Kalasa Valley: कर्नाटकातून गोव्यात येत असताना 3 आकर्षक धबधब्यांचे दर्शन घडवणारी कळसा नदी, जैवसंपदेचे खोरे

Kanakumbi: कर्नाटकातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी या गावात म्हादई उगम पावते. माउली देवीच्या पदस्पर्शाने पवित्र होऊन पुढे जाणाऱ्या याच नदीला देवीचा ‘कळस’ यावरून बहुधा कळसा असे नाव प्राप्त झाले.
Kalasa Waterfall
Kalasa WaterfallDainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

कर्नाटकातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी या गावात म्हादई उगम पावते. माउली देवीच्या पदस्पर्शाने पवित्र होऊन पुढे जाणाऱ्या याच नदीला देवीचा ‘कळस’ यावरून बहुधा कळसा असे नाव प्राप्त झाले. या नदीचे उगमस्थान रामेश्वर देवळाच्या कुशीत आहे. मंदिराच्या कुशीत दोन नद्यांचा जन्म होतो आणि त्या पूर्व आणि पश्चिम अशा विरुद्ध दिशेने जाऊन सागराशी एकरूप होतात.

मंदिराच्या उजव्या छप्परावरचे पाणी कळसा नाल्याचा उगम स्रोत बनून म्हादई नदीशी एकरूप होऊन अरबी समुद्रात विलीन होते, तर मंदिराच्या डाव्या बाजूच्या छपरावरचे पाणी मलप्रभा नदीचा उगम स्रोत बनून कृष्णा नदीशी एकरूप होऊन बंगालच्या उपसागरात विलीन होते. या अद्भुत चमत्कृतीचा प्रत्यय आलेल्या लोकमानसाने या उगम स्थानाला तीर्थक्षेत्र बनवले.

कणकुंबी हा गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरती वसलेला निसर्गसंपन्न गाव होता. कधीकाळी कणकीच्या बेटांनी समृद्ध आणि प्रचंड पर्जन्यवृष्टीसाठी ख्यात असलेला हा प्रदेश आज आपले अस्तित्व हरवत चाललेला आहे. येथील नैसर्गिक आच्छादनावर नाना संकटे येत असल्यामुळे पावसाळ्यात गोव्यातील म्हादई नदीला भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध करून देणाऱ्या कळसा नदीची अवस्था दयनीय झालेली आहे.

रामेश्वराचे मंदिर जुन्याकाळी घनदाट वृक्षवेलींनी समृद्ध अशा देवराईत वसले होते. दरवर्षी येथे ३,८४४ मिलिमीटर इतका पाऊस कोसळत असल्यामुळे पावसाळ्यात ही नदी ओसंडून वाहते. गोव्याच्या दिशेने फक्त पावसाळ्यातच काही प्रमाणात पाणी येणार अशा तर्‍हेचे खोदकाम करून विविध ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह वळलेला आहे.

गोव्यातून कर्नाटकाच्या दिशेने पाहताना दृष्टीस पडणारा सुर्ल धबधबा म्हणजेच लाडकेचा वझर दुग्धधारीने प्रवाहित ठेवण्यासाठी कळसा नदी भरपूर पाणी घेऊन येते. ही नदी पुढे नानोडा नदी बनून उस्ते येथे म्हादईच्या मुख्य प्रवाहात सामील होते. कर्नाटकातील कणकुंबीपासून गोव्यातील उस्त्यापर्यंतच्या खोऱ्यातील कळसा नदीचे कार्य उल्लेखनीय आहे. कधीकाळी ती स्वतंत्र होती. आज नाना संकटांवर मात करत फक्त पश्चिम घटातच आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे व जंगली श्वापदांचे भरणपोषण करत आहे.

कणकुंबी येथील समृद्ध जंगलातल्या असंख्य छोट्या ओहोळातले पाणी कळसात मिसळल्यावर आम्याचो हरल, हुळंद व पारवाडच्या जंगलातले जलस्रोत तिच्याशी एकरूप व्हायचे, त्यामुळे पावसाळ्यानंतर हिवाळ्यात नदी कुशीत वसलेल्या गावातील कष्टकरी जनता वायंगणी शेतीबरोबर भाजीपाल्याचीही लागवड करायचे.

एका बाजूने कणकुंबीतील कळसाचे पाणी व दुसऱ्या बाजूने पारवाड या गावातील पाणी कंबार वेस या जागी प्रवेश करते. या घनदाट जंगलातून पुढे ती सुर्ल गावात प्रवेश करते. मान, चोर्ला, हुळंद या काळ्या कातळावरून वाहत आलेले पाणी कळसाशी एकरूप झाल्यामुळे ती सुर्ल नदी म्हणून नावारूपास येते. सुर्ल हा गाव काळ्या कातळांनी समृद्ध आहे.

८०० मीटरपेक्षा उंचावर असलेल्या पठाराच्या कुशीत वसलेला हा निसर्गसंपन्न गाव. कळसा नदी गोव्यात येत असताना आपल्या पात्रात तीन आकर्षक धबधब्यांचे दर्शन घडवते. सत्तरीतील सुर्ल गावात पोहोचताच ती जणू तीन वेळा उंचावरून खाली उडी घेत गोमंतकीयांना प्रसन्न करते. सर्वांत प्रथम ती लहान उडी घेऊन बाराजण धबधब्याच्या रूपात घाटमाथ्यावरून खाली उतरण्याची पूर्वतयारी करते.

पुढे ती प्रचंड खळीत उडी मारून लाडकेच्या वझराच्या रूपातून फेसाळ दुधाळ धारेने घसाघसा वाहत पाहणाऱ्याचे मन आपल्याकडे आकर्षून घेते. दोन टप्प्यांनी खाली उतरून देवराईजवळ ती जळवतीच्या धबधब्याच्या रूपात तिसरी उडी घेते. या ठिकाणी असलेली चुनखडीची नैसर्गिक गुंफा तर अद्भुत आहे! ‘म्हादई रिसर्च सेंटर’ने आपल्या अभ्यासाद्वारे अभयारण्यातील विविध वटवाघळांचे अस्तित्व सिद्ध केलेले आहे. ही गुंफा वटवाघळांबरोबर जंगली श्वापदांसाठी आश्रयस्थान ठरलेली आहे.

आज इतर गोव्यात ज्या फुलपाखरांच्या प्रजाती दृष्टीस पडत नाहीत, त्या कळसा नदीच्या पात्रात आढळतात. पेडणे ते काणकोणपर्यंत कित्येक फुलपाखरांची नोंद झालेली आहे. नकाशासारखे दिसणारे फुलपाखरू ‘कॉमन मॅपवींग’ या नावाने ‘सर्वत्र आढळणारे फुलपाखरू’ म्हणून जरी ओळखले जात असले तरी आजमितीस ते भरपूर कमी प्रमाणात आढळते. परंतु कळसा नदीच्या खोऱ्यात त्याचे विशेष दर्शन क्षारशोषण करताना होते. कळसा नदी खोऱ्यातील परिसर या फुलपाखराला जगण्यासाठी अनुकूल हवामान उपलब्ध करते.

नदीच्या खोऱ्याजवळील विस्तीर्ण पसरलेल्या कातळ सड्यांवर नानाविध गवतवर्गीय वनस्पतींचे दर्शन घडते. आषाढाच्या सुरुवातीस विविध कीटकभक्ष्यी वनस्पती पठाराला पांढरा, गुलाबी, पिवळा रंग देण्यास सज्ज झाल्या आहेत.

Kalasa Waterfall
Shigao: सफर गोव्याची! दूधसागराच्या खोऱ्यातून भटकंती करत आलेल्या आदिमानवाची पावले 'शिगावा'त काही काळ स्थिरावली होती

जगाच्या पाठीवर केंद्रबिंदू ठरणारी ‘अपोनोजेटोन नटेशी’ ही दुर्मीळ पाणवनस्पती येथे आढळते. वनस्पतिशास्त्रज्ञ आशिष प्रभुगावकर यांनी या वनस्पतीवर अभ्यास करून त्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. सकाळ-संध्याकाळच्या प्रहरी या पठारावर गवे, सांबर, चितळ, भेकरे, पिसय यांसारखे तृणहारी प्राणी आपल्या पिल्लांसोबत भटकण्यासाठी आलेले दृष्टीस पडतात. सधन जंगलात त्यांचा अधिवास आहे.

आज अस्वल आणि मानवाचा संघर्ष विकोपाला पोहोचलेला आहे. मध, जांभळे, मौसमी रानमेवा जसा माणसांना आवडतो तसाच तो अस्वलांनाही आवडतो. वर्षातून काही महिन्यांपुरतेच उपलब्ध होणारे हे त्यांचे उन्हाळा-पावसाळ्यातील आवडते खाद्य आहे. माणूस आणि अस्वलांमध्ये उदरनिर्वाहासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे. इंधनासाठी लाकडे आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना अस्वलांचा धोका निर्माण झालेला आहे.

Kalasa Waterfall
Velage Surla: मँगनीजचा शोध पोर्तुगीज काळातच लागला, गोवा स्वतंत्र झाला; विकासाच्या नावाखाली डोंगर खणले, शेतीसंस्कृती विसरले

आज गोवा-बेळगाव रस्त्याचे रुंदीकरण करणे ही गोष्ट सहज साधी वाटली तरी जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांना आकर्षित करणाऱ्या ‘मलाबार ट्री टोड’ या भेकांचा हा नैसर्गिक अधिवास आहे. या प्रजातीचा शोध लागल्यावर कित्येक वर्षे ते गायब झाले होते. जवळपास ८० वर्षांनंतर पुन्हा त्यांचे दर्शन झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

परंतु चोरला घाटात गाडीच्या चाकाखाली चिरडून मृत पावणाऱ्या भेकांची संख्या कशी कमी होणार, याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. याच भागातील सदाहरित झाडाखाली पाण्याची डबकी असलेल्या ठिकाणी ‘मलाबार ग्लायडिंग फ्रॉग’ आणि ‘मलाबार पिट व्हायपर’, ‘बांबू पीट व्हायपर’ या बेडूक व सापांचा नैसर्गिक अधिवास आहे. कळसा नदीच्या प्रवासामुळे या प्रजातींचे अस्तित्व टिकून आहे. ही नदी पुढे उस्ते येथील दुसगीर येथे म्हादई नदीच्या मुख्य प्रवाहाशी एकरूप होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com