Jatindranath Das death anniversary
Jatindranath Das death anniversaryDainik Gomantak

Jatindranath Das: भगतसिंगांसोबत केले 63 दिवस उपोषण, तुरुंगातच सोडले प्राण; क्रांतिकारी 'जतिंद्रनाथ दास' यांचे स्फूर्तिदायक स्मरण

Jatindranath Das Death Anniversary: स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेऊन तुरुंगात हौतात्म्य पत्करलेल्या जतिंद्रनाथ दास यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त हा विशेष लेख..
Published on

शंभू भाऊ बांदेकर

दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री मोहनराव रानडे यांनी स्थापन केलेल्या स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेच्या बैठकीसाठी स्वातंत्र्यसैनिक विश्वास देसाई, श्यामसुंदर कळंगुटकर, समाजकार्यकर्ते कॅजिटन परेरा आणि मी असे चौघेजण पुणे येथे गेलो होतो.

दुसऱ्या दिवशी रानडे दांपत्याने आम्हांला आपल्या वडगाव- बुद्रूकच्या निवासस्थानी चहापानाचे आमंत्रण दिले होते. चर्चेदरम्यान भय्या देसाईंनी, ‘आपण संस्थेला स्वामी विवेकानंदाचेच नाव का दिले?’ असे मोहनरावांना विचारले.

‘या विभूतीने सर्वांना जगण्याचा, शिक्षणाचा आणि चांगली आरोग्यसेवा यांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी तळमळीने कार्य केले. शिवाय, कोणताही धर्म श्रेष्ठ नाही व कनिष्ठही नाही, कोणत्याही धर्माची तुलना दुसऱ्या धर्माशी कधीच करायची नसते.

पण त्याचबरोबर हिंदूधर्म हा सर्व धर्मांची जननी आहे. या धर्माने जगाला सहिष्णूतेची व वैश्विक ऐक्याची शिकवण दिलेली आहे’, वगैरे बरेच काही सांगितले. शेवटी म्हणाले की, ‘कुठलीही खरी क्रांती संघर्षातून दुःखातून आणि बलिदानातून उभी राहते व अशी क्रांती उभारण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचा मोठा प्रभाव होता.

प्रफुल्ल गांगुली, ज्योतिष घोष, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती, फणिंद्रनाथ घोष, आणि जतिंद्रनाथ दास यांनी कलकत्त्यात फार मोठे क्रांतिकारी कार्य केले’, असेही त्यांनी सांगितले. त्यातील एक स्वांतत्र्यसेनानी जतिंद्रनाथ दास हे आपली पूर्वीची अहिंसावृत्ती त्यागून कट्टर क्रांतिकारी बनले.

अशा या जतिंद्रनाथ दासांचे निधन १३ सप्टेंबर १९३० रोजी झाले. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना प्रणाम करून त्याबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊ.

जितेंद्रनाथाच्या मते पिस्तूल आणि बॉम्बची गाडी म्हणजे निव्वळ दहशतवाद होता आणि म्हणूनच त्यांनी तो मार्ग अव्हेरला होता. त्यांच्या मते समाजवादाच्या लढाईत दहशतवादापेक्षा समाजजागृती जास्त महत्त्वाची होती. हे कार्य चालू असतानाच क्रांतिवीर भगतसिंग यांच्या एचएसआरए म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीला प्रेरणा देण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता.

जतिंद्रनाथ आणि भगतसिंग यांचे सूर एकमेकांशी लवकरच जुळून आले होते. पण तरीही बॉम्बच्या उत्पादनाचे प्रशिक्षण भगत सिंगला द्यायला ते तयार नव्हते. त्यांच्या पार्टीने वैयक्तिक दहशतवाद घडविणाऱ्या साऱ्या कारवाया थांबविल्या होत्या. पण असे असूनही नंतर जतिंद्रनाथांचे मत बदलले.

ज्यावेळेस दुसऱ्या एका क्रांतिकारकाने त्यांना सांगितले की उच्चपदस्थ इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्यांमुळे तरुणांमध्ये शौर्याची व धैर्याची भावना वाढीस लागेल आणि अधिकाधिक तरुण क्रांतिकार्यात भाग घेतील. त्यावेळी दासांचे मत परिवर्तन झाले. ब्रिटिश अधिकारी दिवसेंदिवस कसे कठोर वागत होते याचीही जाणीव होऊन त्यांनी भगतसिंगाच्या कार्यास पाठिंबा दिला.

स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय असल्यांचे व त्यांच्या विरोधातील कटात सामील असल्याचे पुरावे ब्रिटिशांना मिळाल्यामुळे त्यांनी जतिंद्रनाथ दास यांची रवानगी तुरुंगात केली होती. तुरुंगातील कैद्यांच्या सुविधा आणि राहणीमान सुधारावे, यासाठी दासांनी उपोषणास सुरुवात केली होती.

तब्बल त्रेसष्ट दिवस त्यांचे उपोषण चालले होते. त्यांना एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळण्याइतकेसुद्धा त्राण उरले नव्हते. त्यांची जामिनावर सुटका करण्याची तयारी सरकारने दर्शविली. पण दासांनी ती अमान्य केली. प्रकृती खालावलेली असूनही त्यांनी अन्नाला स्पर्श करण्यास नकार दिला आणि १३ सप्टेंबर १९३० रोजी त्यांचे निधन झाले.

सुभाषचंद्र बोस यांनी जतिंद्रनाथांचे शव कलकत्त्यात आणण्यासाठी खर्च म्हणून सहाशे रुपये पाठवले. मुंबई, कलकत्ता आदीं भागातूनही लोकांनी पैसे पाठवले. मी एक भारतीय आहे आणि माझ्या शरीरावर बंगाली रीती रिवाजांनुसार केले जाणारे कोणतेही अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत हे त्यांचे शेवटचे उद्गार होते. जतिंद्रनाथांच्या मृत्यूने साऱ्या देशाला धक्का बसला. देशभक्त मंडळींना तर त्यांच्या कुटुंबातलाच एक गेल्याचे दुःख झाले.

जतिंद्रनाथ त्यांच्या तत्त्वापासून ढळले नाहीत. बलाढ्य इंग्रज सत्तेबरोबरच्या लढाईत ते निर्विवाद विजयी ठरले, याचे समाधान देशभक्तांना लाभले. जतिंद्रनाथांच्या मृत्यूची बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी उत्स्फूर्तपणे मुंडण केले आणि जतिंद्रनाथांचे शव ज्या रेल्वेतून नेले जाणार होते, त्यावेळेला त्या त्या स्टेशनवर लोक मुक्तपणे येऊन उभे राहिले होते.

हावडा स्टेशन आणि जवळपासच्या परिसरात अंदाजे सहा लाख लोक जमले होते. जतिंद्रनाथांच्या शवयात्रेला या लाखो लोकांच्या दुतर्फा गर्दीतूनच सुरुवात झाली. हुगली नदीच्या तीरावर ही यात्रा पोहोचायला तीन चार तास लागले.

शवयात्रेच्या साऱ्या मार्गावर फुले पसरली होती. ‘माझा पुत्रसुद्धा जतिंद्रनाथांसारखाच बनो’ अशा अर्थाची बंगाली भाषेतील भित्तिपत्रके सगळीकडे झळकली होती. जतिंद्रनाथांच्या भावाने चितेला अग्नी देताच हुंदक्यांनी सारा आसमंत भरून गेला. जतिंद्रनाथांच्या शवयात्रेचे वर्णन व्हाइसरॉयने लंडनमध्ये राष्ट्र सचिवांना कळवले. त्यात म्हटले होते, ‘कलकत्त्यातली ही मिरवणूक विक्रमी आकाराची होती, असे समजते. जवळजवळ पाच लाख लोक या शवयात्रेत सहभागी झाले असावेत.

Jatindranath Das death anniversary
Rabindranath Tagore: युद्ध आणि जागतिक शांततेबाबत रवींद्रनाथ टागोर यांचे विचार काय होते?

निःसंशय हा फारच मोठा जमाव होता. कित्येक ठिकाणी जतिंद्रनाथांना मानवंदना देण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी जाहीर सभा घेतल्या गेल्या. पण कुठेही शासनाबरोबर संघर्ष उडाल्याची खबर नाही.’ देशातल्या प्रत्येक मोठ्या नेत्याने जतिंद्रनाथांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याचा गौरव केला. मोहम्मद आलम आणि गोपीचंद भार्गव या दोन आमदारांनी निषेध म्हणून पंजाब विधानसभेचा राजीनामा दिला.

लाहोर तुरुंगातल्या कैद्यांबद्दलच्या सरकारी धोरणाचा निषेध म्हणून मोतीलाल नेहरूंनी संसद बरखास्त करावी, असा प्रस्ताव मांडला. जतिंद्रनाथांच्या मृत्यूने जणू क्रांतिवीरांना बल निर्माण केले ते अधिक वेगाने वाढू लागले व पुढे घडून येणाऱ्या अग्निदिव्यासाची तयारी झाली.

Jatindranath Das death anniversary
Bhagat Singh: भगतसिंग यांचे 'तरुण' आणि 'राजकारण' याबाबत काय विचार होते?

आता भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी जवळ येऊ लागली होती. २३ मार्च १९३१ रोजी या तीन नररत्नांना लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आले. जतिंद्रनाथांच्या अहिंसेतून प्रेरणा घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी जहाल बनलेल्या या सर्व हुतात्म्यांना व हर प्रकारच्या हालअपेष्टा आणि दुःखे तुरुंगात आणि तुरुंगाबाहेर सहन करीत, हसतमुखाने मृत्यूला सामोरे गेलेल्या स्वातंत्र्यवीरांना नतमस्तक होऊन नमस्कार करतो व जतिंद्रनाथ दासांसह सर्वांचे कार्य सर्वतोमुखी जावो असे इच्छितो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com