History of Bread: 14000 वर्षांपूर्वी बनलेला पाव, रुजला गोमंतकीयांच्या खाद्यसंस्कृतीत; जगभरात त्याचे किती आहेत प्रकार? वाचा..

Types of bread worldwide: पाव - ब्रेड हा जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वाधिक वापरला जाणारा खाद्यपदार्थ. धान्य दळून, त्याचे पीठ मळून, भाजून तयार होणारा हा साधा पदार्थ.
History of bread | Types of bread worldwide
History of bread | Types of bread worldwideDainik Gomantak
Published on
Updated on

एका साध्या वाटणाऱ्या तुकड्याने अनेक देशांचा इतिहास, संस्कृती आणि पाककलेचा प्रवास घडवला. म्हणूनच पाव - ब्रेड हा केवळ खाद्यपदार्थ नसून मानवी संस्कृतीचा समान धागा बनला आहे. जगभर कुठेही जा सहजपणे उपलब्ध असणारा एकमेव पदार्थ म्हणून याकडे बघितले जाते.

पाव - ब्रेड हा जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वाधिक वापरला जाणारा खाद्यपदार्थ. धान्य दळून, त्याचे पीठ मळून, भाजून तयार होणारा हा साधा पदार्थ; परंतु विविध संस्कृतींमध्ये तो असंख्य रूपात आढळतो. शहरी असो वा ग्रामीण, श्रीमंत असो वा सामान्य, पाव -ब्रेडने जवळजवळ यातील प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. या ब्रेडची जादू यीस्टमुळे घडते.

यीस्ट पीठातील साखर खाऊन कार्बन डायऑक्साइड तयार करते आणि त्यामुळे पीठ फुगते. म्हणजेच याचे ‘फर्मेंटेशन’ होते. नंतर गरम ओव्हनच्या उष्णतेत पीठाचा आकार स्थिर होत जातो, जसजसा पिठाचा गोळा फुगत जातो तसे वर कुरकुरीत कवच तयार होऊ लागते आणि आतून मऊ, छिद्रयुक्त पाव तयार होतो.

बाजारात सहज उपलब्ध असला तरी अनेक गृहिणी, बेकरी व्यावसायिक, स्वयंपाकप्रेमींनी सध्या घरगुती पाव बनवणे स्वीकारले आहे. स्वच्छ घटक, कमी प्रिझर्वेटिव्ह आणि हवी तशी रचना, आकार करता येत असल्यामुळे घरगुती पाव तयार करण्याची लोकप्रियता वाढत आहे.

ब्रेड बनवण्याचा इतिहास

ब्रेड बनवण्याचा इतिहास प्राचीन दगडांच्या चुलीपासून ते आधुनिक बेकरींपर्यंत येऊन पोहोचला आहे. ब्रेड हा मानवजातीला ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या आणि सर्वात सार्वत्रिक अन्नांपैकी एक प्रकार मानला जातो. ब्रेडच्या निर्मितीची कहाणी मानवी उत्क्रांतीची कहाणीदेखील आहे. शेतकऱ्यांपासून ते पीठ मळणाऱ्या बायकांपर्यंत, मातीच्या ओव्हनपासून ते औद्योगिक बेकरींपर्यंत ब्रेड तयार करण्याची प्रक्रिया विकसित होत गेली आहे.

ब्रेड निर्मितीच्या उगमापाशी गेल्यास आपल्याला आश्चर्य करणाऱ्या गोष्टी सापडतात. सुमारे १२,०००- १०,००० इ.स पूर्वी याची मुळं सापडतात. ब्रेडचे सर्वात जुने पुरावे ईशान्य जॉर्डनमधील ‘नॅटुफियन’ पुरातत्त्वीय स्थळावरून मिळतात, जिथे १४,००० वर्षांपूर्वीचे फ्लॅटब्रेडचे जळलेले तुकडे सापडले.

हे सुरुवातीचे मानव अद्याप शेतकरी नव्हते - ते ‘इनकॉर्न, बार्ली आणि बाजरी’सारखे त्यावेळी जंगली समजले जाणारे धान्य वापरत असत. प्राचीन काळात ब्रेड तयार करताना कदाचित धान्य दगडांनी कुस्करले गेले असेल.

पाण्यात मिसळून त्याचा गोळा तयार गेला असेल. गरम दगडांवर किंवा गवतावर तो भाजला गेला असू शकतो. या पिठाच्या गोळ्याने जगभर वेगवेगळ्या देशात विविध प्रकारचे रंगरूप - चव, आकार घेतले यावरून असे दिसून येते की भाकरी बनवण्याची सुरुवात शेतीपद्धत सुरू होण्यापूर्वी झाली असावी. कदाचित शेतीकडे वळण्यास यातूनच प्रेरणा मिळाली असेल.

जगभरातील ब्रेडचे प्रकार

बॅगेट (फ्रान्स) - लांब, पातळ आणि कुरकुरीत बाह्यभाग हा याचा वैशिष्ट्यपूर्ण भाग. सूप किंवा चीजसोबत हा उत्तम लागतो.

साराडोह (अमेरिका-युरोप) - नैसर्गिक किण्वनामुळे येणारी हलकी आंबट चव आणि जाड कवच यासाठी हा ओळखला जातो.

नान, पाव आणि पराठा - भारतात मैदा, गव्हाचे पीठ, दही किंवा दूध वापरून तयार होणारे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राचा पाव तर आता जागतिक पातळीवर ओळखला जातो. गोव्यातच कितीतरी प्रकारचे पाव मिळतात. ज्याचा आपण दैनंदिन आहारात उपयोग करतो.

पिटा (मध्यपूर्व देश)- भाजल्यावर मध्ये तयार होणाऱ्या पॉकेटमुळे सँडविचसाठी हा उत्तम पर्याय.

दक्षिण आशियाई देशांत ‘बाओ’ नावाचा भाजलेला नव्हे तर उकडलेल्या पावाची निर्मिती झाली. आशियाई ब्रेड- पावने आपले वेगळेपण जपले.

History of bread | Types of bread worldwide
Goan Poi: ‘पोळी नाही दिली?’ असे विचारताच पोदेराने गोलाकार पाव काढून हातावर ठेवला; गोव्याचे पारंपरिक देणे

आणि सध्या सर्वात जास्त मागणी असलेला मल्टीग्रेन आणि हेल्दी ब्रेड्स- ओट्स, नाचणी - रागी, फ्लॅक्ससीड यांसारख्या घटकांमुळे पोषणमूल्य वाढते आणि आजच्या आरोग्य-जागरूक ग्राहकांमध्ये त्यांची मागणी जास्त आहे.

History of bread | Types of bread worldwide
Goan bread: पोर्तुगीज गेले मात्र 'पोदेर' इथल्या मातीत रुजून गेलाय; घराघरांत हक्काची जागा मिळवलेल्या 'पावाची' खरपूस गोष्ट

आजच्या जीवनशैलीत ब्रेडचे स्थान

वेगवान जीवनशैलीत ब्रेड हा झटपट, सोपा आणि किफायतशीर पर्याय ठरतो. सँडविच, टोस्ट, रोल्स, पावभाजी, वडा पाव, मिसळ यांसारखे अनेक भारतीय खाद्यपदार्थ ब्रेडशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. शिवाय लहान बेकरी आणि घरगुती उद्योजकांसाठी ब्रेड बनवणे हा उत्तम व्यवसायाचा मार्ग ठरत आहे. कमी गुंतवणूक, रोजची मागणी आणि प्रशिक्षणाची उपलब्धता यामुळे विशेषतः महिलांसाठीदेखील हा उपजीविकेसाठी उत्तम मार्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com