहे. त्यांच्या मते या घराण्याचे मूळपुरुष नृसिंह भट सत्यवादी होते. ते मूळचे गोदावरीच्या काठी वसलेल्या पैठण येथील होते. परंतु नंतर ते कोकणातील संगमेश्वरनजीक मावळंग येथे स्थायिक झाले. त्यामुळे, मूळचे देशस्थ असलेले ते नंतर कऱ्हाडे बनले.
कऱ्हाडे ब्राह्मण ओळखण्याचे म्हणून जे ठोकताळे आहेत ते बाजूला सारून, असा बदल होतो हेही लक्षांत घेतले पाहिजे. मावळंगकर सरदेसाई यांचा कऱ्हाडशी काहीही संबंध नव्हता. मावळंगच्या जागृत नृसिंह देवाच्या कृपेने त्यांना मुलगा झाला. या घराण्यातील सगळे नृसिंहोपासक आहेत. कऱ्हाटक प्रांतातील लोकांची आराध्य देवता कोल्हापूरची महालक्ष्मी आहे.
आजही कऱ्हाड्यांपैकी बहुतांश ब्राह्मणांच्या घराण्यात नित्यपूजा करताना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा नामोच्चार प्रथम करून नंतर इतर देवतांच्या नावांचा उल्लेख केला जातो. कोल्हापूर पण, मावळंग सरदेसाई घराण्यातील नित्यपूजेत ‘श्रीशांतादुर्गा लक्ष्मीनृसिंह श्रीमहाविष्णू प्रमुख पंचायतन देवाताभ्यो नम:’ असा उल्लेख होतो.
सरदेसायांप्रमाणेच कात्रे, पित्रे, सप्रे वगैरे काही घराण्यांच्या देवपूजेत महालक्ष्मीचा उल्लेख होत नाही. ही सर्व घराणी महालक्ष्मीची उपासक नसतानाही त्यांचा समावेश कऱ्हाड्यांत झाला आहे. देशस्थांचे कऱ्हाडे होतात असे मत पाटीलही व्यक्त करतात. (संदर्भ : पाटील, २०१० : कॉन्फ्लिक्ट, आयडेन्टिटी अँड नॅरेटिव्हस् - द ब्राह्मण कम्युनिटिज ऑफ वेस्टर्न इंडिया फ्रॉम द सेव्हेन्टींथ थ्रू नाइन्टीन सेंच्युरीज, १३१).
शके १०९१ कदंब राजा जयकेशी याची चुलती राणी कमलादेवी यांनी दख्खनमधून ३० ब्राह्मणांना गोव्यात आणून त्यांना काही गावे अग्रहार म्हणून दिल्याचा उल्लेख ताम्रपटात आहे. माधवमंत्री यांनी १३१३मध्ये १२ कऱ्हाडे ब्राह्मणांनी गोव्यात आणून त्यांना दोन गावे अग्रहार दिल्याचा ताम्रपट आहे.
आज या गावांमध्ये कऱ्हाडे ब्राह्मणांची मोठी लोकसंख्या आढळते आणि तेथील मंदिरांमध्ये कऱ्हाडे महाजन आहेत. अशा गावांमध्ये केरी (विजयादुर्गा), कवळे (शांतादुर्गा), बोरी (नवदुर्गा), मडकई (नवदुर्गा), म्हार्दोळ (महालसा) आणि प्रयागमाधव (कोरगाव) आदींचा समावेश आहे. सांगे, केरी, रिवण आणि कोरगाव येथील देवस्थानांत कऱ्हाडे महाजन आहेत. पण, म्हार्दोळ(महालसा), नार्वे (सप्तकोटीश्वर) अशा अनेक ठिकाणी त्यांच्या महाजनकीवर गदा आणण्यात आली, असे आठल्ये म्हणतात.
गोव्यातील पुष्कळशा ग्रामसंस्थांमध्ये कऱ्हाडे व्यवस्थापक होते, असेही ते नमूद करतात. कऱ्हाड्यांची अनेक कुटुंबे चौदाव्या शतकाच्या आसपास गोव्याहून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात स्थलांतरित झाली. वालावल (सावंतवाडी) येथील सुप्रसिद्ध असलेल्या नारायणाची मूर्ती कऱ्हाड्यांनीच हरमल येथून तिथे नेली.
देश ते गोवा ते उत्तर कोकणपर्यंतच्या कऱ्हाडे ब्राह्मणाच्या संभाव्य प्रवासाची ही एक संक्षिप्त कहाणी आहे. त्यात कऱ्हाड कुठे आहे? तुंगभद्रेपासून नर्मदा, गोदावरीपर्यंत पसरलेला २१ हजार गावांचा ‘करहाटक’ हा शिलाहारांच्या ताब्यातील प्रदेश, प्राचीन काळापासून प्रसिद्ध होता. येथून जे ब्राह्मण कोकणात, गोव्यात किंवा अन्य ठिकाणी गेले ते साहजिकच ‘कऱ्हाडे’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.