Drowning Cases: दूधसागर, म्हादई नदीपात्रात बुडून झालेले चटका लावणारे मृत्यू! तरुणाईसह प्रशासनाने जबाबदारीने वागण्याची गरज

Goa River Drowning Case: इशारे मदांधपणे न मानणारे युवक जसे जबाबदार आहेत, तसेच जिथे हवे तिथे सूचनाफलक व सुरक्षारक्षक न नेमणे यासाठी सरकारही जबाबदार आहे.
Drowning Case
Drowning CaseDainik Gomantak
Published on
Updated on

कोणतेही विधिनिषेध, सामाजिक जीवनात पाळावयाचे नियम धाब्यावर बसविण्याची बेपर्वाई दुर्घटनांना निमंत्रण देणारी ठरते. मागील चार दिवसांत दूधसागर आणि म्हादई नदीपात्रात बुडून तिघा युवकांचे झालेले मृत्यू चटका लावणारे आहेत. आंघोळीसाठी पाण्यात उतरण्याचा मोह पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुणांच्या जिवावर बेतला.

आनंदाच्या शोधात केलेली हलगर्जी कुटुंबीय, मित्रांना दुःखाच्या डोहात लोटून गेली. या घटनांनी उन्हाळ्यात संथपणे वाहणाऱ्या नद्याही हेलावल्या असाव्यात. माशे-काणकोण, धारबांदोडा व उस्ते-सत्तरी येथे तीन दुर्घटनांमध्ये जिवाला मुकलेले युवक २० ते २५ वयोगटातील आहेत.

मित्रांनी मिळून आंघोळीसाठी नदीपात्रात उतरणे हा तीनही घटनांमध्ये समान धागा. वीज, पाणी आणि अग्नीसोबत जिथे-जिथे संपर्क येईल, तेथे सावधगिरी बाळगावीच लागते. तेथे चुकीला माफी नाही. त्याचा जेव्हा विसर पडतो तेव्हाच अतिरेक होतो व दुर्घटना घडतात.

सध्या उष्‍म्‍याचे दिवस आहेत. सत्तरी, धारबांदोडासह बहुतांश तालुक्यांत तरुणांचे पाय नदीकिनारी वळत आहेत. पात्रात किती पाणी आहे, त्याचा अंदाज न घेताच आंघोळीला उतरण्याचा मोह होतो, देहभान हरपते. वास्तविक, प्रत्येकाने स्वत:च्या जिवाची काळजी घ्यायला हवी, परंतु तसे होत नाही हा उन्माद.

अशाच दुर्घटनांमुळे मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात राज्यातील धबधबे पर्यटक, स्थानिकांना बंद ठेवण्यात येतात. उन्हाळ्यात बुडण्याच्या घटना सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. असे प्रकार घडू नयेत, यासाठी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवर दबाव वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे.

प्रत्येक तालुक्यात नदी किनारी काही भाग धोकादायक म्हणून गणले गेले आहेत. त्याची स्थानिकांना पुरती माहिती आहे. अशा भागांत सध्या तरुणांचे जत्थे येत आहेत. त्यात पर्यटकही लक्षणीय आहेत. त्यांच्याकडून मद्यपान होते. मद्याच्या अमलाखाली पाण्याखाली जाण्याची जोखीम पत्करली जाते. वानगीदाखल उदाहरण - सोनाळ येथील ‘म्होवाचो गुणो’, ताकार-धावकोण, ओकांब-धारबांदोडा अशा भागांत मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला आढळतो.

तेथे आजतागायत अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तरीही तेथे जाण्यापासून अटकाव करण्याचा प्रयत्न होत नाही, हे दुर्दैव. पंचायतींनी पुढाकार घेऊन धोकादायक ठिकाणी मज्जाव करणारे फलक वा अन्य व्यवस्था उभारण्याची गरज आहे.

Drowning Case
Drowning Cases: चिंताजनक! गोव्यात 2 महिन्यात 15 जणांचा बुडून मृत्यू; पाण्यात उतरताना खबरदारी घेण्याची गरज

काही ठिकाणी रक्षक नेमावे लागतील. आंघोळीस उतरणाऱ्या युवकांवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही उपाययोजना नसल्यानेच मद्यपींचे फावते आहे. किर्लपाल-दाभाळ, धावकोण, मोले येथील ठरावीक भागांत बुडून मृत्यू नित्याचे बनले आहेत. अशी ठिकाणे प्रतिबंधित करावीच लागतील. मद्याच्या फोडलेल्या बाटल्या, जेवणासाठी केलेल्या चुली तशाच ठेवल्या जातात, हे गैरशिस्तीचे पुरावे आहेत.

दुर्घटना हाताबाहेर झाल्यावर सरकारला जाग येते. चिऱ्यांच्या बहुतांश खाणी बेकायदा आहेत. त्या पावसाळ्यात धोक्याच्या ठरतात. पेडण्यात अशाच चिरेखाणींत शाळकरी मुले बुडण्याची घटना आजही अनेकांना स्मरते. अनेक ठिकाणी स्थानिकांनी दिलेला इशाराही युवकांनी झिडकारल्याने त्याचे पर्यवसान मृत्यूत झाले आहे.

Drowning Case
Dudhsagar River: दूधसागर नदीत अंघोळीसाठी उतरला, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह; वास्कोतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

असे इशारे मदांधपणे न मानणारे युवक जसे जबाबदार आहेत, तसेच जिथे हवे तिथे सूचनाफलक व सुरक्षारक्षक न नेमणे यासाठी सरकारही जबाबदार आहे. सरकारने नियम घालणे व युवकांनी संयम पाळणे आवश्यक आहे. उमद्या आशाआकांशांचा एक-एक युवक अकाली काळाच्या पडद्याआड जाणे म्हणजे भविष्य साकारणार हात वर्तमानात कमी होणे. हे परवडणारे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com