
आपण आपला वारसा विसरलात, तर बाहेरून आलेली संस्कृती तुमची मूळ ओळख पुसून टाकेल. म्हणूनच वारसा म्हणजे काय, हे आधी समजून घेतलं पाहिजे. वारसा म्हणजे फक्त धार्मिक रचना किंवा दगडी स्मारक नाही तर स्वयंपाक करण्याच्या पद्धती, शेतीचे तंत्र, आपल्या दैनंदिन जीवनशैली, आपल्या परंपरा व संस्कृती या गोष्टी देखील त्याचा भाग आहेत. आपल्या या मुळांकडे आपण दुर्लक्ष केल्यास आपली ओळख नष्ट होऊ शकते.
गोव्यातील सांस्कृतिक विसंगतीची ठळक उदाहरणं म्हणून सांतिनेज स्मशानभूमीजवळ असलेल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या कोरलेल्या दगडाकडे मी निर्देश करू शकतो. हा दगड आजही दुर्लक्षित आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात, पण त्यांना गोव्याच्या इतिहासाची खरी माहिती देणारी पुस्तिका किंवा त्यांना मिळणारे प्रामाणिक मार्गदर्शन यांचे प्रमाण खूप कमी आहे. गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे समजून घेताना १५१० साली घडलेल्या एका प्रसंगाचा दाखला रोचक असा आहे.
या प्रसंगात पोर्तुगीज लोक समुद्रात जवळजवळ बुडाले होते. त्यावेळी ताळगांवच्या शेतकऱ्यांनी भाताच्या पोती देऊन त्यांना वाचवलं. त्यातून सुरू झालेली परंपरा आजही पिकांच्या हंगामात सुरू आहे- २१ऑगस्टला जेव्हा शेतकरी पिकांची कापणी करतात, तेव्हा त्यातील पहिले भात सेंट मायकल चर्च, से कॅथड्रल, गोव्याचे आर्चबिशप आणि राज्यपाल यांना अर्पण केले जाते.
नैसर्गिक वारशाचा उल्लेख येतो तेव्हा गोव्याचा राज्यपक्षी फ्लेम-थ्रोटेड बुलबुल आणि राज्यवृक्ष टर्मिनालिया एलिप्टिका (क्रोकोडाइल बार्क ट्री) यांचा दाखला आपण लक्षात घेतला पाहिजे. जर तुम्ही घाटात अडकलात आणि पाण्याची कमतरता भासली, तर या झाडाच्या खोडाला छिद्र पाडले तर आत पाणी मिळेल- अगदी बाओबाब झाडासारखे, जे हजारो वर्षं जगते आणि संपूर्ण जमातींना पाणी पुरवते.
पणजीतील इमॅक्युलेट कन्सेप्शन या चर्चच्या वास्तूमध्ये वर्षानुवर्षे बदल झालेले आहेत. तिथली मोठी घंटा मूळ सेंट ऑगस्टिनच्या कॉन्व्हेंटमध्ये होती. २,२५० किलो वजनाची ही घंटा गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाची जड घंटा आहे. १९३४ मध्ये तिचा मुख्य दर्शनी भाग कोसळल्यानंतर ही घंटा आग्वाद किल्ल्यात नेली गेली आणि जहाजांना इशारा देण्यासाठी तिचा वापर होऊ लागला. तिथले दीपगृह आधुनिक झाल्यानंतर ती पणजीला आणून चर्चच्या मनोऱ्यावर बसवली गेली.
आपल्या वारशासंबंधी आपण जाणून अशासाठी घेतले पाहिजे की जर आपली मुळं मजबूत नसतील तर तुम्हाला ना चांगले झाड मिळेल, ना चांगली फळे. आपला वारसा हा आपल्याच आयुष्याचा भाग आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. ठोस स्मारक असो किंवा परंपरा, दोन्हींचं रक्षण त्यासाठीच उत्कटतेने व्हायला हवे.
(क्लब टेनिस दे गॅस्पर डायस आयोजित शताब्दी व्याख्यान मालिकेतील ‘अननोन गोवा, अननोन गोंयकार’ या विषयावरील व्याख्यानातून)
संजीव सरदेसाई
इतिहास अभ्यासक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.