Velage Surla: मँगनीजचा शोध पोर्तुगीज काळातच लागला, गोवा स्वतंत्र झाला; विकासाच्या नावाखाली डोंगर खणले, शेतीसंस्कृती विसरले

Velage Surla Bicholim: वेळगे, सुर्ल भागात मँगनीज असल्याचा शोध पोर्तुगीज काळातच लागला होता. पण, त्याचे खनन करण्यावर नियंत्रण होते. त्यामुळे खनिकर्म व कृषिसंस्कृती समांतर चालत होती.
Portuguese Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

डिचोली तालुक्यातील वेळगे-सुर्ल ओहोळाचा उगम पाळी गावच्या डोंगर माथ्यावरील चौगुले खाण परिसरात चिंचवाडा भागात होतो. उन्हाळ्यात जरी उगमाकडे पाणी वाहत नसले तरी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. खालच्या भागात त्याच्या प्रवासात वेळगे गावातील आणखी लहान ओहळ मिळून त्याचा प्रवाह मोठा होतो.

ते पाणी वेळग्याच्या कुळागर, बागायतीस सिंचन करीत तो मुख्य रस्ता ओलांडून वेळगे गावची सीमा पार करून घाडीवाडा सुर्ल गावात प्रवेशतो. सुर्ल गावच्या विस्तीर्ण शेती आणि बागायतीला पाणी पुरवत कैक किमी प्रवासाने शियाचो बांध या ठिकाणी पोहोचतो.

मानशीतून बाहेर पडताना खळखळाट करत तो सुर्लच्या खालच्या भागातील कुळागर आणि शेतीला पाणी देतो. खोडगिणी सुर्ल आणि पणसवाडी नावेली गावच्या सीमाभागातील बंधाऱ्याकडे पोहोचतो. त्या बंधाऱ्यातून बाहेर पडत तो आणखी खालच्या नावेली आणि कुडणे गावच्या शेती बागायतीला पाणी पुरवठा करीत पावलार नावेली आणि कुडणे भागात पोहोचतो.

पावलार येथे स्थानिकांच्या पूर्वजांनी बराच मोठा बंधारा उभाराला होता. नावेलीच्या विस्तीर्ण सरद वायंगण शेतीला आणि कुडण्याच्या कोले खाजन शेतीला गोड्या पाण्याचा पुरवठा करून तो खाऱ्या पाण्यात मिसळण्यास सरसावताना नावेलीच्या विस्तीर्ण कोळंबात पोहोचतो. कोळंबातून पुढे खाऱ्या पाण्यशी सोयरीक जुळवत कुडण्याच्या सास्त आणि नावेलीच्या नावतान भागातील दोन मानशीच्या दारातून ओहोळाचे पाणी खालच्या भागात नावतान नदीस मिळते.

नावतान परिसरात नदीचे पात्र बरेच रुंदावले आहे. पूर्वी सास्तार ठिकाणी सागरीय होड्यातून व्यापाराची देवाणघेवाण होत होती, हे कुडणेच्या पगोड्यावरून सिद्ध होते.

गुजिर, कुडणे परिसरात पुरातन पगोडा आणि सूर्यमंदिर पाहावयास मिळते. सास्ताच्या कोळंबात काळुंद्र, शेवटा, खरचाणी, चोणकूल, तामसा, पालू आदी रुचकर मासळी मिळते. हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. त्या भागाला डॉ. माधव गाडगीळ, प्रा. राजेंद्र केरकर या तज्ज्ञांनी भेटी देऊन पाहणी केली होती.

पर्यावरणीय दृष्टीने सास्तारच्या नदीतील बांध, कुडण्याचा चर, कालवा शियाचा बांध, पावलार या ठिकाणी बऱ्याच शतकांपूर्वी तिथल्या पूर्वजांनी कृषीसंस्कृती उभी करण्यासाठी बांधकामे केली आहेत. सास्तारच्या बांधावर खूपच पुरातन, लहानसे देऊळ आहे. त्याची उभारणी धरणाच्या बांधकामावेळी केली असावी.

त्या धरणामुळे कुडण्याचे कोले खाजन आणि नावेलीची नवर, वळवाटो, कातीचो कोपर, तितके, आडो, पडींगण पातीन मळो, कातोल, धारगे बंदर, कोळम नावे असलेली सरद वायंगण शेती खाऱ्या पाण्यापासून वाचवून ओहोळाच्या गोड्या पाण्यावर जगवून कुंभाचे कुंभ भातपीक इथले लोक घेत होते.

नावेली, खांडोळा गावात वायंगण शेतीच्या पेरणीपूर्वी ‘बारस’ नावाचा कृषी उत्सव साजरा करतात. सुर्ल ओहोळाचे पाणी स्वच्छ ठेवण्याचे काम त्यात वावरणारे थिगूर, देखळे, सांगट, वाळेर, कासव, खर्बा, करणकाटका, पिठ्ठोळ करतात. प्रथम पावसाचे पाणी लाल पाणी ओहोळात आल्यावर त्यातील गोडी मासळी शेताच्या पाण्यात प्रवेश करते, त्याला ‘चढावणीची मासळी’ म्हणतात.

पडलेल्या पावसाचे पाणी शेतात भरल्यावर कोंगे शंख शिंपले मोत्याप्रमाणे सफेद अंडी घालतात. हेवाळ हे पाणसर्प मासळी बेडूक पकडण्यास दबा धरून बसतात. बगळे कीटक व मासळी पकडतात. त्यांच्या पर्यावरणीय साखळीने दूषित पाणी स्वच्छ करतात, सुर्लच्या ओहोळाच्या दोन्ही काठांवर घाडीवाडा सुर्ल ते पावलार नावेलीपर्यंत बोणगी आणि केगदी झाडांचे विशाल बन आपल्या सावलीने ओहोळाचे पाणी थंड ठेवते.

सुर्ल गावातील शियाच्या बांधावरील आणि खालची विस्तीर्ण सरदवायगण देवशेत कळंग हर्निपाटो, आगशे, पाट्यांनी, शिरानी, कुळागे, बोणये, फोडानी, आमेफाळ, आमील्ले, खोडगिणे, आयचीरी कुमारे या नावांनी ओळखणाऱ्या भल्या मोठ्या शेतीला घाडीवाडा, घोडकावड, शियाचो बांध, जोशीभाट, बाराजण, खोडगिणे ठिकाणी बंधारे घालून पाणी अडवून तो हर्निच्या पाटाने शेतीला पुरवीत होते.

त्या ओहोळाच्या पाण्यावर भात, नारळ, सुपारी, आंबा, फणस अशी पिके घेत तिथल्या पूर्वजांनी कृषी संस्कृती पुजून वाढवली होती. पावसाचे पाणी अंगावर झेलण्यासाठी अग्निकुंडातून प्रवेश करून शेतीच्या पेरणीसाठी देवाकडे ताकद देण्यास आराधना करायचे.

त्या विशाल ओहोळाची भूरचना पाहिल्यास विस्मयचकित व्हायला होते. पूर्वेला वेळगे, सुर्ल आणि कुडणे गावाचा मँगनीज साठ्याने भरलेला लांब रुंद उंच डोंगर; पश्चिमेला कोठंबी, सुर्ल, मायणा, नावेली, मांडवी नदीच्या काठावर उभा ठाकलेला कडा डोंगर; दक्षिणेला पाळी गावचा गिधाडसडा डोंगर आणि उत्तरेला नावेली व कुडणे गावांना जोडणारे सास्तारचे धरण.

देऊळवाडा, जोशी भाट, कडचाळ, वरचेबाये, सकले बाये गावकरवाडा, घोडकातड, घाडीवाडा, अगडये, भायली फाळ, तारीमाथा आणि भिले हे सुर्ल गावचे बारा वाडे. या ओहोळाला भरपूर पाणीसाठा मिळण्याचे कारण म्हणजे या डोंगर रांगांच्या गर्भात असलेले मँगनीज खनिजाचे साठे. त्या मँगनीज साठ्यांनी दिलेल्या पाण्याने पाळी, वेळगे, कोठंबी, सुर्ल, मायणा, नावेली आणि कुडणे गावात पूर्वीच्या लोकांनी भाताबरोबर मिरची, कांदा चवळी भाजीपाला, वाल, अळसांदे, पूर्वज असे विविधांगी पीक घेतले.

माझ्या बालपणी पाळी गावात जाण्यासाठी खांडोळा, बेतकी, वळवई, तार ओलांडून सुर्ल गावातून गिधाड- सड्यावरून चालत जाताना, शेतात भाजीपाल्याचे मळे फुललेले दिसायचे. पिवळी शेती कापताना शेकडो माणसे काम करीत होती.

Portuguese Mining
Codar: सफर गोव्याची! भातशेती भिजवून, दुधसागराकडून वाहत येऊन खांडेपार नदीत सामील होणारा 'कोडारचा ओहळ'

गिधाड सड्यावर तपकिरी रंगाच्या पिसाचे मानेवर सफेद पिसे असलेले गिधाड पक्षी जमावाने झाडांवर बसलेले पाहावयास मिळत होते. आज ते पर्यावरणाचे रक्षणकर्ते गोव्यातून हद्दपार झाले आहेत.

पाळी गावचे फणस म्हणजे अमृतासारखे. तिथे पिकणारे फणसांचा रंग जरी आतून पिवळा असला, तरी त्या पिवळेपणाच्या अनेक छटा पाहायला मिळायच्या. इतकी मोठी कृषी संस्कृती पूर्वजांनी त्या लांब रुंद घळीत सुर्ल ओहोळाच्या पाण्यावर उभारली. त्यांनी आपल्या कृतीतून पर्यावरणाचे जतन केले होते. त्या ओहोळाचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. त्याच वाहणाऱ्या पाण्यात आम्ही पोहण्यास शिकलो होतो.

Portuguese Mining
Murdi Khandepar Stream: सरस्वती नदीपात्रात भूकंप झाला, बर्फ कोसळला आणि काठावरील संस्कृती नष्ट झाली; मुर्डी खांडेपारचा ओहळ

आज आपण उच्चशिक्षण घेऊन विकास साधतो. पण चुकीच्या मार्गाने जात नकळत खणलेल्या खड्ड्यात पडतो. ही गत आज त्या ओहोळाच्या काठावर पाहावयास मिळते. गोवा स्वतंत्र होण्याआधी त्या पट्ट्यात मँगनीज खाणी चालत होत्या. मात्र त्या काळी त्या धंद्यावर नियंत्रण होते. गोवा स्वतंत्र झाला आणि धनिकांना मँगनीजमध्ये सोन्याची अंडी मिळतात हे माहीत झाले.

त्यांनी गावच्या विकासाच्या नावाने अख्खे डोंगर खणून काढले. लोक शेतीभाती बागायती विसरले. मॅगनीज खाणीवर नोकरी करून पूर्वजांची कृषी संस्कृती विसरले. मॅगनीज खननाने खाणीतील चिखलमाती पावसाच्या पाण्यातून वाहत विहीर तलाव, झर, ओहळ, नदीत भरली. आज ओहोळाच्या काठावरील शेतात एक मीटर उंचीचा चिखल भरला आहे. ओहोळातील चिखल उपसा केला तर पेरणी केलेल्या शेताला पाणी मिळत नाही. त्यामुळे, शेतपीक करपून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. गावची जैवविविधता नष्ट झालेली पाहावयास मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com