Janjira Fort: 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अभेद्य जलदुर्गास समुद्रमार्गे वेढा घातला होता; कान्होजी आंग्रे व अजिंक्य जंजिरा

Kanhoji Angre Janjira Fort: रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर हा किल्ला वसलेला आहे.
Janjira Fort History | Murud Janjira Fort Information | Maratha Siddhi Conflict
Janjira Fort History | Murud Janjira Fort Information | Maratha Siddhi ConflictDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करूनही अजिंक्य राहिलेला, अरबी समुद्रात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक असा अभेद्य किल्ला म्हणजे सुप्रसिद्घ जंजिरा किल्ला!

रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर हा किल्ला वसलेला आहे. याच किल्ल्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात.

जंजिरा (बेट) या अरबी शब्दावरून जंजिरा हे नाव रूढ झाले असावे असे मानले जाते. मराठाकालीन कागदपत्रांत क्वचित ‘हबसाण’ असाही याचा उल्लेख आढळतो. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिम खानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख सापडतो.

सिद्दी लोक पराक्रमी व लढवय्ये होते, त्याचबरोबर उत्तम खलाशी पण होते. अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात चाचेगिरी करण्याचा त्यांचा उद्योग होता. अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्ध झाले.

जंजिरा निजामशाहीच्या अखत्यारीत येण्यापूर्वीचा इतिहास उपलब्ध नाही. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारूंपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांनी या सुरक्षित बेटावर लाकडी मेढेकोट बांधला असा एक उल्लेख सापडतो.

बहामनी सुलतानांच्या कारकिर्दीत जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२-८३ दरम्यान किल्ल्याला वेढा दिला, पण यश मिळाले नाही. बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद या निजामशाहीच्या पहिल्या सुलतानाने १४९०मध्ये जंजिरा जिंकून कोळ्यांना ठार केले. जंजिरा किल्ल्याची डागडुजी करून याकूतखान या हबशी आरमार प्रमुखाच्या तो ताब्यात दिला व त्याने त्यास ‘मेहरुब’ (चंद्रकोर) हे नाव दिले.

उपलब्ध फार्सी शिलालेखात फाहिमखान याने १५७६-७७ दरम्यान किल्ला बांधल्याची नोंद आहे. पुढे १६००मध्ये मुघल बादशाह अकबराने अहमदनगर जिंकले व पुढे मलिक अंबरने (१५४९- १६२६) निजामशाहीचा बराच प्रदेश परत मिळविला.

१६१८मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी सिरुर (सुरुल) हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन त्याने स्वतःस जंजिरा संस्थानचा पहिला नबाब म्हणून जाहीर केले. त्यावेळी दंडा-राजपुरी हे मुख्यालय नबाबाच्या आधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोठाण्यापर्यंतचा मुलूख होता.

१६२१मध्ये सिद्दी अंबर नबाब झाला. मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत (१६३६) दंडा-राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानांकडेच होता. मोगलांनी जंजिऱ्यासकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्त केला व सिद्दी अंबर विजापूरचा सुभेदार बनला.

जंजिऱ्याच्या पूर्वेस रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र व उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत विस्तारले होते. त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापार व मक्केसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना होऊ लागला.

वझीर सिद्दी अंबर १६४६मध्ये मरण पावला. त्याच्या जागी सिद्दी युसुफ नबाब झाला. त्याच्या मृत्यूनंतर (१६५५) फतेहखान वझीर बनला. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले होते. पण यश आले नाही.

म्हणून १६७०मध्ये महाराजांनी जंजिऱ्यास समुद्रमार्गे वेढा घातला. पोर्तुगिजांनी सिद्दीस गुप्तपणे दारूगोळा पुरविला होता, तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्दी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला होता.

सिद्दी फतेहखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम व खैरियत सिद्दी यांनी विरोध करून फतेहखानास कैद केले व लढा चालू ठेवला. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारून मदत मागितली. सुरतच्या मोगल अधिकाऱ्याने ती दिली. पण.

औरंगजेबाने सिद्दी संबळ यास याकुतखॉं हा किताब दिला व त्यास सुरतच्या महालातून तीन लाखांची जहागीर दिली. त्यामुळे सिद्दी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्दीचे वर्चस्व सुरतपर्यंत प्रस्थापित झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजींनी १६८२मध्ये जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते जमले नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८९ रायगडसह अनेक किल्ले मोगलांच्या हाती आले.

कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमारातील अत्यंत पराक्रमी व धैर्यवान नेता होता. १६९४ ते ९८पर्यंत कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले. कान्होजी आंग्रेच्या मोहिमेचे मुख्य ध्येय संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या संघर्षात सिद्दीने बळकावलेला मराठा प्रदेश पुन्हा मिळविणे हे होते.

सिद्दी आणि पोर्तुगिजांनी कान्होजी आंग्रेच्या विरोधात मुघलांशी सलोखा केला; परंतु कान्होजीने यांचा पराभव केला. सिद्दी घराण्यातील सिद्दी सात हा गोवलकोट व अंजनवेल किल्ल्यांवर मुख्य प्रशासक होता. पुढे हुसेन सिद्दीनंतर (१७४५) सय्यद अल्लाना गादीवर आला.

Janjira Fort History | Murud Janjira Fort Information | Maratha Siddhi Conflict
Lingayat History: 'कलचुरी राजाचा मुख्य मंत्री असलेला बसव', यल्लम्मा आणि लिंगायत पंथाचा इतिहास

मराठ्यांविरुद्घ इंग्रज सतत सिद्दीस मदत करीत, तसेच गोव्याहून पोर्तुगीजही त्यांना दारूगोळा व शस्त्रसामग्री पुरवीत असत. तथापि या दोन्ही परकीय सत्तांना जंजिऱ्यावर वर्चस्व मिळविता आले नाही.. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) इंग्रजांनी जंजिऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करून १८३४मध्ये त्यास मांडलिक केले. तेथील टांकसाळ बंद केली.

सिद्दी मुहम्मद याने १८४८मध्ये राज्यत्याग करून सिद्दी इब्राहिम या मुलास गादीवर बसविले. इंग्रजांनी तेथील नबाबाला पदच्युत करून (१८६९) तिथे इंग्रज रेसिडेंट नेमला. पुढे नबाबाने इंग्रजांशी करारनामा केला तेव्हा त्याचे पद चालू ठेवले गेले. सिद्दी इब्राहिम खान १८७९मध्ये मरण पावला. त्याच्या तीन मुलांपैकी धाकट्या अल्पवयीन सिद्दी अहमद खान या मुलास इंग्रजांनी गादीवर बसविले.

Janjira Fort History | Murud Janjira Fort Information | Maratha Siddhi Conflict
Abbakka Devi History: पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधी सैन्याचे तंबू पेटवून दिले, 'राणी अब्बक्का'ने अग्निबाण वापरला; अज्ञात इतिहास

त्याने राजकोट व पुण्याला शिक्षण घेऊन सज्ञान झाल्यावर त्याच्याकडे इंग्रजांनी राज्यकारभार दिला. त्याने संस्थानात शाळा काढली. मुरुडचे जंगल तोडून रस्ते केले. १८९२मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ‘व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स’ ही योजना राबविली. शिवाय नगरपालिका आणि लोकल बोर्डाची स्थापना करून पायाभूत सुविधा निर्माण केल्या.

या त्याच्या कार्याविषयी ब्रिटिशांनी त्यास के. सी. आय. ई. हे बिरुद बहाल केले. त्यास ७०० लोकांचे संरक्षक दल ठेवण्याची मुभा दिली गेली. भारतीय स्वातंत्र्यानंतर १९४७ जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले व ते मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com