
तेनसिंग रोद्गीगिश
परशुरामाने शस्त्र म्हणून कुर्हाड का वापरली याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न हा, ‘नावीन्य’ म्हणून थांबत नाही. गावकरी कुणी स्थापन केली, याबद्दल माहिती देणारे कोणतेही थेट स्रोत नाहीत. आम्हाला त्या प्राचीन संस्था समजून घेण्यास मदत करू शकतील, असे परिस्थितीजन्य पुरावे आम्ही शोधत आहोत.
सह्याद्री ओलांडून किनारी मैदाने वसवण्यासाठी दख्खनच्या क्षत्रियांचे नेतृत्व परशुरामाने केले होते, हे आमचे गृहीतक खरे ठरले ठरले, तर आपण गावकरी ही ग्रामव्यवस्था त्या समुदायाची निर्मिती होती का, हे जाणून घेऊ शकतो. हा दावा करण्यासाठी आपल्याकडे अद्याप पुरेसे पुरावे नाहीत. निश्चित भूमिका घेण्यासाठी आपल्याला गावकरी या रचनेचा अधिक अभ्यास करावा लागेल.
आजच्या लेखात आपण ‘भात लागवडीचा प्रसार’ या अशाच आणखी एका परिस्थितीजन्य पुराव्याची छाननी करू. किनारी भागांत किंवा जिथे गोडे व खारे पाणी एकत्र येते तिथे भात लागवडीसाठी सामुदायिक प्रयत्नांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते. ज्यासाठी योग्य संस्थांची निर्मिती आवश्यक असते. त्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचीदेखील आवश्यकता असते.
सह्याद्री कोकण किंवा दख्खनच्या पलीकडे असलेल्या शेतीबद्दल माहिती देणारे अनेक पुरातत्त्वीय, वनस्पतिशास्त्रीय अभ्यास आपण पाहिले आहेत. या प्रदेशात सुपीक गाळाचे मैदान नव्हते आणि दरवर्षी पाऊस पडत नव्हता.
लोक उडीद, मूग, कुळीथ, वाल, मसूर, वाटाणे आणि नाचणी अशी पिके घेत असत; भात लागवडीचा कोणताही मागमूस त्या भागांत सापडलेला नाही. (संदर्भ : दत्त, २००६: अ क्रिटिकल रिव्ह्यू ऑफ द इकॉनॉमी ऑफ ऑफ द चाल्कोलिथिक पीपल ऑफ इनामगाव, एन्शिअंट एशिया, खंड १, १२८). हा शोध साधारणपणे ७००० ईसापूर्व ते १६०० ईसापूर्व या कालावधीशी संबंधित आहे.
भारतात भात लागवडीची सुरुवात पूर्व उत्तर प्रदेशातील लाहुरादेवा येथे सुमारे ६००० ईसापूर्व झाली असावी असे मानले जाते. लाहुरादेवाशी संबंधित तांदूळ हा पूर्व आशियाई जापोनिका तांदळाचे उत्परिवर्तन आहे.
(संदर्भ : किंगवेल-बॅनहॅम एट अल, २०१५: अर्ली अॅग्रिकल्चर इन साउथ एशिया, द केंब्रिज वर्ल्ड हिस्ट्री, खंड २, २७३). ‘शिल्लक पुराव्यांवरून या प्रदेशात इंडिका तांदळाच्या लागवडीचा एक वेगळा उगम दिसून येतो; परंतु चीनमधून उत्तर भारतात भाताच्या जापोनिका जाती आणून त्या संकरित करेस्तोवर त्यांचा विकास व प्रसार पूर्ण झाला नाही’ (संदर्भ : फुलर, २०११: फाइंडिंग प्लान्ट डॉमिस्टिकेशन इन द इंडियन सबकॉन्टिनेंट, करन्ट अँथ्रोपॉलॉजी, खंड ५२, क्रमांक एस४, एस३५६).
जापोनिका तांदूळ कदाचित ६००० ईसापूर्वनंतर किरातांनी भारतात आणला असावा. गंगेच्या मैदानात क्षत्रियांचे स्थलांतर झाल्यानंतर गहू आणि बार्लीचे उत्पादन सुरू झाले. क्षत्रिय शेतकऱ्यांच्या गहू आणि बार्लीच्या शेतीत भातलागवड सुरू झाली. कदाचित हेच क्षत्रिय दख्खनमध्ये तांदूळ घेऊन गेले असतील. फुलरला सुमारे १९०० ईसापूर्व दख्खनमध्ये गहू आणि बार्ली असल्याचे पुरावे सापडले. (संदर्भ : फुलर एट अल, २०११: एस३४८).
या टप्प्यावर थोडीशी तफावत दिसते. इनामगाव उत्खननातून (पुण्यापासून ८९ किमी पूर्वेला) १६०० ते ७०० ईसापूर्व या कालावधीत मिळालेल्या माहितीवरून, दख्खन शेतीत तांदूळ, गहू आणि बार्ली नाही.
परंतु फुलरला १९०० ईसापूर्वपर्यंत दख्खनमध्ये गहू आणि बार्लीचे पुरावे सापडतात. तिन्ही पिकांसाठी अनुकूल हवामानाच्या गरजा लक्षात घेता, जर गहू आणि बार्ली आढळले तर तांदूळ निश्चितच तेथे असावा. इनामगाव डेटा आणि फुलरच्या निष्कर्षांमधील तफावत समजून घेताना, हे लक्षांत घेतले पाहिजे दख्खनमध्ये सर्वत्र हवामान एकसमान नाही.
सह्याद्रीचा पूर्व उतार आणि पूर्वेकडील दऱ्या आणि पलीकडे असलेले विशाल पठार यात असलेल्या हवामानाच्या फरकाचे वर्णन डेरेट करतात : हसन, कदूर आणि शिमोगा जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील भागात आता ३०० इंच पाऊस पडतो, तर मान्सूनचे ढग ६,००० फूट उंची सोडून पठारावर प्रवेश करतात तेव्हा ही पातळी झपाट्याने कमी होते. सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या ६० मैलांच्या आत कमाल ४० इंच आणि किमान २५ इंच पाऊस पडतो.
त्यानुसार, पूर्वेकडील जिल्ह्यांतील शेतकरी विहिरी आणि हंगामी ओढ्यांच्या पाण्यावर एकही पीक घेऊ शकत नव्हता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पूर्व म्हैसूरला पाणी देणाऱ्या ईशान्य मान्सूनचा पाऊस न पडल्यास दुष्काळाचा सामना करावा लागत होता.
परंतु, पश्चिमेकडील स्थलांतरित - जो एकेकाळी लागवडीसाठी जंगलतोड करत होता तो - तुलनेने कमी श्रमात दोन किंवा त्याहून अधिक पिके घेऊ शकत होता. अगदी पूर्वेकडील लोकांसारखे सिंचन प्रणालीवर अवलंबून न राहताही! (संदर्भ : डेरेट, १९५७: द होयसळ, ६). इनामगाव समुद्रापासून २०० किमी अंतरावर एका शुष्क पठाराच्या मध्यभागी असताना, फुलर कदाचित सह्याद्रीच्या ओल्या उतारांवर किंवा त्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या गाळाच्या खोऱ्यांवरील शेतीबद्दल बोलत असावा.
आजही, सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या खोऱ्यांमध्ये आणि पठारातून जाणाऱ्या नद्यांच्या गाळाच्या खोऱ्यांमध्ये भाताची लागवड केली जाते. परंतु दख्खनच्या उर्वरित भागात हे चित्र फारच दुर्मीळ आहे. हे लक्षांत घेतल्यास द्वीपकल्पात भात लागवडीचा प्रारंभ शोधताना होणारा गोंधळ दूर होऊ शकतो.
दख्खनमधील हवामानाचे वैविध्य पाहता, मानवी वस्तीमध्येही विविधता असू शकते असे गृहीत धरणे वाजवी आहे. जरी आदिवासी लोक दख्खनमध्ये कमी-अधिक प्रमाणात एकसारखे पसरले असले तरीही क्षत्रियांनी तसे केले नसावे. त्यांनी निवड करण्याचे धोरण स्वीकारले असेल.
‘...पश्चिमेकडील स्थलांतरित - जो एकेकाळी लागवडीसाठी जंगलतोड करत होता तो..’ हे डेरेटचे विधान, पूर्वेकडील शुष्क पठारापासून पश्चिमेकडील चांगले उत्पन्न देणाऱ्या दऱ्यांकडे लोकांचे स्थलांतर झाले आणि त्यांनी जंगले तोडून तिथे लागवड केली याकडे तर इशारा करत नाही ना? भूप्रदेश, माती आणि पाण्याच्या उपलब्धतेतील हा फरक क्षत्रियांच्या निवड करण्याच्या धोरणास तर कारणीभूत ठरला नसेल?
खास करून ते गाळाचे मैदान, मुबलक पाणी आणि अनुकूल हवामान असतानाही त्यांनी स्थलांतर केले, ही बाब लक्षांत घेण्यासारखी आहे. क्षत्रियांनी स्थायिक होण्यासाठी आणि आदिवासींमध्ये मिसळण्यासाठी निवडलेल्या क्षेत्रांची व्यापक ओळख पटवता आली तर ते उपयुक्त ठरेल. अर्थात ते एवढे सोपे नाही; परंतु आपल्याला दख्खन क्षत्रियांचे स्थलांतराची कारणे सांगणारे अन्य पुरावे शोधावे लागतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.