Goa Agriculture: 15 वर्षांमागे गोव्यात फिरताना सगळीकडे हिरवीगार शेती दिसायची! आता काय दिसते?

Goa Agriculture Opinion: ‘एग्रो टुरिझम’ या संज्ञेचा वापर पाहून ही शेती पोट ‘भरण्यासाठी’ नसून पर्यटकांना ‘बघण्यासाठी’ असल्याच्या ‘पॉलिसी’ची तीव्र जाणीव होते.
Goa Agriculture History
Goa Agriculture NewsDainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

वास्को: दोन लाख वर्षांच्या काळात मानव शिकारी-संग्राहक जीवनशैलीचे पालन करत असे. अजूनही दक्षिण आफ्रिकेतील काही लोक असेच जीवन जगतात. नवपाषाण युगात, सुमारे तेरा हजार वर्षांपूर्वी मानवाने शेतीची कला आत्मसात केली व तो कायमस्वरूपी वसाहत करून राहू लागला. आठ हजार वर्षांपूर्वी पाळीव प्राण्यांच्या व वनस्पतींच्या बहुतेक प्रजाती निर्माण होऊन, ऑस्ट्रेलिया सोडून जगाच्या सर्व भागांत शेती कला विकसित होत गेली.

शिकार करणे आणि जंगलांतून वनस्पतिजन्य अन्न गोळा करणे सोडून मानवाने शेती कला विकसित करण्याला जागतिक स्तरावर अनेक कारणे आहेत. जसे हवामानातील बदल, लोकसंख्येच्या वाढीमुळे जास्त अन्नाची मागणी, अतिशिकारीमुळे लोकर देणारे प्राणी नामशेष होणे, पाळीव प्राणी आणि शेत बियाण्यांमुळे शेती अधिक व्यवहार्य बनणे, इत्यादी.

संस्कृतींच्या मागे शेती ही एक प्रेरक शक्ती होती. शेतीमुळे दैनंदिन खाण्याची चिंता मिटल्यामुळे मानव इतर आवडीनिवडींकडे वळला. अन्नासाठी भटकणे बंद झाल्यावर त्याने समाजात सैनिक, पुजारी, प्रशासक, कलाकार, वैद्य, खेळाडू, राजकीय नेता, विद्वान, इत्यादी भूमिका स्वीकारल्या. शिकारी-संग्राहक मानवी समाज संसाधनांवर प्रत्येकाची मालकी मानीत असे.

पण शेतीतील समृद्धतेमुळे जमीन, अन्न आणि चलनावर मालकीची एक व्यवस्था निर्माण होऊन, सामाजिक ताण निर्माण होण्यास सुरू झाले. सामाजिक असमानता, कुपोषण आणि लष्करी संघर्ष सुरू झाले. जगात संस्कृतींच्या प्रगतीस शेती कारणीभूत असली तरीही शेती उत्पादनात वाढ, संसाधनांचा र्‍हास, लोकसंख्या वाढ, दुष्काळ, बदलते हवामान यामुळे गरीब आणि श्रीमंत असे दोन सामाजिक गट तयार झाले.

मागील दोन शतकांत कृत्रिम नायट्रोजन खते, इतर रासायनिक खते, कीटकनाशके आणि एकल शेतीतून औद्योगिक शेतीचा व्यापक विस्तार झाला. सिंचन, नांगर, इ. तांत्रिक नवकल्पनांनी शेतकऱ्यांनी बेजबाबदारपणे बेसुमार लागवड करून जमिनीची सुपीकता कमी केली. लोकसंख्या वाढ अन्न उत्पादनापेक्षा जास्त झाल्यामुळे व्यापक उपासमारीची शक्यता निर्माण झाली.

आलटून पालटून येणारे दुष्काळ वाढले. आज मानवाला जरी आधुनिक शेतीद्वारे उत्पादन वाढवणे शक्य असले तरी पृथ्वी एका ठरावीक टप्प्यापर्यंतच मानवी विकास झेलू शकते हे अंतिम सत्य आहे.

गोवा सरकारने ‘गोवा राज्य अमृत काल कृषी धोरण २०२५’ जाहीर केले. यामध्ये ‘खाजन’, ‘मरड’, ‘केर’ शेतांच्या रूपांतरावर बंदी घालून सेंद्रिय शेती, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स यांसारख्या शेतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

गोव्यातील बऱ्याच भागात वरील शेती करण्याच्या जागा आधीच रूपांतरित झाल्या आहेत. तेव्हा सरकारने मागील पंधरा वर्षांत रूपांतरित जागा पूर्ववत केल्यास फार बरे होईल. पंधरा वर्षांमागे गोव्यात फिरताना सगळीकडे हिरवीगार शेती दिसायची. आता काय दिसते?

पेडण्यातील नाचणी, वरी, कुळीथ, उडीद, पाखड, तीळ, शेंगदाणे यांसारखी पिके इलेक्ट्रॉनिक सिटी, जुगारी सिटी, एअरपोर्ट आल्यामुळे इतिहासजमा झाली आहेत. मोरजी, काणकोणमधील मिरच्या, ताळगावच्या भाज्या, आगशी-कुठ्ठाळीची वांगी, यांसारख्या बाजारातील स्थानिक शेतमालाची कमी आवश्यकता हे कशाचे द्योतक असावे?

रेशनवर दोन रुपये किंवा फुकट तांदूळ मिळण्यास सुरू झाल्यानंतर, दारात अनेक ‘टू-फोर व्हीलर’ असणारे लोक ‘बीपीएल’ होणे, स्थानिक लोकांची घरे उठवून शेतीसाठी आणलेल्या धरण प्रकल्पांचे पाणी विमानतळ, स्टार हॉटेल्स आणि इंडस्ट्रीसाठी वापरले जाणे, यांसारख्या कारणांमुळे शेतीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

सरकार पारंपरिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याविषयी बोलते. पण असल्या शेतीसाठी लागणारी गुरे, त्यांच्या चरण्याच्या जमिनींवर अतिक्रमण झाल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जो मानधन घेतो तो ‘कलाकार’ याप्रमाणे ज्याच्याजवळ कृषी कार्ड आहे तो ‘शेतकरी’ हे धोरण राबवल्यामुळे, आजोबांच्या काळात तीस-चाळीस बैलजोड्या असणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कृषी कार्ड करण्यासाठी एक/चौदा सारखी बनावट कागदपत्रे ग्राह्य मानली जात आहेत.

Goa Agriculture History
Goa Agriculture: गोव्यात केळींचे 29531 टन उत्पादन! 2495 हेक्टर जमीन लागवडीखाली; सत्तरी, केपेत अधिक उत्पादन

आमच्या पिढीत लहानपणी पारंपरिक शेती करणे सक्तीचे असल्यामुळेच मोठेपणी शिकल्यानंतर ‘प्रिसिजन फार्मिंग’सारखे सॉफ्टवेअर बनवता आले. तसेच सात-आठ तास शेतकाम करण्याची क्षमता साठीनंतरही टिकवून ठेवता आली.

‘एसी ऑफिस’मधून कृषिधोरण आखणाऱ्या, पावर पॉइंट प्रेझेंटेशन करणाऱ्या, शेतीसंदर्भात चमकदार जाहिरातबाजी करणाऱ्या, शेतीविषयक मोठमोठ्या आधुनिक शब्दांचा वापर करणाऱ्या, किती जणांना मातीत उतरून शेतात काम करायला आवडेल?

Goa Agriculture History
AI In Agriculture: 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांना बळकटी देईल', बारामती एआय शेतीची 'मस्क'नी घेतली दखल

सरकारी शेती धोरणातील आधुनिक नावे ऐकून गोवा शेतीमालाने ‘ओवरफुल’ होईल असे वाटत असताना, धोरणातील ‘एग्रो टुरिझम’ या संज्ञेचा वापर पाहून ही शेती पोट ‘भरण्यासाठी’ नसून पर्यटकांना ‘बघण्यासाठी’ असल्याच्या ‘पॉलिसी’ची तीव्र जाणीव होते. आणि तसे असल्यास ‘मायनिंग’, ‘टुरिजम’ नंतर ‘अ‍ॅग्रिकल्चर’चा र्‍हास ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे समजावे. रोम साम्राज्याचा इतिहास आठवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com