Decision Making Skills: निर्णय घेताय? थोडं थांबा, आधी स्वतःला विचारा हा एक प्रश्न!

Avoid Hasty Decisions: काळ कोणासाठी थांबत नाही आणि निसटलेली संधी पुन्हा हातात येईलच असे नाही.
Avoid Hasty Decisions
Decision Making SkillsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सुलक्षा गावस

काळ कोणासाठी थांबत नाही आणि निसटलेली संधी पुन्हा हातात येईलच असे नाही. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक धैर्य आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही तितकीच महत्वाची असते. चुकला एखादा अंदाज तर स्वतःला माफ करून पुढची वाट शोधण्याइतका मनाचा मोठेपणा हा गुंता सोडवण्यास मदत करतो.

एका मुलांच्या गटाबरोबर चर्चा सत्रासाठी गेले होते. त्यांच्या शिक्षिकेच्या मोबाईलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. आजच्या मुलांची नाळ जन्मापासूनच या तांत्रिक उपकरणांशी जोडलेली, त्यामुळे त्यातील एका मुलाने शिक्षिकेला काही उपाय सुचवले. बघू या, काही मार्ग निघतो का, या विचाराने शिक्षिकेनेही मुलांच्या सल्ल्याला संमती दिली.त्या चमूने मोबाईल कसा तरी चालता बोलता केला आणि रीसेट करण्याचा सल्ला दिला. बंद पडलेला मोबाईल पुन्हा सुरू झाल्याने शिक्षिकेला हायसे वाटले. त्या पटकन म्हणाल्या, ‘काहीही करा, पण हे यंत्र पुन्हा व्यवस्थित चालू करा’.त्यावर त्या गटातील एका मुलाने सहजपणे म्हटलेले वाक्य मात्र विचार करायला लावणारे होते.

Avoid Hasty Decisions
Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

‘टीचर, आपण टेन्शनमध्ये असताना घाईघाईने आणि विचार न करता निर्णय घेतो. त्यामुळे निर्णय घेण्याची घाई करू नका’.त्या मुलाच्या या वाक्यात केवळ समजूतदारपणा नव्हता, तर त्याच्या भावनिक बुद्धिमत्तेचीही प्रगल्भता दिसून येत होती. खरंच, बंद पडलेले यंत्र सुरू करण्याच्या घाईत शिक्षिकेने मोबाईल मधील सगळा डेटा गमावला तरी चालेल, असे गृहीत धरले होते. पण पुढे त्यातून नेमके काय गमावले गेले आहे, याची जाणीव झाल्यावर मनाला रुखरुख लागली असती. म्हणजेच, त्या क्षणाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी घेतलेला निर्णय नंतर पश्चात्तापाचे कारण ठरू शकला असता.

आपल्या रोजच्या जगण्यात असे अनेक निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. कोणता ड्रेस घालावा? मित्रांना काय सांगावे? कोणती शाखा निवडावी? एखाद्या गोष्टीला होकार द्यावा की नकार? काही निर्णय अगदी छोटे असतात, तर काही आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. काही वेळी मनाची द्विधा अवस्था होते. आपण चार माणसांचा सल्ला घेतो, परिस्थितीचा अंदाज घेतो आणि उपलब्ध वेळ व मनावरील ताण लक्षात घेऊन निर्णयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आपल्याशी जोडलेल्या व्यक्तींचा विचार आपण एखादा निर्णय घेताना करतो.

काही निर्णय मनात नसतानाही परिस्थतीपुढे नमते घेण्यापुरते घेतो.मात्र, एखादा चुकीचा निर्णय कधी कधी आयुष्यभराची जखम देऊन जातो. नाती दुरावतात, आर्थिक नुकसान सोसावे लागते किंवा मनात कायमची सल निर्माण होते. त्यामुळे निर्णय घेणे ही केवळ एखादा पर्याय निवडण्याची प्रक्रिया नसून त्याचे परिणाम स्वीकारण्याचीही तयारी असते. पूर्वग्रह, भावनेच्या भरात केलेला विचार, अपुरी माहिती किंवा परिस्थितीचा चुकीचा अंदाज आपल्याला गोत्यात आणू शकतो. आपल्या भावना, निर्णय घेण्याची निकड, संसाधनांचा अभाव आणि माहितीची अपूर्णता या गोष्टी सुयोग्य निर्णय घेण्याच्या आड येतात. रोजच्या छोट्या-मोठ्या निर्णयांसाठी आपल्याकडे अनुभवाची पुंजी असते. त्यामुळे ते निर्णय सहजपणे घेतले जातात. परंतु एखादी नवखी परिस्थिती किंवा अपरिचित विषय समोर आला की आपण गोंधळून जातो. अशावेळी घाईघाईने घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता अधिक असते.

अपरिचित विषयाबाबत निर्णय घेताना इतरांनी आपल्यासाठी घेतलेल्या निर्णयावर विसंबून राहण्यापेक्षा त्या विषयातील तज्ज्ञ किंवा जाणकार व्यक्तीचे मत जाणून घेणे योग्य ठरते. मात्र, त्यांचे मत हाच अंतिम निकष न मानता, ते आपल्या परिस्थितीला कितपत लागू पडते, याची पडताळणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपले अंदाज, मनाचा कौल आणि उपलब्ध माहिती यांची वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारे तपासणी केली, तर मनातील साशंकता कमी होण्यास मदत होते.

Avoid Hasty Decisions
Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

भावनेच्या आहारी जाऊन किंवा अर्धवट माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय एकांगी ठरू शकतो. त्याचप्रमाणे खूप विचार करत राहिल्यानंतर मानसिक थकवा जाणवू लागतो. अशा वेळी समोर असलेला एखादा पर्याय स्वीकारून मोकळे व्हावे, असे मनाला वाटू लागते. आपल्या आधीच्याच विचारांशी जुळणारी माहिती आपण स्वीकारतो आणि विरोधी माहिती नकळत बाजूला सारतो. यालाच पुष्टीकरणाचा पूर्वग्रह (Confirmation Bias) म्हणतात. अशा वेळी अधिक चांगले पर्याय आपल्या नजरेतून सुटण्याची शक्यता असते.

सुयोग्य आणि प्रत्येक परिस्थितीत यशस्वी ठरेल असा निर्णय घेणे कदाचित शक्य नसते. मात्र, निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे-तोटे विवेकाने तपासता येतात. आपली बलस्थाने, मर्यादा आणि उपलब्ध संसाधने यांचा विचार करून समोरील पर्यायांचा प्राधान्यक्रम ठरवावा. आपल्या निर्णयाचा स्वतःवर तसेच इतरांवर काय परिणाम होणार आहे, याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्वकेंद्रित विचार काही काळा पुरता सुखावणारा असला तरी पुढे त्याच्यातील उणीव जाणवू लागतात आणि यातना होतात. एखादा निर्णय फार काळ चालढकल करत आपण योग्य संधी, फार गणिताची योग्य जुळवा जुळव करत राहिलो तर तो बहुमोल क्षण हातातून सहज निसटून जातो आणि खंत तेवढी मनात घर करून राहते.

निर्णय घेण्यापेक्षा तो पुढे ढकलणे सोपे वाटते. पण प्रत्येक वेळी थांबणेही योग्य नसते. कारण काही संधी पुन्हा मिळतीलच याची खात्री नसते. काळ कोणासाठी थांबत नाही आणि निसटलेली संधी पुन्हा हातात येईलच असे नाही. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक धैर्य आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही तितकीच महत्वाची असते. चुकला एखादा अंदाज तर स्वतःला माफ करून पुढची वाट शोधण्या इतका मनाचा मोठेपणा हा गुंता सोडवण्यास मदत करतो. प्रत्येक निर्णय परिपूर्ण असेलच असे नाही; पण तो विचारपूर्वक, जाणीवपूर्वक आणि जबाबदारी स्वीकारून घेतलेला असावा. निर्णय घेतल्यानंतर सतत खंत किंवा भीतीच्या सावलीत जगण्यापेक्षा सारासार विचार करण्यासाठी वेळ घ्यावा. म्हणूनच, एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा... मी हा निर्णय शांत मनाने घेत आहे की त्या क्षणाच्या भावनेच्या आहारी जाऊन?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.