Goa Opinion: तुम्ही गैर वागलात, त्याहीपेक्षा तुम्ही गैर बोललात!

Govind Gaude Sharad Ponkshe Controversy: आपल्याकडे सत्ता आहे म्हणून ’मी’ तो पैसा बेसुमार उधळणार असे जर कुणाला वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकार वापरून अशा मंत्र्यांना बाजूला करणेच योग्य ठरेल.
Sharad Ponkshe, Govind Gaude, Kala Academy
Sharad Ponkshe, Govind Gaude, Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

प्रकाश द. नायक

नाटकातून किंवा सिनेमातून शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली म्हणून कोणी शिवाजी महाराज होत नसतो. तसेच एखाद्या वेळी रात्री नाटकात केलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून जर तो कलाकार दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच बाहेर नाही आला तर त्याला लोक वेडाच ठरवतील.

महाराजांची भूमिका करण्याअगोदर एखाद्या कलाकाराने त्या त्या नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका समजून घ्यायची तर असतेच, पण त्याहीपेक्षा खुद्द शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या गुणांनिशी त्यांना समजून घ्यायचे असते. नपेक्षा आजची परिस्थिती उद्भवते.

वसंत कानेटकर यांच्या ’रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकात एक संवाद आहे. हा संवाद शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांच्यात झालेला आहे. शिवाजी महाराज शंभूराजेना म्हणतात "राजे, तुम्ही गैर वागलात त्याहीपेक्षा तुम्ही गैर बोललात!" जनतेचा प्रतिनिधी म्हणून जर एखाद्या मंत्री/आमदाराला एखाद्याने प्रश्न विचारला आणि त्यातून जर मंत्री काहीही बरळायला लागला तर कुणालाही म्हणावे लागेल, ‘राजे, तुम्ही गैर वागलात त्याहीपेक्षा तुम्ही गैर बोललात!’

शिवाजी महाराजांनी जोपासलेला सर्वांत मोठा गुण म्हणजे संयम! संयमाच्या बळावर अनेक आव्हानं महाराजांनी लीलया पेलली आणि शत्रूंचे मनसुबे उधळून लावल्याचा इतिहास आहे. जर महाराजांच्या ’संयम’ याच गुणाचा राज्याच्या एखाद्या मंत्र्याने किंवा आमदाराने स्वीकार केला तर राज्याचे आणि पर्यायाने सरकारचेदेखील किती चांगले होईल याचा विचार कुणी करायचा?

एखाद्या मंत्र्याने किंवा आमदाराने नाटकात शिवाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर प्रत्यक्षातही चालताबोलता शिवाजी महाराजांच्याच आविर्भावात चालायचे, बोलायचे आणि वैयक्तिक जीवनात नेमके त्याउलट वागायचे तर तो कलाकार मंत्री/आमदार म्हणून जनतेसमोर कोणता आदर्श ठेवील बरे?या देशांत लोकशाही आहे. ठोकशाही नाही. एखादे राज्य हे एकट्या दुकट्या मंत्र्याचे राज्य नाही. हे राज्य जनतेचे आहे आणि आपण जनतेचे फक्त सेवक आहोत याचा विसर आजच्या लोकप्रतिनिधींना का पडावा? (शिवाजी महाराजांनी म्हटल्या प्रमाणे, ’हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे!’ त्याच शिवरायांच्या भक्ताला हे समजू नये?)

सत्तेचा माज काय असतो त्याची प्रचिती सध्या गोव्याची जनता अनुभवत आहे. ज्या जनतेचे हे राज्य आहे त्या राज्यातील जनता खुद्द राष्ट्रपतींना किंवा पंतप्रधानांनाही प्रश्न विचारू शकते हे आपल्या राज्यकर्त्यांना किंवा लोकप्रतिनिधींना का समजू नये? कदाचित हेही कारण असेल की, हे लोक पैशांच्या जोरावर निवडून आलेले असतात आणि पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा मते विकत घेण्यासाठी यांना पैसा आणि फक्त पैसाच हवा असतो.

म्हणूनच तर आतापासूनच भ्रष्टाचार करायचाय आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी बोलायला लागले तर त्याला व्यक्तिगत पातळीवर त्रास द्यायचे. भ्रष्टाचारविरोधी बोलणारे लोक यांचे एक नंबरचे शत्रू असतात. भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारे, लिहिणारे हे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच असतात.

Sharad Ponkshe, Govind Gaude, Kala Academy
Kala Academy: शरद पोंक्षेची दिलगीरी, गावडेंची उडवाउडवीची उत्तरे; नेता आणि अभिनेता यातील फरक

सामान्य जनतेला याविषयी सोयरसुतक नसते, हे या राज्यकर्त्यांना चांगले माहीत असते. त्यामुळेच तर ’तुमी कोण रे?’, ‘ते कोण रे?’, ‘ते ’घेवन’ उलयता आसतले!’, ‘तांणींच चोरलचे आसतलें!’, ’ताका सुपारी दिल्या आसतली म्हजी’ अशा प्रकारची अहंकारी आणि माज चढलेली वाक्ये यांच्या तोंडातून बाहेर पडतात. आपण किती नम्र आहोत हे एका बाजूने दाखवायचे आणि त्याकरिता उजवा हात डाव्या बाजूच्या बाहूपर्यंत न्यायचा, कधी कधी चालताना मुजरा करायचा आणि नेमके त्याच्या उलट वागायचे, ही दांभिक वृत्ती नव्हे काय?

सरकारी पैशांतून उभ्या राहणाऱ्या बांधकामांविषयी किंवा सरकारी मालमत्तेचा गैरवापर झाल्यासंदर्भांत जर जनतेने प्रश्न उपस्थित केले तर मंत्र्यांनी/आमदारांनी एवढी आगपाखड का करावी? सरकारी पैसा म्हणजेच जनतेच्या करातून आलेला पैसा. तो मोजून मापून वापरणे ही त्या त्या खात्याच्या मंत्र्याची जबाबदारी असते. आपल्याकडे सत्ता आहे म्हणून ’मी’ तो पैसा बेसुमार उधळणार असे जर कुणाला वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकार वापरून अशा मंत्र्यांना बाजूला करणेच योग्य ठरेल.

Sharad Ponkshe, Govind Gaude, Kala Academy
Kala Academy: साऱ्या प्रेक्षकांनीही सुपारी घेतली होती का? अभिनेते पोंक्षेंचे गावडे यांना प्रत्युत्तर; विचार करून बोलण्याचे केले आवाहन

या देशात माहिती अधिकार आहे. त्याअंतर्गत कुणी नागरिक एखाद्या खात्याची जर माहिती मागत असेल, तर ती माहिती देण्यापासून बंधने घालणे कितपत योग्य आहे? सरकारी पैशांतून उभी राहणारी वास्तू लोकांना पाहण्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवून मज्जाव करणे म्हणजे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय येतो. एखाद्याला काहीतरी जनतेपासून लपवायचे आहे त्यावेळी सरकारी अधिकारी किंवा मंत्री अशा गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा गोष्टी लपविण्याच्या प्रयत्नात जबाबदार मंत्री/आमदार जर एकाधिकारशाही पद्धतीने (ठोकशाही पद्धतीने) वागायला लागला तर जनतेच्या मनात हा संशय आणखीन बळावतो.

या देशातील प्रत्येक नागरिकाला प्रश्न मांडायचा आणि प्रश्न विचारायचा आपल्या लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. असे प्रश्न जनतेने विचारल्यानंतर जर एखादा मंत्री उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला तर? उलट पत्रकारांनाच प्रश्न विचारायला लागला तर? जनतेच्या माध्यमातून पत्रकारांनी जर काही प्रश्न उपस्थित केले तर, त्यांनाच उलट प्रश्न करणे म्हणजे मंत्र्यांच्या गोंधळलेल्या मानसिकतेची कल्पना येते. सत्तेपुढे काही लोक आपली मर्यादा ओलांडून चाललेत असे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com